2 स्टेटस भाग १०

Story Of A Couple From Different States

2 स्टेटस भाग १०



मागील भागात आपण पाहिले कि शोभाताईंसाठी पायघड्या घातल्या गेल्या होत्या आणि पुढे त्यांच्यासाठी अजून एक गंमत होती.. काय ते पाहू आता..



मंडपात गुरूजी लग्नाच्या विधींची तयारी करत होते.. सुरेशराव त्यांची वाट पहात होते.. ' हे काय?' शोभाताईंनी खुणेने विचारले.. पापाजी तिथे आले म्हणाले," बहेनजी यह छोटासा तोहफा, हमारी तरफसे".. शोभाताईंनी पाहिले तर पेशवाई थाटाचे कपडे घातलेला श्रेयस येताना दिसला. कद काय पुणेरी पगडी काय.. त्यांनी आश्चर्याने आ वासला, कारण त्याने तर शेरवानी विकत घेतली होती.. हे घेतले कधी? श्रेयस तिथे येऊन उभा राहिला तितक्यात कवलचे भाऊ तिला घेऊन येताना दिसले.. त्यांनी तिच्या डोक्यावर छान फुलांची चादर धरली होती.. आणि या सगळ्यामध्ये शोभाताईंना आवडलेली नऊवारी नेसून, सगळे मराठमोळे दागिने घातलेली कवल चालत येत होती.. श्रेयस शोभाताईंच्या जवळ आला आणि त्याने विचारले, " खुश?" 

"खूप.." शोभाताई पाणावलेल्या डोळ्यांनी बोलल्या.." पण पंजाबी पद्धतीचे लग्न?"

" हे झाल्यावर.. चालेल ना?" सुरेशरावांनी विचारले..

" पळेल" शोभाताई हसत म्हणाल्या..

मग काय.. आधी वैदिक पद्धतीने लग्न लागले.. मंगलाष्टके , सप्तपदी, कानपिळी.. त्यावेळेस सुखीने एवढ्या जोरात कान पिळला कि श्रेयस बराचवेळ कान चोळत बसला होता.

मध्येच श्रेयसच्या मामीने काढले.. "काय मग श्रेयस हिचे नाव बदलणार ना? कवल हे काय आपल्याकडचे नाव नाही." नाव बदलणे वगैरे काय असते हे कवलला एवढे काही माहित नव्हते.. त्यामुळे तिने प्रश्नार्थक नजरेने श्रेयसला विचारले.. त्याने मानेनेच खूण केली.. पण तो बोलायच्या आधीच सुरेशराव बोलले.." हे लग्न करतानाच आम्हाला तिचे नाव वेगळे आहे हे माहीत होते.. आणि फक्त आपल्याला हवे म्हणून नाव बदलणे आम्हाला कोणालाच मान्य नाही. हा सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय आहे.." गुरूजींनी तांदळाने भरलेले ताट श्रेयसच्या हातात दिले. त्याने अंगठीने एक नाव त्यात लिहिले. त्याने काय लिहिले आहे हे ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक होते.. त्याने नाव लिहिले होते 'कवल'..आणि मग नाटकीपणाने म्हणाला," आजपासून अशीही हिची नेहमीच जीत होणार आहे मग अजून नावातही जीत कशाला?" त्याने आपले नाव बदलले नाही, हे समजल्यावर कवललाच काय तिच्या घरच्यांनासुद्धा बरे वाटले.. विधी चालू असतानाच कवलच्या बहिणींनी श्रेयसची मोजडी पळवली.. त्यांचा जुते देदो, पैसे लेलो टाईप करायचा मूड होता.. पण सुमीतने जेव्हा सांगितले कि त्यांनी श्रेयसच्या समजून सुरेशरावांची मोजडी पळवली आहे, तेव्हा त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.. शेवटी त्यांची दया येऊन श्रेयसने त्यांच्या हातात पाकिट दिले.. सर्व विधी झाल्यावर दोघेही कपडे बदलायला गेले.. आणि सगळा माहोल पंजाबी झाला.. परत एकदा कवल तिच्या भावांसोबत आली. पण यावेळेस पूर्ण पंजाबी वेशात..

        श्रेयससुद्धा शेरवानीत छान दिसत होता.. दोन्ही पद्धतीने लग्न लागले.. आणि दोघांच्याही घरच्यांनी हुश्श केले.. शेवटी सुरू झाली बिदाई.. सुखीने हॉलपासून कारपर्यंत गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. त्या पाकळ्यांवरून नवविवाहित जोडपे चालत होते.. कवल, तिची आई, बाबा, सगळेच खूप रडत होते.. म्हणजे एकाचे रडणे झाले कि दुसरा परत तिच्या गळ्यात पडून रडत होता. शेवटी श्रेयसला एवढे कसेतरी वाटले कि तो ममीजींना म्हणाला सुद्धा, " मी काय म्हणतो, तुम्हा सगळ्यांना एवढे वाईट वाटते आहे तर मग हिला राहू दे तुमच्याकडेच.. हिचे रडणे थांबले, कि पाठवा मग घरी.."

हे ऐकून सगळेच हसायला लागले.. मग मात्र बाकीच्यांनी त्यांचे रडणे आवरते घेतले.. आणि शेवटी कवल श्रेयसच्या घरी आली..

        ऋताने दरवाजा अडवून तिला उखाणा घ्यायला सांगितला.. पूर्ण लग्न पंजाबी पद्धतीने होणार होते म्हणून तिथे तिला कोणीच सांगितले नव्हते. पण आता मात्र सगळ्यांनीच हट्ट धरला होता.. ती थोडी बावरली आहे हे पाहून श्रेयसच्या आत्याने आधी श्रेयसला उखाणा घ्यायला सांगितला.. पण मेथीची भाजी अजिबात नको असे ठणकावून सांगितले.. श्रेयसने सुरुवात केली.. "बाणात बाण मदनबाण, कवल माझी जीव कि प्राण.." हे झाल्यावर "आता तू, आता तू" असा गलका सुरू झाला.. कवलने दीर्घ श्वास घेतला आणि सुरूवात केली.. "देवाला वाहते हळदीकुंकू वाकून, उखाण्याला सुरूवात करते तुमचा मान राखून, नाव घे, नाव घे आग्रह आहे सर्वांचा, पण नेहमीच प्रश्न असतो उखाण्यांचा, नांदा सौख्यभरे असा तुम्ही सर्वांनी दिला आशीर्वाद, उद्या नक्की घ्या सत्यनारायणाचा प्रसाद, गोकुळासारखे सासर, सारे कसे हौशी आणि श्रेयसचे नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी.."

कवलकडून एवढ्या मोठ्या उखाण्याची अपेक्षा नसल्याने ती भरपूर टाळ्या आणि कौतुकाची मानकरी ठरली.. पण न चुकता कवलने एक पुस्ती जोडली.. "ह्या उखाण्याचे क्रेडिट जाते ऋताला.. जिने मला हे सगळे लिहून देते.. बिग थँक्स टू हर. फॉर एव्हरीथिंग.."

लक्ष्मीपूजन झाले.. कवलसोबत सुखी आला होता.. पण तो सुमितसोबत होता.. ऋता सुद्धा इथे तिथे फिरत होती.. त्यामुळे कवल काय करावे हे न कळून एकटीच खोलीत बसली होती.. बाहेर जाऊ कि नको असा विचार तिच्या मनात येत असतानाच पटकन दरवाजा लावण्याचा आवाज आला. तिने वळून पाहिले तर श्रेयस आला होता. त्याने तोंडावर बोट ठेवले.. तो तिच्याजवळ आला.. आणि तिच्या कानात पुटपुटला.." गेले तीन दिवस तुला सांगायचे होते.."

" काय?" कवलचे गाल आरक्त झाले होते. पोटात फुलपाखरे उडत होती..

" इतकी वर्ष तुला पाहतो आहे.. पण तू एवढी सुंदर आधी कधीच दिसली नव्हतीस." हळू हळू त्याचे हात तिच्याभोवती गुंफले जाऊ लागले..

" इथून निघ.. कोणीतरी येईल.." कवलचा आवाज तिला स्वतःलाच ऐकू येत नव्हता..

" हक्काची बायको आहे माझी.." असे म्हणत श्रेयस अजून जवळ येणार एवढ्यात कोणीतरी जोरात दरवाजा वाजवला.. श्रेयस दचकला आणि बाजूला झाला.. त्याने तिला कोण आहे विचार असे खुणावले.. " कोण आहे?" कवलने हसू दाबत विचारले..

" अग मी मामी आहे.. दरवाजा का बंद केलास?" 

आता? कवलने श्रेयसला खुणावले..

" मी बाथरूममध्ये लपतो.. तू पटकन तिला बाहेर घेऊन जा.." श्रेयस तिच्या कानात पुटपुटला आणि जाताना जादूची पप्पी घेऊन गेला..

" काय हे, दरवाजा का लावला होतास?" मामींनी संशयाने विचारले.

" ते जरा साडी नीट करत होते.. काही काम होते का माझ्याकडे?"

" हो, चल ताई बोलवत आहेत तुला.. थोडे खाऊन घे. मग कपडे बदलून झोप. उद्या परत पूजा आहे.. लवकर उठायचे आहे.. तो श्रेयस कुठे गेला काय माहीत? तुला दिसला का?"

हा प्रश्न ऐकून कवलचे ततपप झाले, पण तेवढ्यात ऋता आली, " अरे चला ना जेवायला आता.. भूक लागली आहे.." 

" हो चला.."

सगळे गेले असे समजून श्रेयस बाहेर आला तर मामी त्याची वाट पहात खोलीबाहेर उभी होती..

" तू ज्या शाळेत आहेस ना तिथे आम्ही खूप वर्ष शिकवले आहे.. कळले का?" मामी हसत म्हणाली.. आणि श्रेयस लाजून पळाला.. पूजा झाल्यावर कवल लगेच पतफेर्यासाठी माहेरी जाणार होती सुखीसोबत.. तिला असे वाटत होते कि तिच्या माहेरी जसे अंगठी शोधणे वगैरे खेळ खेळतात असे काहीतरी इथेपण असेल, पण इथे तसे काहीच नव्हते.. सगळेच कसे मिळणार असे मनाला समजावत ती पूजेसाठी तयार व्हायला लागली.. पूजा होता होताच तिचे आईबाबा आले होते.. त्यांना बघून तिला असे वाटले जणू कितीतरी वर्षांनी ती त्यांना भेटते आहे.. तिने माहेरी जावे असे श्रेयसला अजिबात वाटत नव्हते, पण.... संध्याकाळी सगळे नातेवाईक, मित्रपरिवार येऊन गेल्यावर कवल निघाली माहेरी जायला.. तिथून आल्यावर ते दोघे जाणार होते हनिमूनसाठी सिमला कुल्लू मनालीला.. तिथे श्रेयसने छानसे हॉटेल बुक केले होते.. हे दोघे हनिमून कपल आहे हे कळल्यानंतर त्यांनी रूम छान सजवून ठेवली होती.. ती सजावट पाहून दोघेही खुश झाले.. ते बेडवर जाणार इतक्यात कवलच्या आईचा फोन आला," कवल पोचलात ना नीट? काही त्रास नाही ना झाला?"

" हो मॉम, पोचलो.. ऐक ना आम्ही ना जेवायला बाहेर आलो आहोत.. उद्या फोन करते.." परत डिस्टर्बन्स नको म्हणून श्रेयसने आधीच शोभाताईंना फोन केला. "आई आम्ही इथे पोचलो, आता जेवायला जातो आहोत. उद्या फोन करतो.." शोभाताईंना बोलायची संधीही न देता त्याने फोन ठेवला.. तोच परत कवलचा फोन वाजला.. "आता कोण?" श्रेयसने चिडून विचारले..

" ऋता.. हां बोल ऋता.."

" मी काय म्हणते वहिनी. तू येताना माझ्यासाठी काय आणशील?"

" हॅलो.. ऋता, हॅलो ऋता.. इथे ना अजिबात रेंज नाहीये.. मी करते तुला उद्या फोन.."

ती श्रेयसकडे वळली तोच परत फोन वाजला, यावेळेस श्रेयसचा..

" बोल सुमित.." 

" दादा, मी आता कपाट आवरत होतो. तिथे तुझी जुनी पुस्तके मिळाली. काय करू त्यांचे?"

" ते विचारायला फोन केलास?"

" हो.. काही चुकले का माझे?"

" काही नाही..... त्या पुस्तकांचे हवे ते कर.. आणि मी आल्यावर मला सांग.. बाय.."

श्रेयस कवलकडे वळला.. तिचा हात हातात घेणार तेवढ्यात परत तिचा फोन वाजला.. 

" बोल सुखी.."

" अरे तू टिनाला सांगितले नाहीस तुझे लग्न आहे म्हणून?"

फोनवर कोणाचा तरी हसण्याचा आवाज आला आणि या दोघांना प्लॅन कळला..

" फोन रख सुखी.. तू जा हनिमूनपे.. मैं तब दिखाती हूं...." दोघांनीही आपापले फोन बंद केले.. आणि एका नवीन नात्याला सुरूवात झाली..




हा होता कवल आणि श्रेयसचा लग्नापर्यंतचा प्रवास.. तो कसा वाटला ते न विसरता सांगा.. पुढे पाहूया त्यांच्या लग्नानंतर काय होते ते...


सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

🎭 Series Post

View all