वडिलांची बायको

Vadilanchi bayko

  प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंन्ट येतोच.त्यातीलच हा एक क्षण....आणि ही एक सत्यघटना...

सोनल,मोनल आणि विघ्नेश तीन भावंडे मामाकडेच होती शाळेला.....त्यादिवशी भोगी होती आणि सोनल कॉलेजला जाता जाता दवाखान्यात आईला भेटायला गेली कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की आज डिस्चार्ज मिळेल.म्हणून आनंदातच सोनल दवाखान्याकडे वळली आणि ते दृश्य पाहून हादरलीच......सोनलने पाहिलं सगळ्यांची पळापळी सुरू आहे आणि सगळेच कसल्यातरी घाईत आहेत;तिचे डोळे मात्र आईलाच शोधत होते.११वीत असणारया सोनलच्या मनात नको नको ते प्रश्न येऊन गेले व समोरच्याच आय.सी.यू त अचानक ओळखीचा चेहरा दिसला तो म्हणजे आजीचा...आणि तिथेच बेडवर डॉक्टर आईच्या हातात सुया टोचत टोचत काहीतरी बोलत होते.आईचीसुद्धा नजर सोनलकडे वळली जणू त्या सुयांचा तिच्यावर काहीच फरक नव्हता.आई एकटक सोनलकडेच पाहत दोघींच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते.आई नजरेनेच सोनलला सांगत होती की,आता तूच मोनल व विघ्नेशची आई....दोघी एकमेकींकडे बघत नजरेनेच बोलत होत्या.तेवढ्यात डॉक्टरने सोनलच्या आईला पुण्याला ताबडतोब पळवायला सांगितले.सोनल पार बिथरूनच गेली.आज आईला घरी सोडणार या आनंदात ती होती कारण उद्या संक्रांत मग आई घरी आली तर मजाच मजा....पण अचानक हे सगळं वेगळ्याच वळणावर चाललं होतं.

सोनलच्या आईला पुण्याला पळवायचं म्हणून सगळे इकडे तिकडे पळत होते आणि त्यातच सोनलच्या मामाने तिला कॉलेजला जा असं बजावलं.तिचा पाय निघता निघत नव्हता; पण नाइलाजाने सोनलने साइकल काढली व निघणार इतक्यात आईला अँम्बुलंन्स मध्ये बसवलं.आईची अवस्था पाहून सोनलला काय चाललयं तेच समजत नव्हतं.१६ वर्षांची सोनल काही विचार करण्याआधीच अँम्बुलन्स निघून गेली.सोनल त्याच विचारांत कॉलेजमध्ये पोहोचली.कॉलेज सुटलं आणि सोनल घरी गेली.मामी सांगत होत्या की, सोनल आईला आता बरं आहे.सोनलचा चेहरा खुलला.मामी आईला कधी सोडणार,असं मामीला विचारलं.मामी बोलल्या सोडतील ४-५ दिवसांत.....तरीही सोनलला अस्वस्थ वाटत होतं;संध्याकाळ झाली व चुलत मामा घरी आला.त्याने पुढे बसून सगळ्यांना जेवायला घातलं.मामीला एकट्यात बोलावून सांगितल की आपली आशा म्हणजे सोनलची आई देवाघरी गेली.मामीच अंग थरथरत होतं पण मुलांसमोर काहीच दाखवून न देता त्यांनी तो आवंढा गिळला.
सोनलला संशय आला की,काहीतरी नक्की चाललयं पण कोणीच काहीच बोललं नाही.सोनलने मामीला प्रश्न विचारून हैरान केले.पण कुठूनच काहीच कळायला मार्ग नव्हता.तेवढ्यात घरासमोर एक टँम्पू येऊन उभा राहिला.पटकन आपल्याला गावाला जायचंय असं चुलत मामाने सांगून सगळ्यांना गाडीत बसवलं.सगळ्यांच्या चेहरयावर दु:ख दिसत होतं पण सोनलला व तिच्या भावंडांना कळू नये म्हणून सगळे ते दु:ख लपवण्याचा प्रयत्न करत होते.पहाटे ३ वाजता गाडी कोणत्या तरी गावात येऊन थांबली.सगळे खाली उतरले मागून सोनल व  भावंडे उतरली...सोनलला पाहताच क्षणी तिचे वडिल मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागले.सोनल एकदम शांत होती तिला काहीच समजत नव्हते.तिने वडिलांची मिठी सोडवली आणि पुढे गेली.आईला तसं झोपलेलं पाहून मोनल व विघ्नेश खूप रडत होते पण सोनलला मात्र रडू येत नव्हतं.जेव्हा मोनल व विघ्नेश तिला बिलगून रडू लागले तेव्हा मात्र ती भानावर आली;जणू तिच्यातलं आईपणच जागं झालं आणि ती मोठ्याने रडू लागली.नंतर खूप वेळाने अंत्यविधी झाला.
आईच्या जाण्याने घर उध्वस्त झालं होतं.आता मुलांच व सोनलच्या वडिलांचं कसं होणार या विचारांतच सगळे होते.खरंच,हे देवा कितीही कष्ट दे आयुष्यात;पण आईविना कोणालाच पोरकं करू नकोस.काय अवस्था होते ते फक्त त्यालाच माहित ज्यांच्या आयुष्यात आई-वडिल नाहीत.पुढे तीन मुलं व त्यांच्या वडिलांनी परिस्थितीवर मात केलीच व आयुष्याने त्यांना कसं जगायचं हे शिकवले.सोनलची आई सगळ्यांना सोडून देवाघरी गेली आणि आईविना पोरं पोरकी झाली.नंतर सोनल,मोनल व विघ्नेश ही तिन्ही मुले मामाकडे राहत होती.तिथे मामाकडे मामाची मुलं असल्याने या तिन्ही भावंडांना वरून वरून का होईना पण दु:खाचा विसर पडला.एक वर्ष झालं सोनलची बारावी झाली आणि
खूप छान मार्क्स मिळवून इंजिनियरींगला प्रवेश मिळवला.सोनल नेहमी पहिल्या क्रमांक मिळवून बक्षीस मिळवायची याचाच वडिलांना अभिमान वाटायचा.तिला स्कॉलरशीप मिळाल्याने तिला एकही रुपया फी भरावी लागत नव्हती.इकडे मुले शाळेत स्वत:ला रमवून घेत होती पण पदोपदी आई गेल्याची जाणीव हे जग करूनच देत होतं.पण वडिलांची परिस्थिती मात्र खूप बिकट होती कारण बायको गेली म्हणजे ते एकटे पडले.अक्षरश: उपासमारीची वेळ येत होती;कधीकधी वडापाव खाऊन दिवस पुढे ढकलत होते.पण शेवटी वडिलच ते...चेहरा नेहमी  हसरा ठेवून ते मुलांसमोर आनंदाने मिरवायचे.सोनलच्या लग्नाची बोलणी आता सुरू झाली होती.तशी तिला छान स्थळही चालू झाली.जरी सावळी असली तरी शाळेत व कामात ती हुशार असल्याने एका आय.टी इंजीनियरने तिला लगेच पसंती दिली आणि लग्नही जमलं.
एका वर्षांनंतर लग्नाची तारीख काढली होती.सगळे खूष होते पण,सोनलला नेहमी वाटायचं की माझं आणि मोनलचं लग्न झाल्यावर विघ्नेश आणि वडिलांच काय...???विघ्नेश कसाही जगेल पण वडिल त्यांच आयुष्य एकट्याने कसं जगणार;कारण पुर्ण आयुष्य एकट्याने जगणं खूप कठीण आहे.बोलणं सोपं असतं पण त्या परिस्थितीत निभावून निघणं खूप अवघड असतं.सोनलने खूप विचार केला आणि वडिलांना फोन करून सांगितले की,तुम्ही दुसरं लग्न करा.घरातले बाकीचे लोक सोनलला सांगत होते की,तू करतेस ते योग्य नाही कारण शेवटी सावत्र ती सावत्रच आई....तिला सख्ख्या आईची सर नाही.सोनलने एका कानाने ऐकले आणि दुसरया कानाने सोडून दिले.तिच्या मनात कुठेतरी होतं की,चलं बाबा वडिलांना बायको आली तरी खूप झालं.....आपल्या आईची जागा कोणीच भरून काढणार नाही पण जी व्यक्ती येईन तिने वडिलांना नीट सांभाळावं.
वडिलांच लग्न सोनलच्या लग्नाआधी सहा महिने झालं.पण ती वडिलांची बायको नाही तर त्या तीन मुलांची आई म्हणूनच घरात आली.तिने स्वत:ची प्रतिमा स्वत: तयार केली.मुलींच सगळं शिक्षण व लग्न तिने कौतुकाने केलं.सोनलचं लग्न पार पडलं.सगळ व्यवस्थित चालू होतं.विघ्नेश एक दिवस खूप आजारी पडला;त्याला कावीळ आणि डेंग्यु झाला होता.पण तिने स्वत:च्या मुलासारखी काळजी घेऊन त्याला आजारातून बरे केले.तेव्हा विघ्नेशचे डोळे उघडले कारण;तो तिला आई मानायलाच तयार नव्हता.विघ्नेश जसा आजारातून बरा झाला तसा त्याने सोनलला फोन केला;ताई माझी खूप काळजी घेतली त्यांनी...खरंच माझे डोळे उघडले;आता मी नीटच वागेन त्यांच्याशी.....सोनलने विचारले त्यांनी म्हणजे कोणी....अगं आपल्या पप्पांची बायको...विघ्नेश उत्तरला.सोनल बोलली,अरे निदान आई नाही पण त्यांना मावशी तरी बोलं.तू अहो जावो केलं तर त्यांना वाईट वाटतं.आता त्यांना तरी कोण आहे आपल्याशिवाय...मोनलने पण विघ्नेशला समजावले की,विघ्नेश तुझाच एकमेव आधार आहे त्यांना....तू त्यांचे उपकार विसरू नकोस आणि विघ्नेशने मनोमन त्यांना आई मानले.....आणि त्या आईचे प्रयत्न व लग्न सार्थकी लागल्याचं त्या आईला समाधान नक्कीच मिळालं.आणि त्यांनी त्या सावत्र शब्दाला लाजवून जगाला दाखवून दिले की,सावत्र व सख्ख असं काहीही नसंत...आई ही आईच असते....
खरंच असं लगेच आपल्या आईची जागा दुसरया कोणाला देणं एवढं सोपं नक्कीच नसतं;पण त्यापेक्षाही सोपं नसतं दुसरयाशी मुलं आपली मानून सांभाळणं.....मुली काय लग्न करून जातात पण बायको नसलेल्या मागे राहणारया वडिलांना कोण सांभाळणार.....मग त्यांच आयुष्य कोणीतरी सावरलं तर कुठे बिघडलं.....म्हणूच वेळीच घेतलेल्या एका योग्य निर्णयाने पुर्ण घर आणि कितीतरी आयुष्य सावरू शकतात.ही माझ्याबाबतीतीलच घटना आहे....आणि खरंच यातूनच माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली.हे सगळं अनुभवताना खूप लोकांशी संबंध आला त्यातले काही चांगले व काही वाईट.....पण आयुष्य थांबत नाही ते चालूच राहत.


## अक्षया राऊत
प्रिय वाचकहो माझा लेख कसा वाटला हे मला कमेंन्ट करून कळवा.लेख आवडल्यास लाईक करून फॉलो करायला विसरू नका