एक चमत्कारच !

About Power Of God


एक चमत्कारच!


\"स्मृती\" / \"आठवण\" ही मानवाला मिळालेली खूप मोठी देणगीचं आहे. यामुळेच तर आयुष्यातले अनेक चांगले क्षण,प्रसंग आपण आठवू शकतो.त्यांचा आनंद घेऊ
शकतो.चांगले क्षण,प्रसंग तर आपल्या लक्षात राहतात किंवा आपण मुद्दामहून लक्षात ठेवतो.पण काही वेळेस नको वाटणारे,मनाला त्रास देणारेही क्षण,प्रसंग नकळत लक्षात राहून जातात. वाईट प्रसंग आनंद देत नाही पण आपल्याला खूप काही शिकवून जातात.


आयुष्यात असे अनेक चांगले व वाईट क्षण ,प्रसंग येतात आणि जातात पण त्यातील काही अविस्मरणीय राहतात.
शाळेचा पहिला दिवस, शाळेत मिळालेले यश, शाळेचा शेवटचा दिवस. मैत्री,प्रेम यातील कितीतरी आठवणी, नोकरीचा पहिला दिवस, लग्न, आई-बाबा होणे, पुरस्कार, यश मिळणे इ. असे अनेक आनंद देणारे चांगले प्रसंग .
आणि
जीवनात आलेले अपयश, इतरांकडून आपला झालेला अपमान, जीवलग लोकांचे जाणे. असे अनेक त्रास देणारे वाईट प्रसंग.

चांगल्या प्रसंगाचा तर आपल्या जीवनावर चांगलाच परिणाम होतो. वाईट प्रसंगामुळे त्रास तर होतोच पण त्यातून सकारात्मक बाजूने विचार करून जीवनावर चांगलाच परिणाम करणे म्हणजेच खरे आयुष्य जगणे होय!


माझ्या आयुष्यातही असे अनेक चांगले, वाईट प्रसंग आले ; जे अविस्मरणीय ठरले. त्यातील एक प्रसंग --


बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या चार धाम यात्रेला जाण्याच्या 8,10 दिवस अगोदर मी,माझा मुलगा व माझे मिस्टर आम्ही आजारी पडलो. व्हायरल इन्फेक्शन झाले होते. त्या दोघांना 3,4 दिवसात बरे वाटायला लागले पण मला बरे वाटत नव्हते ,त्रास होत होता. माझी तब्येत बघता यात्रेला जाण्याचे कॅन्सल करावे की काय ? असे वाटायला लागले होते. पण यात्रेला जाण्यासाठी दोन दिवस अगोदर मला थोडे बरे वाटायला लागले. शरीर नाही म्हणत होते पण मनाने तयारी केली जाण्यासाठी...

या यात्रेविषयी लोकांकडून ऐकलेले होते. यात्रा खूप अवघड असते, दरड कोसळतात, ढगफुटी होते, परत येऊ का ? याची शाश्वती नसते. अशा अनेक गोष्टी ज्यामुळे आपल्याला या यात्रेला जावे की नाही ? हा प्रश्न मनात येतो.पण विचार केला की, मृत्यू येणारच असेल तर घरी असताना ही येऊ शकतो. प्रवास करताना अपघात होत असतात मग आपण प्रवास करत नाही का ?
त्यामुळे जे होईल ते परमेश्वराची इच्छा! असे समजून आम्ही यात्रेला निघालो.

हरिद्वारला ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो,तिथे काही भाविक भेटले; जे यात्रा करून घरी परतत होते.

\" खूप खडतर प्रवास आहे, रोजच एकदोन अपघात होतच आहेत. आमच्या समोर आम्ही लोकांना मरताना पाहिले . \"

त्यांनी असे जेव्हा सांगितले ते ऐकून तर पुढे जाऊच नये . असे एका क्षणी वाटून गेले.

मनात भीती होती तरी आम्ही पुढे यात्रेला जाण्यास ठरविले.


आकाशाला भिडत असणारे उंचच उंच पर्वत, खोल दऱ्या, खळखळ वाहणाऱ्या नद्या, हिरवीगार झाडे ही सर्व निसर्गाची किमया डोळ्यांना, मनाला सुखावत होती. तर दुसरीकडे जीव मुठीत धरून प्रवास करीत होतो. रस्ते म्हणजे घाटच होते. एका बाजूला केव्हाही दरड कोसळण्याची शक्यता आणि दुसऱ्या बाजूला ड्रायव्हरच्या छोट्याशा चुकीमुळे गाडी खोल दरीत जाण्याची भीती. त्यामुळे कितीही घाबरायचे नाही म्हटले तरी , असा जीवघेणा प्रवास पाहून मनात धडकी भरायचीच.



यमुनोत्रीला जाताना चढून जावे लागते. घोडे,पिट्टू,डोली होती जाण्यासाठी. पण आम्ही नयनरम्य निसर्गाचा आनंद घेत घेत पायीच चढलो आणि उतरलोही.

यमुनोत्री नंतर गंगोत्रीचे ही छान दर्शन झाले.
गंगोत्रीला जाण्यासाठी चढावे लागत नाही.

यमुनोत्री, गंगोत्री येथे आम्हांला कुठेच पाऊस लागला नाही. केदारनाथला जाण्यासाठी आम्ही एका जवळच्या गावात मुक्काम केला. आणि रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली.


थंडी होती म्हणून गरम कपडे आणि पाऊस पडत होता म्हणून त्यावर रेनकोट अशी तयारी करून दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही केदारनाथकडे जाण्यास निघालो.

एरव्ही गौरीकुंडापर्यंत जाण्यासाठी छोट्या गाड्या असतात. पण आदल्या दिवशी गाडीवर दरड कोसळून खूप मोठा अपघात झालेला असल्याने, गाड्या बंद केलेल्या होत्या.त्यामुळे गौरीकुंडापर्यंत आम्ही पायी जात होतो.
आदल्या दिवशीच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथील पोलीस यंत्रणा जाणाऱ्या लोकांना सूचना देत होती. अनेक जण भीतीपोटी अर्ध्या रस्त्यातून परतत होते आणि इतरांना ही पुढे जाऊ नका असे सांगत होते. आम्हांलाही अनेकांनी परतण्यास सांगितले.
आम्ही ज्या ग्रुप बरोबर यात्रा करत होतो.त्यातील जे मुख्य होते त्यांनी सांगितले, \" जे होईल ते परमेश्वराची इच्छा, इथपर्यंत आलो आहोत तर दर्शन घेऊनच परत येवू.\" त्यामुळे लहान मुलांपासून ते 75 वर्षांच्या आजी - आजोबा पर्यंतचे
सर्व तयार झाले.
हा 9,10 किमीचा प्रवास आम्ही करीत असताना, आमचे ग्रुपमधील लोक मागेपुढेच चालत होते. पण काही चालण्यात चांगले होते, ते भरभर चालून पुढे जात होते. तर काही आपल्या क्षमतेनुसार हळूहळू चालत होते.
मी, माझे मिस्टर व आमच्या बरोबरचे 4,5 जण चालत असताना , आमच्या पुढेचं अगदी काही पाऊलेच पुढे..वरून दरड कोसळली. क्षणाच्या फरकाने आम्ही वाचलो. आम्ही पुढे असतो तर ...काय झाले असते ? नुसत्या विचारानेच मन कापरं होतं.

गौरीकुंड येथे आम्ही सर्व एका ठिकाणी थांबलो . आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि आम्ही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता खराब हवामानामुळे अनिश्चित वेळेसाठी बंद करण्यात आला होता.अशी सूचना ऐकली. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला . प्रत्येकाला वाटत होते , आपण रस्त्यात अडकलो वगैरे नाही. इथपर्यंत तरी आपण सर्व व्यवस्थित आलो.
तेथे आमच्या ग्रुपचे सर्व एकत्र आलो. तेव्हा कळाले की, माझा मुलगा ,त्याचे मित्र आणि अजून एकदोन जण हे चालत येत होते तेव्हा ; ते पुढे सरकलेच असतील तेवढ्यात मागे दरड कोसळली.
त्यांनी व आम्ही ही मृत्यू जवळून पाहिला, असे वाटले. \"काळ आला होता ,पण वेळ आली नव्हती \" असेचं म्हणावे लागले.

पुढचा प्रवास घोड्यावर करायचा होता. ते घोडेही मागेपुढे चालत होते. त्यामुळे सर्व सोबत नव्हते. माझा व माझ्या मुलाचा घोडा जोडीचा होता. त्यामुळे एवढे तरी की आम्ही दोघे एकमेकांना सोबत होतो.
मुळात रस्ता इतका कठीण,अपघाती वळण, जीव घेणाऱ्या दऱ्या आणि त्यात एकसारखा कोसळणारा पाऊस , गरम कपडे घातले असूनही वाजणारी कडाक्याची थंडी त्यामुळे अंग थरथरत होते.
मनाला देवाच्या दर्शनाची आतुरता लागलेली होती ,त्यामुळे अशी सर्व संकटे पार करत पुढे जात होतो.
मन तर भीतीने धास्तावलेले होतेच पण मनाला आजूबाजूचा निसर्ग ही भुरळ घालत होता. काय ते निसर्गाचे नयनरम्य दृश्य ! जणू जिंवतपणीच स्वर्ग पाहण्याचा आनंद !
ते पाहून डोळ्यांना,मनाला जे समाधान मिळाले त्याचे वर्णन शब्दांत करणे अशक्यच! तो आनंदाचा अनुभव स्वतः घेतल्याशिवाय कळणार नाही.

घोडे जिथे उतरवतात , तिथून अजून दोन किमी पायी चालावे लागणार होते. मंदिर 3 वाजता बंद होणार होते म्हणून आम्ही सर्व लवकर जाण्यासाठी प्रयत्न करत होतो. गरम कपडे, रेनकोट असूनही आम्ही भिजलेलो होतो आणि थंडीने हातपाय इतके गारठले होते की एक पाऊल टाकणेही जीवावर येत होते. तोंडातून तर शब्दही निघत नव्हता.
तरीही सर्व शक्ती पणाला लावून, देवाचे नामस्मरण करत मंदीरापर्यत पोहोचलो. आणि मंदिर बंद झाले .
क्षणाच्या विलंबाने दर्शन राहून गेले.
पाच वाजता मंदिराचा दरवाजा उघडणार होता, तोपर्यंत आम्ही तिथे बसून होतो. मंदिर उघडल्यानंतर भगवान केदारनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. एवढ्या संकटाना पार करत आल्याचे समाधान मिळाले. त्यादिवशी जास्त गर्दी नव्हती त्यामुळे लगेच दर्शन झाले. नाही तर 3,4 तास रांगेत उभे रहावे लागते असे समजले.

भगवंताच्या दर्शनाचा मनात आनंद घेऊन परत जाण्यासाठी निघालो. उतरताना घोड्यावरही खूप त्रास होतो. असे कोणीतरी सांगितलेले होते. त्यामुळे काही जण पायी जाणार होते, काही घोड्यांवर . पण शरीर एवढे थकले होते की घोड्यानेही नाही आणि पायीही नाही जाऊ शकू असे वाटत होते.
तरीही एक दुसऱ्याला सांभाळत पुढे जात होतो. माझा मुलगा , त्याचे मित्र आणि अजून दोनतीन पुरुष मंडळी घोड्यांची व्यवस्था करण्यासाठी पुढे गेले होते. माझे मिस्टरही आमच्या पुढे चालत होते.
आम्ही स्त्रिया हळूहळू चालत त्यांच्या मागे जात होतो.

