आझादी का सुवर्ण महोत्सव !

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी स्त्री परावलंबी का आहे ? वास्तविक चित्रण...

कथेचे नाव : आझादी का सुवर्ण महोत्सव...

#राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

विषय : स्त्री आणि परावलंबित्व


" अहो, मी काय म्हणते , आज जायचं का डॉक्टरकडे ? तुम्हाला म्हंटलं नव्हतं का सहा महिने झाले पाळीत जास्त जातंय आणि ह्यावेळी तर दहा दिवस झाले पण अजुन ब्लिडिंग थांबलं नाही...." चोवीस वर्षीय सारिकाने नवऱ्याला सांगितलं .

" बघू.... ऑफिसमधून लवकर आलो तर जाऊ....डबा भरलाय ना ? दे लवकर " सागर म्हणाला.

संध्याकाळी सागर घरी परत येतो. " आरं, पोरीला ने की दवाखान्यात, चक्कर येऊन पडली ती....असं बरं नाही.... लेकरं आहेत पाठीशी दोन..." शेजारच्या काकु सागरला समजावत घराबाहेर पडल्या.

" काय झालं गं चक्कर येऊन पडायला? तुला काय खायला प्यायला कमी आहे का घरात? नुसतं आयतं बसून ते पण करता येत नाही का ? आता बरं असेल तर उद्या जाऊ नाहीतर तुझ्या भावाला घेऊन जा दवाखान्यात.....मी थकलोय " म्हणत सागर बेडरूम मध्ये निघून गेला सुद्धा....

" हॅलो , दादा , जरा काम होतं रे तुझ्याकडे. दवाखान्यात येशील का माझ्याबरोबर? कधी एकटी गेलेच नाही ह्या नवीन शहरात, अनायसे तू इथेच आहेस तर तुला विचारावे म्हंटलं " सारिकाने भावाला फोन केला .

" आलो असतो गं पण जरा ऑफिसचं काम आहे. तू जा की, तू काय अशिक्षित आहेस का? कॅब बुक कर आणि जा...." इतकं सोपं असतं तर गेले नसते का ? असा विचार करत सारिकाने फोन ठेवला. जाईलही मी एकटी पण मुलांकडे कोण बघेल? दवाखान्यात नेल्यावर आतून चेक अप करायच्या वेळी छोटी तर आत येणारच...आणि सोनोग्राफी सांगितली तर? जाऊ दे नंतरच जाऊ...

दोन चार दिवस अशीच चालढकल झाली. एक दिवस सारिका बेशुद्ध पडली. शुद्ध आली तेव्हा ती दवाखान्यात होती. " काय गं, इतक्या दिवसापासून ब्लिडिंग होतंय , का आली नाहीस आधीच ? " मॅडम रागावल्या. " अपुरा गर्भपात झालाय तुझा , पिशवी साफ करावी लागेल...." मॅडम पुढे म्हणाल्या.

" काय ? अरे देवा... म्हणजे ऍडमिट करणार ? मग घरी कोण ? आईला बोलवावं लागेल....आणि पैसे ? हे म्हणाले का ऍडमिट करा म्हणून ? " सारिकाला आजारापेक्षा ह्या प्रश्नांनी जास्त गरगरत होतं .

" एवढं टेन्शन येतंय तर गर्भनिरोधक का नाही वापरलं ? हे सगळे प्रश्न आलेच नसते ना...." मॅडम म्हणाल्या .

" मॅडम , कंडोम वापरतो आम्ही पण अधूनमधून म्हणजे....अं...... ह्यांचा मूड असेल तेव्हा . मी नेहेमी सांगते हो पण कधी कधी ऐकतच नाहीत हे , काय करणार ? तांबी मला टोचेल म्हणत ती देखील नको म्हणतात आणि गोळ्या खायच्या म्हंटलं तर लगेच कुठे दिवस जायला बसलेत एवढे पैसे खर्च करायला म्हणतात.....मला नकोय हे सगळं , पाठीवर दोन बहिणी म्हणून आई बाबांनी अठरा पूर्ण झाले की लग्न लावून दिलं आणि सुरू झालं हे चक्र. अजुन शिकत होते की दिवस राहिले, कसं खाली करायचं पहिलं मूल म्हणून राहू दिलं, पाठोपाठ दुसरी मुलगी झाली. संतातिनियमन ऑपरेशन करायचं तर चार आठ दिवस कुणी जवळ पाहिजे मुलांच्या..." सारिका हुंदके देत बोलत होती .

" रडू नकोस सारिका . ही काही तुझ्या एकटीची कहाणी नाही . स्त्री आणि परावलंबित्व हा मुद्दा खूप जुना आहे. बालपणी वडील मग भाऊ, त्यानंतर नवरा आणि म्हातारपणी मुलगा अशी ती परावलंबी असते असं मानणारा आपला समाज.... तुला ठाऊक आहे , हत्तींना कसं ट्रेन करतात ? हत्ती पिल्लू असतांना पासून त्याला दावणीला बांधतात , तेच पिल्लू मोठं होतं तेव्हा अनेक मोठे वृक्ष उन्मळून पाडतं पण दावणी नाही पाडत , का ? कारण त्याला लहानपणापासून जाणीव करून दिली असते की तू हे करू शकत नाहीस . अगदी तसंच , हो अगदी तसंच स्त्रियांना तुम्ही परावलंबी आहात असं बिंबवलं जातं आणि \" मी काहीही करू शकते \" हा तिचा विश्वास आत्मविश्वास न होता दुस्वास होतो . आता तुझंच बघ , लहान वयात झालेल्या लग्नाला तू विरोध करू शकली नाहीस. शिक्षण पूर्ण करूनच लग्न करणार ह्या भूमिकेवर ठाम राहिली असतीस तर....? " मॅडमनी विचारलं .

" इच्छा होती हो पण आई-बाबांपुढे कसं बोलणार ? " सारिका म्हणाली .

" बोलून बघितलं असतं तर ? अगं हा जर तर आपल्याला परावलंबी करतो . त्रास होतोय ना , तडक यायचं डॉक्टर कडे , सरकारी दवाखाने आहेत , गर्भनिरोधक किंवा इतर गोळ्या मोफत मिळतात , निरनिराळ्या योजना आहेत पण आपण त्याचा लाभ घेतला नाही तर काय उपयोग ? आई येईल , भाऊ नेईल किंवा नवरा काळजी घेईल अशी भूमिका का असावी ? " मॅडम कळकळीने बोलत होत्या .

" बरोबर आहे तुमचं पण मुलं ? "

" हे बघ , मार्ग काढायचा म्हंटलं तर कसाही काढताच येतो ! रडत रहायचं म्हंटलं अश्रूभरल्या डोळ्यांनी तर दिसणारा मार्गही अंधुक होतो.... एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मदत करेल , मार्गदर्शन करेल तर सगळे प्रश्न सुटतील . जाग्या व्हा , उठा , शिका , कमवा , स्वावलंबी व्हा. आपल्या प्रगतीसाठी आपणच पुढे आलं पाहिजे , लढलं पाहिजे . "

मॅडम पुढे म्हणाल्या , " \"आझादी का सुवर्ण महोत्सव \" जितक्या ताठ मानेने आपण साजरा करतोय, मला सांग आहे का भारतातील स्त्री तेवढी स्वतंत्र ? नाहीये कारण तिने परावलंबन सोडायचं मनावर घेतलं नाहीये . हीच ती वेळ आणि हाच तो क्षण , कारणं सोडून कर्तृत्वाकडे झेप घेण्याचा , रडणं सोडून स्वप्नांची क्षितिजे ओलांडण्याचा....आता मागे पहायचं नाही, स्वयंसिद्धा व्हायचंच ! "

आज सारिकाला \"आझादी का सुवर्ण महोत्सव \" हे स्लोगन वाचतांना पहिल्यांदा रक्त सळसळलं होतं कारण ती परावलांबनाची कच्ची पाऊलवाट सोडून स्वावलंबनाच्या महामार्गावरून निघाली होती....

डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर


जिल्हा : पुणे