वळीव

.

"आज्जे, हे किती मुंगळ निघालतय बघ. आण ह्यो कसला किडा हाय?" "आर पावसुळ्याचं दिवस जवळ आलं, म्हणुन ते मुंगळ निघत्यात. त्येंना आपल्या आदी वर्दी लागती आणि त्यो किडा मिरगाचा किडा हाय मारु नगस त्याला. आठ दिसात पाऊस पडल बघ आता." आज्जी बोलली.

आठ दिस झालं. रोज सांच्यापारीला आभाळ भरुन येत हुत. अंगाची लाही लाही हुतं हुती. "आज लै गदमादतयं, आज पाऊस पडल असं वाटतंय, तेवढ्या शेणी माळ्यावर रचुन घे आणि लाकुडफाटा शेडात ठेवून दे" सारजाबाई सुनेला म्हणाली. सकाळपासून आभाळ भरून आलं होत. कधी आभाळ गळायला लागल याचा नेम नव्हता. सुन मीरानं पोराबाळांना हाताला घेऊन बाहेरच्या शेणी रचायला सुरुवात केली. सारजाबाई एका जागेवर बसुन सुनेला सुचना देत होती.

गावात जिकडे तिकडे लगबग सुरू झाली होती. कोण शेणी रचत होतं, कोण लाकुडफाटा आत घेत हुतं, तर कोण गंजीवर ताडपत्री घालत हुतं. कोण घर शाकारुन घेत होतं.

बाबू माने म्हसरांना शेडात बांधायला घेऊन चालला हुता, तर त्याला रेडकानं व्हलपटवलं, चांगला कोसभर मागनं फरफटत गेला. चंद्रीचा नवरा काशा आपल्या साध्या मातीच्या घराला शेवरीचा कुड घेत हुता. कोण फाटलेल्या पत्र्यावर प्लास्टिकचा कागद लावत हुतं, तर कोण नारळाच्या झावळ्यांनी शेड शाकारत हुत.
 

दुपारच्या टायमाला आभाळानं गडगडायला सुरवात केली, तशी रानामाळातन माणसांनी आपल्या गुराढोरांना घेऊन घरचा रस्ता धरला. सारजा रानातून येणाऱ्याजाणाऱ्याला विचालत हुती "आमचा गण्या निघालाय कारं रानातून गुर घेऊन?...

थोड्या वेळात गार वारा सुटला आणि लाख्कदिशी ईज लकाकली, आभाळ गडाडल, सोसाट्याचा वारा वाहु लागला, वादळ सुरु झाल. गोल गोल वावटळ उडवत धुळ, माती बरुबर कुणाच्या घरावरच कागद तर कुणाचे पत्रे उडवू लागलं. झाडाचे शेंडे जमीनीला टेकु लागले.

थोड्या वेळात पावसाला सुरुवात झाली. मोठ्या मोठ्या गारा पडु लागल्या. पोरं गारा यचायला पळाली की, म्हातारी आज्जी सारजा वरडायची,  "जावं नगा भायर इज हाय.  सारजाने अंगणात लोखांड टाकलं. गळत हुतं तीत भांडी ठिवून दिली. पत्र्यावर ताड ताड गारांचा आणि पावसाचा मारा चालू झाला. पाऊस कसा पण धसमुसळ्यासारखा आडवातिडवा पडत हुता. काही गारा पडुन वळचणीला, घरात येत हुत्या, पोरं यचुन यचुन गारा खात हुती. म्हातारीच सगळं लक्ष गण्याच्या वाटेकड लागलं हुतं, ती काळजी करत बडबडत हुती.  'पावसापाण्याचं लवकर घरी ये म्हून सांगितल हुतं, तरी ह्यानं उशीर केलाय '   सारजा म्हातारीच डोळं गण्याच्या वाटकडं लागलं हुत. म्हसरांच्या मागनं पोत्याची खोळ डोक्यावर घेतलेला गण्या म्हातारीला दिसला, तसं तिच्या जिवात जीव आला. गण्या म्हसरांना घेऊन त्यांना बांधायला शेडात गेला. म्हसरांना बांधून गण्या घरी आला. वळचणीखाली ठेवलेल्या बादलीतल्या पाण्यानं हातपाय धुऊन घरात आला. सारजा बोलली, "बा कुठं ऱ्हायला." "हाय की बसलाय पवार तात्याच्या सपरात, लै माणस बसलीतय तिथं, मी गुरासंगट आलो पुढं." गण्या बोलला.
गण्या पुरता भिजला हुता, त्यान कापड बदलली आणि चुलीपुढ हात शेकत चहाच घोट पिऊ लागला. "यवढा उशीर कशापायी केलास, ईज कसली हुती" म्हातारी गण्याला विचारत हुती.

ताडताड दोन तास पाऊस पडला आणि मग थांबला. नाल भरभरुन वाहु लागले, ओढ्यावगळाला पाणी आलं हुतं.
शेजारची चंद्री धावत आली  "आवं भावजी लांबड निघालय घरात. " गण्या लगीच तिकडा गेला. झटक्यात लांबड्याच्या शेपटाला धरुन बाहेर काढलं आणि लांब सोडुन आला. "त्येनी तरी कुठं जावं, त्यंच्याबी बिळात पाणी शिरतं मग यत्यात आपल्या घराच्या आडुश्याला" गण्या बोलला.

वाटत भेटल्याला राजा त्याला बोलला "लेका खेकड्याला जाऊया का आज?" " थांब बघुया आमची म्हातारी लय वराडती, जरा दमाने बघुया" अंधार पडताच दोघं वगळाला खेकडी पकडायला गेली तेंच्यासारखी बरीच जण आली हुती. किलोदोन किलो काळ्या पाठीच खेकड घावली. घरला आल्यावर म्हातारी वराडलीच, पण काळ्या पाठीच खेकडं बघुन म्हातारी हाराकली. गण्यानं खेकडं साफ केल. म्हातारी आज्जीन पोरांना नांग्या भाजुन दिल्या. सुनेन खेकडी ठेचुन त्याचा मस्त रस्सा बनवला.
खेकड्याच्या रस्सा पिऊन म्हातारीच बरसाण आणि गाण्याचा शिणवटा कुठल्याकठं पळाला.
©️ सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव