2 स्टेटस अंतिमपूर्व भाग

Story Of A Couple From Different States
2 स्टेटस भाग १३


श्रेयस कवलला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेला.. तिला घेऊन त्याला मावशीकडे जायचे होते.
" नमस्कार ममीजी,पापाजी.."
"नमस्कार बेटा, बोलो कैसे चल रही है शादीशुदा जिंदगी ?"
" चल रही है, पापाजी.. आप कहिए.. कवल तयार है क्या?"
"हांजी.. बस दो मिनट.. लस्सी खत्म होने तक वो आजायेगी.."
यांचे बोलणे होईपर्यंत कवल साडी नेसून आली..
" निघायचे?"
" हो.."
दोघेही तिथून निघाले..
" तू आजकाल काही वेगळे करते आहेस का?" श्रेयसने कवलला विचारले..
" म्हणजे?" कवलने आश्चर्याने विचारले..
" दिवसेंदिवस तू खूप सुंदर दिसायला लागली आहेस.. तुझ्या चेहर्‍यावरून नजर हटत नाही.."
" चल झूठा.." दोघेही मावशीकडे आले.. सगळ्यांनी यांचे प्रेमाने स्वागत केले. कवलने साडी नेसलेली पाहून शोभाताई पण खुश झाल्या.. ऋता नवीन जोडप्याला घेऊन आजीच्या खोलीत गेली.. दोघांनीही आजीला वाकून नमस्कार केला.. आजींनी कवलची विचारपूस केली.. त्यांचे बोलणे झाल्यावर ऋताने कवलला घर दाखवायला सुरुवात केली.. शोभाताई आजींशी गप्पा मारत बसल्या होत्या.
" शोभा, सून छान आहे हो.. दिसायलाही आणि बोलायलाही.. वाटत नाही पंजाबी आहे म्हणून." आजींनी कवलचे कौतुक केले..
" हो काकू.. आता तरी छान आहे.. पुढे कशी वागेल देवाला माहित.."
नेमके तेच शब्द कवलने ऐकले.. पण तिने काही दाखवले नाही.. ती हसतमुखाने तिथे वावरत होती.. निघताना मावशींनी कवलला छानसे गिफ्ट दिले.. रूममध्ये आल्यावर कवलने श्रेयसला एक अनपेक्षित प्रश्न विचारला," तुझ्या आईला मी आवडले नव्हते?"
" असे का विचारतेस?" श्रेयसने आश्चर्याने विचारले..
" तुझ्या आईशी मी वाईट वागले आहे?" कवलचा दुसरा प्रश्न आला..
" काहिही काय विचारतेस?"
" मग काकी त्या ऋताच्या आजीला का म्हणाल्या, कि मी पुढे कशी वागेन काय माहीत म्हणून.."
यावर काय बोलायचे ते श्रेयसला सुचेना..
" अग त्या आजींना ना सवय आहे, असेच काहीतरी बोलायची.. म्हणून आई असे बोलली असेल." श्रेयसने आईची बाजू सावरायचा प्रयत्न केला..
" तू जे बोलतो आहेस, त्याच्यावर तुझा तरी विश्वास बसतो आहे?"
" अरे यार नको ना, कहानी घर घरकी सुरू करूस.. एक तर चोवीस तास तू लांब होतीस, आणि आल्या आल्या हे?" श्रेयस थोडा वैतागला होता..
" त्याचे काय आहे, मी काही वागले नसताना त्या जर असे बोलल्या तर वाईट नाही का वाटणार?"
" हो माझी आई.. ॲग्री.. पण आता नको ना मूड ऑफ करूस.."
" कधीतरी त्याच्या पलीकडे विचार कर ना?"
" नवीन लग्न झालेल्या नवर्‍याला दुसरा विचार करायला लावण्यासारखे पाप नाही दुसरे.." श्रेयस मस्का लावत म्हणाला..
" तू ना..."


दुसर्‍या दिवशी पापाजींचा शोभाताईंना फोन आला..
" काय बहेनजी, कसे चालू आहे?"
" नमस्कार भाईसाब, आम्ही छान.. तुम्ही काय म्हणताय?"
" आम्ही मस्त.. आमची कवल त्रास नाही ना देत तुम्हाला?"
" नाही.. छान आहे तुमची लेक.." शोभाताई थोडे थांबून म्हणाल्या..
" ॲक्चुली बहेनजी , कवलच्या आईला ना कवलचे नसणे मनाला खूप लागले आहे. जेवायच्या आधी जेवण हातात घेऊन बसते.. जेवतच नाही.."
" अरे देवा.. मी काय मदत करू यात?
" तुम्हाला चालत असेल तर रोज दुपारी कवलला डब्बा पाठवला तर चालेल का ? म्हणजे आपली मुलगी आपण केलेले जेवते आहे या विचाराने तरी तिला जेवण जाईल.."
शोभाताई विचारात पडल्या.. पण वरकरणी म्हणाल्या ," अरे त्यात काय एवढे? तुमची मुलगी.. तुम्हाला जमत असेल तर पाठवा कि.."
" थॅंक यू बहेनजी.. मला ना कवलच्या आईचे जरा टेन्शन आले होते.. तुम्ही माझा प्रॉब्लेम सोडवलात.."
" अरे, असे काही नाही.. कधीही काहिही वाटले तरी सांगत जा.."

