सकाळी माझ्या आजोबांचा फोन आला;मी पाहिलंही पण कामात असल्याने फोन न उचलता ठरवलं की;चल,एवढं काम संपवते आणि निवांत फोन करते म्हणजे मनसोक्त बोलता येईल.फोन आले आणि दुनियाच बदलली म्हणजे आठवण आली की माणुस लगेच फोन करून मनमोकळेपणाने मनाचं समाधान होईपर्यंत बोलत राहतो.बरं काही कळवायचं असेल तर दोन सेकंदात कितीही दूर असलेल्या माणसाला ती बातमी आपण कळवू शकतो.पण एक गोष्ट आहे पत्राची मजा आपण थोडीफार अनुभवली पण आपल्या मुलांना ही मजा अनुभवायला नाही मिळणार.....नुसती मजा नाही पण मन घट्ट करून राहावं लागायचं आपल्या आधीच्या पिढीला.....त्यांच्या आठवणी जरी त्यांनी सांगितल्या तरी टचकन डोळ्यांत पाणी येते.असाच एक किस्सा त्यादिवशी माझ्या सासूबाईंनी सांगितला.
अचानक आईंच्या (सासूबाईंच्या) वडिलांचा विषय निघाला.सासरे बी.एस.टी त कामाला असल्याने सगळी फॅमिली मुंबईतच राहत होती.तेव्हा १९९० साली फोन नव्हते;सगळा पत्रव्यवहार होता.खुशाली कळवायची झाली तरी पत्र पाठवायचे,पण ते पञही पोहोचायचे साधारण १५ दिवसांनी.अचानक आईंचे वडिल वारले पण मुंबईला कळवायचं कसं.पञही लवकर पोहोचणार नाही.प्रेत तर जास्त वेळ ठेऊ शकत नाही मग गावकरयांनी निर्णय घेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले.पण इकडे आई आणि त्यांची एक बहीण मुंबईला असल्याने त्यांना अंत्यदर्शन झाले नाही.दुसरया दिवशी आईंचे मामा मुंबईला गेले.घरी आईंचे वडिल अॅडमिट असल्याचे सांगून सगळ्यांना गावी घेऊन आले.म्हणजे त्याकाळात एखादा माणूस मेला तरी त्याच्या जवळच्या व्यक्तींना समजत नव्हते.म्हणजे किती मनावर दगड ठेवून त्यांना जगावं लागत होतं.खरंच त्या वेळी फोन तर नव्हताच;पण आईंच पत्रही त्यांच्याकडे पोहचू शकत नसल्याने वडिलांना शेवटचंही भेटू न शकल्याचं दु:ख त्यांच्या पदरी पडलं.खरंच पहिले लोकं पत्राची वाट बघत बसायचे.त्यांना आस लागून राहायची की सगळं काही ठीक असेल का.....?????
पण खरंच आता मात्र हे पत्र हरवलं ते हरवलंच.......
माझाही एक सुखद किस्सा मला आर्वजुन सांगावासा वाटतो.मला आलेलं पहिलं पत्र........
दहावीची परीक्षा दिली आणि गव्हर्नमेंन्ट होस्टेलला राहायचं ठरलं.रिझल्ट आला आणि होस्टेलची अॅडमिशन प्रोसेस झाली.तिथे सांगण्यात आलं की जर माझं लिस्टला नावं आलं तर आम्ही कळवू.माझं कॉलेज सुरू होणार तरी होस्टेलमधून फोन नव्हता.घरचे जरा काळजीतच होते; आता ही राहणार कुठे.पण एक दिवस अचानक दरवाज्यात पोस्टमन आला आणि माझ्या नावाचं पत्र आहे असं सांगितलं.मला थोडं वेगळं वाटलं की,मला कोणं पत्र पाठवणार...?? मी सही केली आणि पत्र वाचलं तर ते पत्र होस्टेलमध्ये मला अॅडमिशन मिळाल्याचं होतं.घरातले आणि मी खूप खूश झाले.मला भारीही वाटत होतं कारण मला पत्र आलं होतं.तसंही सरकारी व्यवहार पत्रानेच होतात;पण तरीही मला खूप भारी वाटत होतं.
खरंच पत्राची मजा काही औरच असते.पण तेवढेच दु:खद अनुभवही असतात.पण आजच्या मोबाईल, इमेल,मेसेजिंग च्या जमान्यात हे पत्र हरवलं ते हरवलंच.........!!!!!!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा