कल्पवृक्ष कन्येसाठी...

This true story is about my father who was a loving royal dad and was concerned about his kiss getting well educated

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला,
वैभवाने बहरून आला, 
याल का हो बघायला, 
याल का हो बघायला..
लता मंगेशकरांचे हे गीत कानावर पडले आणि माझ्या मनात आठवणींचे हिंदोळे सुरू झाले. मला माझ्या बाबांची, आम्ही सर्व काका म्हणायचो, त्यांची स्वप्न, त्यांची जिद्द धडपड सर्वच आठवली. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारणारे माझे काका! माझ्या वडिलांना आम्ही काकाच म्हणायचो. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच आई वडिलांचे छत्र हरपले. बहीण सहा वर्षाची होती. सखे सगे असे कोणीही नव्हते. चुलत काका काकूंच्या पदरात काकांच्या वडलांनी आपली सर्व इस्टेट आणि दोन मुले देऊन टाकली. दोन्ही भावंडे लहान. खेळण्या-बागडण्याच्याचे वय. पण छोट्या वयात कष्टाची कामे करायला लागले. अवघ्या बाराव्या वर्षी माझे काका नोकरीला लागले. सायकलवर दहा पंधरा किलोमीटर जायचे. डब्यात जे असेल ते, कधी ताजे कधी शिळे ते खायचे. पण पैसे मिळवून आणायचे आणि ते त्यांच्या चुलत्यांच्या हातात द्यायचे.  बहिणीची आणि स्वतःची जबाबदारी एवढासा जीव सांभाळत होता. पण उराशी स्वप्न मोठी होती. त्यांच्या काकूने ठरवलेल्या मुलीबरोबर त्यांनी लग्न केले. काकुने त्यांना वेगळा संसार थाटायला सांगितला. बाहेर पडताना स्वतःच्या वडलांच्या इस्टेटी मधील एक रुपया किंवा एखादा दागिना सुद्धा मागितला नाही. हक्कासाठी भांडले नाहीत. माझे काका म्हणायचे अरे मी वाईट वळणाला लागलो असतो, पण त्यांच्यामुळे मी जीवनात चांगल्या गोष्टी शिकलो ज्या अनमोल आहेत. माझे हात आणि मी आहे ना खंबीर सगळे वैभव मिळवायला. आणि खरंच त्यांनी करून दाखवले. किर्लोस्कर कंपनीत ते मोठ्या पदावर होते. स्वतःचे लेथ मशीन चे वर्कशॉप त्यांनी उभे केले अपार हिमतीवर. आपल्याला जास्त शिकता आले नाही, पण मुले माझी खुप शिकावीत त्यांची जिद्द इच्छा होती. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी रात्रशाळा करून जुने मॅट्रिक केले. माझा शाळेत नेहमी पहिला क्रमांक असायचा याचा त्यांना खूप अभिमान वाटायचा. मी कॉलेजला गेल्यावर तर त्यांनी माझे खूप लाड पुरवले. उंची साड्या सॅंडल्स सर्व हौस त्यांनी केली. मीही त्यांची इच्छा अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करत होते. बीए ला मला ऑनर्स मिळाला. त्या वेळी हे मिळवणे खूप सन्मानाचे आणि महत्त्वाचे होते. त्यांना आभाळ ठेंगणे झाले. पुढे जावईपण त्यांना उच्चशिक्षित मिळाला. चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी एम एस सी पदवी खूप मोठी होती. जावई एम एस सी आहे याचा त्यांना खूप अभिमान वाटला. त्यांना खूप आनंद झाला. माझा भाऊ बहीण हेही पदवीधर झाले. या सर्वाबरोबर यांनी आम्हाला स्वच्छतेचे शिस्तीचे संस्कार शिकवले. आमची आर्थिक शैक्षणिक अशी घराची पातळी उंचावली.
 पण फार दिवस माझे काका हे पाहू शकले नाहीत. माझ्या लग्नानंतर दीड वर्षातच त्यांचे निधन झाले. दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्यांची जिद्द माझ्यातही होती. माझी मुले खूप शिकावीत मोठी व्हावीत हे माझे स्वप्न होते. त्याप्रमाणे मी माझ्या संसाराच्या व्यापातून मुलांना तयार करत होते. त्यांच्या मनात उच्च शिक्षणाचे ध्येय पेरत होते. आवड निर्माण करत होते. मुलांनी माझी स्वप्ने साकार केली. मुलगी जावई उच्चशिक्षित आहेत. मुलगी बीएससी डी एम एल टी आहे. जावई इंजिनीयर आहेत.मोठा मुलगा आणि सून एम फार्म पीएचडी आहेत. मोठ्या मुलाचे इंटरनॅशनल लेव्हलवर प्रोजेक्ट प्रसिद्ध झालेत. सुनबाई फार्मसी कॉलेजची प्रिन्सिपल आहे. धाकटा मुलगा आणि सून दोघेही डॉक्टर आहेत. मुलगा परदेशात जाऊन लॅप्रोस्कोपीचे शिक्षण घेऊन आला. सुनबाई दंतवैद्य आहे. बहिणीची दोन मुले आणि सुना आयटी क्षेत्रामध्ये उच्च पदावर आहेत. भावाची मुलगीही पदवीधर होऊन नोकरी करत आहे. माझ्या दोन्ही सुनांची, मुलीची त्यांच्या जीवन साथीदारांना अमूल्य साथ आहे. यामुळे सर्वजण आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्यांची स्वप्न मोठी आहेत. ते सत्यात उतरवण्याची त्यांची धडपड चालू आहे. त्यांची जिद्द बघण्यासारखी आहे. मी शाळेत असताना शेवटच्या वर्षी मला खूप पारितोषिके आणि जनरल चॅम्पियनशिप मिळाली होती. त्या वेळेचा माझ्या काकांचा आनंदाने भरून आलेला चेहरा, त्यांचे डोळे आणि माझ्या पाठीवर शाबासकीचा त्यांच्या हाताचा स्पर्श मला अजूनही जाणवतो. आताही तेच वाटते, आज त्यांना किती अभिमान वाटला असता
आपल्या नातवंडांचा. त्यांची स्वप्न पुरी करणाऱ्या त्यांच्या छोट्या जवानांचा. 

पण आज ते हयात नाहीत म्हणूनच ओठी येते, कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया काका गेला, वैभवाने बहरून आला, याल का हो बघायला?
सूर्य-चंद्र तुमचे डोळे दुरुनिया बघतात, पाठी वरती फिरवा हात.. या हो काका एकच वेळा..!