माझे मिस्टर पुढे जात होते, तेव्हा त्यांना कळाले की हेलिकॉप्टर सुरू झाले आहे. त्यांनी आमच्या सहकारी मंडळींना फोन करून बोलवून घेतले. जो लवकर तिथे पोहोचला त्याचा नंबर अगोदर. त्यामुळे आम्ही जे 3,4 जण अगोदर पोहोचलो त्यांचा हेलिकॉप्टरमध्ये नंबर लागला. माझा मुलगा बराच पुढे गेलेला होता त्यामुळे त्या सर्वांना हेलिपॅड पर्यंत येण्यास वेळ लागत होता. इकडे त्याला सोडून मला हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा होत नव्हती. पण त्या लोकांनी सांगितले , दुसऱ्या राऊंड ला येईल तो, तुम्ही टेंशन घेऊ नका.
आम्ही हेलिकॉप्टरने ते अंतर अवघ्या काही मिनिटात पार केले आणि खाली आलो. आपण खाली आलो या आनंदापेक्षा मला मुलाची,मिस्टरांची आणि इतर सहकाऱ्यांची काळजी वाटत होती. पण जेव्हा मुलाला,मिस्टरांना दुसऱ्या राऊंडमध्ये खाली आलेले पाहिले तेव्हा आपोआपच डोळ्यात अश्रू आले...
माझा मुलगा मागे होता त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये त्याचा नंबर नव्हता, पण ज्या ताईंचा नंबर होता त्यांनी माझ्या मुलाला व माझ्या मिस्टरांना बरोबर पाठवावे म्हणून त्यांच्या जागी माझ्या मुलाला पाठवले. त्या ताई आणि अजून आमचे 4,5 सहकारी तिसऱ्या राऊंडला येणार होते. आम्ही सर्व त्यांची खाली येण्याची प्रतिक्षा करत बसलो होतो. पण हवामान अचानक बदलले त्यामुळे हेलिकॉप्टर बंद झाले.आणि शेवटी ते सर्व पायी रात्रभर प्रवास करत मुक्कामाच्या ठिकाणी आले.
जरी आम्ही सुखरूप पोहोचलो होतो, तरी आमच्या या सर्व सहकारी मित्रमंडळीसाठी देवाकडे प्रार्थना करत होतो.

त्यादिवशी एवढा पाऊस,ढगाळ वातावरण आणि संध्याकाळ होत चाललेली त्यामुळे हेलिकॉप्टर मिळेल असे आमच्या ध्यानीमनीही नव्हते. पण देवाच्या मनात काय होते , आमचा परतीचा प्रवास हेलिकॉप्टरने झाला. आमचे मित्रमंडळीही हेलिकॉप्टरने आले असते तर किती बरे झाले असते! असे आम्हांला वाटत होते. ते जेव्हा पायी प्रवास करत व्यवस्थित पोहोचले तेव्हा त्या ताईंचे कोणत्या शब्दांत धन्यवाद द्यावे? हेच समजत नव्हते. त्यांच्या मुळे मी,माझे मिस्टर, माझा मुलगा आम्ही सुखरूप खाली आलो होतो.


सर्वांनी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही बद्रीनाथला गेलो. तिथेही एवढ्या उंचीवर ऑक्सीजन कमी असतो.त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. असे ऐकलेले होते. पण देवाच्या आशीर्वादाने आम्हांला कोणालाच काही त्रास झाला नाही.
मी हार्ट पेंशट ( valve replacement झालेले) त्यामुळे सर्वांना माझी काळजी होती. पण मला काहीही त्रास झाला नाही. माझा सर्व प्रवास देवाने माझ्याकडून सुखरूप करून घेतला.

आमची ही चारधाम यात्रा आयुष्यात कायम अविस्मरणीय राहणार.
मुळात कठीण असलेली यात्रा, त्यात येणाऱ्या अनेक अडचणी, त्या अडचणींवर मात करून देवाचे दर्शन घेऊन सुखरूप घरी येणे म्हणजे एक दैवी चमत्कारच !