अनैतिक भाग तीन
मधुलीला भेटण्याच्या निमित्ताने अमित तिच्या ऑफिसमध्ये जायचा. तिला डॉक्टर कडे नेताना तिच्याच ऑफिसमधली तिची मैत्रिणीही त्यांच्या सोबत असायची. मैत्रिणीचं कुटुंब आणि नवरा परगावी असल्यानं, मधुली तिला खूप मदत करायची, तिच्यासाठी भाड्याची रूम शोधणं, तिच्या अडीनडीला मदत करणं, अशा अनेक गोष्टी दोघी मैत्रिणींमध्ये सुरू होत्या. पण जसजसे मधुलीचे दिवस भरत आले, तसतशी तिची मैत्रीण मधुलीच्या संसारात हळूहळू घुसू लागली. मधुलीला वाटायचं की अमित केवळ मदत म्हणून मैत्रिणीला काय हवं नको ते बघतो आहे. पण त्या दोघांचं नातं त्या पुढे गेलं होतं. मधुली प्रसव वेदनेने तडफडत होती आणि अमित मुधुलीच्या मैत्रिणी सोबत रात्रीचा आस्वाद घेत होता.
हळूहळू या गोष्टी मधुलीच्या लक्षात आल्या आणि तिने मैत्रिणीला खडसावून जाब विचारला,” अगं एक वैरी सुद्धा आपल्या वैऱ्याशी जितकं वाईट वागणार नाही, इतकं तू माझ्याशी खराब वागली आहेस! या शहरात तुझं कोणीच नाही म्हणून मी तुझी मदत केली आणि तू माझ्याच संसारात विष कालवलास? वैरीण सुद्धा चार घर सोडून वैर साधते, तू तर मैत्रिणीचाच विश्वास घात केलास? लाज नाही वाटत मैत्रिणीचा संसार उध्वस्त करताना? काय मिळालं तुला असं वागून? माझ्या आयुष्यातून निघून जा!” मधुली चिडून मैत्रिणीशी भांडत होती.
“हे बघ मधुली जे झालं त्याला तूच जबाबदार आहेस! आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या नवऱ्याला मी चाळवलं नाही, तोच माझ्याकडे स्वतःहून आला. अगं आपल्या नवऱ्याला काय पाहिजे हे ज्या बाईला कळत नाही, त्या बाईच्या संसाराची अशीच गत होते. तू तुझ्या नवऱ्याच्या घरात केवळ एक कामवाली बनून राहिलीस आणि मी तुझ्या नवऱ्याची अभिसारिका झाले. मी तर तुझ्या संसारातून निघून जाईल पण म्हणून तुला तुझा नवरा मिळेल?” मैत्रिणीचा शेवटचा वाक्य मधुलीच्या काळजावर घाव करून गेलं. मधुलीच्या मैत्रिणीचे शब्द मधुलीच्या कानात तप्त शिश्याच्या रसाप्रमाणे घुमत होते, जणू घडल्या प्रकाराला केवळ मधुलीच जबाबदार आहे असं तिच्या मैत्रिणीचं म्हणणं होतं.
मधुलीने तिच्या नवऱ्याला चांगलाच जाब विचारला पण त्यानं पूर्वीसारखंच सगळं तिच्यावरच उलटवलं.
“मी पुरुष आहे आणि मला माझ्या गरजा पूर्ण करण्याचा अधिकार आहे. मग त्या बायकोकडून असो किंवा इतर कोणाकडून!” मधुलीचा नवरा स्वतःच्याच धुंदीत मधुलीचा आणि स्वतःच्या नात्याचा अपमान करत होता. अमितच्या या उत्तराने त्याचे आई-वडीलही हादरून गेले होते. त्यांनी अमितला घराबाहेर काढले. आणि मधुली काही दिवसांसाठी त्याच शहरातल्या आपल्या माहेरी गेली.
पुढच्या भागात बघूया मधुली आणि अमितच्या नात्यात कुठलं नवं वळण घेतं?
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा