त्रस्त गृहिणी भाग अकरा
माझ्या परिचयातले एक स्नेही आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि चिंधी पासून चौका पर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांचं सतत विचार मंथन सुरू असतं, आणि समाज माध्यमांवर किंवा इतर कुठल्याही बाबतीत जरा काही खुट्ट झालं की ते स्वतःचं कुणीही फारसं महत्त्व देत नसलेलं, अमूल्य मत सगळीकडे नोंदवत असतात. बरं यांची विशेषता म्हणजे ते स्वतःला जागतिक समस्त गरीब नवरे संघटनेचे स्वयंघोषित संस्थापक अध्यक्ष म्हणवतात आणि प्रत्येक घरातल्या पुरुषाला त्यातल्या त्यात नवरा या जमातीला ते गरीब नावाने संबोधतात, तर घरातील प्रत्येक स्त्रीला विशेषतः नवऱ्याच्या बायकांना ते श्रीमंत अशी उपाधी लावतात. त्यांच्या या सृजनशील तेच मला नेहमीच कौतुक वाटतं.
तर त्यादिवशी नेमकी या अध्यक्ष महोदयांनी एक जाहिरात पाहिली आणि माझ्याकडे येऊन तावातवाने स्वतःची कैफियत मांडली.
“धान्याची अवजड पोती पुरुष उचलणार, गॅसचे भरलेले सिलेंडर खांदा, मानेवर पुरुष तोलणार, किराणा सामानाच्या अवजड पिशव्या दुकानातून कारपर्यंत पुरुषच उचलणार, कारही पुरुषच चालवणार, परत त्या अवजड पिशव्या घरात बिचारा गरीब प्राणीच नेणार, पण तरीही पाठ दुखी, कंबर दुखी, अंगदुखी करिता असलेल्या समस्त जाहिरातींमध्ये घरातली थकली भागलेली गृहिणीच भाव खाणार? हे अजिबात योग्य नाही हो वहिनी!” ते सदृहस्थ स्वतःची कैफियत माझ्यासमोर दीनवाणीपणे मांडत होते.
त्यांचं हे म्हणणं मलाही रुचलं होतं पण पटलं नव्हतं. मी त्यांना म्हटलं, “भाऊजी तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे पण मी काय म्हणते, केवळ अंगदुखीच्या जाहिरातीमध्ये पुरुषांवर अन्याय झाला, म्हणून तुम्ही स्वतःच्या जीवाला एवढा त्रास करून घेऊ नका. जाहिराती म्हणजे काही अंतिम सत्य नव्हे.
“असं कसं! शेवटी जाहिराती म्हणजे आपल्या समाजाचा आरसा असतात.” गरीब संघटनेचे अध्यक्ष.
“तरीही मला हे जाहिराती वाल्यांचं वागणं अजिबात पटलेलं नाही. नेहमी ते पुरुषांवर अन्याय करतात.” बाजूलाच नवीन राहायला आलेला नवविवाहित नवरा या महोदयांना दुजोरा द्यायला लागला.
“दादा तुम्ही अगदी बरोबर बोललात, ते हार्पिकवालं तेवढं पुरुष दाखवत्यात,पुरुषांना कुठं खाज येत असेल तर त्या जाहिरात मध्ये घेतात किंवा मग ध्वतीयोग चूर्ण, इनो यांसारख्या जाहिरातीत घेतात. गरिबांवर बिचाऱ्या पुरुषांवर सगळीकडे अन्याय.”
हे दोन गरीब संघटनेचे खंन्देशीलेदार तावातवाने असं काही बोलत असताना, समस्त श्रीमंत स्त्रीवर्ग गप्प कसा बसेल? लगेच एक स्त्री मुक्ती चळवळीत हिरहिरीने भाग घेणारी माझी मैत्रीण तावातवाने बोलली,”मग काय तुम्हाला संतूर,लक्स बाबा दाखवायचे?”
“हो त्यात काय वाईट... असतात पुरुष सुद्धा सुंदर!” इति नवविवाहित नवरा.
“हो खरतर कोणताही प्राणी बघा त्यात पुरुष (नरच) सुंदर असतो. मोर, सिंह.” गरीब संघटनेचे अध्यक्ष.
“पुरुषांच सौदर्य बॉडी बिल्डर, उंच, धिप्पाड, रांगडा, ताकदवान, ताकदीची कामं सहज करणारा.”स्त्रीमुक्ती चळवळीची कार्यकर्ती.
आता पुरुषांचं एवढं छान वर्णन केलं म्हणजे बघा त्यांचं शरीर सौष्ठव, ताकद, धिप्पाड, उंच तरीही त्या नवविवाहित नवऱ्याचं समाधान झालं नाही. त्याने परत स्वतःच टुमणं लावलं.
