Jan 19, 2022
नारीवादी

नागपंचमी अनपेक्षित

Read Later
नागपंचमी अनपेक्षित

 

 

मयुरी आणि मंदार यांचे नुकतेच लग्न झाले...छोट्या कुटुंबात वाढलेली मयुरी लग्न करून सासरी आली.. इकडे एकत्र कुटुंब..मंदारची आजी, काका- काकू त्यांच्यी दोन मुले- दोन सूनबाई आणि मंदारचे आई-बाबा आणि आता मंदार आणि ती...

मंदार आणि धाकटे दिर वकीली करत होते त्यांचा खानदानी पेशाच होता तो.. सतत लोकांचे जाणे येणे असायचे...घरात सतत राबता असायचा...पण सर्वात मोठे दिर मात्र डॉक्टर असल्यामुळे शहरात राहायचे त्यांची बायको आणि एक मुलगा सुद्धा त्यांच्यासोबत... पण प्रत्येक शनिवार आणि रविवार मात्र गावी यायचे आणि सणवाराला तर गावीच...तेव्हा घर अगदी गजबजून जायचे... मयुरी सुरुवातीला अगदी बावरून जायची.... पण सर्व एकमेकांना समजून घ्यायचे... कधीच हेवेदावे नव्हते त्यांच्यामध्ये....आजींनी सर्वांना त्यांच्या प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवले होते...हसते खेळते वातावरण होते...

मंदार शेंडेफळ त्यामुळे आजीचा लाडका.. घरातले शेवटचे लग्न म्हणून खूप धूमधडाक्यात लग्न लागले आणि बर्व्यांची धाकटी सून म्हणून मयुरी घरात आली...

ह्या पिढीमधले शेवटचे लग्न त्यामुळे सूनबाईंचे सर्व कार्यक्रम अगदी जोरात केले बर्वे कुटुंबियांनी... पहिले हळदी कुंकू... काळी साडी, हलव्याचे दागिने आणि ते घालून काढलेले फोटो, सर्व गावाला आमंत्रण... वाडा तर अगदी लग्न असल्यासारखे सजवला होता... रांगोळी.. सजावट सर्व बघण्यासारखे होते... सगळ्या सूनबाई अगदी नखशिंखात नटल्या होत्या...

त्यानंतर आलेला शिमगा, नाचवलेल्या पालख्या सगळे सण मयूरीसाठी नवीनच होते... पण ती पण लाघवी होती... सगळे छान करत होती... पहिला सण म्हणून सर्व ठिकाणी यांच्या जोडीचाच मान होता कारणही तसेच त्यांच्या कुटुंबाला गावात पहिल्यापासुनच खूप मान असे.. उभ्या पंचक्रोशीत त्यांचे नाव होते... पण कोणालाच गर्व, अभिमान नव्हता.. सगळ्यांचे पाय जमीनीवर होते... एकूण काय गुण्यागोंविदाने रहात होते...

गावदेवीची जत्रा झाल्यावर माहेरी गेली...पण तिला तिथे करमतच नव्हते... एवढी छान रूळली होती सासरी... पहिली वट पोर्णिमा, मंगळागौर सगळे अगदी थाटात.... खूप खुश होती ती...

लहान असल्यापासूनच शंकराला खूप मानायची... ती मनात म्हणायची देवाची कृपा म्हणून असे सासर मिळाले मला... खरच सासर माझे भाग्याचे...

श्रावण महिना आला... पहिल्याच शुक्रवारी पूजा घालायची पद्धत होती पूर्वापार... ह्या वर्षी मान ह्याच जोडीला... पूजा आटपल्यावर मयुरीनेच विषय काढला उद्यां नागपंचमी आहे... तयारी केलीच नाही आपण... सगळे एकदम गप्प... सासूबाई ओरडल्याच काही गरज नाही आहे... मयुरी घाबरली तिला हे सगळे अनपेक्षित होते... आजींनी लगेच सर्व सावरायचा प्रयत्न केला...

पण काहीतरी गडबड आहे खरी..मयुरीला जाणवत होते... पण कोणीच उत्तर देईना... काय झाले?? माझे काय चुकले?? मी उद्या पूजा करू शकणार नाही?? पण का?? तेवढ्यात फोन येतो... आईचा आवाज ऐकून तिला भरून येते, आई विचारते झाली का पूजा?? आणि उद्याची तयारी? हे ऐकून ती रडू लागतें, आग आई मी उद्या... तेवढ्यात मंदार आलेला बघून ती फोन ठेवते. तो तिच्यावर ओरडतोच, काय गरज होती आईला सांगायची? आजी तिकडून येताना ऐकतात, मंदारला त्या खूणेनेच गप्प बसायला सांगतात..

आजी प्रेमाने मयुरीला जवळ घेतात अन म्हणतात, बाळ शांत हो आधी, जे घडलं तें तूला अगदीच अनपेक्षित आहे त्यामुळे तूला वाईट वाटतंय.. तुझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत, त्या सगळ्यांची उत्तर मी तूला देईन... आणि तू रे "खबरदार जर तिला ओरडलास तर, तिला काय माहित? आपण सांगितले आहे का कधी?" मंदार मानेनेच नाही म्हणतो...

आजी पुढे बोलू लागतात पोरी ऐक, 'तुझ्या सासुला हा व्हायच्या आधी दोन जुळ्या मुली झाल्या... दोन पिढ्यांनी लक्ष्मी आली घरात म्हणून ह्याच्या आजोबांनी सगळ्यांना बर्फी वाटली... केवढ कौतुक...!!' मोठ्या थाटात बारसं केले होते... आणि थोड्या मोठ्या झाल्यावर आजोबांसोबत जायच्या आपल्या शेतावर, दोघी लाडक्या होत्या... आणि एक दिवस नाग चावून त्या गेल्या तो दिवस नागपंचमीचा होता, आजोबांना हा धक्का सहन झाला नाही, स्वतःला दोषी समजत होते, त्यांना वाट्त होते त्यांनी जर शेतावर नेले नसते तर...त्या वाचल्या असत्या... त्यांनी अंथरूण धरले ते पण गेले महिन्यात... तेव्हापासून आपण नाही पूजा करत नागोबाची...

तुझी सासू एकदम गप्प गप्प राहायची, कुठे जाणं नाही की येणं नाही... मग् दोन वर्षांनी हा तूझा नवरा जन्माला आला बघ... आणि मग् ती हळू हळू विसरून गेली... पण नागपंचमी आली की सगळ्या आठवणी जाग्या होतात पोरी... आजी रडू लागल्या...

मयुरी म्हणाली, "आजी मला माफ करा, आज अनपेक्षितपणे मी तुम्हाला दुखावले..." आजी म्हणाल्या, तुझी काय चूक ग? आमच्याकडूनच तूला सांगायचं राहिले...

मयुरी धावत जाऊन सासूबाईंची माफी मागते, सासूबाई म्हणतात ' वेडाबाई, मीच तुझी माफी मागते, मी असे वागायला नको होते...'

दिवसामागून दिवस जातात पुढे असलेले सर्व सण गणपती, नवरात्र,दिवाळी हे सुद्धा अगदी थाटात होतात... लग्नाला वर्ष होते, लग्नाचा वाढदिवस खूप छान साजरा करतात.. त्या दोघांना सरप्राईज म्हणून 8 दिवस बाहेर फिरायला जायचे बुकिंग करून देतात घरातले सर्व...
मयुरीला आता घरातल्या बऱ्याच गोष्टी माहीती पडत जातात.. सगळे व्यवस्थित सुरू असते.. गोड बातमी येते, खूप कौतुक सुरू होते तिचे, त्यात डॉक्टर सांगतात जूळे आहे मग् काय आजी, सासूबाई, काकी सासूबाई, मोठ्या दोन जाऊबाई तिची खूप काळजी घेतात, मोठ्या थाटात तयारी करतात सगळी डोहाळजेवणाची.. मयुरी खूप खुश असते... कार्यक्रम अगदी नेहमी प्रमाणे मस्तच होतो...

तारिख जवळ येते, श्रावण महिन्यात त्यांची पूजा घाईने घालून घेतात, दोन दिवसांनी नागपंचमी असते, मयुरीला सगळ्या गोष्टी आठवतात... ती देवाला नमस्कार करून बोलते, सर्व व्यवस्थित कर रे महादेवा....!!

नागपंचमीच्या दिवशीच हीच पोट दुखू लागतें, बाप रे आता काय करायचं? ती आजींना सांगतें मला त्रास होतोय पण...आज नागपंचमी आहे.. आजी म्हणतात, आग पण काय जन्म आणि मृत्यु कोणाच्या हातांत असतो का?? थांब मी मंदारला बोलावते...लगेच हालचाल होते, तिला दवाखान्यात नेले जाते.. डिलिव्हरी होते, दोन मुली जन्माला येतात... आजी अख्खं घर डोक्यावर घेतात, माझ्या ताई- माई आल्या... आग साखर वाटा.. तोंड गोड करा... लक्ष्मी आले...

सगळे दवाखान्यात येतात, सासूबाई खुश असतात... त्यांना बघून मयुरीला समाधान मिळते ती काहीच बोलत नाही... त्या पण सांगतात सगळ्यांना माझ्या लेकी परत आल्या... माझ्या मुली आल्या.... सगळे कौतुकाचा वर्षाव करतात... बारसे होते... त्यांच्या पैंजणाचा आवाज ऐकून जणू वाडा तृप्त होतो... मंदारच्या आईचा तर आनंद गगनात मावत नाही...

आपल्या दोन नातींमध्ये त्या आपल्या मुलींना बघत असतात, त्यांच्यासोबत बालपणात रमताना आपल्या मुलींच्या आठवणी त्या परत जगत असतात... त्या दोघी  आता वर्षाच्या व्हायला येतात... मयुरी मनात म्हणते, नागपंचमीलाच ह्यांचा वाढदिवस येतो आणि घरात तर... ती खूप अस्वस्थ होते.. या विचाराने.. मुलींचा आज तिथीने पहिला वाढदिवस आणि या घरात सर्वाना त्रास देणारी ती दूःखद आठवण.. कसा मेळ घालू? मला कोणाला परत दुखवायचे नाही..

तेवढ्यात काकी सासूबाई तिला बोलवायला येतात.. आग अशी काय बसलेस.. चल आवरून बाहेर ये.. नागोबाला पूजायला.. मयुरीला विश्वास बसत नाही.. ती बाहेर येऊन बघते तर काय सासूबाई स्वतः सगळी तयारी करत असतात.. दोन नातींना सोबत घेऊन.. तीच्यासाठी हा धक्का अगदी अनपेक्षित असला तरी सुखद असतो.. तिला खूप आनंद होतो.. ती लगेच आवरून येते.. मनोमन आभार मानते महादेवाचे..

सगळ्याजणी मिळून पूजा करतात... सासूबाई नागोबाची माफी मागतात..  एवढ्या वर्षांनी बर्वे कुटुंबात नागपंचमी साजरी होते.. मयुरीला ही नागपंचमी मात्र अनपेक्षित असली तरी खूप आनंद देऊन जाते...

कशी वाटली कथा? आवडली असेल तर तुमच्या कंमेंटमधून     सांगा...
अजून  लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे त्यामुळे लेख नक्की शेअर करा पण नावासहीत..

© अनुजा धारिया शेठ
२६/०७/२०२०
 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...