चाफा बोलेना भाग १२

It's a Blooming love story..

#चाफा_बोलेना
#भाग१२
©अर्चना बोरावके"मनस्वी"
          अबोली सकाळी लवकर उठली होती.... अविला गोळ्या घ्यायच्या आधी पोटभर खायला द्यायचे होते. स्वयंपाक घरात येऊन इडलीच्या तयारीला लागली... तेव्हड्यात तिचे लक्ष खिडकीतून समोर गेले... रेवती दिसली. रेवतीला बघून तिला त्यांचे सर्व बोलणे आठवले. अविचं प्रेम होतं तिच्यावर....त्या प्रेमभंगाचं दुःख मनात असतानाच घरच्यांचीही नाराजी त्याला सहन करावी लागली होती.... त्याला आधार द्यायलाही कोणी जवळ नव्हते..... त्याला सावरायला थोडा अवधीही मिळाला नाही, लगेच नव्या बंधनात अडकावे लागले.  त्याच्या मनाची अवस्था कोणालाच कळली नाही.... त्यामुळेच तो इतका शांत होता..... मी त्याची मैत्रीण, पण मलाही काही कळले नाही. त्यात आता हे आजारपण आणि आर्थिक संकट! मला अविला आधार द्यायला हवा, दरवेळी फक्त स्वतःचाच विचार केला मी, आता अविला या सगळ्यातून बाहेर यायला मदत केली पाहिजे. तिला वैजू आत्याचे बोल आठवले ' संयम आणि प्रेमाने सगळं जिंकता येतं,' मी परत अविला त्याचे हसू मिळवून देईन. मी वचन दिले आहे वैजू आत्याला, मी कायम त्याच्यासोबत राहील....
             घरची आठवण येताच तिने लगेच घरी फोन लावला.... त्यांना काही सांगायचे नव्हतेच. पण खुशालीचे बोलण्यानेही तिला बरे वाटले.... हिम्मत मिळली. तिने तिच्या कपाटातून एक पाकीट काढलं... त्यात तिने तिकडून आणलेली चाफ्याची फुले होती.... त्यांना एकवर आपल्या हातात घेतले.... त्या फुलांकडे बघून तिचे मन मागे गेले. तिला जाणवले , फुले सुकली तरी त्यांची आठवण मनात तशीच ताजी आहे. आणि त्या सुंदर आठवणींमुळे तिच्या मनातील सर्व निराशा दूर पळाली.
               तिने इडली सांबार बनवून अविला उठवले. त्याला जेवणाच्या टेबलपर्यंत आधार देऊन आणले. त्याला अजिबात खायची इच्छा नव्हती.... मग अबोलीने स्वतः त्याला भरवायला सुरुवात केली...." खाल्ले नाही तर लवकर बरा कसा होशील तू? .... आता एक आठवड्यात तुझे प्लास्टर निघेल... मग काही काळजी नाही... आपण बाहेर फिरायलाही जाऊ शकू .... ताज्या हवेत तुला खूप छान वाटेल."
          "अबोली किती काळजी करते गं माझी.... मला स्वतःच्या या अवस्थेची खूप लाज वाटते .... मी होईल ना बरा नक्की?"
        " तू नक्की बरा होणार.... शंभू महादेवाचा तुझ्यावर आशिर्वाद आहे.... मी साकडे घातले आहे त्याला....आणि तुला माहितच आहे, तो माझं सगळं ऐकतो.. "
     " हो! ते तर मी पाहिलेच आहे! तुझ्या सांगण्यानेच तर आपलं लग्न त्याने जमवलं ना! "
      तो असं म्हणताच अबोली लाजली आणि अवि तिच्याकडे बघून हसू लागला. तीही मग त्या हास्यात सामील झाली.
            फोनच्या घंटीने त्यांचे हसू थांबले. अबोलीने फोन घेतला...... ती  कुणाशी तरी मराठीत बोलत होती..... अवि विचारच करत होता आणि अबोली एकदम आनंदी होऊन त्याच्याजवळ आली,
         " अवि, महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांचा फोन होता. महाराष्ट्रियन मुलांना मराठी लिहायला वाचायला शिकवण्यासाठी त्यांना कुणीतरी हवं आहे.... मी B. A. मराठीतून केल्याने मला विचारत आहेत... आठवड्यातुन तीन दिवस संध्याकाळी शिकवायला जायचे.... आणि ....... आठवड्यातुन दोन दिवस मुलांना नृत्य आणि गायन शिकवायला पण या असं म्हणणं आहे त्यांचं....."
      "अगं मग चांगले आहे की.... तुझ्या आवडीचं काम आहे. तूझंही मन रमेल.. दिवसभर काय करशील घरात? "
     "   पण आठवड्यातील पाच दिवस रोज संध्याकाळी जावे लागेल..... तीन-चार तास तरी लागतील परत यायला.... तू इथे एकटा कसा राहशील? ... तुला काही गरज पडली तर? मला तुझी काळजी वाटते रे! "
      " अबोली मी व्यवस्थित आहे... आता प्लास्टरही निघेल... तू जा.. चांगली संधी आहे... तुझ्या कलेला इथे वाव मिळतो आहे... तू जाच. "
      अबोलीला त्याच्या पायापेक्षा जास्त काळजी त्याच्या मनाच्या आजाराची होती.... डॉक्टरांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायला सांगितले होते.... काहीही वेगळे वाटले की लगेच कळवायला सांगितले होते..... पण सध्या पैशांचीही गरज होती.... चांगला पगार मिळणार होता.... तिची द्विधा अवस्था झाली. "
       संध्याकाळी ते बाहेर त्यांच्या बागेत बसले. कुंडीत उगवलेली ती सुंदर फुले त्यांना त्यांचे सर्व प्रश्न विसरून जायला जणू सांगत होती...... कितीतरी रंगांची चाफ्याची फुले छोट्याशा कुंडीतली चांगली फुलली होती.....
     " अबोली, ही फुलेच आपल्याला सांगत आहेत, झाड जमिनीत असो वा छोट्याशा कुंडीत..... त्याला योग्य वातावरण मिळताच ते फुलतंच.... तुलाही आता इथे चांगली संधी मिळत आहे......फुलू दे तुझी कला इथेही.... येऊ दे बहर या अबोलीलाही ....."
         अविचे प्रोत्साहन बघून अबोली खुलून गेली....," अवि, तू मला साथ देशील तर मी सगळे काही करेल... "
       नंतर कितीतरी वेळ ते बोलत बसले.....
             अबोलीने दहा दिवसांचा वेळ मागून घेतला.... तोपर्यंत अविचे प्लास्टर निघणार होते... आणि एक चिंता कमी होणार होती. रात्री अबोली खूप वेळा उठून अवि ठीक आहे का तपासत असे, त्याला ताप तर नाही ना, तो चांगला झोपतो आहे ना याची ती सारखी शहानिशा करी. मागच्या एक महिन्यात त्याला परत तसा त्रास झाला नव्हता.... पण अजून काही महिने त्याला नीट जपायचे होते.... तरच सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील. या काळजीने ती त्याला लहान मुलांसारखे जपे.
                 प्लास्टर निघाले, अवि आता चालू फिरू लागला. अबोली रोज संध्याकाळी मंडळाच्या हॉलमध्ये जाऊ लागली. पण जाण्याआधी ती अविचं सर्व त्याच्याजवळ ठेऊन जाई, खाण्यासाठी तर तिने कितीतरी पदार्थ करुन ठेवले होते.... पौष्टिक लाडू, त्याला आवडणारी चकली, कुरमुऱ्याचा तिखट चिवडा! ....... दुकानात जाऊन सामानही ती आता व्यवस्थित आणे, बँकेतून पैसे काढून आणणे.... बाहेरची सर्व कामेही ती करे .... मंडळात जाताना तर तिचा पाय लवकर निघतच नसे...... दाराबाहेर पडल्यावरही एकदा परत येऊन सगळं जागच्या जागी आहे ना, हे ती बघून घेई....... तिथे गेल्यावरही अविला दोन-तीन फोन होत.....
                ती गेल्यावर अवि एकटाच असे..... मागच्या दोन-तीन महिन्यांपासून अबोली जवळ असण्याची त्याला इतकी सवय झाली होती कि, ती गेल्यावर त्याला घर खायला उठे ....अबोली सारखी त्याच्या मागे मागे असे, त्याला खायला तरी विचारे, गोळ्या तरी घेऊन येई,  त्याच्या जवळ जाऊन तो झोपलाय की जागा आहे, हे कितीतरी वेळा बघायला येई. त्याला आधीचे दिवस आठवले, तो आजारी असला की ती त्याच्या शेजारीच बसुन रहायची..... एकदा तर त्याने तापात तिला तांब्या फेकूनही मारला होता..... तरी ती, तो आजारी पडला की त्याच्याजवळ यायचीच."  