लगेचच पापाजींनी कवलला ऑफिसमध्ये रोज डबा पोचवायची सोय केली.. आईच्या हातचे जेवायला मिळाल्यामुळे कवलपण खुश होती.. दिवस जात होते.. कवल ही श्रेयसच्या घरी रूळत होती.. आता लहानसहान नोकझोंक असायची. म्हणजे कवल \"पाने घेऊ का? च्या ऐवजी ताटे लावू का?\" असे विचारायची. ती \"तो वाटी, ती चमचा\" असे पटकन म्हणून जायची. असे काही झाले कि शोभाताई तिची मराठीची शिकवणीच घ्यायच्या.. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून कंटाळलेली ती या शिकवणीला कंटाळायची.. उष्टे आणि खरकटे यात ती खूप गोंधळायची.. मग आधी हास्याचे फवारे उडायचे.. मग परत तेच.. आधी कवल पण सगळे मस्करीत न्यायची. पण नंतर नंतर ते तिला अपमानास्पद वाटायचे. ती मराठी भाषा बोलायची पण व्याकरणाचा थोडासा गोंधळ व्हायचाच. ती व्याकरण शिकायचा प्रयत्न करत होती पण तिला थोडा वेळ हवा होता आणि तोच तिला मिळत नव्हता. त्यातच श्रावण सुरू झाला. सणवारांना सुरुवात झाली. सगळेच पहिले सण असल्यामुळे जोरात सुरू होते.. मंगळागौरीच्या दिवशी घरी सगळे जमले होते. कवलच्या घरचे पण आले होते.. कवल जेवायला बसणार इतक्यात श्रेयसच्या मामीने विचारले," काय ग तुला चालेल का हे जेवण?"
" हो.. तुम्हाला का वाटले मला चालणार नाही?"
" तुला नेहमी डबा येतो ना म्हणून विचारले.."
कवलचा चेहरा पडला.. रात्री मंगळागौरीचे खेळ झाले.. झालेली गोष्ट कवलने मनात ठेवली, कारण श्रेयसला काही सांगितले तरी तो उडवून लावणार हे आता तिला कळून चुकले होते.. तिला आश्चर्य याचे वाटायचे, कि समोर बोलताना शोभाताई अगदी प्रेमाने बोलायच्या.. पण मागून आजकाल टोमणे ऐकू येऊ लागले होते..
एक दिवस कवलच्या मामांचा तिला फोन आला.. तिच्या मामेभावाचे लग्न ठरले होते.. पंजाबमध्ये लग्न होते.. ते रितसर आमंत्रण द्यायला येणार होतेच.. पण आधी आयडिया देण्यासाठी फोन केला होता. रोजच्या धकाधकीतून बदल होईल आणि सगळ्या नातेवाईकांची भेटही होईल या हेतूने तिनेही जायचे ठरवले..
" काकी मी आणि श्रेयस पंजाबला जातो आहोत पुढच्या महिन्यात.."
" असे अचानक? आणि न विचारताच तुम्ही डायरेक्ट ठरवलेत?"
" हो. ते ना मामाचा फोन आला होता.. आणि त्याने सांगितले.. म्हणून मी बुकिंग करून टाकले.. "
" अग पण विचारण्याची पद्धत असते ना.. तुम्ही स्वतःचे स्वतःच ठरवले.." शोभाताई थोड्या तणतणतच होत्या..
" सॉरी काकी.. माझी चूक झाली.. माझ्या लक्षात आले नाही."
" प्रत्येक वेळेस आधी चुकायचे आणि नंतर सॉरी बोलले कि झाले.. तू पण श्रेयस सगळे विसरला आहेस.."
" अग, किती चिडतेस मुलांवर.. फोन आला तिला वाटले आपण जाऊ आपल्या माणसात.. राहिले सांगायचे त्यात काय एवढे चिडायचे?" सुरेशरावांनी बोलायचा प्रयत्न केला..
" तुम्ही पण प्रत्येक वेळेस तिचीच बाजू घ्या.. घरात सासूसासरे आहेत.. त्यांना आमंत्रण येणे तर दूरचीच गोष्ट.. उलट सरळ येऊन सांगताहेत कि जाणार म्हणून.."
" तुला आमंत्रण आले तर तू जाणार का पंजाबला?" सुरेशरावांनी विचारले.
" मी जाईन किंवा नाही तो माझा प्रश्न. पण या लोकांना काही पद्धतच नाही. म्हणूनच मी म्हणत होते.." शोभाताईंनी बोलणे थांबवले..
" क्यूं रूक गई आप.. बोल दिजीए ना कि मैं आपको पहलेसे पसंद नहीं थी.. आपको आपके जातकी कोई बहू चाहिये थी.. मगर श्रेयस और मेरी शादी कि वजह से आपके सब अरमान राख हो गये.. यही कहना चाहती थी ना आप?" कवलने दुखावलेल्या स्वरात विचारले..

" नही बेटा ऐसा कुछ नही है.." सुरेशराव बाजू सावरून घेत म्हणाले..

" नाही बाबा, मी खूप वेळा पाहिले.. तुम्ही आणि सुमीतने मला सपोर्ट केला. पण काकींना माझा राग यायचा. त्याशिवाय का मामींनी मला विचारले, तुला इकडचे जेवण आवडत नाही का? मी या घरातले काहिही माझ्या ममी पपांना सांगत नाही. पण इकडच्या सगळ्या गोष्टी तुमच्या नातेवाईकांना कळतात. मग ते मी पंजाबी आहे, म्हणून मला बोलतात.. कसे चालेल मला? " कवलने मनात साचलेले सगळे शेवटी बोलून टाकले..


शोभाताई आणि कवल यांचे भांडण मिटेल कि वाढेल पाहू पुढील भागात..

कथा कशी वाटली हे नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all