“ ही व्याख्या चुकीची आहे...
कमकुवत असणारे म्हणजे अंगकाठी बारीक असणारे तर काही लठ्ठ पुरुष पण तितकेच सुंदर असतात..
कमकुवत असणारे म्हणजे अंगकाठी बारीक असणारे तर काही लठ्ठ पुरुष पण तितकेच सुंदर असतात..
प्रेमात असलेल्या पुरुषाच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो येत असतो.. त्यामुळे पुरुषांचे चेहरे पण सुंदर असतात…झालंच तर पांडवांमध्ये भीम धिप्पाड होता म्हणून हिडिंबा त्याच्यावर भाळली.” या वाक्यावर मी महत् प्रयासाने माझे हसू दाबले.
“नकुल तर नाजूकही होता आणि सुंदरही!” आता या नवविवाहित नवऱ्याला सुसंस्कृत शब्दात समजून सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. मी माझं ठेवणीतलं शस्त्र बाहेर काढलं.
“शाहरुख खान आणि जॉन अब्राहम फेर अँड हॅन्डसम ची जाहिरात करतो.
‘मेन विल बी मेन’ ती पण जाहिरात विसरू नका.
‘खूप जमेगा रंग जब मील बैठेंगे तीन यार’ यावर तुमचं काय म्हणणं आहे?
बोलो जुबां केसरी, कियारा, दीपिका कोणीही म्हणत नाही.
हां आता धक धक गर्ल आणि ड्रीम गर्ल, पाणी शुद्धीकरणाच्या उपकरणाची जाहिरात करतात. शिवाय मच्छर, झुरळं, लादी पुसण्याचे लिक्विड या जाहिराती पण महिलाच करतात. कारण त्यांच्या अंगी उपजत स्वच्छतेचा गुणधर्म असतो.
च्यवनप्राश, रिवाईटल, डोकेदुखी साठी सारीडान, कधी कधी तर साड्यांची जाहिरात पण......... सुंदर शरीरयष्टीचे पुरुषच करतात.
चाळीशी नंतर थकलेले पुरुष एक विशिष्ट औषध घेतात. ज्या मधे सुवर्णभस्म असतं आणि त्याने घोड्याची ताकद येते.
बरं सासूचे, नंणदेचे, नवऱ्याचे टोमणे ऐकून, कामवालीची दांडी सहन करून स्त्रिया मात्र मुलांना शाळेत पोहोचवतात पण ऍसिडिटी मात्र पुरुषांची वाढते. ते कसं काय? बरं पुरुषांची ही वाढलेली ऍसिडिटी कमी करण्याकरिता एखादं लिक्विड किंवा एखादा सोड्याचा प्रकार घरातली आई, काकी, मामी, मावशी,आजी किंवा आत्याच देते. याचा अर्थ लहानपणापासून स्त्रियांना घरेलू नुस्के माहिती असतात.
मला सांगा घरातला करता पुरुष गहू निवडताना, भाजी तोडताना, गॅसचा ओटा पुसताना, मशीनला कपडे लावताना, झालंच तर डस्टिंग करताना बरा दिसेल का?????
बर ते जाऊ द्या, घरातली कामवाली बाई सुद्धा एखाद्या ब्रँडची सुगंधी विलायची खाऊन किंवा इतर तत्सम तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कधीही म्हणत नाही की मी दोन मिनिटात तंबाखूची फक्की मारली आणि मला लादी पुसायला, भांडी घासायला, कपडे धुवायला दहा हत्तींचे बळ आलं.”
माझ्या या वाक्यावर आजूबाजूला स्मशान शांतता पसरली.
‘किंवा एखादा गरीब माणूस(नवरा) घरातल्या श्रीमंत वर्गाला(बायकोला) असं अजिबात सांगत नाही की 'या कंपनीचा किंवा त्या ब्रँडचा आटा किंवा गव्हाचं पीठ आणं बरं का! त्या पीठाने पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत तर होतातच पण मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि त्यांना ताकदही मिळते.
दुधात टाकून कुठली शक्तीवर्धक भुकटी द्यायची ते सुद्धा आम्ही स्त्रियाच ठरवतो. त्यामुळे भाऊजी एक गोष्ट तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवा, की घरातील समस्त मंडळींचा आरोग्य आम्हा स्त्रियांमुळेच टिकून आहे. काय?”
त्यावर ते भाऊजी आणि तो नवविवाहित नवरा काही न बोलता मुकाट आपापल्या घरी गेले.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर
सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा