चक्रव्यूह- एक चकवा.

काय असेल विद्याचा भूतकाळ?

'चक्रव्यूह'- एक चकवा (भाग-एक)

©®श्री.सारंग शहाजीराव चव्हाण.

 मुसळधार पावसाची रिपरिप असल्यामुळे माझ्या बाईकमध्ये बिघाड होऊन ती बंद पडली होती. त्यामुळे मी एका जवळच्या बसस्टॉपवर जाऊन बसची वाट बघत थांबलो होतो. 

थोड्यावेळात एक बस येताना मला दिसली आणि मी बसला हात करून बसमध्ये चढलो. बसने पुन्हा थोडा वेग पकडला होता. मी पायरीवरून वर चढून गेलो आणि सहज प्रवाशांवर नजर फिरवली. तोच मला एका सीटवर कोणीतरी ओळखीचा चेहरा दिसला,म्हणून मी नीट निरखून बघू लागलो. तर तो चेहरा अगदीच ओळखीच्या व्यक्तीसारखा वाटत होता.

मी विचार करू लागलो, ' हिला कुठे बर पाहिलंय?'

त्या उत्सुकतेपोटी मी आणखी जरा जवळ गेलो तर, 'अरे! ही तर अगदी तिच्यासारखी दिसते.' असा विचार करत मी तिला पुन्हा निरखून पाहू लागलो.

नंतर माझ्या लक्षात आलं की,'ही तिच्यासारखी नसून ही तीच आहे.'

'पण ही इथे काय करतेय?' असा प्रश्न मनाला भेडसावत होता.

कदाचित तिनेपण मला ओळखलं असावं, म्हणून ती माझ्यापासुन आपली नजर चोरत होती. 

कधीकाळी कॉलेजमधील मुलांची ड्रीमगर्ल असणारी ती आता एकदम सर्वसामान्य स्त्रीसारखी दिसत होती. प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त वयस्कर वाटत होती.

'पण अगदी काही वर्षांत एवढा बदल कसा झाला हिच्यामध्ये? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बसमधून का प्रवास करत आहे? हिचा नवरा तर दुबईला असतो आणि इथेपण त्याचा बंगला गाडी वगैरे काहीबाही आहे असं ऐकलं होतं. त्याचबरोबर हिचं राहणीमान अगदी सामान्य लोकांच्यासारखं कसं?'  असे कितीतरी  प्रश्न एकाचवेळी माझ्या मनात गर्दी करत होते.

'मी तिच्याशी बोलावं का? ओळख काढावी की नको? आणि तिने ओळख नाही दाखवली तर? काय करावं?'

अश्या विचारात मी गर्क झालो असतानाच एका स्टॉपवर तिच्या शेजारचा प्रवासी उठून गेला. त्यामुळे मला आयतीच संधी मिळाली आणि मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. मी बोलायला जास्त वेळ लावला नाही, कारण कोण जाणे ती कोणत्या स्टॉपवर उतरेल!

मी तिच्याकडे बघत म्हणालो,"हाय! तु विद्या ना?"

ती काही बोलणार इतक्यात मीच पुढे म्हणालो,

"मला ओळखलं का तू? मी महेश,तुझ्या वर्गात होतो मी."

ती थोडीशी भेदरली होती. मी ते ओळखलं आणि म्हणालो,

"अग रिलॅक्स हो घाबरु नको."

ती नजर चोरुनच म्हणाली,

"हो ओळखलं. आपण एकत्र होतो कॉलेजला."

मी म्हणालो,

"तु इकडे कशी?"

माझा प्रश्न ऐकून ती बावरली होती.

मी पुन्हा विचारलं ,"एकटीच कुठे चालली आहेस? ते पण या बसमधून? तुझी गाडी असेल ना स्वत:ची?"

ती म्हणाली,"माझा स्टॉप आलाय. बाय!"

आणि ती बसमधून खाली उतरली, पण माझी उत्सुकता वाढली होती. त्यामुळे मला आता तिच्या पाठोपाठ जाणं भाग होतं. मीपण खाली उतरलो आणि तिच्या नकळत तिचा पाठलाग करु  लागलो.

क्रमशः

ही विद्या नक्की कोण असेल?

काय असेल तिचा भूतकाळ?

त्याने तिचा पाठलाग करण्यामागचं कारण काय असेल?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

'चक्रव्यूह'- एक चकवा.

श्री.सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.९९७५२८८८३५.

(कथा आवडल्यास नक्की लाईक करून आपला बहुमोल अभिप्राय द्या. तसेच मला फॉलो करा.)

*पहिला भाग छोटा आहे, पण पुढील भाग मोठे आहेत. नक्की वाचा,कथा आपणांस नक्की आवडेल.

🎭 Series Post

View all