Jan 26, 2022
नारीवादी

स्वयंपाक

Read Later
स्वयंपाक

*स्वयंपाक*

"आई.. किमयाने आज खास माझ्यासाठी मदर्स डे म्हणून मस्तपैकी पुरणपोळी केली आहे." जागृती तिच्या आईला म्हणजे मालतीबाईंना कौतुकाने सांगत होती. तिची मुलगी नुकतीच बारावीची परीक्षा देऊन घरीच थांबली होती. फोन स्पिकरवर असल्याने त्या दोघींचे बोलणे सगळ्यांना ऐकू आले होते. "वाह गं माझी किमया आहेच हुशार... नाही तर आमच्याकडे कसलाच दिवा नाही. सारखं आपलं करिअरच्या नावाने अंग चोरून घ्यायचं."   मालतीबाई सुनेकडे राधाकडे कटाक्ष टाकून बोलल्या. त्यांचा टोमणा खरं तर राधाच्या लेकीला साराला दिला होता. तिची लेक सारा अभ्यासात जास्तच हुशार होती. तिचा अभ्यासाकडे झुकता कल दिसता तिचे आई बाबा शुभम आणि राधा यांनी तिला फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला सांगितले. त्या गोष्टीचा तिच्या सासूबाईंना खूप राग येत असे. त्या वरवर दोघी मायलेकींना न चुकता टोमणा मारत असत. तशी सारा तसा बेसिक स्वयंपाक करत होती. वरण, भात आणि भाजी पोळी बनवायला जमलं आणि तिने आणखी स्वयंपाक करण्याचा नादच सोडला. राधेला सासूबाईंची वागणूक अजिबात पटत नसे. त्या नेहमी किमया आणि सारा दोघींमध्ये तुलना करत. आणि किमयाचे स्थान त्यांच्या आयुष्यात उजवेच होते. राधा नेहमी म्हणत असे की मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. ती प्रसंगी माझीही आई होऊन मला जपते. हे तिच्या सासूबाईंना काही रूचत नव्हतं. असाच एक दिवस  मालतीबाईंची अचानक तब्येत बिघडली होती. घरी फक्त किमया होती. तिला काय करावं हे सुचत नव्हतं. तिने लगबगीनं साराला फोन केला. साराने एकीकडे रूग्णवाहीका बोलवली आणि स्वतः आधी घरी पोचली. इकडे आजीला तग धरवत नव्हता. साराने कसंबसं एकटीने दवाखान्यात नेलं. इकडे किमया कावरीबावरी होऊन घरातच थांबली होती. सारा स्वतः नुकतीच एक डाॅक्टर झाली होती. तिने जोपर्यंत आजी बरी होत नाही तोपर्यंत तीची सेवा केली. एक दिवस किमया तिच्या आईसोबत आजीला बघायला म्हणून दवाखान्यात आली. आजीला फक्त कशी आहेस इतकंच बोलून बाहेर निघून आली. आजीची लाडकी नातच तिच्यापाशी थांबली नाही म्हणून ती सारखी बाहेर वाकून बघत होती. हे बघताच जागृती तिच्यापाशी जाते,"किमया आजीजवळ जाऊन बस ना जरा. तिला बरं वाटेल." हे ऐकून किमया अक्षरशः किंचाळून बोलली, " शी आई..! एक तर तू जबरदस्तीने मला दवाखान्यात आणले. आता आजीजवळ पण बसू. सारा दीदी बोलत होती ते ऐकलं मी. आजीच्या सगळ्या विधी बेडवर होतात. तिचा एक हातही काम करत नाहीये. मी चालले घरी..." जागृतीने तिला थांबवत आईजवळ येऊन बोलली,"आई..! किमूचं एक्स्ट्रा लेक्चर आहे..मी येते.. सारा आली की सांग तिला आत्तू विचारत होती म्हणून.." सारा निस्वार्थपणे आजीची सेवा करत होती. काही दिवसांनी मालतीबाईंना दवाखान्यातून डिस्चार्जड मिळाला. किमया जाऊन आजीच्या गळ्यातच पडली, "आजी तू आता आलीस ना घरी.. बघ मी तुझी कशी काळजी घेते. ताईला तर नीट स्वयंपाक येत नाही. तुला नुसता वरण भात खावा लागेल. " आणि खदाखदा हसू लागली. तोच मालतीबाई चिडलेल्या स्वरात बोलल्या , "किमया नीट बोलायला शिक् आधी. मामे असली तरी मोठी बहीण आहे ती तुझी. तिने स्वतः मला इतके दिवस जपलं आहे. जेव्हा सगळे मला बघून नाक मुरडत होते तेव्हा ती रात्रभर जागून माझी काळजी घेत होती. ती खूप चांगली आहे. नसेल येत तिला स्वयंपाक तरी काही बिघडत नाही. सारा आज तू माझ्यासाठी वरण पोळी बनव." आणि त्यांच्या खोलीत निघून गेल्या.
~ऋचा निलिमा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now