Jan 17, 2021
नारीवादी

सोडचिट्ठी

Read Later
सोडचिट्ठी

 

खूप दिवसांपूर्वी बागेत ती दिसली होती 

जगावं कि मरावं या विचारात गढलेली 

 

चेहऱ्यावरचे माराचे डाग खूप काही सांगून गेले 

आयुष्याच्या तिच्या धागेदोरे उलगडत गेले 

 

ती होती पिचलेली.... स्वतःवरच चिडलेली 

रोजच्या त्याच्या काटकटीला वैतागलेली 

 

रोजचा ताण..... रोजचाच त्रास 

हुंदक्यांनी घशात अडकणारा घास 

 

सवयीचं झाले होतं सगळंच तिला 

पण चिमुकल्यासाठी आपल्या जगायचं होतं तिला 

 

नेहमीचा मार नेहमीचा अपमान 

रोजच्याच त्याच्या शिव्या घाण 

 

मरत मरत जगत होती कि जगण्यात मरण शोधत होती 

येणारा प्रत्येक दिवस कसाबसा ढकलत होती 

 

एक दिवस तुटला बांध सहनशीलतेचा 

ठरवलं करायचा आता अंत जीवनाचा 

 

पंख्याला बांधली गाठ ठेवणीतल्या साडीची 

साद ऐकू आली तेवढ्यात चिमुकल्याची 

 

गडबडली गोंधळली, खुर्चीवरून खाली उतरली 

चिमुकल्याने जवळ येऊन इवलीशी ओंजळ उघडली 

 

ओंजळीत होतं एक चिमणीचं पिल्लू.... घायाळ.... तनानं...  आणि मनानं... 

स्वकीयांनी केलेल्या अनपेक्षित माऱ्यानं.... 

 

आई, बघ ना याला त्या सगळ्यांनी चोचीनं खूप मारलं 

त्याची आई त्याला सोडून गेली म्हणून का ग 

आसवं भरल्या डोळ्यांनी हुंदके देत त्यानं विचारलं 

 

त्याच क्षणी सावरली..... स्वतःशीच म्हणाली 

माझ्या पिलासाठी जगत होते त्याच्यासाठीच जगणार 

या राक्षसाला आता अजिबात नाही जुमानणार 

 

वैतागलेली पिचलेली बायकोला त्याच क्षणी संपली

डोळ्यातली आसवं कायमची पुसून टाकली 

 

आणि... आज पुन्हा ती दिसली 

बागेत चिमुकल्याशी खेळताना 

हसत होती, खेळत होती, त्याच्यासोबत बागडत होती 

 

चौकशी केल्यावर कळालं 

तिने 'सोडचिट्ठी' घेतली होती.... 

त्या 'नवरा ' नावाच्या राक्षसापासून ... 

आणि रोजच्या मरणापासून ..... 

कायमची.............