घरकोन भाग 19

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्याा अल्लड,प्रेमळ रेवाची गोड सुंदर प्रेमकहाणी घरकोन जूर वाचा.

घरकोन-19
©राधिका कुलकर्णी.

स्वत:च्या आत्मसन्मानाला पोहचलेली ठेच रेवाच्या वर्मी घाव घालून गेली होती.
बदल्या सारख्या घाणेरड्या गोष्टी तिच्या डोक्यात चुकुनही नव्हत्या पण सुशांत बद्दलचे तिचे मत बदलायला गेल्या दोन तिन दिवसातील घटना पुरेशा ठरणार होत्या.
सुशांत हा विषय आपल्या आयुष्यातून आता पुर्णपणे हद्दपार करायचा मनोमन निग्रह करतच तिने घर गाठले.
आजही न जेवताच झोपली ती.
सकाळ होऊन ऊन्ह वर आली तरी रेवा अंथरूणातच पडलेली पाहून तिच्या रूममेट्सना आश्चर्याचा धक्काच बसला.हो कारण तिला पहाटे लवकर उठायची सवयच होती.कॉलेजला सुट्टी असलेल्या दिवशीही ती लवकर उठुन बसायची आणि मग एकटीच गाणी एेकायची किंवा वॉकला जायची.
पण आज तिच्या स्वभावा विपरीत कॉलेजला जायची वेळ होऊनही रेवा अजुन झोपलेलीच पाहून दोघींना जरा काळजी वाटली.त्यांनी तिला हलवून उठवायचा प्रयत्न केली तेव्हा ती थोडी कण्हतच उठली.
तिला प्रचंड ताप भरलेला होता आणि त्यामुळेच ग्लानीने तीला उठवत नव्हते.तिच्या हाताला स्पर्श करताच चटका बसावा तसे तापलेल्या तव्यासारखे अंग तापले होते.
मग घाईनेच त्यांनी तिला उठुन बसवले,थोडे कोमट पाणी प्यायला दिले.पाणी पिल्यावर थोडी ग्लानी उतरली आणि वॉशरूमला जायला बेडवरून उठली तसा तिचा चक्कर येऊन तोल गेला.
डोके प्रचंड गरगरत होते.
सहाजिकच होते नाऽऽऽ,
स्वत:च स्वत:ला त्रास देत गेल्या दोन रात्री ती उपाशी पोटीच निजली होती त्यात भरीस भर सुशांतने दिलेले मानसिक आघात,ह्या सगळ्याचा एकत्रीत परीणाम म्हणुन आज ती तापाने फणफणली होती. मैत्रिणींनी तिला लगेच जवळच्याच एका क्लिनिकमधे घेऊन गेल्या.
डॉक्टरांनी तपासून गोळ्या औषधे लिहून दिली आणि आराम घ्यायला सांगितला.
तिघी घरी आल्या.
पटकन त्यातल्या एकीने रेवासाठी मऊ-भात/वरणाचा कुकर लावला आणि दोघीही आपापल्या कॉलेजला निघुन गेल्या.
रेवाने थोडा चहा बिस्कीट खाऊन गोळी घेऊन पडून राहीली.
दुपारी उठुन आपल्याच हाताने थोडा मऊ-भात वरण वाढुन घेऊन खाल्ला.अन्नावरची वासनाच उडल्यासारखी झाली होती तरीही गोळी घ्यायची म्हणुन बळजबरीने दोन घास पोटात ढकलून गोळ्या घेऊन ती पून्हा झोपली.
औषधांमुळे की काय तिला पुन्हा गाढ झोप लागली.
कोणीतरी दारावर जोरजोराने थाप मारत तिला उठवतेय असा तिला  भास झाला.
आपण स्वप्नात तर नाही ना?असे तिला वाटत होते पण ते स्वप्न नव्हते तर सत्य होते.
घरमालकीण काकू दार वाजवून तिला उठवायचा प्रयत्न करत होत्या.
जराशा नाराजीनेच ती उठली.
अजुनही तिचे डोके प्रचंड दुखत होते.
उठल्यावरही गरगरत होते तरीही भिंतीच्या आधाराने दारापर्यंत पोहोचून तिने दार उघडले.
बाहेरच्या प्रकाशाने डोळे किलकीले झाले.
किती वेळ झालाय ह्याचाही पत्ता नव्हता तिला.
ग्लानीतच तिने काकुंना का आलात असे प्रश्नार्थक नजरेने विचारले.
काकू तिला बघुन म्हणाल्या,
"अगंऽऽऽअशी अवेळी घरी कशी तू आज?"
"तब्येत बरी नाहीये का?"
"हो काकू थोडा ताप आहे."
"पण तुम्ही का आलात?"
"अग तुझ्या कॉलेजमधुन कुणाचा तरी फोन आलाय."
"बघ काय काम आहे, जरा खाली ये."
फोन कुणाचा?
आणि मला काेण कॉल करणार?
असा विचार करतच जिन्याच्या कठड्याचा आधार घेत रेवा काकुंच्या घरी गेली.
रिसिव्हर उचलला तेव्हा उन्मेश पलिकडून बोलत होता.
उन्मेश सुशांतचा रूम पार्टनर होता.
"काय रे?फोन का केलास?"
"अगऽऽ,सकाळ पासून तूझी कॉलेजला येशील म्हणुन वाट पाहीली."
"तू का नाही आलीस आज?"
"अरे मला ताप आहे थोडाऽ
म्हणुन घरीच आराम करत होते."
"बर बोल ना,फोन का केलास?"
"अगऽऽ आज सुशांतला दुपारी डिस्चार्ज मिळणार होता आणि तो काकूंबरोबर नगरला जातोय त्याच्या घरी.
त्याला 10/12 दिवस तरी रेस्टची गरज आहे.
बहुतेक सगळ्या फॉर्मलिटीज उरकून ते संध्याकाळी निघतील असे वाटतेय.
तूला शक्य असेल तर निघण्याआधी भेटून ये म्हणुन मेसेज द्यायला फोन केला होता,पण तूलाच बरे नाहीये."
"बघ बरे वाटत असेल तर जा."
ठिक आहे बघते म्हणत रेवाने फोन ठेवला.
पून्हा एकदा मनात द्वंद्व सुरू झाले,"काय करू?"
"जाऊ की नको?"
"आता गेला तर सुशांत पुढचे दहा बारा दिवस दिसणार नाही की भेटणारही नाही.काय करावे? ??"
रेवा प्रचंड कात्रीत सापडली होती.
एकीकडे त्याचे तोंड बघू नये इतकी घृणा वाटत होती तर दुसरे मन एकदा बाय करून यायला काय हरकत आहे शेवटी तो पेशंट आहे.माणुसकी म्हणुन तरी जायला हवे असे म्हणत होते.
पून्हा कालच्या कटू घटना आठवण यायला लागल्या होत्या.
आपल्याच विचित्र, वेडवाकड्या सावल्या वाकुल्या दाखवून आपल्याभोवती फेर धरून नाचत फिदीफीदी हसताएत असे तिला भासत होते.

