"आजोबा लवकर केक कापा ना !" मधुकररावांचे नात, नातू असे म्हणत उत्साहाने केक ची वाट बघत होते.
आज मधुकररावांचा सत्तरावा वाढदिवस. धाकटा मुलगा अभिजित, धाकटी सून अभिलाषा आणि चार वर्षाचा नातू ऋषी, मुलगी आकांक्षा आणि जावई संकेत , त्यांची दोन गोंडस लहान मुले आणि मोठा मुलगा अनिकेत आणि त्याची बायको अंकिता आणि नात श्रेया, नातू श्री हे सर्वजण मुंबईतील अनिकेत च्या मोठ्याश्या फ्लॅट मध्ये एकत्र हॉल मध्ये जमलेले होते.
सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
मुधुकररावांनी केक कापला. अन सर्वात आधी छोट्या मुलांना भरवला. सर्वजण केक खाऊन परत आपल्या जागी बसले.
मुलांनी आजोबांना आपापल्या परीने बनवलेले ग्रीटिंग कार्ड्स , छोटेसे गिफ्ट, पुस्तक वगैरे दिले आणि मुले खेळायला बाहेर पळाली. आणि बाकी सर्वजण अंताक्षरी वगैरे खेळले. अंकिता आणि अभिलाषा ने मिळून सर्वांसाठी पुरणपोळी चा बेत केला होता. सर्वजण यथेच्छ आस्वाद घेऊन जेवून आता हॉल मध्ये एकत्र बसलेले होते.
मधुकरराव बोलू लागले , " तुम्ही सर्वजण आज आपापली कामे सोडून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आलात. मला माझ्या सर्व मुलांसोबत नातवंडांसोबत हा दिवस अगदी आनंदात घालवायला मिळाला. या वयात आता मला अजून काय हवे असणार. असे आनंदाचे क्षण हीच माझी पुंजी. तुम्ही सर्वजण असेच मिळून मिसळून रहावे, नात्यांचे रेशीमबंध असेच छान जपावे, अडीअडचणीला एकमेकांच्या साथीला उभे रहावे अशीच माझी इच्छा आहे."
"मला कौतुक आहे माझ्या दोन्ही सुनांचे की त्या माझ्या परिवारात अलगदपणे सामावून गेल्या आहेत, जणू दुधात साखरच. सर्व बघून मला खूप आनंद झालाय. आता उद्या संध्याकाळ च्या गाडीने मी परत गावी जाईन म्हणतो."
"हे हो काय बाबा, लगेचच जातो म्हणताय. आता कुठे पंधरावीस दिवस झालेत तुम्हाला येऊन. आता तुम्ही इकडेच रहा ना. हवंतर मी आणि अभिजीत जाऊन सगळं सामान नीट बांधून घेऊन येतो. आपण ते घर भाड्याने देऊ या किंवा बंद ठेवू या." अनिकेत.
"हो ना बाबा, दादा बरोबर बोलतोय. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही माझ्याकडे पण येऊन राहू शकता. असे एकटे किती दिवस गावाकडे राहणार तुम्ही. आम्हाला काळजी वाटते ना तुमची." अभिजीत.
"चांगला ठणठणीत आहे मी, काळजी कशाला करतोस. शिवाय आकांक्षा आहेच न, त्याच गावात . ती तर येत असतेच ना अध्ये मध्ये मला भेटायला , दोन चार दिवस राहायला.
शिवाय लताबाईही येतात साफसफाई, स्वयंपाकपाण्याचं बघायला. माझ्या सुनांनी माझी जेवणाची सोय सुद्धा अगदी उत्तम लावून दिलीय." मधुकरराव.
"पण बाबा, तुम्ही इकडे असलात की तुमचे नातवंडं बघा किती आनंदात असतात, तुमच्या गोष्टी, गप्पा किती आवडतात त्यांना" मोठी सून अंकिता.
" अग मी आता आलो तसा येईनच ना अध्येमध्ये. तिघांकडेही दोन चार दिवस अध्ये मध्ये येत राहीन . तुम्हीही जमेल तसे तिकडे या. मला गावी रहायची सवय आहे, तिकडे मोठा मित्रपरिवार आहे माझा, हाकेच्या अंतरावर देऊळ, दवाखाना सगळेच आहे . इकडे शहरात मला एकटे दिवसभर घरी राहवणार नाही. तुम्ही सगळे आपापल्या नोकरीच्या निमित्ताने व्यस्त असता. इकडे शहरात तर बोलायलासुद्धा कोणी सापडणार नाही दिवसभर ". मधुकरराव.
"दादा, तिथे आपल्या मनमोकळ्या, मिस्किल स्वभाववैशिष्ट्यामुळे बाबांनी बराच मित्रपरिवार गोळा केला आहे. व्यायाम करणे, बागेत फिरणे, भजन वगैरे च्या निमित्ताने ते सकाळ संध्याकाळ एकत्र वेळ घालवतात, गप्पा मारता मारता बराच वेळ निघून जातो त्यांचा. आपल्या घरच्या छोट्याशा बागेतही ते झाडांची देखभाल करत असतात.
पण बाबा , तुम्ही इथे सर्वांसोबत असलात तर मग मलाही काळजी राहणार नाही . आता शिफ्ट करूया का दादा म्हणताहेत तसं " मुलगी आकांक्षा.
आता आपले काही चालत नाही असे बघून शेवटी मधुकरराव खरं काय ते सांगायला लागतात.
"मुलांनो, साधारणतः पंचेचाळीस वर्षांपूर्वी माझं आणि तुमच्या आईचं माधवीचं लग्न झालं .
तसा आमचा परिवार मोठा . माझे आई , वडील , लहान भाऊ-भावजय, आणि लहान बहीण तिचे लग्न होऊन सासरी गेलेली. वडील त्या काळी सावकाराकडे वहीखाते, हिशेब सांभाळण्याचे काम करीत. त्यांची कमाई ती कितीशी असणार ! त्यात एवढया परिवाराचे भागवणे म्हणजे कठीणच . घरातील मोठा मुलगा म्हणून साहजिकच हातभार लावण्यासाठी मीही शिकता शिकताच छोटीमोठी कामे करू लागलो . शिक्षण पूर्ण होताच मार्केटिंग मध्ये नोकरीला लागलो. नोकरी मात्र फिरस्तीची मिळाली. सतत आज इथे तर उद्या तिथे , कधी दोन चार दिवस तर कधी पंधरा वीस दिवसांनी परत घरी येणे व्हायचे. अशा परिस्थितीत माधवीच घर , तुम्ही मुले आणि वृद्ध सासू सासरे यांना सांभाळत असे. त्यांना काय हवे नको ते बघत असे.
तुम्हा तिघाही मुलांना उच्च शिक्षण देणे, आपला लहान भाऊ मकरंदलाही शिकण्यासाठी आर्थिक मदत करणे ,आणि तो नोकरीला लागेपर्यंत घर चालवणे . अशा बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या माझ्यावर. मधूनेही काटकसरीने परंतु अगदी नेटका सांभाळला होता संसार. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा , पाहुण्यांचा सतत राबता असायचा. फार गुणी होती माझी मधू, अगदी सालस. अन्नपूर्णाच जशी. आपली गाण्याची आवड सुद्धा होईल तशी तिने जोपासली होती. भजनीमंडळाच्या कार्यक्रमात आणि घरच्या घरी कधी सर्वजण एकत्र येत असत तेव्हा माधवीला गाण्याची फर्माईश आवर्जून होत असे. मग अगदी मंत्रमुग्ध होऊन गात असे ती !
"आई, बाबांच्या शेवटच्या काळात तिने खूप सेवा केली त्यांची. " मधुकरराव.
"हो बाबा, आई लक्षपूर्वक त्यांना काय हवं नको ते बघायची, वेळेवर औषधे द्यायची, आजीचे पाय दुखत असत तर ती मला किंवा अभिजितला सांगायची की आजीच्या तळव्यांना तेलाने मालिश करून दे. एकदा असेच मी तेल लावत असताना आजी म्हणाली,
" बघ पोरा , लई गुणाची अन लाघवी पोर हाय तुझी आई, आपल्या घराचा आधार हाय जणू. लई कष्ट केलेत तुझ्या आईनं अन बाबानं आपल्या घरासाठी, साऱ्यांसाठी. आज तू लहान हाईस, पण तुला सांगून ठेवते, म्हातारपणी त्यासनी कधी अंतर देऊ नकोस हो, नीट सांभाळ " अनिकेत .
"कालपरत्वे आई, बाबा दोघांनाही देवाज्ञा झाली आणि नंतर मकरंद, अनिकेत आणि अभिजीत आपापल्या नोकरीच्या आणि शिक्षणाच्या निमित्ताने एक एक करून परगावी राहण्यास गेले. आकांक्षा मात्र लग्न होऊन सासरी त्याच गावी राहतेय." मधुकरराव सांगायला लागले.
"घराच्या बाहेर थोडयाशा मोकळया जागेत आज जी बाग आहे ना, ती मधूनेच फुलवलीय, तिच्या आवडीची फुलझाडे तिने लावली होती. गुलाब, मोगरा, निशिगंध, जास्वंद आणि पारिजात. फुले फुलली की वातावरण अगदी सुगंधी होऊन जाई. पाहणाऱ्याचे मन प्रफुल्लित होऊन तो क्षणभर तिथेच घुटमळायचा. तिथे एक झोपाळा ठेवला होता. मधूला संध्याकाळी तिथे बसून माझी वाट बघायला फार आवडे. मी आलो की हे सुगंधित वातावरण आणि मधूला आतुरतेने वाट बघताना पाहून माझा प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून जायचा.
मी तिला म्हणतही असे, "मधू, किती सुंदर फुलवली आहे तू ही छोटीशी बाग! मी निवृत्त झालो ना, की मी पण तुला बाग कामात मदत करीन . आपण दोघे मिळून बाग आणखी फुलवू . आणि मग सकाळ संध्याकाळ आपण इथे बसून गप्पा मारत जाऊया निवांतपणे चहाचे घुटके घेत. मग तू तेव्हा माझ्यासाठी गाणे गाशील का ग?" मग ती हसून "चला, तुमचं आपलं काहीतरीच ! " म्हणत असे.
नोकरीला असताना एकदा माझी ऑफिसतर्फे कोल्हापूरला बदली झाली. पण तुम्ही तिघेही मुले लहान आणि शाळेत जाणारी असल्याने मधूला लगेचच सोबत येता आले नाही. मुलांच्या शाळेचे वर्ष पूर्ण होईपर्यंत आठ दहा महिने तिला इकडेच रहावे लागले होते. दोघांनाही एकमेकांची खूप आठवण येई . मला जाऊन सहा महिने झाले होते. त्यामुळे एकदा मी घरी न कळविता सुटी घेऊन अचानक दोन तीन दिवसांसाठी भेटायला घरी आलो . त्यावेळी आई, बाबा तुमच्या आत्याकडे गेलेले होते. तुम्ही मुलेही आपापल्या क्लासला गेलेली. बघतो तर काय मधू एकटीच बागेतल्या झोपाळ्यावर बसून तंबोरा लावून गात होती,
नयन तुजसाठी आतुरले ...
प्रेमदिवाणी झाले रे
नयन तुजसाठी आतुरले ...
तुझ्या प्रीतीच्या अमृतधारा
मनमोराचा फुले पिसारा
भानच हरपून गेले रे
नयन तुजसाठी ...
जुळता नाते दोन मनांचे
बंध लोपले युगायुगांचे
मी नच माझी उरले रे
नयन तुजसाठी आतुरले ...
नयन तुजसाठी आतुरले...
डोळे मिटून , अगदी मंत्रमुग्ध होऊन आर्त स्वरांत मधू गात होती.
मी हळूच येऊन झाडाच्या आड थांबून तिला बघत, गाणे ऐकत होतो. गाणे संपले तरीही तिचे डोळे मिटलेलेच होते. माझ्या आठवणीने भावुक होऊन तिच्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. तिचे अश्रू बघताच माझ्या हृदयातून एक कळ निघाली, गलबलून आले, तिच्या मनाला वाटत असलेला एकटेपणा मला जाणवला आणि लगेच पुढे होऊन मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणालो, "इतकी आठवण येत होती माझी? बघ, तू असं बोलावलंस आणि मी आलो !" क्षणात मधूची कळी खुलली.
मी म्हणालो," मधू, एकदा निवृत्त झालो की माझा सगळा वेळ तुझाच. फिर जो चाहिये वो सब इस गुलाम से करवा लेना .तुला फिरायला घेऊन जाईन, हवे ते आणून देईन."
मधू लाजून म्हणाली, " तुम्ही ना, अगदी असे आहात. जरा म्हणून रागवावेसे वाटत नाही मला तुमच्यावर."
"चल मधू , आता एक चहा आणि त्यासोबत तुझ्या हातची खमंग भजी असा फक्कड बेत कर ना. "
"ती वेळ तर मी सावरली पण तेव्हाच मनात पक्के ठरवले की शेवटपर्यंत मधूला कधीही अंतर देणार नाही. निवृत्त झालो की ज्या छोट्या छोट्या गोष्टी सोबतीने करायच्या राहिल्या आहेत त्या सर्व मी तिच्यासोबत करणार. एकमेकांच्या सहवासात राहण्याचा आनंद भरभरून तिला देणार."
मधुकरराव सांगताना अगदी भावुक झाले होते. म्हणाले, " मी नोकरीच्या दिवसात नेहमी खूप कामातच राहिलो . कधी ओव्हरटाइम करून, तर कधी काही जास्तीचे काम करून सतत जास्तीतजास्त पैसे कसे मिळवता येतील यासाठीच प्रयत्न करायचो. अर्थात हे सगळं मी आपल्या परिवारासाठीच करायचो. पण मात्र हे करताना मी तिला, तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही. साध्या साध्या गोष्टींत आनंद मानायची ती. पण मी साधे सोबतीचे सुंदर क्षणसुद्धा तिला फारसे देऊ शकलो नाही. तेव्हा वाटायचं, निवृत्त झालो की हे सगळं करू. आता खूप जाणवतं की मी परिवारासाठी , तिच्यासाठी वेळ काढायला हवा होता. साधे साधे जगण्यातले आनंद सोबत अनुभवायला हवे होते. तिने तर काही फार अपेक्षाच केल्या नाहीत कधी माझ्याकडून. कधी रागावली नाही , कधी नवीन साडीसाठीही हट्ट केला नाही की दागिन्यांसाठी. वाटायचे,
एक दिवस असा येईल , जे हवे ते आणून देईन तिला,
या दिवसाची वाट बघता बघता दिवस निघून गेला हातातला.
निवृत्त झाल्यावर एक वर्ष सुद्धा उणेपुरे मिळाले नाही रे मुलांनो आम्हाला. दहा वर्षांपूर्वीच , मला एकट्याला सोडून ती निघून गेली. आज माझ्याकडे वेळ आहे, पैसा आहे, सगळे आहे . पण त्याचा आनंद घेण्यासाठी तीच नाही. काय उपयोग आता सर्व असूनही? आज मी सुद्धा खूप आतुरलोय तिच्यासाठी ! पण ... त्या घरात, तिच्या आठवणींसोबत जगणे एवढेच आता माझ्या हातात आहे.
कामासाठी, पैशासाठी झोकून देऊन जगता जगता जगायचेच राहून गेलेय ... " मधुकररावांचा कंठ दाटून आला होता.
" म्हणून तुम्हाला सांगतो मुलांनो, काम तर महत्त्वाचे आहेच, पण त्याबरोबरच जीवनातला प्रत्येक क्षण भरभरून जगा. मुलांबरोबर लहान होऊन खेळा . त्यांचे बालपण अनुभवा. एकमेकांना समजून घ्या, नातेसंबंधांना जपा, सांभाळून घ्या, कुठल्याही गोष्टीवर जास्त काळ अडून राहू नका. खास करून अहंकारामुळे, पैशामुळे नात्यात कटुता येऊ देऊ नका. आनंदाने जीवन फुलवा, स्वतः चे आणि इतरांचेही."
मधुकरराव बोलायचे थांबले तसे आकांक्षा त्यांच्या खांद्यावर हळूच थोपटत म्हणाली, "बाबा, बरं झालं तुम्ही आमच्याकडे मन मोकळं केलंत. तुमच्या कणखर आणि मिस्कील चेहऱ्यामागे किती वेदना दडलेल्या आहेत ! आज आईची खूप आठवण येतेय ना, बाबा?
म्हणूनच आज सकाळपासूनच तुम्ही खूप अस्वस्थ वाटत होतात. सकाळी कोणती कविता लिहिलीत , दाखवा ना"
मधुकररावांनी डायरी तिच्याकडे दिली.
आकांक्षाने बाबांच्या डायरीतून ती कविता सर्वांना वाचून दाखविली...
भिंतीवरच्या फोटोतून माझ्याकडे एकटक बघतेस,
तुझ्याविना होणारी माझी तगमग बघून मलूल हसतेस
गुलाबाच्या फुलासारखीच दिसायची सुंदर, आनंदित
साधीच साडी असूनही नेसायची अगदी टापटिपीत
आज आठवतोय तुझ्या हातात घातलेला हिरवा चुडा
बांगड्यांची नाजूक किणकिण टाकताना अंगणी सडा
टापटीप अन छान सजवलेले छोटेसेच होते माझे घर
तुझ्या हातचीच चव जेवणाला अन तृप्त होई मन तर
तेव्हा मात्र करायचो याकडे कळत नकळत डोळेझाक
कामात राहायचो, ऐकूच यायची नाही तुझी प्रेमळ हाक
मात्र तुझ्यासोबतच हरवली ग बांगड्यांची किणकिण
देवघरात ठेवणारी समई आता करते फक्त मिणमिण
पैंजणांचाही नसतोच आता घरभर मंजुळ आवाज
फक्त कल्लोळ उरलाय ग मनामध्ये तुझ्याविना आज
आज यातलं काही नाही, फक्त आठवणी तुझ्या असण्याच्या
आणि तुझ्या असण्याने माझ्या असण्यास अर्थ देण्याच्या
मधुकरराव आणि तिथे असलेल्या प्रत्येकाच्याच डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. मधुकरराव ओल्या डोळ्यांनी कितीतरी वेळ भिंतीवरच्या माधवीताईंच्या त्या फोटोकडे पाहत राहिले...
© स्वाती अमोल मुधोळकर
कथा कशी वाटली ते नक्की कळवा.
कथेचे लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा