Jan 23, 2021
माहितीपूर्ण

निष्पाप

Read Later
निष्पाप


लांबून बस येतांना पाहून शुभांगी धावत सुटली आणि जेमतेम तिने ती बस पकडली.मिळालेल्या एका सीटवर स्थानापन्न होऊन तिनं तिकिटासाठी वीस रुपयाची नोट काढली.कंडक्टर च्या स्वाधीन पैसे करून,त्यांच्याकडून तिकीट घेऊन तिने ते हातातल्या पर्स मध्ये टाकलं आणि सुटकेचा श्वास टाकला.आज ही तिला धावत पळत गाडी गाठावी लागली होती.तरी बरं, घर बस स्टँड च्या अगदी जवळ होतं. ती सकाळी नऊ पर्यत घरा बाहेर पडायची. श्रीधर मात्र सकाळी सात लाच घराबाहेर पडायचा.त्याची स्वतःची स्पेअर पार्टस बनविण्याची फॅक्टरी होती.सकाळी स्वयंपाक करण्यासाठी ती माणूस शोधत होती.
त्या दिवशी ऑफिस मधून येता येता खालीच पाठक काकूंनी तिला गाठलं.
" तुला स्वयंपाकाला माणूस ठेवायचा आहे ना?मला एक चांगला मुलगा मिळालाय बघ.मी महीना भर अनुभव घेतलाय आणि मग तुला सुचवत आहे..."
"पाठवा न मग त्याला उद्या माझ्याकडे."
पाठक काकू मग त्याला दुसऱ्याच दिवशी सकाळी घेऊन आल्या.
राधेश्याम साधारण बावीस वर्षाचा होता .मूळ उत्तर प्रदेशचा होता .तिकडे घरदार,शेतीवाडी,पोटापुरतं सगळं होतं. तो मॅट्रिक झाला होता.त्याच्या चुलत भावाबरोबर तो इथे आला आणि इथेच रमला.सर्व त्याला राधे म्हणत.
राधे चांगला गोरागोमटा, स्वच्छ होता.हसतमुख होता.शिवाय त्याला मराठी बोलता येत होती.पगाराचं वगैरे  नक्की करून शुभांगी ने त्याला कामावर ठेवून घेतलं.
राधे आला आणि शुभांगी ला खूपच स्वस्थता मिळाली.तिने मुद्दाम पाठक काकूंना संध्याकाळी चहाला बोलावून धन्यवाद दिले.फक्त स्वयंपाक कामासाठी ठेवलेला राधे इतरही कितीतरी कामात मदत करायचा.काम अगदी झटपट पण स्वच्छ.चेहरा हसतमुख. त्यामुळे राधे अगदी लाडका झाला होता.पाठक काकूंकडे तो चांगलाच रुळला होता.
दोन्ही घरात चांगले प्रेम संबंध होते.बऱ्याचदा पाठक काकू ,काका आणि श्रीधर शुभांगी एकत्र जेवणं करायची,तेव्हा राधे सगळ्यांना वाढायचा.शेवटी सगळी छान आवरा आवर करून निघून जायचा.
राधेला आता जवळ जवळ वर्ष व्हायला आलं होतं. पाठक काकू साधारण सकाळी दहा पर्यंत बाहेर पडायच्या. येतांना भाजी वगैरे घेऊन यायच्या.काका ही कुठे लायब्ररीत, कुठे बँकेत तर कधी सिनियर सिटीझन क्लबात जात असे.राधे नेमका त्याच वेळी येई म्हणून त्याला एक किल्ल्यांचा जोड काकूंनी दिला होता.तो यायचा आणि आपलं काम करून निघून जायचा.
राधे सकाळी रोजच्या सारखा शुभांगी कडे आला.स्वतः काम आटोपून त्याने सांगितलं की',त्याच्या एका दूरच्या नातेवाईकाचं लग्न  आहे. त्याच्या लग्नासाठी निदान दोन दिवस तरी त्याला जावं लागणार आहे' आणि राधे शनिवार पासून दोन दिवसांच्या सुट्टी वर गेला.
शुभांगी आणि श्रीधर रविवारी सकाळीच शुभांगी च्या गावातल्या मावस बहिणी कडे बारसं निमित्त गेले.पाठक काकू, काका पण त्यांच्या जवळच्या नातेवाईका कडे जेवायला जाणार होते.
शुभांगी ला रात्री यायला उशीर झाला.येतांना तिने सहज पाठक काकू च्या घराकडे पाहिलं तर काकूंचं दार उघडं ,घरात पोलीस ते दोघे धावत त्यांच्या घरात शिरले.सगळी घरातली कपाटं उघडी होती.तिजोरी उघडलेली होती.काकूंनी शुभांगीला एकदम मिठीच मारली आणि त्या ओकसाबोक्शी रडू लागल्या लगेच पोलीस इन्स्पेक्टर पुढे आले .चौकशी करू लागले.
" हे कोण ? रोज घरात कोण कोण येतं? कुणावर संशय आहे काय? हे रोजच्या येणाऱ्या माणसाचंच काम आहे कारण फक्त कपात आणि तिजोरी उघडलेली आहे".
रोजच्या येणाऱ्यात राधे चं नाव निघालं.पण सगळ्यांनी त्याची खात्री दिली,शिवाय तो गावात ही नव्हता.
राधे दुसऱ्याच दिवशी परत आला.हे चोरी प्रकरण ऐकून तो ही त्या चोराला शिव्या श्राप देऊ लागला.पोलिसांनी त्याला बोलावून त्याची  जबानी लिहून घेतली.तो खरोखरच बाहेरगावी गेला होता असं कळलं.
चोरी होऊनही जवळपास वर्ष व्हायला आलं होतं.कधीही पोलिस स्टेशनवर चोरीच्या मालातून दागिने ओळखण्याकरिता बोळवण आलं तर काका काकू सोबत श्रीधर पण जायचा.पण त्यात त्यांचा एक ही दागिना सापडला नाही.चोरीचा पत्ता काही लागला नव्हता.
आता राधे दोन्ही घरी चांगलाच रुळला होता.इतरही सगळ्या कामात मदत करायचा.त्याचं जेवण ही सहज होऊन जायचं.
...... ........     ..............    ..........     ......... ..........
मध्यंतरी फॅक्टरीच्या काही कामानिमित्त श्रीधरला दोन चार दिवसांकरीता दिल्लीला जावं लागलं.रात्री झोपण्याकरिता काकू येत होत्या.शुभंगीचा एकटीचा स्वयंपाक करण्यापेक्षा,काकूंनी दोन्ही वेळ जेवणाकरिता तिला स्वतःकडे बोलावून घेतलं होतं.तीन दिवस सर्व व्यवस्थित चाललं.गुरुवारी संध्याकाळी सात पर्यंत पोहचेल असा श्रीधरचा फोन आला होता आणि नेमकं त्याच दिवशी शुभांगी च्या ऑफिसमध्ये, हेड ऑफिस चे अधिकारी इन्स्पेक्शन करिता येणार होते.साहजिकच त्या दिवशी घरी यायला उशीर होईल म्हणून सकाळी जातांना पाठक काकूंना एक किल्लीचा जोड देऊन ठेवला होता आणि तसं सांगितलं ही होतं जेणेकरून श्रीधर अगोदर पोहोचला तर त्याची गैरसोय नको.
त्या दिवशी तिला खरं तर खूप थकवा वाटत होता आणि अनायासे इन्स्पेक्शन पोस्टपोन झालं असं कळलं म्हणून दुपारी आपलं काम पूर्ण करून तासभर आधीच ती सुमारे चार वाजताच ऑफिस बाहेर पडली.ती घरी पोहोचली तर लक्षात आलं कि ,दाराला कुलूप नाही.श्रीधर लवकर आला असावा आणि आत आराम करीत असेल असं विचार तिच्या मनात येऊन गेलं. तिने स्वतःच्या किल्लीने लॅच उघडलं आणि ती आत आली. बेडरूममधून कसलातरी आवाज येत होता म्हणून ती सरळ बेडरूम कडे गेली आणि बघते तर काय.......
कपाट उघडून राधे कपाटासमोर उभा होता.त्याने लॉकर पण उघडलं होतं. दोघांची एकदम नजरानजर झाली.
शुभांगी एकदम " कोण ..राधे ..." म्हणून ओरडली.

...... .......       .........
 श्रीधर घरी आला तेव्हा संध्याकाळचे साडे सात वाजले होते.दाराला कुलूप पाहून शुभांगी अजून कशी आली नाही असा विचार त्याच्या मनात आला.पाठक काकू कडे गेली असेल असा विचार करतच तो पाठक काकू कडे पोहोचला तर दारातच ' ती थोडं उशीरा परतणार आहे' असे सांगून काकूंनी त्याला किल्लीचा जोड दिला.काकूंकडून किल्ल्या घेत तो परत आला आणि त्याने दार उघडलं.बूट काढून तो बेडरूम कडे गेला.
समोरचं दृश्य पाहून एक जबरदस्त किंकाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली.
शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात पलंगावर पडली होती.रक्त ओघळून सगळं पलंगावर पसरलं होतं. डोकं फुटलं होतं. कपाट उघडं होतं. पेट्या इकडे तिकडे पडल्या होत्या.सगळं लक्षात येऊन तो शुभांगी जवळ जाऊन तिला हलवून हाका मारायला लागला.पण तिच्याकडून कुठलीच हालचाल झाली नाही.तो धावतच बाहेर आला आणि मोठ्यांनी दार ठोकून शेजाऱ्यांना त्यानं गोळा केलं .काका काकू पण धावत आले.कुणीतरी पोलिसांना फोन केला.
पोलीस आले.फोटो,ठसे,चौकशी सुरू झाली.शुभांगी चा खून झाला होता.
" शुभांगी ताई रोज किती वाजता घरी यायच्या?"इन्स्पेक्टर शिंदेंनी विचारलं.
" ती साधारण सहा च्या सुमारास येते.पण आज नक्की किती वाजता आली सांगता येणार नाही कारण मी दुपारी भजनाला गेले होते" पाठक काकू पुढे येत म्हणाल्या.
" तुम्ही रोज किती वाजता भजनाला जाता?"
" मी रोज तीनच्या सुमारास बाहेर पडते आणि संध्याकाळी सातपर्यत घरी येते..."
" तुमच्या घराचे किल्ल्यांचे जोड किती आहे आणि ते कोणाकोणाकडे आहेत?"इन्स्पेक्टर नी श्रीधर ला विचारलं.
" आमच्याकडे दोघां जवळ एक एक जोड आहेत.पण मी बाहेरगावाहून असल्याने शुभांगी ने माझा जोड काकूंकडे ठेवला होता" श्रीधर कसा बसा स्वतःला सावरत म्हणाला.
" हे काम व्यवस्थित घराला,कपाटाच्या किल्ल्या लावून केलं आहे"
मग नेहमी घरात येणारी माणसं कोण?नातेवाईक कोण?अश्या चौकश्या झाल्या.अर्थात राधेची चौकशी झाली.त्याचा पत्ता ही पोलिसांनी घेतला.
धुणी भांडी करणारी रेखा नेहमीप्रमाणे भांड्यासाठी आली होती.मग इन्स्पेक्टरनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.कुठे राहते? इथे कामाला केव्हा येते?आणखी कुठे कुठे काम करते?
" मी रोजच येते इथे.धुण्या भांड्याची कामं करते?इथे दोन तीन घरी सायेब,मला जाईस्तो सात आठ वाजतात रोजच्या."ती पण एकदम रडायलाच आली.
" आज किती वाजता इथे आली?कुणी दिसलं कां जाता येता?" इन्स्पेक्टर विचारत होते.
" दुपारचे साडे तीन चार वाजले असतील पण मी येत होते तेव्हा राधे मला भेटला."रेखा आठवून आठवून म्हणाली.
" काही बोलला का तुझ्याशी?काय म्हणाला?".
" म्या इचारलं, काय रे राधे,काकू कडे चालला काय?तवा फक्त हो म्हणाला आणि गेला घाईने."
इन्स्पेक्टर शिंदे नी मग पाठक काकूंना विचारलं 
" राधे तुमच्याकडे केव्हा येतो?रोज दुपारी येतो कां?"
" नाही नाही.माझ्याकडे आणि शुभांगी कडे सकाळीच येतो.हिच्याकडे सकाळी आठपर्यंत येतो आणि माझ्याकडे दहा पर्यंत "
" मग आज संध्याकाळी राधे तुमच्याकडे आला होता काय?"
" मला ठाऊक नाही.मी दुपारी तीन लाच भजनाला निघून गेले होते पण आमच्या किल्ल्या असतात त्याच्याकडे.."
" शुभांगी ताई च्या किल्ल्या तुमच्या घरी असतात हे राधेला ठाऊक होतं कां?
" हो सकाळी शुभांगी किल्ल्या ठेवायला माझ्याकडे आली होती तेव्हा तो माझ्याकडे स्वयंपाक करत होता " काकू म्हणाल्या
सगळे  पोलिसी सोपस्कार होईपर्यंत रात्रीचे दहा वाजले.बॉडी पोस्टमॉर्टेम साठी पाठवून पोलीस निघून गेले.
इन्स्पेक्टर शिंदे नी राधेचं घर गाठलं तेव्हा रात्री चे अकरा वाजले होते.सगळीकडे सामसूम झाली होती.दार ठोठावल्यावर राधे डोळे चोळत उठला.त्याने दार उघडलं.पोलिसांना समोर पाहून थरथर कापू लागला.त्याच्या तोंडावर सगळे ओचकारे उठलेले होते.डोळे सुजलेले दिसत होते.
" काय रे?हे तोंडावर काय झालं?" इन्स्पेक्टर शिंदे नी त्याची कॉलर धरली.
" मी सायकली वरून पडलो.सगळीकडे खडी पसरलेली होती.त्यावरून घसरलो ".तो हात जोडायला लागला.
" आणि हे हातावरचे व्रण कसले?" त्याच्या हातावरील व्रण पाहून इन्स्पेक्टर शिंदे त्याच्यावर ओरडले.
" कुत्रं चावलं साहेब "एवढं तो म्हणतो न म्हणतो ,इन्स्पेक्टरांनी त्याची गचांडी धरली आणि त्याला जीप मध्ये कोंबलं .एक हवालदाराला तिथेच बसवून,राधेला पोलीस स्टेशनवर आणलं .
" संध्याकाळी कुठे गेला होता ?" इन्स्पेक्टरांनी विचारलं.
" आज कुठेच गेलो नाही साहेब, तब्येत बरी नव्हती."
" मग रस्त्यात पडला कसा ....?"
" नाही साहेब,बाहेर जाण्यासाठी निघालो होतो पण रस्त्यात पडलो म्हणून घरी परत आलो".राधे नी भोळेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केला.त्याचबरोबर एकच भयंकर कानफटात बसली.आणखी दोन चार लाथा बसल्या तेव्हा त्याने इन्स्पेक्टर शिंदे चे पाय धरले.
" सगळं सांगतो साहेब,मारू नका".तो रडू लागला.
" रडणं बंद कर ,नीट सांग सगळं.नाही तर उलटा टांगतो बघ "
" साहेब कर्ज झालंय माझ्यावर बरंचसं .पैसे हवे होते म्हणून ...."
" कर्ज का झालं,जुगार खेळतो काय साल्या?कसली व्यसन करतो काय? बाई कडे जातो के? बोल पटापट आता..."
" साहेब मला माहित होतं,ताईच्या घराच्या किल्ल्या काकूंकडे आहेत म्हणून.काकू रोज भजनासाठी दुपारी देवळात जातात.काकूंच्या घराच्या किल्ल्यांचा एक जोड माझ्याकडे आहेच.मी काकूंकडून ताईच्या किल्ल्या काढून घेतल्या आणि त्यांचं घर उघडलं"
"पण जीवे मारायची काय गरज होती?".
" नाही साहेब,मला त्यांना मारायचं नव्हतं पण त्या लवकर घरी आल्या.त्यांनी मला पाहिलं म्हणून मला त्यांना मारावं लागलं साहेब !" 
" सर्व सविस्तर सांग .." इन्स्पेक्टर शिंदेनी त्याला पुन्हा फैलावर घेतलं.
जेव्हा शुभांगी ने बेडरूममध्ये राधेला पाहिलं तेव्हा ती ओरडली.
" कोण राधे..?" तेव्हा त्याने हातातलं सगळं खाली टाकलं आणि प्रथम जाऊन तिचं तोंड दाबलं. तिनं त्याच्या हातातून सुटून दाराकडे धावण्याचा प्रयत्न केला पण राधेनी ओढत ओढत तिला आत घेतलं.ती जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करीत होती.आता हि ने आपल्याला पाहिलं आहे त्यामुळे आता हिला संपवावचं लागेल असं पक्के ठरवून त्याने जवळच्या टेबळावरचा पितळी फ्लावरपॉट उचलून तिच्या डोक्यावर चार पाच वेळा हाणला. रक्ताची धार लागली.थोड्या वेळातच ती निपचित होऊन पडली.तो उठला.त्याने पटापट इकडे तिकडे पसरलेल्या दागिन्यांचा पेट्या,जे मिळेल ते भराभर खिशात घातलं.कॅश ही बरीच मिळाली.आपले कपडे ठीक ठाक करून केसांवरून कंगवा फिरवून तो शांतपणे बाहेर पडला.बाहेर त्याने पुन्हा कुलूप लावलं.काकूंच्या किल्ल्यांनी त्यांचं कुलूप उघडून आत जाऊन शुभांगी च्या किल्ल्या व्यवस्थित जागेवर ठेवून दिल्या.पुन्हा काकूंच्या घराला कुलूप घालून त्या किल्ल्या आपल्या खिशात घालून निघाला.
रात्रभर  मग त्याची कसून चौकशी झाली.अगदी बारीक बारीक तपशील ही घेण्यात आले.सकाळी सगळा चोरीचा माल ताब्यात घेण्यात आला.
श्रीधरला पोलीस स्टेशनवर बोलावण्यात आलं. तो,काका काकू सर्व जण तिथे पोहोचले.
" श्रीधर हा पहा तुमचा आरोपी .."इन्स्पेक्टर म्हणाले.
" राधे ...तू...?" श्रीधर राधे कडे पाहतच राहिला.पण त्याची नजर खाली झालेली होती.ती काही वर आली नाही.
" तुमचे दागिने,कॅश सगळं बघून घ्या! ही एक चेन मला जास्तीची सापडलीय यात बघा.."इन्स्पेक्टर शिंदे असं म्हणत एक चेन समोर ठेवली.आणि काकू मोठ्याने ओरडली.
" अरे ही चेन तर आमची आहे म्हणजे आमच्याकडे जी चोरी झाली होती ती पण यानेच केली होती की काय..?"
" होय,ती चोरी पण यानेच केली होती.त्या रात्री हा बाहेरगावी गेलाच नव्हता.दोन दिवस हा खोलीवर गेलाच नाही.."इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले.
" अरे,स्वतःच्या पोरा पेक्षा जास्त माया लावली आम्ही तुझ्यावर आणि तू शेवटी...."पाठक काका ही आता चिडले होते.
" मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, म्हणजे पोलीस जनतेला नेहमीच सुचवते की जर तुम्हाला घरकामाकरिता नोकर ठेवायचा असेल तर त्याची संपूर्ण माहिती,फोटो इत्यादी नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवा.त्याच्या बद्दल पूर्ण माहिती मिळवूनच त्याला कामावर ठेवा.पण हल्ली लोक यातलं काहीही करत नाही.वर्षभरापूर्वी पाठक काकूंकडे जी चोरी झाली होती आणि परवा तुमच्याकडे झालेल्या चोरीमध्ये एक कॉमन फॅक्टर मला जाणवला तो म्हणजे दोन्ही चोरी एकाच पद्धतीने केली होती आणि ते अश्या माणसाने केली होती जो नेहमी घरी येत जात असेल आणि तेव्हाच मला या राधे वर संशय आला कारण हाच दोन्ही घरी काम करत होता.घरातील बारीक बारीक गोष्टींची याला पूर्ण माहिती होती.मी जर याला रात्रीच अटक केली नसती तर कदाचित हा निसटला असता .असो...." तुम्ही निघा आता,तुम्हाला आता बॉडी ही ताब्यात घ्यायची आहे."असं म्हणून इन्स्पेक्टर शिंदे उठले.
श्रीधर अगदी असहाय,एकाकी, पोरका झाल्यासारखा सर्वांबरोबर घरी निघाला.एक निष्पाप जीव निष्कारण बळी पडला! एक सुखी घरकुल विझून गेलं.
( समाप्त)
(सदर कथा संपूर्ण काल्पनिक आहे.कुठल्याही घटना,पात्र, प्रसंग ईत्यादीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.लेखक तसेच माध्यम याकरिता जवाबदार नाहीत .)

उज्ज्वल कोठारकर
वर्धा

Circle Image

Ujjawal Kotharkar

Govt. Service

Working under ministry of skill development &enterpreneurship formerly known as Deptt of vocational education and trainingsince lasts 25 years,make today's youth self dependent.