किती जीव लावते अबोली माझ्यावर.... आणि मी काहीच केले नाही तिच्यासाठी...... तिला इथे आल्यावर काही सुख तर मिळाले नाहीच, त्रास मात्र किती झाला... पण कधीही चेहर्‍यावर काही दाखवत नाही.... मला आनंदी ठेवायला स्वतः आनंदी असल्याचे कायम भासवते ..... तिची सारी स्वप्नं माझ्याशी जुळलेली आहेत....आणि मी कधी तिच्या स्वप्नांचा विचारही केला नाही.... स्वतःचंच दुःख मला मोठं वाटत होतं...स्वतःभोवती मी कोष बनवून घेतला..... मला हेही दिसलं नाही की, ती माझ्यावर जीव ओवाळून टाकते..... मी हसलो की ती हसते, मी काळजीत असलो की ती चिंता करत बसते. माझ्या या अवस्थेमुळे नव्या ठिकाणी काम करायलाही तयार झाली... संसाराला हातभार लावते आहे."    त्याच्या मानत अबोली विषयी एकदम प्रेम दाटून आले, " तिच्यासाठी काही तरी केले पाहिजे. "
            अबोलीची यायची वेळ झाली.... अवि रूममध्ये झोपला होता. अबोली तिच्या चावीने दार उघडून आत आली.... घरात अंधार बघून एकदम काळजीत पडली.... अवि अजून झोपलेला कसा काय? घाईघाईत तिने लाईट लावले...... समोरचं दृश्य बघून तिचा डोळ्यांवर विश्वासच बसेना....... जिकडे तिकडे रंगीत फुगे लावले होते..... रंगीबेरंगी झिरमाळ्यांनी घर सजवले होते.....मंद सुगंध घरात दरवळत होता.... जेवणाच्या टेबलवर गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये  छोटासा केक ठेवलेला होता..... जवळच एका फ्लॉवरपॉटमध्ये तिच्या आवडीची चाफ्याची रंगीत फुले सजवली होती.....           
        "अविच्या लक्षात होतं? मला वाटलं तो नक्कीच विसरला.... सकाळपासुन काहीच बोलला नाही! "
         तेव्हड्यात अवि आतून बाहेर आला.... " हॅप्पी बर्थडे अबोली!" असं म्हणुन गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तिच्या हातात दिला. " मी आज तुला भेट म्हणुन इतकेच देऊ शकतो, अबोली! "
   भारावून गेलेली अबोली म्हणाली," अवि, ही फुले माझ्यासाठी आजवरची सर्वात मोठी भेट आहे.... सर्वात मौल्यवान! कारण ती मला माझ्या अविने प्रेमाने दिली आहेत.
आणि केक तू बनवलास? कधी शिकलास तू ?"
     " स्वयंपाक शिकलो इथे आल्यापासून.... केकही शिकलो तेव्हाच..... आता केक काप बरं..."
     अविने  मेणबत्त्या पेटवल्या ... घरातील सर्व लाईट बंद केले..... त्या मंद प्रकाशात अबोलीचा चेहरा पाहिला. तो चेहरा एकदम उजळून निघाला होता..... समाधानाचं आणि तृप्तीचं तेज तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वहात होतं...
अबोलीने केक कापला.... पहिला घास अविला भरवला.... अविनेही तिला केक भरवला..... दोघे गप्पा मारत आनंदाने जेवले. खरं तर अबोलीला भूकच नव्हती....  अनपेक्षित मिळलेल्या या गोड भेटीने तीचं पोट भरून गेलं होतं... मन तृप्त झालं होतं....... अविच्या त्या एका गोष्टीने तिला आज भरून पावलं होतं.
क्रमशः

वाचकहो कशी वाटते आहे कथा? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. 

©अर्चना बोरावके"मनस्वी "
#टीप :या कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. पूर्वपरवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
       माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी माझ्या #मनस्वी या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.
       

🎭 Series Post

View all