शेवटी गेल्या तीन वर्षांपासुनची साथ अशी पटकन झुरळासारखी झटकुन विसरणे शक्य होते का?
कितीतरी एकत्र घालवलेले प्रसंग तिला आठवायला लागले.ती बाहेर टपरीवर पिलेली कळकट कॉफी,एकत्र बसुन केलेला अभ्यास,भांडण,
बऱ्याचदा त्याने सहन केलेला तिचा राग, चिडचीड सगळे सगळे डोळ्यासमोर चलचित्रासारखे दिसायला लागले.
काही विचार करून मग ती उठली.
डोळ्यावर पाणी मारले.
चेहरा पाण्याने स्वच्छ धुतल्यावर तिला जरा बरे वाटले.पटकन कपडे करून ती हॉस्पिटलला जायला निघाली.
गाडीवरून जाण्याची ताकदच नव्हती अंगात त्यामुळे रिक्षा करून तिने हॉस्पिटल गाठले.
आत्तापर्यंत घड्याळाकडे तिने बघीतलेच नव्हते.
साधारण साडेपाच झाले होते.
काकू भेटतील की गेले असतील हेही ठाऊक नव्हते.
रिक्षा हॉस्पीटलच्या आवारात पोहोचताच ती पळतच रिसेप्शन काउंटरवर गेली.
रूम नंबर 302 च्या पेशंटला मि.सुशांत नगरकरांना आज डिस्चार्ज दिलाय,ते आहेत की गेलेत जरा सांगाल का प्लिज?
तिने रिस्पेशनिस्टला विचारले.
रिसेप्शनिस्ट तिच्या कामात होती.ती लवकर उत्तर देत नाहीये पाहून रेवा पळतच वर गेली पण रूम रिकामी होती.
वॉर्डबॉय रूमची सफाई करत होता.तिने त्यालाच विचारले त्यावर ते आत्ताच गेले असे त्याने सांगीतले.
ती पून्हा धावत खाली आली पण ती पोहचेपर्यंत एक कार हॉस्पीटलच्या गेटमधुन बाहेर पडताना तिला दिसली.
थोडी पळतच ती कारच्यामागे काकू आणि सुशांतला हाका मारत धावली.खूप आवाज दिले पण तोवर गाडीने वेग पकडला आणि म्हणता म्हणता सुशांत तिच्या नजरे समोरून दिसेनासा झाला.
तिच्या डोळ्यातून आता अश्रुंच्या धारा वहायला लागल्या.
डोळ्यातल्या आश्रुंना तसेच ओघळू देत ती काही काळ तिथेच मख्ख चेहऱ्याने उभी राहीली.
जणु एक सुंदर काळ तिच्या हातातून रेतीसारखा निसटून दूर दूर चालला होता.

उरला होता तो फक्त  वर्तमानातला भयाण एकाकीपणा......
~~~~~~~~~~~~~~~~~~
क्रमश:-19
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all