मायेचा पदर ( भाग १५)

काही वेळेस आपलेच लोक आपल्याच सुखाच्या आड येवू पाहतात. तेव्हा खूपच वाईट वाटते.
कथेचे नाव - मायेचा पदर..
विषय - कौटुंबिक कथामालिका
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

जेव्हापासून सुलभा काकू आणि आत्याबाईंना नंदिनीची आनंदाची बातमी समजली होती तेव्हापासून दोघींचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. निशांतला तर क्षणभरही नंदिनीला नजरेसमोरून दूर करु वाटेना. साऱ्यांचे प्रेम पाहून नंदिनी तर आज भरुन पावली होती. याच सुखाची ती कितीतरी दिवसापासून ती भुकेली होती. आता कुठे दोघांचेही आयुष्य परिपूर्ण होण्याच्या मार्गावर होते. मनातून खूपच आनंद झाला होता दोघांनाही. तिच्या आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरील हाच आनंद पाहण्यासाठी आतुर झाली होती नंदिनी.

म्हणतात ना,"भगवान के घर में देर हैं लेकीन अंधेर नहीं.." असेच काहीसे झाले होते नंदिनी सोबत. लग्न झाल्यापासून ज्या सुखासाठी ती तरसली होती ते सुख परमेश्वर कृपेने आज तिच्या पदरी पडले होते. खरंच, प्रत्येक गोष्टीची वेळ ही यावीच लागते. यात दुमत नाहीच मुळी. स्वतः नंदिनी याचा अनुभव घेत होती. थोडं उशीरा का होईना पण परमेश्वराने तिचे गाऱ्हाणे ऐकले होते. आज खऱ्या अर्थाने सुखाची नवीन परिभाषा तिला उमगली होती.
पण काही वेळेस आपलेच लोक आपल्याच सुखाच्या आड येवू पाहतात आणि ते आपल्यालाच माहित नसते. जसे की नंदिनीच्या दोन्ही जावा, वरवर तिच्याशी गोड बोलत असल्या तरी तिच्याविषयी त्यांच्या मनात खूपच विष भरले होते. याचे एकच कारण ते म्हणजे नंदिनी किती नशीबवान आहे. सारं कसं मनासारखं मिळालं तिला. सगळेच जण तिचं कौतुक करत असतात. माणूस जेव्हा दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो तेव्हा तो मनापासून कधीच आनंदी राहू शकत नाही. आणि हेच नंदिनीच्या दोन्ही जावांना समजत नव्हते. त्या स्वतःकडे जे आहे त्यात आनंद, समाधान मानण्याचे सोडून नंदिनीकडे असलेल्या गोष्टींनी दुःखी होत होत्या. आणि त्यांचा हाच स्वभाव घरातील इतरांना चांगलाच ठावूक होता. नंदिनीला फक्त हे जरा उशीरा समजले.

सगळ्यांची एकी आणि नंदिनीवरचे प्रेम पाहून तिच्या जावा मात्र नंदिनीचा खूपच तिरस्कार करत होत्या. आणि परमेश्वर कृपेने अजूनतरी तिला मातृत्वसुख मिळाले नाही याचा त्यांना मात्र आनंद होत होता.
पण विनाकारण एखाद्याची निंदा करणं, त्याला घालून पाडून बोलणं, इतरांच्या सुखाने स्वतः दुःखी होणं हे मात्र चुकीचं आहे. हे काही लोकांना अजिबात समजत नाही. पण आपण केलेल्या चुकीच्या वर्तणूकीची शिक्षा आपल्याला कधी कधी भोगवीच लागते हेही तितकंच खरं.

आता नंदिनीच्या  जावेसोबत असेच काहीसे घडले.

दोन्ही जावा बाहेरची कामे आटोपून घरात येतच होत्या. ओट्याची पायरी चढताना नेमकी पूनमचा पाय घसरला आणि ती पडली. पाय मुरगळला. हातालाही थोडे खरचटले.

" अगं अगं सावकाश", सुलभा काकूंनी धावत जावून मग तिला आधार देत उठवले.

"काय ग लक्ष कुठे आहे तुझं? नक्कीच कोणाबद्दल तरी वाईट विचार करत असशील मनात."आत्याबाईंचा टोमणा पूनमच्या मात्र जिव्हारी लागला.

सवयीप्रमाणे तिही आत्याबाईंचा शब्द थोडीच ना खाली पडू देणार होती.
" काय हो आत्या, तुम्ही इथे आल्यापासून मी बघते आहे, कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न  केला तरी तुम्हाला मी चुकीचीच वाटते. आणि ही नंदिनी चुकीची असली तरी नेहमी बरोबरच असते तुमच्या नजरेत."

"हे बघ पुनम, हे डोक्यावरील पांढरे केस उन्हात उभं राहून पिकवले नाहीत ग मी, चांगला वाईट सगळा अनुभव गाठीशी आहे बरं का. माणसं अचूक वाचता येण्याचं कौशल्य हळूहळू अंगी मुरलंय आता. आणि नका ग नंदिनीचा हेवा करु. अगं खूप साधी आहे ती. तुमच्यासारखा चॅप्टरपणा नाही जमणार तिला. आणि एखाद्याकडून आपलं कौतुक व्हावं असं जेव्हा वाटतं माणसाला तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, "कौतुक हे मागून मिळत नसतं त्यासाठी मन निर्मळ असावं लागतं आणि कर्म देखील. तोंडावर एक पाठीमागे एक करण्याची सवय नसावी. कारण मांजर कितीही डोळे झाकून दूध पित असले तरी ते सगळ्यांना दिसत असते.
एखाद्याच्या मनात आपली जागा निर्माण करण्यासाठी वेगळं असं काहीच करण्याची गरज नाही. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली ना की आपसूकच जमतं सगळं. बघा जमलं तर करा विचार थोडा."

आत्याबाईंच्या बोलणे दोघींनाही विचार करायला लावणारे होते खरे, पण दोघींनाही ते किती पटले ते देवच जाणे. त्यात आता पूनमचा पाय मुरगळला म्हणजे तीही जास्त काम करु शकणार नव्हती. निदान दोन चार दिवस तरी काळजी घ्यावी लागणार होती. त्यात नंदिनी पण आजारी. इकडे पल्लवीला मात्र या गोष्टीचे खूपच टेन्शन आले. "आता सगळी काम मी एकटीने कशी करायची?" तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह तिची काळजी आणि भीती दाखवत होते.
तेव्हढ्यात आत्याबाई म्हणाल्या, "ओ मॅडम नका टेन्शन घेवू, आम्ही आहोत सगळ्याजणी. तुझा एकटीचा जीव नाही घेणार आम्ही. जगभराचं ओझं तूझ्या एकटीच्या डोक्यावर असल्यासारखं नको तोंड पाडूस. जा तिच्या पायाला काहीतरी लावून दे."

आत्याबाईंनी मात्र दोघींचीही बोलतीच बंद केली.

तेवढ्यात निशांत आत्याला म्हणाला, "आत्या उद्या सकाळी मी आणि नंदिनी निघतो पुण्याला. तुम्ही या तीन चार दिवसांनी."

"अरे कशाला, आम्ही पण येतो की, राहिलो एक दिवस  बस झालं आता. तसंही इथे पाहिलं ना ह्या दोघींना किती त्रास होतो कुणी आलं तर. त्यामुळे आपलेपणा वाटत नाही रे. मधुकर आणि मालतीच कसे राहतात त्यांच्यासोबत काय माहिती. त्यात सासू म्हणजे गरीब गाय मग सुनांचेच राज्य. असो, बोलून काहीही उपयोग नाही त्यांना. आपण सगळेच निघुयात उद्या."

दुसऱ्या दिवशी सकाळीच मग सगळेच जण निघाले जाण्यासाठी. मधुकरराव आणि मालती काकूंना मात्र खूपच वाईट वाटत होते.
"आक्का राहिली असतीस ग अजून दोन दिवस. तू तरी थांब ना." मधुकरराव केविलवाण्या स्वरात बहिणीला म्हणाले.

" म्हणाला तेच खूप झालं रे, आता तुम्ही दोघेही या एकदा तिकडे. तसंही तुम्ही कुठेही जात नाहीत की येत नाहीत. स्वतः ला अगदी वाहून घेतलंय कामात. आता सोडा हा प्रपंच. एक सोडून दोन दोन मुलं, सूना आहेत हे सगळं सांभाळायला आता स्वतः साठीही जगा थोडं."

बहिणीच्या या बोलण्याने मधुकररावांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. पण वेळीच त्यांनी  स्वत:ला सावरले.

नंदिनीची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे म्हणावं तसं एन्जॉय कोणालाही करता आलं नाही. पण दोन दिवस का होइना, एकमेकांसोबत थोडा निवांत वेळ मिळाला सर्वांना. रोजच्या धावपळीतून थोडासा विसावाही मिळाला. आणि त्याहीपेक्षा घरात आता नवीन पाहुण्याचे आगमन होणार हा आनंद खूप मोठा होता. दोनच दिवसांत बरेच काही बदलले होते नंदिनीच्या आयुष्यात.

घरी पोहचताच सर्वांचेच रोजचे रूटीन सुरु झाले. पुन्हा तीच धावपळ नि रोजचीच ती घाईगडबड.त्यात आता नंदिनीची ही अशी अवस्था. पुन्हा एकदा नोकरीतून ब्रेक घ्यावा लागणार होता तिला. तिने सलीलला तसे फोनवरून सांगितले. सलील देशपांडे, नंदीनीचा वर्गमित्र आणि आता तिचा बॉस.
त्यामुळे सुट्टी मंजूर करणं जास्त अवघड नाही गेलं.
त्यातच आता नीरजच्या लग्नाचीदेखील चर्चा सुरु होती घरात. नंदिनीला थोडं बरं वाटलं की मग ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असं ठरलं.

दोन दिवस एकत्र घालवून सगळेच जण घरी परतले. पुढच्या कामासाठी एक वेगळीच उर्जा घेवून. खूप दिवसांनी एकमेकांसोबत बसून गप्पा झाल्या, त्यामुळे सगळेच जण मनातून खूपच फ्रेश झाले आणि आनंदीदेखील. त्यातच आता सामंतांच्या घरी नवीन  पाहुणा येणार म्हणजे दुधात साखरच.

क्रमशः

नात्यातील गोडवा पुढेही अनुभवण्यासाठी वाचत राहा "मायेचा  पदर."

©® कविता सुयोग वायकर
( जिल्हा पुणे)

🎭 Series Post

View all