Login

जी गाठ सुटू शकते,तिथे कात्री लावायची गरज काय?

story revolves around a couple who is disturbed due to suicide of one of thier teacher

"काय?'' असं जवळजवळ किंचाळतच सुनीताच्या हातातून फोन खाली पडला. तिचा आवाज ऐकून माधव धावतच बेडरूम मधून बाहेर आला.बघतो तर सुनीता खाली बसून अगदी स्तब्ध झाली होती, तिचे हातपाय थरथरत होते, डोक्यावर दोन्ही हात ठेवून ती एकटक शून्यात बघत होती. फोन वरून समोरचा हॅलो हॅलो करत होता पण सुनीताला कसलेच भान राहिले नव्हते.

माधवने धावतच जाऊन तिला सावरले, तिला गदागदा हलवत विचारू लागला," काय झालंय सुनीता? कुणाचा फोन होता? सगळं ठीक आहे ना?" पण सुनीता काहीच बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती. माधवने तिला उठवून खुर्चीवर बसवले आणि पाणी पाजले.तिचा फोन उचलून बघितलं तोवर फोन कट झाला होता पण त्याला सध्या सुनीताला सांभाळणे जास्त महत्वाचे होते म्हणून त्याने फोन कुणाचा होता हे बघितलंच नाही.

तो वारंवार तिला विचारत होता, आता त्यालाही भीती वाटायला लागली होती, सुनीता जोरजोरात रडत होती आणि तो तिल समजावत होता.अखेर खूप वेळाने ती बोलती झाली.तिने माधवला सांगितले, रीनाचा फोन होता.रीना त्यांची कॉलेजची मैत्रीण..कॉलेजमध्ये हे सगळे एकाच गृपमध्ये होते. रीनाने सांगितले की त्याचे कॉलेजचे रानडे सर, जे त्यांना चार वर्ष शिकवत होते त्यांनी आत्महत्या केली.हे ऐकून माधवलाही धक्का लागला.

रानडे सर,जे दिसायला अगदी साधारण पस्तीस छत्तीस वय असावं..पहिल्यांदा बघणाऱ्याला खूप कडक स्वभावाचे वाटावे असं व्यक्तिमत्त्व पण मनाने खूप साधे, सरळ..जितके चांगले शिक्षक तितकेच चांगले व्यक्तीही.सामाजिक बांधिलकी जपलेले..मुलींच्या शिक्षणासाठी दिवसरात्र झटणारे..गरजू मुलींना फ्रीमध्ये शिकवायचे.कुणालाही मदत करायला तत्पर..

माधवचेही डोळे पाण्याने तरळले कारण शिक्षकही आपल्या यशात तितकेच भागीदार असतात पण सुनीताला खूपच धक्का बसला होता. ते दोघेही एकमेकांना सावरत होते. सुनीताने पुढे सांगितलं की ते चार दिवसांपासून घरातून गायब होते आणि आज अचानक नदीकाठी त्यांचा मृतदेह सापडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते गायब होण्याआधी त्यांनी social media वर एक पोस्ट टाकली होती, ज्यात त्यांनी लिहलं होतं की ते लोन कंपनी वाले या कोरोना मुळे दिलेल्या हफत्यांच्या सुटवर भरघोस व्याज लावताय आणि रोज धमक्यांचे फोन, मेसेजेस कधीकधी घरीही येऊन तमाशा करतात तर सर्वसाधारण लोक या परिस्थतीतून जाताय त्यांच्यासाठी सरकारकडून काहीच मदत होऊ शकत नाही का?????..

ती पोस्ट वाचून सुनीताला वाटले की सर खूप तणावाखाली असावे म्हणून तिने त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्नही केला पण त्यानी उत्तर दिलं नाही.  सुनीताला आतून कुठेतरी वाटत होतं की सरांशी बोलणं व्हावं म्हणून तिने त्या रात्री प्रयत्नही केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा पण त्यानंतर ते फोन बंद करून निघूनच गेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे काही पारिवारीक वादविवादही खूप टोकाला गेले होते तेव्हाही ते असेच social media वर पोस्ट टाकून गायब झाले होते पण तेव्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाचवण्यात यश आले होते हेही माधवला आठवले.

माधव आणि सुनीता आता फक्त शांत बसून विचार करत होते की काय इतकं बिघडलं असेल, त्यांच्यामागे त्यांच्या परिवारातील सदस्यांचे काय, त्यांच्या दोन लहान मुलांची काय चूक की ते पोरके झाले, इतका टोकाचा निर्णय घ्यायला धाडस कसं केलं असेल त्यांनी? त्यांच्यासारख्या जबाबदार आणि कर्तृत्ववान माणसाने असा निर्णय का घेतला असेल?
पण आता सगळं संपलं होतं आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी इतकीच प्रार्थना ते दोघे करत होते.

वरील कथेचा विचार केला असता मलाही खरंच प्रश्न पडला की जीवन खरंच इतकं स्वस्त झालंय का? समाजातील प्रतिष्ठित आणि सन्माननीय लोक असे का वागताय?पण मला वाटतं कोणतंच संकट इतकं मोठं नसेल की त्यात आपण आपलं जीवनच संपवावे. प्रत्येक अडचणीला मार्ग आहेच गरज आहे तो शोधण्याची आणि हिम्मत न हरण्याची. मान्य आहे ज्याचे त्याचे प्रॉब्लेम्स ज्याला त्याला माहित असतात, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते तणाव सहन करण्याची पण तरीही माझं ठाम मत आहे की आत्महत्या मार्ग नाहीच..

सध्या टीव्हीवर रोज आत्महत्या आणि कोरोनाच्या बातम्या झळकत असल्याने आधीच सगळीकडे एक निराशेचं वलय तयार झालंय. तथाकथित हिरोचं आत्महत्या प्रकरण तर मीडियाने इतकं उचलून धरलं की टेन्शन असणाऱ्या प्रत्येकाला वाटतंय की हे डिप्रेशन आहे आणि यातून आता काही मार्ग नाही किंवा इतके मोठे सेलिब्रिटी हारलेत तर आपण तर सामान्य माणूस ...

पण तरीही हिम्मत न हारता यातूनही मार्ग काढवाच लागणार आहे.. मुळात जीवन याचेच नाव आहे. इथे रोज नवीन संकट येणारच, जीवन परिक्षा घेणारच पण प्रत्येक वेळी शस्त्र  टाकण्याआधी एकदा लढून तर बघा.. आणि मुळात जी गाठ सुटू शकते तिथे कात्री लावायची गरजच नाही.

हा लेख वाचून एकाही व्यक्तीचं मतपरिवर्तन झालं तरी मी समजेल की माझा हेतू सफल झाला.

माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो करा. लेख आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा.