2 स्टेटस भाग अंतिम

Story Of A Couple From Different States


2 स्टेटस भाग १४


मागील भागात आपण पाहिले कि कवल आणि श्रेयसने पंजाबला जायचे सांगितले नाही म्हणून शोभाताई चिडतात. त्यावर कवलही त्यांना उलटून बोलते. आता बघूया पुढे काय होते..


" बेटा असे काही नाहीये. तुझा गैरसमज होतो आहे. श्रेयस तू कवलला तुझ्या खोलीत घेऊन जा .." सुरेशराव बाजू सांभाळत बोलले..
" कवल प्लीज थोडी शांत हो. अशी चिडू नकोस ग.." श्रेयस समजूत काढत होता..
" कशी शांत होऊ सांग ना? तुमच्या घरी माहित होते ना मी पंजाबी आहे. माझे मराठी तेवढे चांगले नाही. तरिही मराठी व्यवस्थित बोलण्याचा हट्ट का? बरे मी नाही म्हणत नाही पण थोडा वेळ तरी द्याल कि नाही.. कुकिंग मी माझ्या पद्धतीने केले कि काकी जेवणार नाही म्हणून मी स्वयंपाक करणे टाळते. पण जसे तुम्हाला माझे कुकिंग आवडत नाही, तसे मला पटकन तुमचा स्वयंपाक आवडेल असा आग्रह का? मी पण वीस पंचवीस वर्ष जे खाल्ले आहे ती चव सहा महिन्यात कशी बदलणार? पण नाही.. आणि घरातली हि गोष्ट नातेवाईकांना सांगायची काय गरज? मला कोणी काही बोलले तरी तू मलाच शांत व्हायला सांग.. माझी चूक काय झाली तर मी आधी नाही सांगितले.. पण म्हणून एवढे ओरडायचे ते पण मलाच? तुलासुद्धा माहित होतेच ना? मग तू का नाही सांगितलेस? तू विसरलास तर ते चालते मी विसरलेले नाही?" कवल रडत होती.. श्रेयसला एका बाजूला तिचे बोलणे पटत होते. पण कुठेतरी आई चुकली आहे हे मान्य करायची इच्छाच होत नव्हती..
" शोभा, तू आज कवलला खूपच बोललीस.." सुरेशराव शोभाताईंना म्हणाले..
" परत माझीच चूक का? मी बोलते म्हणून माझे तोंड दिसते. ते लहान म्हणून सगळे खपवून घ्यायचे? लग्न करायची अक्कल आहे पण घर सांभाळायची नाही? आमची नाही लग्न झाली? मुले झाली? आम्ही केले ना ॲडजस्ट? आधी सासूचा मूड सांभाळा आणि आता सुनेचा.. आमचा कोणीच सांभाळू नका.. आम्ही काही नोकऱ्या केल्या नाहीत? आणि सुधारले हिचे मराठी तर काय चुकले? कोणी हिला हसू नये म्हणूनच आटापिटा करत होते ना? पण नाही. मीच चुकीची.." शोभाताई थांबायचे नाव घेत नव्हत्या. सुरेशराव हतबुद्ध होऊन फक्त ऐकत होते.. सासू सुनेचा तिढा कधीतरी संपेल का? हाच मनाशी विचार करत होते..
दुसर्‍या दिवशी दोघींनीही काही झालेच नाही असे दाखवले.. सुरेशरावांनी नाश्ता करताना कवल आणि श्रेयसला पंजाबला नक्की जा असे सांगितले.. काही दिसत तरी हे सगळे नसेल या विचाराने सगळ्यांनाच हायसे वाटले होते.. जाताना हे दोघे ट्रेनने जाणार होते, येताना विमानाने येणार होते.. कवलने सुद्धा लग्नात द्यायचा आहेर शोभाताई, सुरेशराव आणि श्रेयस यांच्यासोबत जाऊन खरेदी केला. शोभाताईंनी जास्त न बोलता तिखटमीठाच्या पुर्‍या, भोपळ्याचे घारगे असा सुका खाऊ करून दिला होता.. निघताना दहीभात करून दिला.. दोघेही घरातल्यांना नमस्कार करून निघाले. कवल न विसरता शोभाताईंना थॅंक यू बोलली.. त्यावर त्यांनी फक्त तिचा हात थोपटला..
हनिमूननंतर पहिल्यांदाच दोघेही बाहेर जाणार होते.. त्यामुळे दोघेही खूप खुश होते.. ना कामाचे टेन्शन, ना घरचे.. सोबत कवलचे आईबाबा आणि सुखी होते.. सुखीच्या गप्पांनी मस्त टाईमपास होत होता. दहिभात, घारगे, पुर्‍या सगळ्यांनी फस्त केल्या. कवलच्या आईनेसुद्धा भरपूर काय काय खायचे घेतले होते.. जायचा प्रवास मस्तच झाला. दोघांनीही अगदी ठरवून घरचा विषय काढला नाही.. ते दोघे पंजाबला पोचताच शोभाताईंचा श्रेयसला फोन आला.
" काय रे पोचलात का?"
" हो आई.. जस्ट पोचतोच आहोत.."
" कवल बरी आहे ना?"
" हो आई.." ममीजींनी शोभाताईंचा फोन आहे हे पाहून श्रेयसकडे फोन मागितला.
" बहेनजी तुम्ही केलेला भात आणि पुर्‍या खूपच मस्त होत्या.. आल्यावर रेसिपी नक्की सांगा मला.."
" थॅंक यू फॉर युवर कॉम्प्लिमेन्ट.. नक्की सांगेन रेसिपी.. काळजी घ्या."
सगळे कवलच्या मामाच्या घरी पोचले.
या मामाला कवलच्या लग्नात यायला जमले नव्हते. त्यामुळे कवलची खास सरबराई सुरू होती. ज्या नातेवाईकांना लग्नाला यायला जमले नव्हते त्यांच्यासाठी ममीजींनी गिफ्ट आणले होते. ते सगळेचजण श्रेयसला बघायला उत्सुक होते. कारण त्यांच्या इथे पहिल्यांदाच कोणीतरी बिगर पंजाबी मुलाशी लग्न केले होते. त्यातल्याच एक आजी पटकन बोलून गेल्या.. "इस कवलने ठिक नही किया.. आजतक हमारे खानदानमें किसीने दुसरी जातमेंभी शादी नहीं कि पर इसने तो नाक कटवां दि. अभी इसका देखके कोई और ऐसी शादी ना करें.." या वाक्याला काही जुन्या लोकांनी मान डोलावली. तर काही जणांनी नाक मुरडले. हे ऐकून कवलने कान जोडले आणि श्रेयसने पण ती गोष्ट तिथे सोडून दिली. नवीन पिढीतले बरेचजण लग्नाला आले होते. त्यामुळे त्यांच्याशी श्रेयसची ओळख होतीच. तो रमला होता त्यांच्यामध्ये. सध्यातरी त्याची अडचण वेगळीच होती. जे जेवण कवल आरामात खात होती.. ते रोजच खाऊन श्रेयस मात्र वैतागला होता. त्याला त्याच्या आईच्या हातच्या स्वयंपाकाची आठवण येत होती..
आता त्याला कवलच्या मनस्थितीची थोडीफार कल्पना येत होती.. त्याला कळत होते.. लग्न म्हणजे फक्त नवराबायकोचे नसते. ते दोन कुटुंबांचे असते. दोन्ही बाजू समजूतदार असतील तर सोन्याहून पिवळे. नाहीतर फक्त आणि फक्त मनस्तापच. समान संस्कृती जिथे असते तिथे लग्न टिकणे कठिण असते. इथेतर दोघे दोन वेगळ्याच परस्परविरोधी संस्कृतीमधून आलेले. थोडी नाही खूप तडजोड करावी लागणार आहे.. पण कोणाचेही मन न दुखावता शक्य आहे? श्रेयसचे विचार मंथन सुरूच होते.. तेवढ्यात कवल आली.. "चल , आवर ना, आपल्याला वरातीत नाचायला जायचे आहे.."
" मी पण?"
" मग काय? तू तर दामाद आहेस घरचा.. तू तर पाहिजेच.. तुझ्यासाठी स्पेशल तयारी आहे.."
" हो का.. मग आलेच पाहिजे.."
ते दोघेही वरातीत नाचायला गेले.. तिथे सगळेच नाचत होते.. श्रेयसला कवलच्या बहिणी त्याला ओढून घेऊन गेल्या..पण ते एकाला रुचले नाही. तो पटकन म्हणून गेला," यह मरहट्टा क्या नाचेगा?" कवल हे ऐकून भडकली. पण श्रेयसने तिला गप्प रहायला सांगितले. त्याने नाचायला सुरुवात केली.. तो एवढा लयबद्ध आणि मस्त नाचत होता, कि बाकीच्यांनी नाचणे थांबवले आणि त्याला पाहू लागले. गाणे संपल्यावर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.. आणि मामाने श्रेयससाठी आणलेली सरप्राईज नोटांची माळ त्याच्या गळ्यात घातली.
श्रेयसने त्या मुलाला हात दाखवला आणि म्हणाला," यह मरहट्टे जब जिदपे आते है तो दुनिया हिलाते है, यह डान्स क्या चीज है.."
सगळे हॉलवर पोचल्यावर श्रेयसने एक कोपरा पकडला आणि आजूबाजूला चालणाऱ्या गोष्टी पहात बसला.

" सॉरी.." कवल येऊन म्हणाली.
" कशासाठी?"
" तो मुलगा जे बोलला त्यासाठी.."
" ते फिट्टम फाट समज.."
" म्हणजे?"
" त्या दिवशी तुला मामी बोलली , आज मला हा मुलगा बोलला, हिसाब बराबर.. "
" पण मला नाही आवडले हे.." कवल व्यथित होऊन म्हणाली..
" आपण या विषयावर घरी जाऊन बोलूयात.. आता लग्नात मूड खराब नको करून घेऊस.. सगळे बघत आहेत आपल्याकडे.."
कवल गेल्यावर ममीजी, पापाजी आले.. " सॉरी हा बेटा.."
" अरे, आप क्यू सॉरी बोल रहे है.."
" वो जो बारातमें हुआ उसके लिए.."
" मुझे तो याद हि नहीं.. आप शादी एन्जॉय किजीए.. मैं भी वो बात भूल गया , आपभी भूल जाईए.."

ममीजी, पापाजी, सुखी आल्यासारखे काही दिवस पंजाबमध्ये राहणार होते. त्यामुळे हे दोघेच निघाले.. पण निघण्यापूर्वी कवलने न विसरता शोभाताई, सुरेशराव आणि सुमितसाठी भरपूर खरेदी केली.. श्रेयस हे सगळे न बोलता पहात होता.
दोघेही घरी आले.. पहिले काही दिवस छान गेले.. नंतर परत छोटीमोठी कुरबूर होत राहिली.. श्रेयसने मनाशी एक गोष्ट ठरवली आणि संध्याकाळी सगळ्यांची मिटिंग बोलावली.. काय झाले ते तो कोणालाच सांगायला तयार नव्हता..
" आई, बाबा, सुमित आणि कवल मी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे." श्रेयसने बॉम्ब फोडला.. सुरेशराव आणि सुमित सुन्न झाले.. शोभाताई आणि कवल रडायला लागल्या..
" कारण विचारू?" सुरेशराव भानावर येत म्हणाले..
" हो बाबा, मी गेले अनेक महिने बघतो आहे. लांब असले कि संबंध चांगले राहतात. तेच जवळ राहिले कि कुरबूरी लगेच वाढतात.. नात्यात कडवटपणा येऊन नाती दुरावण्यापेक्षा लांबून ओलावा राहिलेला काय वाईट?"
" आणि मी जर नाही म्हणाले तर?" कवलने विचारले.
" ते तू ठरवायचे.. हे लक्षात ठेव तू आणि मी दोघेही वेगळ्या संस्कृतीमधून आहोत.. आपले प्रेम आहे म्हणून आपण एकमेकांना समजून घेतो.. पण बाकीचे घेतीलही किंवा नाहीही.. याची तयारी मात्र ठेवायलाच पाहिजे.."
" माझी परवानगी आहे.." शोभाताई म्हणाल्या..
सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. श्रेयस त्यांच्याजवळ गेला.. त्यांचे हात हातात घेऊन म्हणाला, "माझे तुमच्या दोघींवरही खूप प्रेम आहे.. एकीसाठी दुसरीला मी दुखवूच शकत नाही.." आणि त्याने त्यांच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली.. शोभाताई फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत होत्या..
महिन्याभरातच कवल आणि श्रेयस त्यांच्या जुन्या घरापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घरात रहायला गेले.. घरे वेगळी झाली असली तरी ऑफिसमधून निघाले कि दोघे आधी शोभाताई, सुरेशरावांना भेटून चहा, नाश्ता करून मग त्यांच्या घरी जायचे.. इकडच्या भाज्या तिथे, तिकडच्या इथे होतच राहायचे.. शनिवारी शोभाताईंकडे , रविवारी ममीजींकडे दोघेही दिवसभर असायचे. एकूणात सगळीकडे आनंदीआनंद होता. सणासुदीला मात्र सगळेच एकत्र जमायचे. जे काही देवाधर्माचे असेल ते केले कि गप्पा मारत बसायचे.. एकदा असेच सगळेजण गप्पा मारत बसले होते.. सुमित त्याच्या कोणत्यातरी मित्राला भेटून येणार होता.. निघायच्या आधी कवल आणि श्रेयस त्याची वाट पहात होते.. बेल वाजली. कवलने दरवाजा उघडला. दरवाजात सुमित एका मुलीला घेऊन उभा होतो.. कवलने दोघांना आत घेतले. सुमितने तिची ओळख करुन दिली.." आई, बाबा , दादा ,वहिनी हि अवंतिका अय्यर. आम्हाला लग्न करायचे आहे.." अवंतिकाने सगळ्यांना नमस्कार केला . आधी सगळेच शॉकमध्ये होते.. पण नंतर सगळ्यांनीच एकदम हसायला सुरुवात केली.. सुरेशराव शोभाताईंना म्हणाले " 2 स्टेटस पार्ट दुसरा सुरू.."



सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.. तुम्ही 2 स्टेटस या कथेवर केलेल्या प्रेमासाठी.. हि कथा इथेच संपत आहे. लवकरच भेटूया एका नव्या कथामालिकेसोबत..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all