
मोनिका राजेशची दुसरी बायको.....मनिषा पहिली बायको......डिलिवरी झाली नि मुलगी व मनिषा दोघीही आकस्मितपणे देवाघरी गेल्या.मनिषा घरातल्या सगळ्यांची खूप लाडकी;कारण तिच्या वडिलांची परिस्थिती सासरपेक्षा दहा पटीने चांगली होती.मनिषा गेल्यानंतर राजेशने मोनिकाशी दुसरं लग्न केलं.जेमतेम दहावीच्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं,कारण वडिल खूप दारू पित असल्याने मुलींकडे अजिबात लक्ष नव्हतं.म्हणून मोनिकाच्या मामाने या लग्नात पुढाकार घेऊन लग्न व्यवस्थित पार पाडलं.आठवी शिकलेल्या मोनिकाला मात्र तिच्या ताटात काय वाढून ठेवलयं,याची तीळमात्र कल्पना नव्हती.तिचा नवीन संसार सुरू झाला; पण " म्हणतातना नव्याचे नऊ दिवस......" लग्नानंतर तिचा खूप छळ होऊ लागला.कारण तिच्या घरची परिस्थिती हलाकीची होती आणि त्यात भर म्हणून लगेच बाळ झालं पाहिजे.पण नवरयानेदेखील आईला कधीच समजावले नाही.
मोनिकाला खूप कामं असायची.घरची कामं करून शेतातही तिनेच गेलं पाहिजे.दहा गुरांचा चारा-पाणी,शेण काढणे,धारा काढणे,स्वच्छता करणे ही सगळी कामंही तिच्याच नावावार....एवढी कामं करूनही तिला खायची प्यायची सत्ता नव्हती.सासूने दिलं तर खायचं,नाहीतर उपाशी....अक्षरश: कोणाला माहिती न होऊ देता गुरांना टाकलेल्या शिळ्या भाकरी भूक लागल्यावर ती खायची.
बरं अशा परिस्थितीत नवराही तिला साथ देत नव्हता.आई बोलली हिला मार की तो मारायचा.बिचारी खंगून गेली होती.आजूबाजूच्या लोकांशीदेखील बोलायचं नाही.माहेरी जायचं नाही.अशी आठ वर्षे एवढ्या जाचात ति नांदत होती.नंतर तिची श्रद्धा म्हणून तिने निरंकार काहीही न खाता पिता व्रत केले.असेही तिला कधी जेवण मिळायचे तर कधी नाही.
एवढ्या सहनशक्तीचं फळ तिला मिळालं आणि अखेरीस तिची कुस उजवली.पहिला मुलगा झाला त्याचं नाव सोहम ठेवलं.काही वर्षांनी दुसरी मुलगीही झाली.पण सासूला मात्र अद्दल घडवायला आता तिची जाऊ आली होती.स्मिता मोनिकाची जाऊ पोलीस होती.........अजिबात अन्याय सहन न करणारी आणि अन्यायाविरूद्ध सडेतोड बोलून आवाज उठवणारी.स्मिताने पोलीसी भाषेत सासूला चांगलाच धडा शिकवला आणि नवरयाला जिकडे बदली होईल तिकडे घेऊन गेली.सासूला मात्र मोनिकाशिवाय पर्याय नव्हता.आता मात्र मोनिकाला सासू फुलासारखी जपत होती.नवरयालाही त्याची चूक समजली होती.याव्यतिरिक्त मोनिकालाही आयुष्यात दुसरं काहीच नको होतं.तिचं आयुष्य इंद्रधनुष्यासारखं रंगीबेरंगी रंगांनी भरलं होतं.
## सत्यघटना