2 स्टेटस भाग ८

Story Of A Couple From Different States
2 स्टेटस भाग ८..


सुखविंदरने ठरल्याप्रमाणे दोन बसेस ठरवल्या होत्या.. एक बस श्रेयसच्या घरच्यांसाठी एक कवलच्या घरच्यांसाठी.. बाकीचे नातेवाईक आपापल्या गाड्या घेऊन येणार होते.. घरच्या देवाला नमस्कार करून पानाचा विडा ठेवून श्रेयस घराबाहेर पडला. फार्महाऊसवर जायला दोनेक तास तरी नक्कीच लागणार होते.. मस्त अंताक्षरी खेळत, टाईमपास करत गाडी निघाली होती.. आणि श्रेयसला वेध लागले होते कवलला घरी आणण्याचे.. सगळेच छान आनंदात होते, उत्साहात होते.. हे सगळेजण फार्महाऊसवर पोचले पण कवलच्या गाडीचा पत्ता नव्हता.. खरेतर त्यांची गाडी आधी पोचणार होती.. आणि ते सगळे आवरून नवर्‍याचे स्वागत करणार असे ठरले होते. पण कवलच्या घरचे कोणीच दिसत नव्हते. या सगळ्यांना ते थोडे विचित्र वाटले. पण सुमीत पुढे गेला आणि त्याच्या मित्राशी बोलून या सगळ्यांची व्यवस्था करायला गेला. सगळ्यांना त्यांच्या खोल्या दिल्या. सगळ्यांचे आवरून झाले.. तरिही कवलच्या बसचा पत्ता नव्हता.. बरे कोणाचा फोनही लागत नव्हता.. आता श्रेयसला थोडे टेन्शन यायला लागले. बाकीच्या नातेवाईंकांना टेन्शन येऊ नये म्हणून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली. जेवणे झाली. सगळे साखरपुड्याच्या तयारीला लागले तरिही हे कोणीच आले नाही. शेवटी एकदाचा सुखीचा फोन आला.. \"आमची बस बंद पडली होती.. नेमकी जिथे बंद पडली तिथे रेंजही नव्हती. त्यामुळे तुम्हाला कळवता आले नाही.\" आम्ही पोचतोच.. हे ऐकून श्रेयसच्या जीवात जीव आला.. तोपर्यंत सुमीतने त्याच्या भावंडांबरोबर मिळून एक योजना ठरवली. सुखीच्या सांगण्याप्रमाणे त्यांना यायला अजून एक तास नक्कीच होता.. तोपर्यंत या लोकांनी मिळून सर्व तयारी करून ठेवली. कवलच्या घरचे जेव्हा आले.. तेव्हा श्रेयसच्या घरचे त्यांच्या स्वागताला उभे होते.. त्या प्रत्येकाचे सुमीतने फुले देऊन स्वागत केले.. आधीच बंद पडलेल्या बसने वैतागलेल्या त्या लोकांना झालेले स्वागत पाहून थोडे लाजल्यासारखे झाले.. "तुम्ही सगळे उपाशी असाल आधी जेवून घ्या. नंतर बोलू.." सुरेशराव म्हणाले.. पहिल्याच कार्यक्रमाची अशी सुरुवात झाल्याने दोन्ही पक्ष मनातून थोडे नाराज झाले होते. पण दाखवत कोणीच नव्हते. कवलचे सुद्धा तोंड उतरले होते. इथे मग सुमीत, ऋता आणि सुखीने पुढाकार घेतला..
"मुलाकडचे सगळे आवरून आले आहेतच.. तर आता प्लीज मुलीकडच्यांनी आवरून घ्या.. नाहीतर आपण हे जे फार्महाऊस तीन दिवसांसाठी घेतले आहे. त्याचे चार दिवस होतील.. म्हणजे तुमचा मेकअप वगैरे लवकर होणार असेल तर चांगले आहे.. नाहीतर.."
सुमीतची हि अनाउन्समेंट ऐकून सगळे हसायला लागले.. वातावरण हलकेफुलके झाल्यावर मुलाकडचे आजूबाजूला फिरायला गेले आणि मुलीकडचे आवरायला..
लग्न जरी पंजाबी पद्धतीने होणार होते , तरी शोभाताईंनी मुद्दाम त्यांच्या गुरूजींनाही बोलावून घेतले होते.. साग्रसंगीत साखरपुड्याचे विधी झाल्यावर श्रेयसच्या घरच्यांना जरा बरे वाटले.. तोपर्यंत पापाजींनीही त्यांच्या पद्धतीने श्रेयसला टिका लावून त्याला ड्रेस दिला.. आता सगळे वाट पहात होते अंगठी घालण्याची.. पण कवल तयारच होत नव्हती.. ममीजींनी डोळ्याने खुणावले.. शोभाताई बघत होत्या.. पण हिचा आपला न्नाचा पाढा. शेवटी तिला काय हवे आहे ते श्रेयसला कळले. तो गुडघ्यावर बसला आणि मान झुकवून त्याने तिला विचारले,"माझ्यासोबत सुखी आयुष्य जगायला आवडेल का तुला?"
कवल लाजत हो म्हणाली नंतरच तिने अंगठी घालून घेतली.. सुमीत आणि सुखीने फुलांचा भरपूर वर्षांव केला.. यानंतर सुरू होणार होता.. बायकांचा मेहेंदीचा कार्यक्रम आणि पुरूषांचा......
सगळ्या बायका लॉनमध्ये बसल्या होत्या.. मधोमध कवलला बसवले होते.. शोभाताईंनी शगुनाची मेहेंदी कवलच्या हाताला लावली.. आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.. सगळ्या बायका मेहेंदीसाठी बसल्या आहेत हे पाहून सगळ्याच पुरूषांची वेगळा कार्यक्रम करायची खूप इच्छा होती.. पण कोणाच्या डोक्यातून हे भूत निघाले माहित नाही..\" बायको दोन्ही हातांवर मेहेंदी काढणार, मग ती जेवणार कशी? मग नवर्‍याने तिच्या शेजारी बसायचे आणि तिला हवे ते द्यायचे..\" सगळेजण जोडीने बसले.. पुरूषांच्या चेहर्‍यावर बारा वाजले होते.. पण बायका मात्र खुश होत्या.. त्यात सगळ्यात जास्त खुश होती नवी जोडी.. श्रेयसला जाम थ्रीलींग वाटत होते. सगळ्यांसमोर कवलला भरवायला, तिला पाणी वगैरे देताना. त्याला ते प्रेमाने करताना बघून ममीजी आणि पापाजींच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू येत होते.. नुसतेच बायको शेजारी काय बसायचे. मग त्यातून सुरुवात झाली गप्पांना, वेगवेगळ्या खेळांना.. त्या सगळ्यात मराठी आणि पंजाबी मध्ये जी दरी होती.. ती हळूहळू कमी होत होती.. आज खूप दमलो आहोत उद्या हळदीला आणि संगीतला धमाल करू असे म्हणत एकेकजण तिथून निघू लागला.. श्रेयसने खास त्याच्या आणि कवलच्या आईबाबांची परवानगी घेतली.. आणि तो कवलला घेऊन नदीकाठी आला..
तिथे आधीच एक छोटासा शामियाना तयार केला होता. आजूबाजूला पडदे सोडले होते.. आतमध्ये छान मेणबत्त्या लावल्या होत्या.. मंद आवाजात गाणी चालू होती.. दुसरीकडे नदीच्या पाण्यावरून थंडगार वारे वहात होते..
"लग्नाआधी गर्लफ्रेंडसोबत फ्लर्ट केले तर चालेल का?" श्रेयसने मिस्किलपणे कवलला विचारले.. त्यावर ती चक्क चक्क लाजली.. "डान्स?" तिने मान हलवून होकार दिला..
" हि जागा जेव्हा पाहिली ना तेव्हाच मला तुला इथे घेऊन यायचे होते.. बायको म्हणून नाही हा.. एक मैत्रिण म्हणून. उद्या वेळ मिळेल कि नाही माहित नाही. म्हणून आजच त्याला हि तयारी करायला सांगितली होती.. तुला आवडले?" श्रेयसने विचारले..
" खूप...." कवलने उत्तर दिले..
" मग , एवढे सगळे केले त्याचा काही मोबदला मिळेल?"
कवलने डोळे बंद करून घेतले.. श्रेयस पुढे होणार एवढ्यात " अजून लग्नाला दोन दिवस बाकी आहेत" असा जोरात आवाज आला.. दचकून त्यांनी पाहिले तर सुमीत, सुखी आणि ऋता सगळे त्यांच्या बाकीच्या भावंडांबरोबर तिथे उभे होते..
" कमॉन , आमचे आता लग्न होणार आहे.. आता तरी आम्हा दोघांना एकांत द्या कि थोडा.."
" तेच तर आम्ही म्हणतोय जिजू.. तुमचे लग्न झाल्यावर तुम्ही नेहमीच एकत्र राहणार.. जरा आमच्याशी पण बोला कि.." कवलची एक धीट बहिण बोलली..
" मग काय दादा.. चला आपण इथेच नदीकिनारी छान गाणी म्हणूया.." ऋता म्हणाली..
" नको.. मला झोप येतेय. मी जातो झोपायला.. उद्या माझी हळद आहे.." श्रेयस मुद्दाम प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला..
" ओके.. तू जा.. वहिनी बसेल आमच्यासोबत.. काय वहिनी?" ऋताने विचारले.." मी जरा बाकीच्यांशी हिची ओळख पण करून देते."
" अरे जिजू , आप भी बैठी ये ना.. वैसेभी शादी के बाद हम वापस पंजाब चले जायेंगे.. तो बात थोडी होने वाली है.."
ठरवलेल्या रोमँटिक पलॅनची ऐशीतैशी झाल्यामुळे श्रेयस थोडा वैतागला होता.. पण तो बसला. कमीत कमी समोर तरी कवल दिसेल या हेतूने.. त्याचा मोबाईल वाजला.. त्यावर एक मॅसेज आला होता.. \"होणाऱ्या नवर्‍या.. खूप खूप थँक्स या न झालेल्या रोमँटिक डेट साठी .. आणि lots of love.. तुझ्या होणाऱ्या बायकोकडून...\"
तो मॅसेज वाचून श्रेयस खुलला आणि उद्या संगीतमध्ये कोण कोणता डान्स करणार यावर सगळ्यांसोबत चर्चा करायला लागला..


काय मग लग्न एन्जॉय करताय ना..
शेवटी कवल आणि श्रेयस या दोघांचे लग्न यशस्वी पार पाडायचे आहेच.. आज बिघडलेल्या बसरूपी एक संकट आले होते.. उद्या असे काही होणार नाही अशी आशा बाळगूया...

कथा कशी वाटली, सांगायला विसरू नका...
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all