गोष्ट छोटी डोंगराएवढी. विषय:- मना घडवी संस्कार शिर्षक:- मना घडवी संस्कार.... "संस्कार" हा शब्द आला की पहिली आठवण येते आईवडीलाची आणि शिक्षकाची त्याच्यामुळे तर आपले जीवन घडत असते. कधी ते प्रेमाने ,रागाने, आपुलकीने आपल्यावर चांगलेपणाचे "संस्कार" करत असतात. आपली मुले कुठे कमी पडू नये हा त्याचा प्रयत्न असतो, आणि जरी कमी पडली तरी आहे त्या परिस्थितीचे आव्हान त्यांना पेलता आले पाहिजे हे ते आपल्या प्रॅक्टिकल भाषेतून समजावून सांगतात. आणि कसे असते ना काही गोष्टी ह्या बघूनच मुलांना लवकर समजतात. भारतीय संस्कृतीत "संस्काराला" खूप महत्त्व आहे.....तुमच्यावर झालेले "संस्कार" आणि तुम्ही देत असलेले तुमच्या मुलांना "संस्कार" यावर संपूर्ण जीवनाचे सार अवलंबून आहे." "संस्कार" मुलावर करताना ते त्याच्यावर ओरडुन ,त्यांना मारून नाही करता येत."संस्कार" करायचे म्हणून करता येत नसतात,तर ते आपल्या बोलण्यातून वागण्यातून सहज आले पाहिजेत, तरच ते मुलाच्यात खोलवर रुजतात. आयुष्यामध्ये शिकवण अशी हवी ,असा गुरू हवा किंवा असा "संस्कार" हवा, की तो कायमचा मनावर बिंबवला जाईल धाकात ठेऊन , जसे की तू असेच वागायला हवे, तसेच वागायला हवे असे करून "संस्कार" होत नसतात.आपणच आपल्या आचरणातून ,वागणुकीतून सहज प्रकट करायला हवे आणि मुलांना जाणवु द्यायला हवेत.आईचा निस्वार्थीपणा बालकाच्या जडणघडणीत असतो, त्याच्यावर जे "संस्कार" केले जातात तीच तर त्याच्या जन्माची पुंजी असते. असे हे आईचे विलक्षण प्रेम असते. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि चांगला माणूस कसे व्हायचा हेच शिक्षण देत असतात. ते कधीच आपला मुलगा वाईट मार्गाला जाऊ नये याची दक्षता घेत असतात. कोणत्या पण आईवडिलांना आणि शिक्षकाना आपल्या पाल्याचे वाईट व्हावे असे कधीच वाटत नाही .तो नेहमी यशाच्या मार्गावर अग्रेसर असावा हेच तर त्याचे ध्येय असते. त्याचबरोबर तो हरला तर नाउमेद न होता अजून जास्त मेहनत घेऊन यशस्वी कसा होईल याकडे त्याचा कल जास्त असतो. "जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकण वडीलांच्या कर्तव्यापोटी"....समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुमच्या आईवडीलाचे "संस्कार" आहे म्हणून. "इंद्र धनुष्याचे रंग जसे आकाशाचे सौंदर्य खुलवतात तसे आईवडील आणि शिक्षकांचे "संस्कार" , शिकवण मुलाच्या आयुष्यात सुंदरता भरणारी असतात". श्रीधर फडके यांच्या दोन ओळी आठवतात..... "तेज स्पर्शाने दूर होई अंधार जैसा मुळांचा वृक्षास असे आधार शिल्पास आकारी जैसा शिल्पकार" "मना घडवी संस्कार". शेवटी काय तर "संघर्ष हा वडिलांकडून शिकावा , "संस्कार" आईकडून आणि बाकी सगळे दुनिया शिकवते". "ज्ञान" आणि "संस्कार" जिवनाचे मूळ आहे. "ज्ञान" कधीही वाकु देणार नाही आणि "संस्कार" कधी कमी पडू देणार नाही". ©® ॲड श्रद्धा मगर..