मेरी आवाजही मेरी पहचान है

एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या कर्तृत्वावरून केली जाते.

किशोर :- ये अज्या तू मेल्यावर लेका तुले कुणी काय कुत्र बी इचरणार नाई बघ. जिवंत हाये तोवर अस काई तरी केल पायजे आपुन का मेल्यावर बी आपलंच नाव असलं पायजे लोकायच्या तोंडात.

अजय :-अरे किश्या... हरामखोरा बोलूनत असा रायला तू.. का जस काई अर्जुनावाणी तिरच मारून लायला आता मछिंच्या डोयात. आला मोठा मले शानपण शिकवाले. मोठा म्हन्ते "आपल नाव बी झालं पाहिजे " अबे लेका चार पयक कमव आन तुया मायबापाले चांगलचूगल खाऊ घाल. त्यायच्यासाठी साजरे कपडे ने.. त्वाल्या बुड्याले (आजोबाला ) डोयाच्या इस्पीतळात नेऊन त्याच्या मोतीबिंदूच आपरेशन कर. त्वाल्या बुडीले (आजी ) साजर मोराच डिजाईन असलेलं लुगडं (नऊवारी ) घे. एवढं जरी त्या ईमानेईतबारी केल ना लेका.. त त्वाले घरचे डोक्यावर घेऊन नाचणं तुले. आला मोठा जगामदी नाव कमावाले. पैले मायबाप, आजी आज्याच नाव मोठं करून दाखव.
उलीसक गाण काय म्हणता यालागलं ह्या दीड शायन्याले तर स्वतःले मोठा लता मंगेशकर समजून रायला का का बे तू..


किशोर :- अय लेका अज्या कुणाचं नाव घेतलं त्या... देवी हाय म्हणलं लताताई गाण्याची. आपली लायकीबी नाय त्यायचं नाव तोंडातून काढाची. काय त्यायचा आवाज आह्हह्ह. एक गाणं आणखी आणखी आयकावं वाटते ना बे त्यायन म्हणलेल.

त्यायचं एक गाणं हाये "मेरी आवाज ही मेरी पहचान है ". खरंच लेका अज्या त्यायच्या आवाजाले सारी दुनिया ओळखते ना बापा..

अजय :- हाव रे किश्या म्या बी आयकतो ना त्यायचे गाणे.
थे मराठी गाणं नाही काबे..( मोबाईल मध्ये गाणं लावतो दोघेही मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतात )

"अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरिदरितून मावळ देवा, देऊळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले, हसले
कडी कपारी अमृत प्याले
आता हे परी सारे सरले,उरले मागे नाव....

हाय सोडूनि जाते आता
ओढून नेली जैसी सीता
कुणी ना उरला वाली आता, धरणी दे ग ठाव....

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरिदरितून मावळ देवा, देऊळ सोडून धाव"

किशोर :- पाय बर लेका.. वाटते का नायी ऐकत राहावं.. लय झाक आवाज हाये बे त्यायचा... मायावाल्या त फेव्हरेट हाये त्या...

अजून एक गाणं हाये त्यायचं मनाले अस चिरून जाते.. आन आसू असे आपोआप गयते ना बापा डोयातून...
(किशोर मोबाईलवर गाणसर्च करून लावतो )

आता विसाव्याचे क्षण"

आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची ओढतो स्मरणी

काय सांगावे नवल
दूर रानीची पाखरे
ओल्या अंगणी नाचता
होती माझीच नातरे

कधी होती डोळे ओले
मन माणसाची तळी
माझे पैलातले हंस
डोल घेती त्याच्या जळी

कशी पांगल्या प्रेयसी
जुन्या विझवून चुली
आश्वासती येत्या जन्मी
होऊ तुमच्याच मुली

मणी ओढता ओढता
होती त्याचीच आसवे
दूर असाल तिथे हो
नांदतो मी तुम्हांसवें.......

पाय कसे डोये ओले झाले.... असा आवाज हाये जो अजरामर झाला...

अजय :- हो ना बे.... पाय अशीच आपली बी वयख राहिली पाहिजे जगात नाही त नाही लेका, निदान आपल्याला गुटूमपूर गावामधी तरी आपल्या मेल्यावर आपल नाव घेतलं पाहिजे.

किशोर :- नाव त होईन आपल फकस्त थे चांगल का वाईट थे नाही सांगत बावा... ??
 वऱ्हाडी भाषेत लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. चुकल्यास क्षमा असावी.

या लेखातून लताताईना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
प्रत्येक व्यक्तीची एक खास गोष्ट, गुण, कला असते ज्यामुळे आपण त्याला सदैव स्मरणात ठेवतो. एखाद्याच दिसणं त्याची ओळख असते, एखाद्याचा शांत, मनमिळाऊ स्वभाव त्याची ओळख असते, एखाद्याचा अभिनय तर एखाद्याची विनोद्बुद्धी त्याची ओळख असते.
लताताईनी गायलेलं गाणं "मेरी आवाज ही मेरी पहचान है!" हे शाश्वत सत्य होत आणि आहे.
एखाद गाणं ऐकताना.. त्याचे गायक कोण हे नाव न वाचताही आपसूक तोंडातून निघत "हा लताताईचाच आवाज आहे "
कारण खरच त्यांचा सुरेल आवाजच त्याची ओळख आहे आणि ती नेहमीसाठी राहील. आज त्या देहरूपी आपल्यात नसल्या तरी.. त्यांचा आवाज सदैव आपण ऐकत राहू.
????भावपूर्ण श्रद्धांजली लताताई ????
©जयश्री कन्हेरे -सातपुते

फोटो साभार गुगल ?? नावासहित पोस्ट शेअर करायला हरकत नाही.