Sep 28, 2020
प्रेम

आता जगणं फक्त तुझ्यासाठी

Read Later
आता जगणं फक्त तुझ्यासाठी

आता जगणं फक्त तुझ्यासाठी

बेला आज खूपच खुश होती,तिचा आज 51वा वाढदिवस पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होत होता आणि यात सगळयात मोठा हात रवी( तिचा नवरा) आणि दोन मुली नमिता आणि धन्वंतरी यांचा होता, तिचा वाढदिवस आज आमंत्रण हॉटेलात साजरा करण्यात येणार होता,तिथे एक हॉल सजवला होता ,दोघी मुलींनी मिळून आणि जेवणासाठी मासवडी थाळीची ऑर्डर दिली होती. वाढदिवसाला माहेरचे,सासरचे आणि तिच्या शाळेतील आणि आताच्या काही मैत्रिणी यांना सगळ्यांनाच आमंत्रण दिले होते,मुलींनी एक मोठा केक ऑर्डर केला होता ,आरतीचे ताट तयार केले होते , माहेरची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती की ,बर्थडे वगैरे कोण करत बसणार. बेलाने आज छान जरीच्या काठाचा ड्रेस घातला होता,जो मुलींनी तिला गिफ्ट दिला होता, ती गोरीपान,दिसायला सुंदरच होती,केसांना क्लच लावला होता, त्यात  अजून थोडाशी भर  लाईट मेकअपने घातली  होती ,नमिताने तर झाडूने तिची लगेच दृष्टही काढली.

भावांच्या गाड्या होत्या ,ज्यांना आमंत्रण दिले होते ते सगळेच आपापल्या गाड्यांवर हॉटेलला पोहोचले ,येणा-या प्रत्येकाचं फूल देऊन स्वागत करण्यात आले,वाढदिवस सुरु झाला , बेलाच्या भावाने कार्यक्रमाची प्रस्तावना दिली ,पाच बायकांनी हळदी कुंकू लावून आरती आणि ओटी भरली ,केक कटिंग झाले. बेलाची भाची शिक्षिका,तिने मामी बद्दलच्या छान आठवणी सांगितल्या,त्यानंतर बेलाचे दोन भाऊ आणि बहिणी आपल्या बहिणी बद्दल भरभरून बोलल्या की,सगळ्यांच्या डोळयात पाणी आलं,वहिनीने एक कविता केली होती ती वाचून दाखवली.

 बेला ताई तुम्हाला 51व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा,तुमच्या वाढदिवसानिमित्त

वाढदिवस म्हणजे जन्मदिवस,

आयुष्याच्या पुस्तकाची सुरुवात,

पुस्तक वाचताना पानं पलटत जातो,

एक एक वर्ष म्हणजे एक पान,

जशी वर्षे संपत जातात ,

आयुष्याच्या पुस्तकाची पाने उलटली जातात,

प्रत्येक पानात दडलेल्या असतात ,चांगल्या वाईट आठवणी,

मागे वळून पाहिले असता,आठवतात काही आठवणी,

ज्यात असतो चूक आणि बरोबरचा हिशोब,

चुकीतून शिकायचे असते,

बरोबर मधून बहरायचे असते,

आयुष्याच्या शेवटी मात्र सगळे गणित शून्य असते,

आता या वळणावर मात्र ,स्वत:ला शोधायचे असते.

इतरांसाठी जगून,त्यांना आनंद दिला,

स्वत:च्या भावनांचा,त्यासाठी त्यागही केला.

आता तरी स्वत:ची काळजी घ्या,स्वत:साठी जगा,

लहानमुलाप्रमाणे स्वछंदी जगा,मनसोक्त आनंद भोगा.

नका करु जगाची पर्वा,स्वत:साठी काही तरी करा,

उरलेल्या पानांमध्ये आता तरी  नवीन रंग भरा.

शेवटी काय मातीतून आलो,मातीत मिसळणार,

पण आयुष्यात काय केलं ,त्यावरून आपण  कसे होते हे ठरणार.

तुम्हाला पुढील आयुष्यात वेगवेगळे रंग भरण्यासाठी,स्वत:चे छंद जोपासण्यासाठी,आयुष्य स्वछंदीपणे जगण्यासाठी  खूप खूप शुभेच्छा.

आता वेळ होती रवीची,रवी उभा राहिला आणि त्याने बोलायला सुरुवात केली- लग्न झालं आणि डोंबिवलीला वन रूम किचन मध्ये संसार सुरु झाला,मी शॉर्ट हैण्ड आणि टायपिंग केले होते ,त्या जोरावर बँकेत नोकरी मिळाली होती , शनिवारी व रविवारी जास्तीची कामे घेऊन कामे करायची ,आयुष्य म्हणजे काम ,काम आणि काम एवढच होतं,घरातलं सगळं बेला पाहायची ,मी नेहमी व्यस्त असल्याने तिनेही बी एडला  ऐडमिशन घेतलं आणि पूर्ण केलं ,नवीन लग्न झालं आहे म्हणून कुठे जास्त एकत्र जाणं नाही की पिक्चर बघायला गेलो नाही ,त्यातच नमिता झाली ,मग बेलाचा  सगळा वेळ तिच्यात जायला लागला,तिच्या बहिणींनी कधी एखादा दागिना केला की,मला येवून  सांगायची, पण मला हवयं असं कधी म्हटली नाही,मीही ती काही म्हणत नाही,म्हणजे तिला नको आहे असं समजून गृहित धरलं होतं,असंही मला सोनं घेणं,म्हणजे उगीच पैसे अडकून राहतात असं माझं स्पष्ट मत.

त्यापेक्षा शेअरबाजारात पैसे टाकले तर निदान त्याच्यात तरी पैशाची वाढ होते ,असा विचार करणारा आणि त्यात पैसे गुंतवले तर यश मिळत होते ,त्यामुळे आपण बरोबर मार्गाने जात आहोत हा विश्वास होता ,शेअर मार्केटने जेव्हा रंग बदलला तेव्हा तर बेलाने मला खूप सपोर्ट केला आणि त्यातुनही बाहेर आलो ,तेव्हा सुटकेचा श्वास सोडला,मुली मोठ्या होत होत्या ,त्यांच्या सगळ्या मैत्रिणींचे वाढदिवस साजरे व्हायचे ,पण मला आवडत नाही म्हणून बेलाने इच्छा असूनही कधी वाढदिवस साजरे केले नाही ,तिथेही मी तिला गृहितच धरत होतो. गावी काही कार्यक्रम असला की,मला सुट्टी नाही म्हणून सगळे कार्यक्रमाला  बेलाच हजर असायची , तेही नेहमी हसत मुखाने,तिथेही मी तिला गृहितच धरायचो ,कधी एखादा गजराही प्रेमाने घेऊन दिला नाही , मी माझ्या  प्रत्येक गोष्टीत तुला गृहित धरून चाललो आणि तूही अर्धांगिनी सारखी माझ्या आनंदात आनंद मानत गेली आणि त्या सगळ्या साठी मी सर्वां समोर तुझी माफी मागतो.

असं बोलताच बेला उभी राहते - माफी मागण्याची खरचं काही गरज नाही ,कारण तुम्ही जे काही केलं ते आमच्यासाठीच केलं, पण यात आपलं सहजीवन जगायचं राहून गेलं, पण मी जेव्हा इतर बायकांकडून ऐकायची की ,त्यांचा नवरा दारु पिऊन येतो,शिवीगाळ करतो ,मारतो तेव्हा मी स्वत:ला खूप नशीबवान समजायची ,तुम्ही आम्हाला कुठे नेलं नाही पण तुम्ही स्वत:ही कुठे गेला नाहीत आणि पैसे खर्च करायचं मला तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे,कधीही तुम्ही माझ्याकडून कधीच कोणत्याही प्रकारचा हिशोब घेतला नाही , कदाचित हा तुमचा माझ्यावरचा विश्वासच आहे ना की,मी वायफळ खर्च करत नाही आणि नात्यात विश्वास तर खूप मोठा असतो. मला पुढच्या जन्मातही तुमची बायको व्हायला आवडेल ,फक्त एक दोन गोष्टींची त्यात सुधारणा हवी.

रवी सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसतो ,हातात गुलाबाचा गुच्छ घेतो ,तिच्या समोर धरत बोलतो- आतापर्यंत तू माझ्यासाठी  जगत आलीस ,माझ्या आनंदात आनंद मानलास ,आयुष्याच्या या कातरवेळी मी तुला वचन देतो की, आता जगणंं फक्त तुझ्यासाठी.

बेला लाजून चूर चूर होते, पहिल्यांदाच तो तिला इतक्या रोमँटीकपणे असं काही बोलला होता.

सगळे टाळ्या वाजवतात ,तसं बेला रवीला उठवते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात .

तिने हे सारं असं घडेल, असा कधीही विचार केला नव्हता आणि रवीने तर आज सगळ्यात मोठा सुखद धक्का दिला होता,सगळ्यांच्या प्रेमाच्या वर्षावात ती ओली चिंब भिजली होती आणि त्याचे तेज तिच्या        चेह-यावर पसरले होते.

कथा आवडली असेल तर अभिप्राय अवश्य द्या आणि शेअर करा 

रुपाली थोरात 

 

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat