...आणि सगुणा हसली...

शाळेपासून वंचित झालेल्या छकुलीची गोड कहाणी...
"ऐ सगुणे ..आवर बये लवकर ...ठेव बघु ती पुस्तक कोपर्यात काय ?कळते व तुले त्यातल..आवर लवकर ... बाजारात लवकर गेलो तर जागा मिळल बसायला ...व ह्या भरलेल्या मालाच चार पैक येतील त्यातुन दाळणदाणा घ्यायचा व उद्याला विकायला भाज्या बी आणायच्या बघ..दोन दिसापासुन तु ती जागा पकडते ना बाय...लय धारजीनी हाय बर ...आजबी भेटली तर बर होईल माय...चार पैक बी मिळतील ...गिर्हाईक बी भेटलं...पाण्यापावसाचा माल टिकत बी नाय बर ...सडुन जातो मग तोटाच तोटा होतो बर...हातात पैक्का नाय बाय...त्यामुळ चाल पटदिशी .."

शांती तावातावने बोलत होती व सगुणी भाजी  बांधायच्या रद्दीतल पुस्तक आश्चर्याने बघत होती ...दोन वरिष शिकलेली सगुणी थोडफार वाचन येत होत बर ..त्याच शब्दांना गुफत शिकण्याचा प्रयत्न करत होती ...चेहेर्यावरचा भाव तर अवर्णियच होता ...तोच शांती पडवीत घुसली सगुनीने लगबगीने पुस्तक शेजारच्या गठोड्याखाली लपवल...शांतीने पाटीत रद्दी व तराजू ठेवला व सगुणीला म्हणाली,

"उठ गे बाय हे घे डोक्यावर व कालची जागा पकड जा लवकर...धारजीनी हाय बर ती जागा ...दोन दिस झाली नफाच झाला व गिर्हाईकबी चांगलीच भेटलीत बर..."

सगुणीनी डोक्यावर पाटी घेत म्हणाली..,"व्हयं माय "...व चालु लागली.

सगुणी पुढं चाले व शांती डोक्यावर भाजीच गाठोड घेऊन तीच्या माग माग...आठ नऊ वर्षाची पोर ती ...खेळण्याच शिकण्याच वय पण परिस्थितीपुढे हाताश होती ...कोरोनान बा गेला ...दोन येळच जेवण बी नशिबी येई ना ?नातगोत सारच लाब गेल एक पाच वर्षाचा भाऊ ,सगुणी व शांती अस तिघंच उरली ...सार दुःख विसरून कंबर कसुन शांती मुलांसाठी भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागली ..
कष्ट कमी नव्हती .मग जोडीला सगुणीला घेतली ...बा वारला सगुणी दुसरीत होती ...शाळेचा खर्च पेलवेना मग काय शांतीने  घेतली घरीच थांबवून...सामाजिक संस्थांनी  त्यावेळी मदत केली पण सगुणीच्या बाच्या दवाखाण्यावर भरपुर खर्च झाला होता ते कर्ज फेडल व शांतीने पोराला शाळेत घातलं...

".सगुणीच काय नाय गं शांते ...पोरीची जात नवरा कमवल ..व ती खाईल पण पोरगं शिकल नाय तर कोणी बायको देणार नाय...पोरीले शिकवून काय बर करायचं तीले जाऊ दे ....पोराले टाक शाळेत."

शांतीची माय बोलली ...व तेच शांतीने ठरवलं..शाळा सुटली तशी शांती अबोल झाली ...लगाव होता तीला शाळेशी पण बाच नाय तर हट्ट कोणाकड बर करणार...माय नाय बोलली ...तर सगुणीने बी हिम्मत नाय केली ...आता माय जाईल तिकड फिरायचं...माय पाटी डोईवर घेउन फिरणार व सगुणी तिच्या त्या मंजुळ आवाजात ओरडायची ...
"भाजी घ्या भाजी ...ताजी ताजी भाजी...!"

पोरीचा आवाज ऐकुन सारेच घेत...बालमुंजीच ती कोणाच्याही नजरेस भरत असे...

"इतकी छोटी पोर कशाला घेउन फिरता बाई .."

गिर्हाईकही बोलत ....

"काय करता बा नाय व शाळेत जायला आतातरी पैक्का नाय .."

अशीच सगुणीची माय बोलत असे ..

मायबरोबर गल्लोगली फिरतांना शाळा दिसली रे दिसली... कि तिचा आरोळी देण्याचा सुरच बदलुन जाई...चेहेर्यावर एक प्रश्न चिन्ह असे, मनात कधी जाईल मी शाळेत ही आशा जागत असे...तीच्या मनातलं त्या भोळा आईला समजत होत ...हो...पण आज ती कमवणारी एकटीच व तीन जीव खाणारे ...तिच्या शिक्षणासाठी शांती खर्च करूच शकत नव्हती...पोरीची तगमग तिला दिसत होती ...पण म्हणतात ना ?

,"परिस्थीतीपुढे काही चालत नाही "तसच होत...

शिकवण्याची इच्छा होती पण हाती पैका नव्हता ...जस जसे दिवस पुढे सरकत होते ...तशी सगुणी शांत व अबोल होऊ लागली होती ...सकाळी बाजारात भाजी विकायला बसली कि हातात येई तो कागद ती वाचायला बघत होती ...शाळेची गोडी काय तिची संपलेली नव्हती...पण आज आईला मदत करण व पैसे मिळवण जास्त महत्वाच झाल होत बस ...

एक एक करत महिना संपत होता साल सरण्याच्या मार्गावर होत...पण शांतीच मन सगुणीला शाळेत पाठवायला तयार नव्हतं...

"सगुणे ...पैशांचा हिशोब आला ना बाय मग शिकली बघ तु जगायला ...मी बी कुठे शिकली माय शाळा.... आईबरोबर राहुण संसार कसा करायचा ते शिकले ...तु बी हेच शिक माय...दोन बुक शिकुन तु कुठे मास्तरीण बनशी ..."

सगुणी शांत बसली कि शांती बोलत असे... आज पण तसच झाल...मार्केटमध्ये शांतीन सगुणीला लवकर जागा पकडायला सांगितली ...व सगुणाबाई शाळेच्या गेटजवळच उभी राहुन गंमत बघत होती...हे आता रोजचच होत चालल होत.... शाळेतला तो आवाज ती मुलांची लगबघ ...मुलांच खेळण बघुन तिला आनंद होत असे ...पण आईसोबत सगुणा शांत शांत असे....गोकुळ तिचा भाऊ...शाळेत जाई त्याला सोडायला जाण ...कारण काढुन सगुणी शाळेच्या त्या आठवणी डोळ्यात साठवून येई ...जसा काही सारा आनंदच सगुणीचा डोळ्यात गोठुन पडला होता....तीच्या गोबर्या गालावरचे हसु हरवले ...होते ...जणु.

आता तिचे एकच काम होते आईआधी जागा सांभाळायला निघायचं ...आणि जागा पकडुन झाली कि आईला काहितरी खोट कारण सांगुण शाळेच्या आंगणात जाउन बसायचं...थोडावेळ का?असेना शाळेची मज्जा अनुभवायची ...हे आता रोजच च झाल ...सगुणाला शाळेत येतांना व जांताना शाळेतील देशमुख बाईच्या वर्गातुन दिसत असे.....खरतर नविन नविन सगुणाच वागण जरा त्यांना वेगळच वाटे पण आता ते नित्यनियमाच त्यामुळे त्यांना तीला भेटण्याची उत्सुकता लागली ...आणि घडल तसच ...दुसर्या दिवशी सगुणा आली तशी देशमुख बाईं सगुणानाकडे चालत येऊ लागल्या तशी सगुणा शाळेतील ग्राउंडमधुन पळु लागली पण ती का?येते व येथे का ??बसते हे त्यांना आज जाणुन घ्यायचच होत..
बाईंनी शिपायाच्या मदतीने सगुनाला पकडलं तशी ती मोठमोठे हुदके देत रडु लागली ...बाईना काही कळेचना ...बाईंनी जरा जवळ घेत तिला आधार दिला ,आपलेपणाने कवटाळलं...तशी सगुणा गप्प झाली ...आता तीची भिती जराशी कमी झाली होती ...बाईंनी हळुहळु तिच मन जाणुन घ्यायच ठरवलं....

"बाळा ..तुझं नावं काय?"
हुंदके देत ती म्हणाली ,"सगुणा "

"वर्गात का ?बसत नाही दप्पतर कुठे तुझं.."

सगुणा परत रडु लागली व मानेनच नाही म्हणु लागली बाईला कळतच नव्हत तिच बोलणं...पण बाईंनी पाठिवर हात फिरवला व ,"बोल बेटा ...त्याशिवाय मला कस समजेल ?"
अस म्हणाल्या ...
आता सगुणा म्हणाली ,"मी शाळेत नाही ...पण मला शाळा आवडते ...माय म्हणते आपल्याकडे पैसे नाहीत...बा पण देवाघरी गेला ...मला आईला मदत करावी लागते .त्यामुळे मी असच बसून शिकती बाई ....मला रागवू नका ...मी उद्यापासून नाही बसणार शाळेत ..."

देशमुख बाईंना गहिवरून आलं .दहा बारा वर्षाची ती पोर पण शिकण्याची किती हौस तिला आपण मदत करायलाच हवी ...ह्या मुलीला शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत त्यासाठी त्यांनी ती कुठे राहते हे अगोदर विचारलं...
बाईंच्या आपलेपणाने सगुणा घडाघडा बोलू लागली..चुणचुणीत हुशार सगुणाला शिक्षणापासून वंचित ठेवण जरा आवघड होत ...बाईशी बोलत असतांना सगुणाला आईची आठवण झाली व ती पळत निघुन गेली....

दुसर्या दिवशी सकाळी देशमुख बाईंनी शाळेआधी सगुणाला शाळेत आणण्यासाठी ...सकाळीच शांतीच घर गाठलं...बाईंना बघताच सगुणी कोपर्यात लपली शांती घाबरलीच ...काय ??बर केल असेल सगुणीने तीला प्रश्नच पडला ...बावरलेली सगुणा बाईंसमोर गेली तशा हसर्या चेहेर्याच्या देशमुख बाई म्हणाल्या ,

"तुम्ही सगुणाची आई का?"

शांती जरा गोंधळलीच ,"बाई तुम्ही कशा ओळखता व्हयं पोरीला ...काय केल बर पोरींनी ..विचारती बघा ...ये सगुणे बाहेर ये गं पोरी ...काय ताण वाढवून आली व माय ...ये व बाहेर .."

शांती चिडुन बोलत होती ...बाईंनी शांतीला जरा गप्प केल ल म्हणाल्या,"अहो गुणाची पोर आहे ती मी तीला शाळेत घेऊन जायला आली .मी शाळेत नोकरीला आहे फक्त तीला बाहेर बोलवा बस.."

शांती आता जरा गोंधळलीच ,"बाई दोन घ्यास खाण्यापुरतं कमवती मी...हाती पैक्का नाही ...तिचा बा बी नाही...कशी पाठवू ओ पोरीला ...मला तीची मदत होते बाई कशी पाठवू शाळला.."

देशमुख बाईंनी शांताला जवळ बसवलं...सगुणा किती हुशार आहे हे समजवल ,शाळा शिकण्याची किती गरज आहे ,सगुणांच बालपण व तिचा शाळेचा कल शांताला समजवून दिला ...पण पैसा व एकल पालकत्वाने मला जमणार नाही हेच शांता बोलत होती ...देशमुख बाईंनी शांताचा हात धरला व म्हणाला ,"सगुणाची आई ...तुम्ही बस शाळेत येण्याची परवानगी द्या ...सगुणाचा सारा खर्च व तिची जबाबदारी माझी ...अस समजा ती माझीच पोर आहे ..."

बाईंच हे आपलेपणाच बोलणं ऐकुण शांतीचे डोळे भरून आले...तीने बाईंचा हात घट्ट पकडला ...व मानेनेच सगुणाला शाळेत पाठवायला होकार दिला ...सगुणा सार बघत होती...आईची होकारार्थी हलणारी मान बघुन ती धावत येऊन पाठीमागुन मायला बिलगली ....

शांतीने सगुनीला कवटाळलं ..डोक्यावरुन हात फिरवला व सगुणीला म्हणाली,"सगुणे बाय नशिब काढलं बघं...बाई तुझ शिक्षण करणार हायती ...जाय माय शाळला ...मी करल जस जमल तस काम ..."

त्या गोड गोबर्या कळीच्या गालावर लाली फुलली ...हरवलेल हसु सगुणीच्या चेहेर्यावर आलं...तीच्या खळखळुन हसण्याने देशमुख बाईंचा सकंल्प पुर्ण झाला व सगुणा पुन्हा शाळेत जाऊ लागली ....


  @ वैशाली देवरे...(नाशिक)
कथेच नाव-..आणि सगुणा हसली
विषय-लघुकथा
... आणि ती हसली 
फेरी-जिल्हास्तरीय लघुकथा स्पर्धा
जिल्हा -नाशिक