.jpg)
धडक [शतशब्दकथा]
"तुला बोलावलंय ढोल्यानं, ऑफिसात."
दिग्याच्या बोलण्यानं मी वहीतनं वर बघितलं तसं पलिकडच्या रांगेतल्या प्राचीकडे लक्ष गेलं. नजर भिडताच तिनं फणकाऱ्यानं मान फिरवली.
ढोल्या !
शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचीचे वडील. पोटात भितीनं गोळा आला. काल संध्याकाळी तिला 'आय लव यू' लिहीलेलं. आता चांगलीच खरडपट्टी निघणार आणि उद्या आप्पांनाही बोलावून घेणार.
आप्पा ! डोळ्यांसमोर काजवे चमकल्यागत माझा सुजलेला गाल मला दिसला.
प्राचीचा राग आला.
..पण धडक तर घ्यावीच लागणार...
"आत येऊ, सर ?"
ढोल्यानं चष्मा सावरत 'ये' म्हटलं.
"आनंदा, परवा अमृतवाहीनीतल्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी प्राचीसोबत तुला निवडलंय."
हुश्श !
"जो मेरी मंजिलोंको जाती हैं
तेरे नाम़की कोई सड़क हैं ना"
'दोघांच्या धडकनीनं' स्पर्धा जिंकली होती !
―र।हुल ०३/०९/२०१९