माझा विश्वासघात

Laghu katha

   विश्वासघात

       मी कुठे आहे?" बेशुद्ध असलेली काव्या शुध्दीवर आली आणि आजुबाजुला नजर फिरवल्यावर आपण कुठल्या तरी अनोळखी जागेत आलो आहोत हे तिच्या लक्षात आले. 

      "कुठे आहोत आपण ? " आणि माझे बाळ......कुठे ?" ... हा प्रश्न तिला पडला. तिने तिच्या पोटावर हात फिरवला. तर किंचाळत उठली. माझं बाळ..... माझं बाळंं..... तो धावत तिच्या जवळ गेला. त्याने तिला पाळण्यात शांत झोपलेल्या बाळाकडे बोट दाखवले. हे बघ तुझं बाळ. 

     एका छान दुपट्यात गुंडाळून ठेवलेलं बाळ पहाताच तिच्या चेहऱ्यावर हसू आले. ती हळुच उठून बाळाकडे गेली आणि तिने त्याला स्पर्श केला.   

 पण, दुसऱ्याच क्षणी .... ती दुःखी झाली.

 काय झाले ? कसे वाटत आहे आता ? "

 "तू कोण आहेस? मला इथे कसे आणले ? " .... काव्या. 

 अगं झोप सध्या. मी कोण आहे ‌हे नंतर सांगतो. तेवढ्यात डॉक्टर राऊंड वर आले. 

   कसा आहे पेशंट ? बाळाला जवळ घेतले की नाही. अगं म्हणजे बाळाला अंगावर पाज. तुझ्या दुधाची गरज आहे त्याला. तीन दिवसांपासून तो त्याच्या आईची वाट बघत आहे. पण, डॉक्टर.... आता पण वगैरे काही नाही. 

डॉक्टरमॅडमनी स्वतः बाळाला उचलले आणि काव्याजवळ नेले. बाळाला कसे धरायचे, कसे पाजायचे.... हे शिकवले. काव्याला त्या बाळाला हातात घ्यावेसे सुध्दा वाटत नव्हते. पण, त्याच्या इवल्या इवल्या स्पर्शाने ती मोहरून गेली. 

      चला , "मिस्टर ओम .... काव्या आता शुध्दीवर आल्या आहेत. त्यांचे एकदा चेक अप करून घेते. त्यानंतर तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. त्यांची तब्येत आता ठीक आहे. काहीही वाटले तर नक्की फोन करा. काळजी घ्या."

 हो चालेल डॉक्टर.... "मी नक्की काळजी घेईन"..... ओम.

      ओ , मिस्टर ओम .... "कोण आहात तुम्ही ? " मला कुठे नेणार आहात? मी इथे दवाखान्यात कशी आले ? आपण सध्या कोठे आहोंत ? "

     अहो, "काव्या मॅडम थांबा. आपण घरी जाऊन बोलू यात. कारण, आता आपल्याला निघायला हवे. चला मी तुमचं सामान आवरून लागतो. "

   का ? माझे आईबाबा कुठे आहेत ? ते नाही आले मला‌ न्यायला ? माझा भाऊ कुठे आहे? मी तुम्हांला ओळखत देखील नाही. मग मी तुमच्या सोबत यावे. हा हट्ट का करत आहात तुम्ही? "...... काव्या

    " आपण आपली तात्पुरती ओळख केलेली आहे. त्यामुळे सविस्तर चर्चा घरी जाऊनच करू या. चला त्याने तिला उठण्यासाठी मदत केली. तेवढ्यात दादा, चल आवरलं का इथलं ? आई खाली वाट बघतेय. अदितीने बाळाला हातात घेतले. "

   " काव्या जवळ जवळ ओरडलीच. मला तुमच्या सोबत नाही यायचे. मला माझ्या घरी जायचे आहे ‌. ऐ, कोण आहेस तू ? तू माझ्या बाळाला हात लावू नकोस. कळलं का? हे बघा मला एक फोन लावून द्या माझ्या घरी‌ प्लीज.प्लीज ऐक ना माझं."

     हे बघा काव्या.... तुम्ही.... "तरीही ऐकण्याच्या मनःस्थितीत ती नव्हती. ओमने त्याचा मोबाईल तिला दिला. पण, घरच्या कोणाचेच फोन लागत नव्हते. एक काम करा . मला माझ्या घरी नेऊन सोडा तुम्ही" ......काव्या.

    तुम्हाला तुमच्या घरी जाता येणार नाही सध्या.... ओम.

का? कारणं, तुमच्या घराला कुलूप आहे सध्या. सगळे बाहेरगावी गेले आहेत......ओम.

       हे बघ, ऐका माझं ...... "सध्या तुमच्या घरी कोणीच नाही. तेव्हा काही दिवस माझ्या कडे राहा. मग मी सोडतो तुम्हाला तुमच्या घरी. पण, मनात शंका येत होती. हा आपल्याला त्याच्या घरी चालण्यासाठी का आग्रह करत आहे. काही अपहरणाचा कट तर नाही त्याचा ?  तिच्या मनाात शंकेच एक झाड तयार झाले होते. निरनिराळळे रंग दिसत होते. मोठ्या निराशेने ती त्याच्या सोबत जायला निघाली. ओली बाळंतीण त्यात सिझेरियन झाल्यामुळे पोटात थोडे दुखत होते. पण, आता काहीच उपाय डोळ्यासमोर दिसत नव्हता. दवाखान्यातून खाली जात असतांना‌ सगळीकडे बघत जात होती. त्यामुळे लगेचच तिच्या लक्षात आले. की आपण गोव्यात येऊन पोहोचलो. मनातली धाकधूक आता वाढली होती. आपण महाराष्ट्रातून अचानक दुसऱ्या राज्यात कसे पोहोचलो? 

     गाडीत ओमची आई सुलोचना ताई आधीच वाट बघत होत्या. मी कोणालाच ओळखत नव्हते. पण, त्यांनी लगेच ये, बस काव्या. आता कसं वाटतंय ? 

       मी ठीक आहे.... असे बोलून मन मारून काव्या गाडीत बसली. गाडी भरधाव वेगाने पुढे चालली होती. खिडकीतून येणाऱ्या थंड गार वाऱ्याची हळुवार झुळूक तिच्या अंगावर आली. थकव्यामुळे तिला परत झोप लागली. 

     त्यांची गाडी एका सुंदर बंगल्याजवळ येऊन थांबली. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात जणु टुमदार बंगला होता. सगळे जण खाली उतरले. तिला घरात नेले. घरात नोकर चाकर असल्यामुळे लगेचच चहापाणी झाले. तिला आराम करण्यासाठी सांगितले. पण, सगळ्यांना तिने थांबवले. माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय तुम्ही कोणी कुठेच जाणार नाही. 

       हो, हो, विचार. सुलोचना ताईं बोलल्या. "तुम्ही कोण आहात आणि मी इतक्या दूर‌ कशी आली ? "मला कळलेच पाहिजे. 

     ओम बोलू लागला. आठ दिवस अगोदर आम्ही विदर्भातून येत असतांना तू अचानक आमच्या गाडी समोर आली आणि खाली पडली. तेंव्हा आम्ही तुला सरळ इकडे घेऊन आलो. कारण, तिकडे काही तरी घडले होते आणि पोलिस आम्हांला कुठेही थांबू देत नव्हते. त्यामुळे आम्ही तुला सरळ येथे घेऊन आलो. तू आठ दिवसांपासून तू बेशुद्ध अवस्थेत होती. पण, डॉक्टरांनी मोठ्या प्रयत्नाने तुझी आणि बाळाची सुखरूपपणे सुटका केली. 

     आता , तू सा़ंग .... काही तुझ्याविषयी.... ओम

नाही, नाही माझा आणखी एक प्रश्न आहे. तुम्हांला माझे नाव कसे माहिती ? तुम्ही मला ओळखता का?

    हो, सुलोचना ताई बोलू लागल्या. आम्ही तुला अगदी तुझ्या लहाणपणापासूनच ओळखतो. तू माझी भाची आहे. म्हणजे म्हणजे माझ्या सख्ख्या भावाची मुलगी. मी स्वतः तुझे नाव ठेवले आहे. तुला कसे विसरेल मी. तुझ्या हनुवटीवरचा हा तीळ मला अजुनही लक्षात आहे. तू जन्माला आली आणि तुझ्या आईला पॅरिलिसिसचा झटका आला. त्यामुळे ती तुझं संगोपन करून शकत नव्हती. त्यामुळे मीच तुझा सांभाळ केला. पाच वर्षांची होईपर्यंत तू माझ्याच अंगावर होती. अगदी शेजारीच घर असल्याने मला काही त्रास होत नव्हता. पण, अचानक तुझ्या वडीलांनी म्हणजे सुरेशने दुसरे लग्न केले. त्यामुळे घरात वाद निर्माण झाला. त्याची दुसरी बायको आल्यामुळे मला ती तुझ्या जवळ सुध्दा येऊ देत नव्हती . त्यामुळे आम्हां बहिण भावांमध्ये चांगलेच भांडण झाले. आम्ही एकमेकांचे तोंड देखील बघत नव्हतो. ते अजूनही बघीतले नाही. यात तुझी आई मात्र जास्त खचली आणि ती आपल्याला सोडून गेली. त्याच वेळी नेमके ओमच्या वडीलांची बदली इथे गोव्यात झाली आणि आम्ही इथेच स्थायिक झालो. तू तेव्हा एकटी पडली होतीस. पण, तुला सोबतीला एक भाऊ आला होता. त्यावेळी ‌तुला काय त्रास होणार याची मला पूर्ण जाणीव होती. पण, मी काहीच करू शकले नाही. 

      आता कळले का आम्ही तिघे तुझे कोण आहोत ते. काव्या लगेच उठून आत्याच्या गळ्यात पडून रडू लागली. आत्या .... अगं," बोल काही तरी." तू अशी नवव्या महिन्यांची गरोदर आणि सुसाट धावत सुटली होती. "असे काय घडले होते?"

     आत्या , " मी महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होते. त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलावर म्हणजे‌ राजवर माझे प्रेम होते. म्हणजे आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. कारण, घरून प्रेमाची अपेक्षाच करता येत नव्हती. त्यामुळे मी बाहेर प्रेम शोधले. शिक्षण पुर्ण झाले की तो त्याच्या वडीलांच्या कंपनीत हातभार लावणार होता. 

        त्यामुळे माझा त्याच्यावर पुर्ण विश्वास होता. त्यामुळे आम्ही दोघे या प्रेमात इतके वहावत गेलो की कळलेच नाही. मी गरोदर राहिले. सुरवातीला एक दीड महिना कळलेच नाही. त्यामुळे सध्या लग्नाचा विचार केलाच नाही. पण, जसजसा मला त्रास व्हायला लागला. तेव्हा लक्षात आले. त्यावेळी मी राजला सांगितले. आपण आजच्या आज लग्न करू. पण, "आज करू उद्या करू असे करत तो मला टाळू लागला." बघता बघता एक महिना होऊन गेला. पण राज आलाच नाही. कारण, त्याच्या वडीलांनी त्याला अमेरिकाला पाठवले होते. तेही कायमचे. 

      घरात याविषयी कोणालाच माहीती नव्हती. माझ्या सावत्र आईने त्याचवेळी माझ्यासाठी तिच्या मामे भावाचं स्थळ आणलं. कारण, तिला मी नकोच होते. शिवाय ती बाबांचाही तेवढाच तिरस्कार करीत होती. 

     माझ्या लग्नात माझ्या आईला भरपूर पैसा मिळणार होता. मला मात्र कोणाशीच लग्न करायचे नव्हते. पण, तरीही माझ्या आईने जबरदस्तीने माझे लग्न करून दिले. पण, जेव्हा मी गरोदर असल्याचे कळले तेव्हा मला घरी आणून सोडले. बाबांना वाटले माहेरी आली. कारण, आपली मुलगी आई होणार हा आनंद खूप मोठा होता. पण, मी जायचे नाव घेत नव्हते. दिवसेंदिवस गर्भाची वाढ होत होती. 

    एके दिवशी माझ्या आईला कळले की हे बाळ राजचे आहे. तेव्हापासून ती मला त्रास देत आहे. आता तर माझा नवरा माझ्या माहेरी रहायला आला होता. तो मला शारिरिक संबंध ठेवण्यासाठी रोज त्रास देत होता. एकतर माझी अवस्था कठीण होती. त्याला हे बाळ नको होते. त्याला स्वतः चे बाळ हवे होते. पण, मी ही गोष्ट कोणालाच सांगू शकत नव्हती. 

     ज्या रात्री मी धावत तुमच्या गाडी समोर आले. त्यावेळी तर भयानक प्रकार घडला होता. त्याच दिवशी माझे वडील बाहेरगावी गेले असतानांची घटना. माझा नवरा शारिरीक संबंध ठेवण्यासाठी त्रास देत होता. मी स्पष्टपणे नकार दिला. तर माझ्या सावत्र आईने माझे हात धरले आणि माझ्या नवऱ्याने ‌.... (काव्याच्या डोळ्यात आभाळ दाटून आले होते. ) माझ्या आईच्या डोळ्यासमोर माझा जणु बलात्कारच केला. असह्य अशा वेदनांनी मो ओरडत होते. पण, एका स्त्रीमधील मायेचा पाझर आटला होता.

    मला असं वाटतं होतं की आई फक्त आईच असते. ती प्रेमाचा सागर असते. ती सुखदुःखाची सावली असते. ती.... भावनाविवश होवून ती म्हणाली. 

    तेव्हाच मी मनाशी निश्चय केला की या घरातून बाहेर पडायचे. संधी मिळताच मी घरातून पळत सुटले. पण, त्यांच्या लक्षात येताच माझ्या मागे तो दोघे धावू लागले. मी धावत धावत रोडवर आले आणि नेमकी मी तुमच्या गाडीसमोर आली. तुम्ही मला वाचवले नसते तर कदाचित आज मी..... जिवंत नसते. 

   सुलोचना ताई, ओम आणि आदिती सर्व ऐकून सुन्न झाले होते. एवढं सगळं कसं सहन केलं गं तू आतापर्यंत. पण,‌आता पुढे काय करायचं ठरवलं आहे. 

     मी आधी बाबांना फोन लावणार आहे. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. काव्याचे वडील समोर उभे होते. बाप लेकीच्या प्रेमाची व्याख्या काय वर्णावी. एकमेकांच्या गळ्यात पडून दोघांनीही मन हलके केले. 

        आत्या.... हो गं मी आधीच फोन केला होता. पण, तू शुध्दीवर नव्हती. त्यामुळे मी आज बोलावून घेतले. काव्याच्या वडीलांनी देखील सुलोचना ताईंची माफी मागितली. 

         "आता माझा निर्णय झाला आहे. दुःखाला दूर सारून आनंदाची वाटचाल करणार. मी माझं शिक्षण पूर्ण करून छान नोकरी करणार. माझ्या बाळाला मी एकटीनेच मोठं करणार आणि छान आनंदाने जगणार." ......काव्या.

      " या आनंदात मी सहभागी झालो तर चालणार आहे का तुला? मी बाळाचा बाबा झालो तर . अर्थातच तुझी हरकत नसेल तरच आपण एक होऊ या. ".......ओम.

     ओमचे हे शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावर खळी खुलली. तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि लाजेने लाल होऊन ती खोलीत निघून गेली. 

     अनेक वर्षांनंतर एका नात्याचा गोड शेवट झाला होता.

©®आश्विनी मिश्रीकोटकर