वडिलांच्यात दडलेलं आईपण

Father

     प्रत्येकाच्या पाठीशी ऊन,वारा,पाऊस या कोणत्याही परिस्थितात पाय रोवून खंबीरपणे उभे फक्त आई-वडिलच असतात.आमची आई आम्हांला अर्ध्यावर जरी सोडून गेली,तरी स्वत:चं दु:ख विसरून माझे वडिल मात्र आम्हां भावंडांच्या पाठी नेहमी खंबीरपणे उभे राहिले.मला अजूनही आठवतं खूप लहान असल्यापासून मी मामाकडेच राहिले,वाढले,शिकले;त्यामुळे मला वडिलांचा अजिबात लळा नव्हता.पण जेव्हा आई देवाघरी गेली तेव्हा;मी जरी अकरावीत असले तरी बहिण ८वीत आणि भाऊ तर ३रीतच होता.त्यानंतर वडिल स्वत: एकटे म्हातारया आई-वडिलांकडे राहायचे.आम्ही तिन्ही भावंडे मामाकडेच होतो;तेव्हापासून मला माझ्या वडिलांची काळजी वाटू लागली.अचानक मनात माया जागी झाली.ते स्वत: वडापाव खाऊन दिवस काढत होते, पण आम्हांला काहीही कमी पडणार नाही याची मात्र खबरदारी घ्यायचे.आपली मुलं शिकताहेत त्यांना काहीच कमी पडणार नाही ,यासाठी रात्रंदिवस काम करायचे.स्वत: एकटेपणा सहन केला.खूप वाईट वाटायचं पण मी काहीच करू शकत नव्हते.माझे वडिल हतबल होऊन खूपदा रडलेदेखील पण आमचे चेहरे पाहून पुन्हा नव्या उमेदीने उभेही राहिले.ते आमचे वडिल कमी आईच बनले होते आणि आहेत.आम्हांला कसलाच त्रास होणार नाही याची खबरदारी नेहमी घ्यायचे.मला त्यांच दु:ख कळत होतं पण......
असे माझे तात्या खूप हळवे आहेत.एक किस्सा सांगावासा वाटतो.
आता लॉकडाऊनमुळे मी मुंबईतच अडकले होते.लग्नानंतर मुंबईला असल्याने मी माहेरी फक्त दिवाळी आणि उन्हाळ्यातच यायचे.पण यावर्षी दिवाळीतही यायला नाही भेटलं म्हणून मी उन्हाळ्यात येणार होते, पण मुलीला शाळेला सुट्टी लागायच्या आधीच कोरोनाने थैमान घातलं.दिड महिना लॉकडाऊन सहन केलं पण नंतर वडिल,भाऊ आणि बहिणीची खूप आठवण येत होती.कोणाला कळू न देताच जवळ जवळ ३ वेळा मी एकटी असताना खूप रडले.पण सुदैवाने गावी यायला चान्स मिळाला.वडिलांचा,बहिणीचा फोन येत होता पण खूपदा वाटायचं त्यांना भेटावं.असंच एक दिवस माझा रिचार्ज संपला.थोड्या दिवसांनी माझं इनकमिंग बंद झालं.मी मिस्टरांना सांगितलं,पण कामाच्या गडबडीत ते रिजार्ज करायला विसरले.ते रिचार्ज करू बोलले होते आणि जर मला फोन करायचा असेल तर घरात दुसरेही फोन होते.पण मला एवढं भरून आलं होतं की,मी नवरयाशी भांडण सुरू केलं कारण हेच की रिचार्ज का केला नाही.ते बोलतायत मी करतो रिचार्ज तरी मी नवरयाच्याच फोनवरून रडत रडत वडिलांना फोन केला की मला लगेच भेटायला या.मन भरून रडले कारण खूप दिवस भेटले नव्हते,आठवण खूप येत होती.माझ्या नवरयाने मला काय वाटतय हे आधीच ओळखलं होतं.मला एका शब्दानेही ओरडले नाही की तू तूझ्या वडिलांना फोन करून का रडलीस???उलट त्यादिवशी मला माझ्या नवरयातही माझ्यावर प्रेम करणारे आई-वडिलच दिसले.आणि तुम्ही माझ्यासाठी नवराही असा निवडलात की तोही माझ्यावर तुमच्याइतकच प्रेम करेल.....
खरचं तात्या तुम्ही आम्हां भावंडांसाठी खूप सोसलत.आई-वडिल दोन्हींच प्रेम दिलत.कसं जमलं तुम्हांला हे सगळं!!खरचं तुम्हाला सलाम.....पुढच्या सात जन्मांत तुम्हीच माझे वडिल म्हणून मला हवे आहात आणि तुम्हांला उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....!!!!

## अक्षया राऊत.....
## माझेलेखन....