Jan 27, 2022
प्रेम

शुद्ध शाकाहारी

Read Later
शुद्ध शाकाहारी

शुद्ध  शाकाहारी*   ©विवेक वैद्य .     

                     कोमलचे स्थळ जयंतला सांगुन आले. दोघेही तोलामोलाचे.कोमल व जयंत दोघेही उच्च शिक्षित, नौकरी करणारे, संस्कारी. जयंत देखणा..कोमल सुंदर . दोघांच्याही घरातल्यांना स्थळ पसंत होते. तेव्हा दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि आॕफीशीअली पसंती आली दोघांकडून की लग्नाचा बार उडवून द्यायचा बेत होता मंडळींचा.

       त्याप्रमाणे दाखवण्याचा कार्यक्रम झाला.नंतर कोमलचे वडील तिला म्हणाले "तुम्ही दोघेही गच्चीवर जा.काय बोलायचे असेल विचारायचे असेल तर विचारा एकमेकांना मोकळेपणानं "
       कोमल व जयंत वरच्या टेरेसवर आले.तिथे टाकलेल्या खुर्च्यांवर बसले.जयंतच्या मर्दानी रूपाने आधीच दडपण आलेल्या कोमलला काय बोलावे काही सुचेना.तेव्हा जयंतच म्हणाला.

"काही संकोच करू नका.तुम्हाला काही विचारायचे तर जरूर विचारा."

त्याच्या आश्वासक शब्दांनी धीर आलेल्या कोमलने बोलणे सुरू केले.

"विचारायच जरा वेगळं आहे.बाकी तुमच्या आवडीनिवडी छंद तुमच्या बायोडाटात आहेच. "

"विचारा."

"तुमच्या घरात nonveg बनवतात."

"नाही.माझी आई शुद्ध शाकाहारी आहे.त्यामुळे घरात nonveg  बनवत नाहीत."

" काय आहे...मला nonveg अजिबात आवडत नाही.त्याचा वासही मला सहन होत नाही. म्हणून मी ठरवले आहे की मी त्याच मुलाशी लग्न करेन जो शुद्ध शाकाहारी आहे."

जयंताचा चेहरा गंभीर झाला.
" मी तुम्हाला अंधारात ठेऊ इच्छित नाही.नॉनव्हेज मला आवडतं. मी बाहेर गेलो की खातो.पार्टीत किंवा हाॕटेलला गेलो तर. अर्थात अगदी रोज नाही.पण महिन्यातून दोनदा तरी निश्चित."

दोन मिनीटे शांतता पसरली.कोमलच्या चेह-यावर अपेक्षाभंगाचे दुःख पसरले. तिला काय बोलावे सुचेना.

"तुम्ही मला नकार देऊ शकतात." जयंत म्हणाला.

"ह्या कारणासाठी नकार दिला तर माझ्या घरातले मला वेड्यात काढतील. तुमच्या घरी खात नाही म्हणजे तोही प्रश्न नाही."

" माझाही तोच प्रॉब्लेम आहे.मला मुलगी पसंत नाही असे मी सांगितले तर माझ्या घरचे मला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जातील." जयंत असे बोलल्यावर कोमल मनमोकळी हसली...थोडी सुखावलीही.

"आपण एक करू शकतो " कोमल विचार करत म्हणाली 
"एकमेकांना समजून घेण्यासाठी आपण उद्या परवा कुठेतरी पुन्हा भेटू."

"कुठे भेटायचे?" जयंत घाईघाईने म्हणाला.

"ठरवू नंतर.पण घरच्यांना भेटल्सांयानंतर  सांगू की आमचे विचार जुळत नाहीत म्हणून .चालेला ना?"

"चालेल.तुम्ही सांगाल तसे. माझा मोबाईल नंबर घ्या.म्हणजे भेटायचे कुठे ते ठरवता येईल." जयंत तिच्या सुंदर चेहऱ्यावरची नजर मुश्कीलीने हटवून म्हणाला.

              रात्री कोमलला काही केल्या झोप लागत नव्हती.    जयंतला माझ्याशी सविस्तर बोलायचे आहे त्यानंतर आम्ही ठरवू ही थाप घरी पचली होती.पण  जयंतचा देखणा चेहरा डोळ्यापुढे फिरत होता. त्याचे आश्वासक बोलणे...तिच्या निर्णयाचा आदर.खूप वेळ विचार केल्यानंतर तिने जयंतला कॉल करायचे ठरवले. पण घड्याळ्यात पाहीले तर बारा वाजून गेलेले. तरीही तीने मोबाईल उघडला.मेसेज तर टाकू.

           जयंत आॕनलाईन असल्याचे बघितल्यावर तिची धडधड उगाचच वाढली. तिने मेसेज टाकला.

"हाय..मी कोमल."

"अरे? तुम्ही झोपला नाहीत अजून? बोला काय म्हणतात?"

"काही नाही,एक गोष्ट सांगायची मी विसरले तुम्हाला."

"कोणती?"

"मला प्रामाणिक माणसे फार  आवडतात."

" म्हणजे? मी समजलो नाही."

".तुम्ही मला सांगितले नसते मी बाहेर nonveg खातो तर मला काय समजले असते? पण तुम्ही कोणतीही लपवाछपवी केली नाही."

"अहो.आयुष्यभराचे नाते निर्माण करायचे आहे.त्याचा पाया विश्वासार्ह नको."

" बरोबर. मी उद्या पप्पांना सांगते."

"काय सांगणार. ?"

"किती स्पष्ट बोलायला लावाल? माझ्याकडून होकार आहे."

"कोमल...मीही तुम्हाला फोनच करणारा होतो.पण एवढ्या रात्री बरोबर दिसणार नाही म्हणून सकाळी करणार होतो."

"कशाबद्दल?"

" मी nonveg सोडले तर तुम्ही मला होकार द्याल का म्हणून?"

"मी तर होकार दिलाच आहे.पण धन्यवाद तुमच्या निर्णयाबद्दल."

"मग आता परत केव्हा भेटाल तुम्ही?"

"तुम्ही सांगाल तेव्हा.अणि आता तुम्ही नका म्हणू मला...तू म्हणा....ok?"

" ओके..."

"गुडनाईट"

"इतक्या लवकर ? मला वाटले अजून भरपूर चॕटींग होईल."

" एक ओझ उतरलय डोक्यावरचे.आता शांत झोप काढते.उद्यापासून चॕटींग काय.डायरेक्टच बोलू."

"चालेल.गुडनाईट."

     कोमलने समाधानाने फोन आॕफ केला. तिला अगदी शोभेल असा साथीदार मिळाला होता.

©विवेक चंद्रकांत वैद्य . नंदूरबार

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vivek Vaidya

Blogger

Doctor (general practitioner)