2 स्टेटस भाग १२

Story Of A Couple From Different States
2 स्टेटस भाग १२

 पसारा , डबा तसाच टेबलवर टाकून गेल्यामुळे शोभाताई कवलवर पहिल्याच दिवशी चिडतात.. कवल रडायला लागते. श्रेयस तिची समजूत काढतो.. पुढे पाहू काय होते ते.. 


"श्रेयस" शोभाताईंनी दरवाजा वाजवला..
" आलो.." 
" चल पटकन डोळे पूस." असे कवलला म्हणत दरवाजा उघडायला गेला. शोभाताई रडणार्‍या कवलला बघून तिच्या शेजारी बसल्या..
" त्याचे काय आहे".. त्यांनी बोलायला सुरुवात केली.. "तुमचे लग्न एवढ्या झटपट झाले ना, कि आपल्याला एकमेकांना ओळखताच आले नाही.. तुम्ही दोघे एकमेकांना ओळखत असाल.. पण आपली तशी ओळख झालीच नाही.. त्यामुळे पहिल्या दिवशीच गोंधळ झाला खरा.. मला ना पसारा अजिबात आवडत नाही.. त्यात तुम्ही दोघे डबे पण इथेच विसरून गेलात.. विचार कर मला किती राग आला असेल.."
   "ते सगळे बरोबर आहे काकी.. मी नवीन आहे.. माझी चूकच झाली. पण ते तुम्ही मला हळू आवाजात पण सांगू शकला असता ना?" कवलने विचारले.
तिच्या या प्रश्नाने शोभाताई थोड्या विचारात पडल्या.. "माझ्या लक्षातच आले नाही ते.." त्यांनी कबुली दिली.
"चला, मग आता जेवायला जाऊया का?" श्रेयसने विचारले..
" हो.. चला.. पण अजून स्वयंपाक करायचा आहे.. जायचे का?" शोभाताईंनी कवलला विचारले..
तिघेही हसत बाहेर आले.. हे पाहून सुरेशराव रिलॅक्स झाले.. दोघींनी मिळून पटकन स्वयंपाक केला.. म्हणजे शोभाताईंनी केला. कवलने फक्त बघितले.. त्यांना भाजीत गूळ घालताना पाहून तिच्या पोटात गोळा आला. पण तिच्या आईने दुपारी पाठवलेली भाजी शिल्लक होती.. हे आठवून तिने कोणाला ऐकू येणार नाही असा सुस्कारा सोडला.. आता उद्यापासून आपल्या जेवणाचे काय करायचे हा मोठा प्रश्न तिला पडला..
तिला आईने केलेल्या नॉनव्हेजची आठवण यायला लागली.. आणि पानात होती भोपळ्याची भाजी.. 
" दुपारी ना, माझ्या आईने मला आवडते तशी भाजी करून पाठवली होती.. ती उरली आहे.. मी ती आणू का?" कवलने थोडे घाबरतच विचारले.
" त्यात काय विचारायचे? आण पटकन.." सुरेशराव म्हणाले..
" कसली भाजी आहे? वास तर मस्त येतो आहे.." सुमीतने विचारले..
"भरलेली भेंडी.."
" वॉव.. माझी पण फेवरेट.. वहिनी दे टाळी.." सुमित म्हणाला.. कवलला वाटले , आता हा मागणार कि काय. पण सगळ्यांनी फक्त टेस्ट केली.. आणि उरलेली भाजी तिला मिळाली..
" वहिनी आंटींना सांग.. भाजी मस्त होती म्हणून.. पुढच्या वेळेस जास्त पाठवायला सांग.. " सुमित डोळा मारत म्हणाला..
" पाठवायला का? मला पण येतो स्वयंपाक.. पण पंजाबी स्टाईल.." कवल म्हणाली..
" वहिनी, मग एक दिवस कर ना मस्त हॉटेल स्टाईल." सुमितने डिमांड केली.
" अरे हो सुमित.. तिला जरा घरात सेटल तर होऊ दे.. नंतर सांग. " शोभाताई म्हणाल्या..
" हो आई.. वहिनी लक्षात ठेव हो.."
असेच हसतखेळत जेवण झाले.. ते झाल्यावर कवल शोभाताईंना म्हणाली.. "स्वयंपाक तुम्ही केलात, आता हे मी आवरते.." काहीच न बोलता शोभाताईंनी तिला मदत करायला सुरुवात केली..
      बेडरूममध्ये श्रेयस कवलची वाटच पहात होता. 
"सॉरी कवल, जे झाले त्यासाठी.."
" इट्स ओके, श्रेयस. रात गई , बात गई..पण एक प्रॉब्लेम तर आहेच ना?"
" कोणता?" 
" जेवणाचा. मैं इतना मिठा नही खा सकती.. उसका क्या करू?"
" तू वेगळी भाजी कर. तुला हवी तशी. पण आता तर चिडू नकोस किंवा मूड ऑफ करून घेऊ नकोस ना?" श्रेयस कवलला मस्का मारत म्हणाला..
" तुला ना दुसरे काही सुचतच नाही." कवल त्याला उशी फेकून मारत हसत म्हणाली..
     दुसर्‍या दिवशी सकाळी कवल गजर लावून लवकर उठली. तिने स्वतःचे आवरले.. चहा केला. आता भाजी काय करायची म्हणून फ्रीज उघडला.. तिला कोबी दिसला.. तिच्या डोक्यात एक कल्पना आली.. तिने पटापट कोबीच्या पराठ्याची तयारी करून ठेवली.. विचार केला जाताना सगळ्यांना गरम गरम देऊया.. ती स्वयंपाकघरातून बाहेर पडणार तोच शोभाताई आत आल्या.. "अरे वा.. चहाचा छान वास येतो आहे.. मस्त. माझे लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच या घरात सकाळचा चहा आयता मिळाला आहे मला.. थँक यू.."
" त्यात काय एवढे आई.. साधा चहा तर आहे.. मी तर ना कोबीचे पराठे पण करणार आहे.. सगळे नाश्ता करायला बसले ना कि गरम गरम करते.." शोभाताईंनी मान डोलावली.
सगळे नाश्ता करायला बसले.. कवल उभी राहिली पराठे करायला..
" वहिनी एक नंबर पराठे झालेत.. मी डब्यात नेऊ?" 
" कवल, खरेच छान झालेत हा.." सुरेशराव म्हणाले.. श्रेयसने नजरेनेच छान झाल्याची पावती दिली.
" तुम्हाला देऊ अजून एक आई?"
" नको ग.. मी ना एवढे तूप खात नाही. तू यामध्ये साखर टाकली होतीस का?"
" नाही.."
" पराठ्याला ना कसला तरी वास येतो आहे.."
" ते ना आमच्याकडे थोडी धणेजिरे पावडर टाकतात.. मी तसा केला आहे."
" हो का.. तरीच.. अग मला ना ते चालत नाही.. पण बरा झाला आहे हो. तू पण आता खाऊन घे.. नाहीतर उशीर होईल ऑफिसला. "
" हो काकी.."
" काय ग हे मध्येच आई,मध्येच काकी?" 
" ते सवय नाही ना म्हणून.."
" अजून एक, आपल्या सगळ्यांनाच मावशीने रविवारी जेवायला बोलावले आहे.. तिच्या सासूबाई आजारी असतात म्हणून तुमच्या लग्नाला आल्या नव्हत्या.. त्यांना भेटायचे आहे तुला.."
" काकी... आई... मी ना मॉमकडे जायचा विचार करत होते.. लग्न झाल्यापासून भेटलेच नाही ना तिला.."
" हो का? मग ठरव तूच काय करायचे ते.. मी सांगायचे काम केले.."
" मग मी शनिवारी संध्याकाळी राहायला जाते आईकडे.. तिथूनच येते मावशींकडे. चालेल का?"
" चालेल कि.. तू आणि श्रेयस ठरव कसे काय यायचे ते.."
ऑफिसला जाताना गाडीत श्रेयस थोडा नाराज होता..
" तू चिडला आहेस का?"
" मी कशाला चिडू? आणि चिडलो तरी तुला काय? तू जा छान तुझ्या आईकडे.. मजा कर.. तुला काय पर्वा माझी?"
" अच्छा, मी आईकडे जाणार म्हणून कोणाला तरी राग आला आहे? पण आधी आपले दोघांचे रविवारी जायचे ठरले होते.. मावशींचा कार्यक्रम अचानक ठरला.. मी काय करू?"
" तू रहायला नको ना जाऊस.."
" आर यू ओके? शनिवारी ऑफिस संपल्यावर मी आईकडे जाणार आणि तुला काय म्हणायचे आहे, मी फक्त तोंड दाखवून यायचे.. नो वे.. मी तर मॉमला काय काय खायला करायला सांगणार आहे.. मला तर आत्ताच तिथे जावेसे वाटते आहे.."
" पण तू आपल्या इथे कर ना तुला हवे ते खायला.."
"काकींना मी केलेले आवडले नाही बहुतेक.. आणि शहाण्या तू तुझ्या फॅमिलीसोबत राहतोस.. आणि मी एक दिवस चालले आहे तर तुझी नाटके.."
" तुला काय माहीत नवीन लग्न झालेल्या नवर्‍याची व्यथा.." श्रेयस नाटकीपणे म्हणाला.. आणि दोघेही हसायला लागले.. शनिवारी श्रेयसने कवलला तिच्या आईकडे सोडले.. त्यांना मोकळेपणाने बोलता यावे म्हणून तो तिथून निघाला.. पण घरी आल्यावर त्याला खूप एकटे वाटले.. काही दिवसातच एखाद्याची एवढी सवय होऊ शकते.. यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता..
        इथे कवल माहेरपण मस्त एन्जॉय करत होती. तिच्या आईने तिच्या आवडीचे सगळे पदार्थ केले होते.. तिला काय खाऊ आणि काय नको असे झाले होते..
" कवल, तिथे सगळे ठीक आहे ना?"
ममीजींनी विचारले..
" हो मॉम का ग? असे का विचारतेस?"
" काही नाही ग.. तुझे लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच तू शांतपणे भेटते आहेस ना, म्हणून विचारले. फोनवर आपण बोलतोच.. पण"
खाता खाता कवल मध्येच थांबली..
" तिथे सगळे चांगले आहेत ग.. पण माझा ना जेवणाचा प्रॉब्लेम होणार आहे बघ.. यू नो मॉम ते भाजीत, वरणात गूळ किंवा साखर टाकतात.. नॉनव्हेज सोडून दे, पण कांदा, टोमॅटो पण त्यांना हवे तेव्हाच वापरतात. मला सवय नाही ग अशा जेवणाची."
" आम्ही तुला आधीच बोललो होतो.." ममीजी म्हणाल्या.
" आधी बोललो होतो, ते सोडून दे.. माणसे चांगली आहेत ना? मग मी करतो तुझ्या जेवणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. " इतका वेळ शांतपणे यांच्या गप्पा ऐकणारे पापाजी म्हणाले..
" थॅंक यू पापा.." कवल आनंदाने म्हणाली..
" ज्यादा मत खा मोटी हो जायेगी.." सुखीने चिडवले..
" मी काय शर्लिन आहे, मोटी व्हायला?" कवल म्हणाली.." आता याचे पण लग्न करून टाका.."
त्या दोघांच्या लुटुपुट भांडणात जेवण कधी झाले कोणालाच कळले नाही.बघूया पापाजी कवलचा प्रॉब्लेम कसा सोडवतात ते पुढच्या भागात..
हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका...

सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई

🎭 Series Post

View all