Login

संकेत भाग एकोणीस.

कथा मालिका .

संकेत भाग एकोणीस : 


दोघेही सदनंदच्या खोलीत आले जिथे त्याने शेवटचा श्वास घेतला होता..त्या खोलीत खूप वास येत होता सदानंद तिथे वर्षानुवर्षे पडला होता. एक छोटीशी खोली होती ती त्यात एक बेड आणि एका बाजूला काही भांडी पडली होती. बेडच्या एका कोपऱ्यात एक डायरी होती. आदित्यने ती डायरी उघडली तर त्यावर शाल्मली माफ कर असे लिहले होते. आदित्यने पुढचे पान उलटले त्यावर तेच होते अशी सगळी डायरी त्याने पहिली तर प्रत्येक पानावर पूर्ण पान भरून त्याने हेच तीन शब्द लिहले होते शाल्मली माफ कर. शिवाय प्रत्येक पान ओले झाले होते ते सदानंदच्या अश्रूने. आदित्यने ती डायरी पहिली आणि त्यालाही कसेतरी झाले. काय बोलावे ते समजेना. त्याने ती डायरी निशाच्या हातात दिली, तिने पाहिले पण निशा खूप चिडली. 


निशा : जीवंतपणी शाल्मलीला नरक यातना भोगायला लावल्या या माणसाने आणि आता अशी डायरी लीहण्यात काय अर्थ ?? 


आदित्य : माणसाच्या हातून अशा चुका होतात निशा. पण पश्चात्ताप हीच खरी शिक्षा असते आणि मला वाटत इतकी वर्षे खितपत पडून सदानंदने ती भोगली आहे. त्याच्या डोळ्यातील अश्रू हेच सांगत आहेत. 


निशा : मला आश्चर्य वाटत आहे आदित्य, तू या नालायक माणसाची बाजू घेत आहेस. उलट याला तर भर चौकात उघडा करून फोडून काढायला हवे होते. तो जर जीवंत असता ना तर शाल्मली आधी मीच त्याच्या नरडीचा घोट घेतला असता माहिती तुला ?? निशा दात ओठ खात बोलत होती, तिच्या हाताच्या मुठी आवळल्या होत्या. 


आदित्य : हो निशा, चूक नाही गुन्हा केला आहे त्याने मान्यच आहे मला पण सगळ्या परिस्थितीचा विचार करता एक गोष्ट नक्कीच म्हणेन सदानंद काय किंवा शाल्मली काय दोघेही प्यादे ठरले सदानंदच्या आईच्या खेळाचा.


त्या बाईला सगळी खरी परिस्थिती माहीत असूनही तिने स्वतःच्या मुलाला तर सुडात ढकलले शिवाय शाल्मलीचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. पण त्या बाईचे पुढे काय झाले ते समजले नाही. चल आपण त्याच्या पहिल्या घरी जाऊया. 


निशा : काय झालं असणारे त्या म्हातारीच ती ही अशीच तरफडून मेली असणारे, निशा खोलीच्या बाहेर पडत म्हणाली. 


दोघेही त्याच्या पहिल्या घरात आले, तर समोरच एक हार घातलेला फोटो होता पण तो सदानंदचा होता. त्याच्या आईचा फोटो कुठेही नव्हता. आदित्यला प्रश्न पडला होता हा फोटो इथे लावला कोणी आणि इथे एकट्या सदानंदचा फोटो का आहे ?? त्याची आई जर मेली असेल तर तिचा फोटो का नाही ?? अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदानंदचे घर स्वच्छ आणि नीटनेटके होते ते कसे ?? मग इथे दुसरे कोणी रहात आहे का ?? आणि असेल तर मग गेले कोठे ?? आणि गावातील लोकं याबद्दल काहीच कसे बोलले नाहीत ?? 


सदानंदने ते घर शोधून काढले. त्यात त्याला कुठे काही पुरावा मिळतो का हे बघायचे होते. तो शोधत शोधत सदानंदच्या खोलीत आला होता तेंव्हा त्याचे लक्ष कपाटावर ठेवलेल्या पेटिकडे गेले. त्याला आठवले डायरीत सदानंदने याच पेटीतील पुरावे काढून शाल्मलीला दाखवल्याचा उल्लेख होता. तो पटकन कपाटाकडे गेला आणि त्यावरील पेटी काढली. निशा ही त्याच्या मागे मागे फिरतच होती. त्या पेटीत सदानंदने शाल्मलीला दाखवले ले पुरावे होते जे खोटे होते. त्याच्याच खाली अजून एक पिशवी होती त्यात काही पुरावे होते जे शाल्मलीच्या बाबांना आणि पर्यायाने शाल्मलीला निर्दोष सिद्ध करत होते आणि खरे होते. त्याच्या खाली अजून एक पिशवी होती ज्यात दोन फोटो होते. ते दोन फोटो सदानंदच्या आई वडिलांचे असावेत असा निशा आणि आदित्यचा अंदाज होता. पण तरीही खूप प्रश्न अनुत्तरित होते. आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे दोघेही तिथून बाहेर पडले. 


बाहेर आल्यावर आदित्य पुन्हा चौकशीसाठी गावातील लोकांना विचारू लागला पण कोणी नीट उत्तर देईना. खूप चौकशी केल्यावर असे समजले की सदानंदच्या घराची देखभाल करण्यासाठी एक माणूस होता जो गावाच्या बाहेर एका टोकाला रहातो. आदित्य आणि निशा लगेच त्या व्यक्तीकडे निघाले. गाव तसे छोटे असल्यामुळे एका टोकाला पोहचायला त्यांना तसा वेळ लागला नाही. तिथे गेल्यावर एक पन्नास साठ वर्षांचा माणूस त्यांना भेटला. त्याचे नाव होते भिकाजी. 


आदित्य : तुम्ही कधी पासून सदानंदच्या घराची देखभाल करत आहात ?? 


भिकाजी : चार पाच महिन्यापासून. म्हणजे सदानंद गेल्या पासून. 


आदित्य : त्या घरात कोण रहात होते. 


भिकाजी : त्याची आई रखमाबाई. 


आदित्य : हे नाव सदानंदच्या आईचे होते. म्हणजेच त्या अजूनही जीवंत होत्या. आता त्या कुठे आहेत ?? सदानंदने उतावीळ पणे विचारले. 


भिकाजी : माहीत नाही. 


आदित्य : त्यांच्या अंगावर ओरडत, माहीत नाही म्हणजे ?? त्यांनी जाण्याआधी काहीतरी सांगितले असेलना आणि साफ सफाई करता त्याचे काहीतरी पैसे त्या देत असतील ते कुठून मिळतात तुम्हाला ?? 


निशा : आदित्य, जरा शांत हो प्लीज. 


भिकाजी : हे बघा साहेब, त्यांनी मला देखभाल करायला सांगितली आणि त्या बदल्यात सगळ्या शेताचा डोलारा माझ्यावर टाकून गेल्या त्या. जाताना माझ्याजवळ एक पिशवी ठेवून गेल्यात. अन् थोडे पैसे पण देऊन गेल्यात. आताच थोड्या दिवसापूर्वी त्यांनी फोन करून मला त्यांचं सगळ घर पण सोपवल आहे..तुला त्याच काय करायचं ते तूच ठरव असे त्या म्हणाल्या. 


आदित्य : त्यांनी दिलेली पिशवी कुठे आहे ? 


भिकाजी : घरात जाऊन एक पिशवी घेऊन आला आणि आदित्यला दिली. त्याने ती उघडली तर त्यात शाल्मली आणि त्यांचा म्हणजे रखमा बाईचा एक फोटो होता आणि एक चिठी होती. त्यात लिहला होते, 


शाल्मली, 


तू सदानंदला मारण्याच्या प्रयत्नात स्वतःच मरण पावली. घरी आल्यावर सद्याने सगळं काही मला सांगितल. पण ही घटना घडल्यामुळे सद्या फक्त शरीराने जीवंत होता मनाने तो तिथेच मेला जेंव्हा त्याने तुझ्या पोटात सुरा खुपसला. नंतर तो अंथरुणाला खिळून राहिला. खाणे पिणे बंद करून फक्त अंदाधुंदी बडबडत होता. खूप उपचार केले पण सगळे व्यर्थ होते. माझ्याशी असलेले सगळे संबंध त्याने तोडले होते. माझ्याच सुडाच्या आगीत तो जळत राहिला. म्हणून माझ्या चुकीची शिक्षा त्याने स्वतःला दिली. मरेपर्यंत त्याने माझ्याकडे पाहिले पण नाही. त्याचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मला दिली नव्हती हीच त्याची शेवटची इच्छा होती. सतत फक्त शल्मली, शाल्मली इतकेच बोलत राहिला. त्याची अशी अवस्था पाहून मी रोज मरत होते शाल्मली. आताही रोज मरणाची वाट बघत आहे. सद्या होता तोपर्यंत तिथे राहिले आता पुढे काय करेन माहीत नाही. ही चिठ्ठी लीहण्यामागे एकच कारण म्हणजे, सद्याला झालेल्या त्रासावरून एक गोष्ट नक्की की शाल्मलीचा आत्मा शांत झाला नसेल अजूनही अतृप्त फिरत असणार याची खात्री आहे. तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी कोणीतरी नक्कीच त्याला शोधत येईल म्हणून हा अट्टाहास. खरतर मला लिहता वाचता येत नाही म्हणून गावातल्या एका शिकलेल्या पोराकडून हे पत्र लिहून घेतले. आता इथून पुढे एखाद्या आश्रमात राहून मरणाची वाट पहात बसणार आहे पण नक्की कुठे माहित नाही कारण अजून काही ठरले नाही. पण आश्रमात राहीन हे नक्की. 


रखमाबाई.


आदित्यने ती चिठ्ठी वाचली आणि भिकाजीचा निरोप घेऊन तो आणि निशा तिथून निघाले. गाडीत बसल्यावर आदित्यने सखा तुकाल पटकन फोन करून रखमा बाईचा फोटो पाठवून तपास करायला सांगितले. आदित्य आणि निशा दोघेही दिवसभराच्या प्रवासाने दमून गेले होते. आदित्य प्रवास सुरू झाल्यापासून एकही शब्द बोलला नव्हता निशा सोबत. त्याच्या डोक्यात रखमा बाई कुठे असेल याचाच विचार होता. निशाला दिवसभर प्रवास करून खूपच भूक लागली होती. तिने आदित्यकडे पाहिले तर अजूनही तो त्याच्याच तंद्रीत होता. 


निशा : आदित्य आज दिवसभर आपण ज्याच्यासाठी फिरलो तो सदानंद मात्र मरून गेला आहे आणि ती म्हातारी मेली असे वाटले तर ती जीवंत आहे. विचित्र आहे ना हे सगळं. निशा बडबडत होती पण आदित्यचे मात्र अजूनही लक्ष नव्हतेच. आता मात्र निशा वैतागली आणि म्हणाली, आदित्य मी मगाच पासून तुझ्याशी बोलत आहे पण तुझे लक्षच नाही माझ्याकडे. तू ऐकतोस का ?? 


आदित्य : हा काय निशा किती बडबड करत आहेस मगापासून.मी बोलत नाही म्हणजेच मी कसल्या तरी विचारात आहे हे समजून घे ना. काय सारख आदित्य आदित्य. आदित्य तिच्या अंगावर खूप ओरडला. खरतर अपेक्षित काम झाले नव्हते आणि त्यात रखमाबाईचा शोध शिवाय दिवसभर उपाशीपोटी वणवण या सगळ्याचा राग त्याने निशावर काढला होता. निशा त्याच्या अशा ओरडण्याने वैतागली आणि रागाने नाक लाल करून खिडकी बाहेर बघत राहिली.


आदित्य : थोड्याच वेळात आदित्यला जाणवले की आपण कामाचा ताण विनाकारण निशावर काढला आहे. तो निशाला सॉरी म्हणाला पण लवकर माफ करेल ती निशा कसली ?? निशा तर त्याच्याकडे वळून बघयला पण तयार नव्हती.


तेवढ्यात बाहेर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात निम्म्या रस्त्यात आदित्यची गाडी बंद पडली.


निशा : काय झालं आदित्य आता तुझ्या गाडीला ?? एकतर इतका पाऊस येतोय त्यात तुझी गाडी बंद पडली आता काय करणार आहोत आपण ?? एकतर मला खूप भूक लागली आहे आणि तुझे बोलणे ऐकून त्यात भरच पडली आहे. त्यात तुझी ही गाडी ??? आता मला पटकन खायला मिळाले नाही तर मी तुलाच खाऊन टाकेन कळतंय तुला ???


आदित्य : अग माझ्यावर काय चिडतेस ?? मी मुद्दाम बंद नाही पाडली गाडी ती बंद पडली आहे. काय झालं ते तर बघू दे ना. गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत आदित्य म्हणतो. पण गाडी काही सुरू होत नाही. त्यात आदित्यचे लक्ष पेट्रोल इंजिन कडे जाते आणि त्याच्या लक्षात येते की गाडीत पेट्रोलच नाही. सकाळी घाईत निघाल्यामुळे पेट्रोल भरायला तो पूर्ण पण विसरून गेलेला असतो. तो निषाकडे बघतो तर ती गाडीबाहेर बघत असते. मनातल्या मनात देवाचे आभार मानतो बाप्पा बरं झालं हिने अजून पाहिले नाही पेट्रोल इंजिन नाहीतर अजून चिडली असती माझ्यावर. वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणतो, निशा मला खूप भूक लागली आहे. समोर लकीली हॉटेल आहे तर आपण काहीतरी खाऊन घेऊया का प्लीज ?? 


निशा : बाहेर बघते तर समोर दोन खोल्या टाईप काहीतरी असते पण त्यावर हॉटेलचा बोर्ड असतो. ती मानेनेच त्याला होकार देते आणि धावत जाऊन हॉटेलमध्ये शिरते मागोमाग आदित्य ही येतो. 


तर तिथे एक घरगुती हॉटेल असते. त्या मावशी निशाला आणि आदित्यला पाहून काय हवं ते विचारतात दोघेही ऑर्डर देतात आणि निशा आपले ओले केस नीट करत असते. हॉटेलमध्ये गाणे सुरू असते त्यामुळे पावसाच्या रोमँटिक वातावरणात छान भर पडलेली असते, 


रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना

बनात ये ना जवळ घे ना......


अशा गाण्याच्या ओळी असतात. दुसरी लाईन सुरू झाल्या बरोबर आदित्य निशाकडे बघतो आणि नेमकी त्याच वेळी ती पण आदित्यकडे बघते. दोघांची नजरानजर होते, आदित्य तिच्याकडे बघुन हसत असतो, तर ती नजर चुकवत असते. पावसामुळे हॉटेलमध्ये कोणीच नसते. आदित्यची नजर तिच्यावरून हटत नसते. तेवढ्यात मावशी त्यांची ऑर्डर घेऊन येतात आणि त्यांच्या हातातून भाजीची वाटी नीशाच्या हातावर पडते. भाजी गरम असल्यामुळे तिचा हात भाजतो. आदित्य पटकन तिचा हात हातात घेतो आणि गार पाण्यात बुडवून तिला विचारतो खूप त्रास होतोय का निशा ?? हळूच तिच्या हातावर फुंकर घालत असतो तसे निषाच्या अंगावर काटे उभे राहतात. मावशी हे सगळं बघतात आणि निषाची माफी मागून निघून जातात. निशा हात सोडवून घेते तसा आदित्य तिच्याकडे रागाने बघतो. 


आदित्य : काय झालं निशा ?? असं का वागतेस ?? आता तुझी काळजी करतोय तर तेही आवडत नाही का तुला ?? 


निशा : नाही आवडत. त्या मावशी पण हसत होत्या आपल्याकडे पाहून, काय वाटलं असेल त्यांना. तू कुठेही काय सुरू होतोस ?? 


आदित्य : एकतर त्या मावशीमुळेच तुला भाजल आहे त्यात तूच मला सांगतेस त्या हसत होत्या. आणि कुठेही सुरू होतोस म्हणजे काय ?? काय म्हणायचं आहे तुला ?? मी मुद्दाम करतो का हे सगळं ?? मला तुझी काळजी..... असुदे खाऊन घे आपण निघुया. 


निशा : खायला जाते पण उजव्याच हातावर भाजल्याने तिला खाता येत नाही ती वैतागून तशीच बसून रहाते. 


आदित्य : रागवल्यावर लाल होणाऱ्या नाकाकडे बघतो आणि गालातल्या गालात हसतो. तो एक घास खातो आणि म्हणतो, वा निशा, खरतर हे हॉटेल बघून वाटलं होत की इथे जेवणाला टेस्ट नसेल पण मावशीच्या हाताला खूप झकास चव आहे. खूपच मस्त बनवलाय जेवण त्यांनी हा हा... छान बोटं चाटत. 


निशा : इथे भूक लागली आहे मला त्यात हात भाजला आहे आणि हा स्वतःच अधाशासारखा खातोय आणि वर कौतुक पण करतोय माझ्यासमोर हे मनातल्या मनात बोलत असते. काहीच कसं वाटत नाही याला ?? तेवढ्यात तिच्या तोंड समोर हात येतो ती बघते तर आदित्यने तिला भरविण्यासाठी हात पुढे केलेला असतो. ती पुन्हा मनात म्हणते, मी बोले ते याला ऐकू गेले असेल का ?? 


आदित्य : खानारेस का आता अशीच बघत राहणार आहेस ?? खा पटकन. 


निशा : त्याचा हात पकडून ती खाते. खास खाताना तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या बोटाला होतो. 


आदित्य : आदित्य निषाकडे बघत तेच बोट पुन्हा स्वतःच्या तोंडात घालून चाखतो आणि निशाला बघून किलिंग स्मायल देतो तशी निशा पुन्हा तोंड फिरवते. बनात ये ना जवळ घे ना .... गाण्याच्या त्याच लाईन म्हणत पुन्हा तिला खास भरवतो या वेळी मात्र निशा त्याची बोटे दातात पकडते आणि जोरात चावते. तसा आदित्य ओरडतो ये हळू खा ना आई ग किती जोरात चावलीस. 


निशा : गालातल्या गालात हसते आणि खोटं खोटं हसते. 


दोघांचीही जेवणे आटपतात. आदित्य बील पे करुन बाहेर येतो, पाऊस अजूनही तेवढ्याच जोरात कोसळत असतो आणि निशा एका कोपऱ्यात हातांची घडी घालून पावसाकडे बघत गाणं गुणगुणत असते


रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना....

बनात ये ना जवळ घे ना.... 


आदित्य : तिला मागून मिठीत घेत म्हणतो

चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत ये ना

प्रीतीत ये ना जवळ घे ना..... 

हम हम हम हम......


निशा : त्याच्या मिठीतुन बाजूला होण्याचा प्रयत्न करते तशी आदित्यची पकड घट्ट होते. सोड ना. मला तुझ्याशी अजिबात बोलायचे नाही. कारण नसताना उगाच माझ्यावर राग काढलास मगाशी. मला सोड ना काय करतोस ??


आदित्य : काय करतो हे सांगण्याची गरज आहे का निशा ?? प्रेम करतोय अजून काय ?? आणि हो मगाशी साठी खरंच सॉरी. मी माझ्याच विचारात होतो त्यामुळे कामाचा ताण तुझ्यावर निघाला सॉरी निशाला घट्ट पकडत म्हणतो.


निशा : आपण हॉटेलमध्ये आहोत भान ठेव आणि सोड लवकर हातांची चुळबुळ करत. 


आदित्य : अजिबात नाही सोडणार. मला सांग तू मला माफ केलेस का ?? आणि खरं सांग तरच सोडेन. तिच्या मानेवर स्वतःचे ओठ टेकत म्हणतो. 


निशा : त्याच्या हातात हात गुंफत हो केलंय मी तुला माफ प्लीज सोड प्लीज. 


आदित्य : तिचा केविलवाणा चेहरा बघून हसतो आणि बाजूला होत म्हणतो निशा, मगाशी जरा जास्तच अपसेट झालो होतो. कामाचा ताण आला होता मनावर आणि तो राग तुझ्यावर निघाला. खरंच सॉरी इथून पुढे अस होणार नाही. 


तेवढ्यात एक मुलगा बाटली भरून पेट्रोल घेऊन येतो आणि आदित्य च्या हातात देत म्हणतो, गाडीत पेट्रोल भरलं आहे आणि हे उरलेले तुम्हाला दिलं आहे आता दोन दिवस गाडीत पेट्रोल भरायची गरज पडणार नाही. आदित्य निशा कडे बघतो तर ती हातची घडी घालून डोळे मोठे करून नाक पुन्हा लाल करून त्याच्याकडे बघत असते. चल चल निशा, घरी आई वाट बघत असेल म्हणत पळतो आणि हिच्या समोर बोलायची गरज होती का ?? जाताना त्या मुलाच्या कानात पुटपुटतो.


क्रमशः

🎭 Series Post

View all