Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 32

Read Later
घरकोन भाग 32

घरकोन -32
©®राधिका कुलकर्णी.

रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत रात्र काढणाऱ्या सुशांतला कधी सकाळ होतेय असे झाले होते.विचार संपत नव्हते आणि अस्वस्थ मनाला झोपही येत नव्हती.कधी हे विचारचक्र संपतेय असे झाले होते.रात्री कधीतरी नकळत डोळा लागला त्याचा.
काहीवेळाने खडबडून जागा झाला तेव्हा सकाळ झाली होती.
सुशांत घाबरून अंथरूणावर उठुन बसला.रेवा पहाटेच जाणार म्हणाली होती.खरच गेली की काय?
घाबरतच त्याने धावत आईची खोली गाठली.काकू तर रोजच लवकर उठुन घरकामाला लागलेल्या असायच्या.आईची ही सवय माहित असल्याने सुशांतला खोलीत आईचे नसणे अपेक्षितच होते पण रेवाही कुठेच दिसत नव्हती.त्याने चहुकडे नजर फिरवून तिचे सामान कुठे दिसतेय का तपासले परंतु तिकडेही त्याची निराशाच झाली.
रेवा खरचच परत तर गेली नाही ना मला न सांगता?विचारांच्या गोंधळातच तो घाईघाईने खाली आला.चहुकडे नजर फिरवली.आई कुठेच दिसत नव्हती आणि रेवाही.आता मात्र सुशांत पुरता कोलमडला होता.तरीही धीर करून आईला काही कल्पना असेल म्हणुन तिला विचारायला आता त्याची नजर घरभर आईला शोधत होती.
काकु बाहेर तुळशीला प्रदक्षिणा घालत स्तोत्रपठण करत होत्या.सुशांतने घाईनेच आईला विचारले,"आई तु रेवाला पाहिलेस का कुठे?ती घरात कुठेच दिसत नाहीए."
काकुंनी हातानेच थांबण्याचा इशारा केला.स्तोत्रपठण चालू असताना त्यांना सुशांतला बोलता येणार नव्हते हे जाणुन सुशांत अधिकच अस्वस्थ आणि अधिर झाला होता.पण शांत बसण्यावाचुन पर्यायही नव्हता.
मग तो घरातच डायनिंग चेअरवर आई कधी आत येतीय ह्याची वाट पहात बसला.
थोड्या वेळातच काकु आत आल्या.काकुंना बघताच सुशांत लहान मुल होऊन धावत आईपाशी गेला आणि रडवेल्या सुरातच विचारला," आई रेवा कुठे गेलीय काही सांगुन गेली का तुला?मी घरभर शोधले पण ती मला कुठेच दिसली नाही,तुला काही माहितीय का?"
काकू त्याचे प्रश्न ऐकतच किचनकडे वळल्या.सुशांतही त्यांच्यामागेमागे किचन पर्यंत पोहोचला.
काकुंनी त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत त्याला विचारल्या,"तु चहा घेशील ना?"
"मरू दे तो चहा,आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे,रेवा तुला सांगुन गेलीय का? कुठे गेलीय?प्लिज सांग आई."
सुशांत आता खरोखर रडवेला झाला होता.
काकुंना त्याची अवस्था बघवत नव्हती पण तरीही त्यांनी नाटक पुर्ण वठवत त्याला बोलल्या,"रेवात आणि तुझ्यात काही झाले का काल रात्री,कारण ती आज पहाटेच आवरून खाली आली.काल दिलेली ही साडी मला परत केली आणि म्हणाली सध्या ही तुमच्याकडेच ठेवा.मी निघतेय आणि नमस्कार करून गेली.
मी तिला थांबवायचा प्रयत्न केला,तुला सोबत ने असेही बोलले पण ती म्हणाली की मी सुशला कालच सांगितलेय की मी लवकर निघेन त्यामुळे त्याला त्रास नका देऊ.मी जाईन एकटीच.
तिचे डोळे थोडे पाणावले होते निघताना पण ती काही न बोलताच निघुन गेली.आता मला खरं खरं कारण सांग ती अशी तडकाफडकी तूलाही न सांगता घर सोडुन का गेली?काय झाले तुमच्या दोघांत?"
सुशांतच्या कानावर आईचे प्रश्न पडत होते पण त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते डोळ्यातुन घळाघळा अश्रु वहात होते.आपण रेवाला कायमचे गमावुन बसलो ह्या कल्पनेने तो पुरता खचून गेला होता.पुन्हा बोलण्याची एक संधीही न देताच ती निघुन गेली ह्याचेच त्याला सतत दु:ख होत होते.
आईच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर  न देता फक्त तो कुशीत शिरून लहान मुलागत रडत होता.
"अरे काय झाले तरी काय?"तू का रडतोएस इतका?मला नीटपणे सांग पाहू काय झाले?"
तिही जाताना खुष दिसत नव्हती रडवेला चेहरा घेऊन गेली आता तुही रडतोएस, नेमके काय बिनसलेय तुमचे?"
आईची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.
रडून मन थोडे शांत झाल्यावर सुशांतने सगळा दोघांमधला संवाद आईला सविस्तरपणे सांगितला.
आई मी रेवावर मनापासुन प्रेम केले पण आज ती रागावुन दूर गेलीय माझ्यापासुन.आई तुच काहीतरी मार्ग सांग ना गं,कशी तिला मी परत आणु?"
मग ठरल्याप्रमाणे काकुंनी त्याला थोडे बौद्धिक द्यायला सुरवात केली.
सुश बाळा,आधी ते डोळे पुस.आणि,मला सांग ह्यात खरच रेवाची चुक आहे का काही?"
नाही आई,मला माहितीय मीच चुकलो आहे पण त्याची एवढी कठोर शिक्षा द्यावी का तिने.तिही माझ्यावर प्रेम करते.ती कॉलेजच्या पहिल्या वर्षापासुन माझ्यावर प्रेम करते हे मला माहित असुनही मी कधीही तिला माझे प्रेम व्यक्त केले नाही का माहितीय?कारण मला तिचे आणि माझे कोणतेही नुकसान होऊ नये असेच वाटायचे.मी ही माझ्या प्रेमाची कबुली दिली असती ना तर प्रेमात दोघेही वहात गेलो असतो आणि त्याचा परीणाम आमच्या अभ्यासावर, करीअरवर झाला असता,जे मला होऊ द्यायचे नव्हते म्हणुन मनावर दगड ठेऊन मी शेवटपर्यंत माझ्या भावना लपवून ठेवल्या.मी ठरवले असते तर मला तिचा हवा तसा फायदा कधीही घेता आला नसता का आई?पण मी नेहमी तिला एका अंतरावर ठेवले.कितीवेळा तिने काही मदत केली की वाटायचे आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात पण मी स्वत:वर नेहमी कंट्रोल ठेवला.तिला विचारून बघ कधी मस्करीत सुद्धा मी तिचा गैरफायदा घेतलाय का?
पण आता सगळे आेके होते.तिलाही सगळे माहित होते म्हणुन थोडी गंम्मत केली मी,मला वाटले तिला समजेल मी मस्करी करतोय ते पण माझे सगळेच फासे उलटे पडले.काल ती खूप चिडली होती माझ्यावर.मी शांततेने तिचे सगळे ऐकुन घेतले,वाटले होते सकाळी तिची समजूत काढू तोपर्यंत तिचाही राग निवळेल पण कसचे काय,ती तर खरचच निघुन गेली."
"आईऽऽ निदान ती निघतेय म्हणल्यावर तरी मला एकदा उठवायचेस ना ग तू,असे कसे जाऊ दिलेस तिला?"
सुशांत पुन्हा रडायला लागला.
"तु रडणे थांबव पाहू आधी."
"मी तुला मागेही हजारवेळा सांगितलेय ना सुश की अशी सतत मस्करी करू नये."
"एकदिवस तुझ्याच अंगलट येईल.पण तू नेहमीच सगळे दुर्लक्षित केलेस.कालही मी तूला सांगत होते नको करूस अशी चेष्टा.पोरी हळव्या असतात अशा विषयात.तिच मन दुखेल अशाने पण तु तुझीच मनमानी केलीस आता बघतोएस ना काय झाले."
आतातरी काही बोध घेणार आहेस की असेच चालु ठेवणार आहेस?"
मला पटलीय माझी चुक पण आता फार उशीर झालाय गं.मला नाही माहित आता रेवा मला माफ पण करेल की नाही.पण आई माझ्यावतीने एकदा तु बोल ना गं तिच्याशी.
फक्त एकदाच.मग मी पुन्हा आग्रह नाही करणार.जे जसे होईल तसे अॅक्सेप्ट करेन पण तु एकदा बोल तिच्याशी,बोलशील ना?"
सुशांत खूप भावुक झाला होता.
डोळे पुन्हा पाण्याने डबडबले.
"बर बोलेन.तु डोळे पुस आता आणि चहा घे थोडा.ती सध्या प्रवासात आहे की नाही,मग घरी पोहोचू दे तिला मग बोलते हं."
आईच्या अश्वासक शब्दांनी सुशांतला थोडे बरे वाटले.पुन्हा थोड्या आशा पल्लवीत झाल्या.त्याला माहित होते रेवा त्याच्या आईचे बोलणे नक्कीच ऐकुन घेईल.
मग तो पाणी चेहऱ्यावर मारून फ्रेश होऊन टेबलवर बसला.काकुंनी दोघांसाठी चहा आणला.बिस्कीटाचा डबा आणायला म्हणुन काकुंनी सुशांतला स्टोअररूम मधे पाठवले.
"सुश,जा जरा बिस्कीटडबा आण रे आतल्या खोलीतुन,बिस्कीट संपलीएत."
आईचे म्हणणे ऐकतच सुशांत स्टोअररूमचा दरवाजा उघडून आत गेला.आत जाताच समोर रेवाला बघुन होते नव्हते ते सगळे अवसान गळुन पडले आणि त्याने धावत जाऊन रेवाला घट्ट मिठी मारली.
"रेवाऽ तूऽऽ!!!इकडे??"
त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता.काय बोलावे काहीच समजत नव्हते फक्त डोळ्यातुन पाणी वहात होते आणि चेहऱ्यावर आनंद ओसंडुन वहात होता.जे घडून गेले ते एक दुष्टस्वप्न होते की आत्ता बघतोय ते स्वप्न आहे अशी सुशांतची संभ्रमावस्था झाली होती.
रेवाही त्याची ही अवस्था बघुन रडवेली झाली होती.
त्याला दु:ख देऊन तिलाही खूप त्रास होत होता.
सर्व भावना फक्त स्पर्शातुनच व्यक्त होत होत्या.कुणीच कुणाशी बोलत नव्हते.
दोघेही एकमेकांच्या मिठीत कितीतरीवेळ पर्यंत तसेच विसावले.तो स्पर्शच सर्वकाही बोलत अबोल भावनांना वाट करून देत होता.
आता काकुही त्यांच्यात सामिल झाल्या.दोघांना आपल्या कुशीत घेत पुन्हा एकदा तिघांनीही एकमेकांना आश्वस्त केले.
नात्यांची ही वीण नक्कीच अजुनच घट्ट होत होती.
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -32
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतोय की नाही? 
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..