Jan 19, 2022
नारीवादी

शोषण सहन करणार नाही

Read Later
शोषण सहन करणार नाही

इंटरकॉमवर चिऊसाठी फोन वाजला.. मिस चिऊ फाईल घेऊन जरा केबिनमध्ये या 
बॉस कावळ्याने फर्मावले. हो सर पाच मिनिटात आले.
चिऊ दचकून म्हणाली. 
चिऊ दोन महिन्यापूर्वीच ऑफिसमध्ये जॉईन झाली होती. 
तरुण, सुंदर आणि घटस्फोटित आणि मुख्य म्हणजे गरजू चिऊवर बॉसची काकनजर होतीच. 
चिऊ घाबरतच केबिनमध्ये शिरली... काऊ तिच्या येण्याची वाटच पाहत होता.पायापासून डोक्यापर्यंत  अश्लीलपणे न्याहाळत होता तिला. 

 फाईलच्या निमित्ताने सहेतुक स्पर्श, घाणेरडी नजर, डेस्कटॉपवर मुद्दाम काहीतरी अश्लील साईट्स उघडून  तिला पाहायला बोलावणे अशा गोष्टी  तिच्यासाठी  हे रोजचंच झालं होतं.. चिऊचा आज मात्र धीर सुटला होता. 

आजही काऊ नेहमीप्रमाणे उठून तिला खेटायला आल्याबरोबर तिने काडकन त्याच्या मुस्काटात लगावली.. काऊ भयचकित नजरेने तिच्याकडे पाहत गाल चोळत उभा होता.. 
थपडेच्या आवाजाने सगळा स्टाफ गोळा झाला आणि क्षणात सगळ्यांना झालेला प्रकार कळला. 

चिऊ कडाडून बोलली... गरज आहेच मला नोकरीची पण म्हणून हा अन्याय आणि शोषण मी कदापि सहन करणार नाही. 
आणि मी घटस्फोट घेतला आहे म्हणजे मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे असा गैरसमज करून घेतला तर खबरदार !!!

स्त्री जेवढी कोमल दिसते तेवढीच कठोर होऊ शकते आणि प्रसंगी कालीचा अवतार धारण करू शकते हे  कायम लक्षात ठेवा. 

तिचे बोलणं ऐकून अनेक चिमण्यांना धीर आला.. आणि त्यांनीही आपबिती सांगितली. 
नोकरी जाण्याच्या भीतीने सगळ्या जणी गप्प होत्या... पण प्रत्येकीला चिऊच्या या कृत्याने आनंद झाला होता. 

कामाच्या ठिकाणी सुरक्षितता असणे हा स्त्रियांचा मूलभूत अधिकार आहे. आणि जर कोणी या हक्काचे उल्लंघन करत असेल तर गप्प न राहता,  या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे हे चिऊने सर्वाना ठणकावून सांगितलं.  

सर्व चिमण्याच्या लेखी निवेदनानंतर  लबाड कावळ्याची ऑफिस मधुन हकालपट्टी झाली हे वेगळं सांगायची गरजच नाही.... 

 

मैत्रिणींनो या गोष्टीमध्ये कावळा आणि चिमणी ही पुरुष आणि स्त्री यांची प्रतिनिधित्व करणारी पात्रे आहेत. 
बऱ्याच महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते.. पण भिडेपोटी आणि गरजेपोटी त्या गप्प राहतात. या गोष्टींची वाच्यता करत नाहीत. परंतु या विरुद्ध वेळीच निषेध नोंदवणे फार आवश्यक असते.
कथा आवडली असेल तर नक्की कळवा.. आपल्या मतांचे स्वागत आहे. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Meetu

Homemaker

I am Homemaker