Login

जरा थांब ना

It's Beautiful Love Story Of A Guy Ruturaj Full Of Attitude And a Very Simple Cute Girl Duhita. How Life Twists Like roller Coaster And They Depart.. And How They Meet Again Is The Story "JARA THAMB NAA"
जरा थांब नाऽ!-1
@राधिका कुलकर्णी.


आजही तसाच पाऊस कोसळत होता. ऑफिसमधून घरी पोहोचता पोहोचता दूहीताला पावसाने गाठले. धावतपळत दार उघडून ती घरात आली. ओलेते केस मोकळे करून एक कडक कॉफीचा मग घेऊन आपल्या बाल्कनीत उभी राहिली. असा पाऊस कोसळायला लागला की तिच्या मनात काहूर उठायचं. नकळत मन भूतकाळात डोकवायचं आणि डोळ्यावाटे पाझरायला लागायचं.

‘का? का केलं त्याने असं? मला न सांगता असा कुठे निघून गेला हा?’

आजही पावसाकडे बघून ती पुन्हा त्याच प्रश्नांचा मागोवा घेत 15-20 वर्ष मागे गेली.
त्याच गोड, गुलाबी तारूण्यात, जेव्हा ती फक्त 18 वर्षांची नुकतीच कॉलेजच्या प्रथम वर्षात होती. चलचित्राप्रमाणे तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तरळू लागला.

वीस वर्षांपूर्वी…….

दूहीता झपझप पावले टाकत सिंहगडाच्या पायऱ्या चढत होती. सगळ्यांना मागे टाकत ती आता बरीच पुढे आली होती. एका कड्याशी ती तिथलं सृष्टीसौंदर्य आपल्या नजरेच्या कॅनव्हासवर टीपत उभी राहिली. त्या उंचीवर दरीतून येणारे वारे घोंघो आवाज करत साद घालत होते. सोबत आणलेल्या कॅमेरात ते सौंदर्य टीपण्याचा मोह आवरला नाही दूहीताला आणि ती थोडं अजून पुढे सरसावून ॲंगल चेक करू लागली आणि वाऱ्याच्या तीव्र झोक्याने तिचा तोल ढळला. पायाखालचा दगड सरकून ती दरीकडे कलली. तिने डोळे गच्च मिटून घेतले. इतक्यात कोणीतरी तिला बळकट पकडीने आपल्याकडे खेचून घेतले. तिचा ऊर अजूनही धपापत होता. तिने हलकेच डोळे किलकीले करून बघितले आणि ती बघतघ राहिली.
कॉलेजच्या समस्त मूली ज्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्यासाठी उसासे सोडतात, त्याने एक वाक्य तरी आपल्याशी बोलावं म्हणून त्याच्या आगेमागे करतात तो सगळ्यांचा हार्टथ्रोब तिच्यासमोर तिला आपल्या बलदंड हाताने खेचून धरून ठेवला होता. तिला भानावर यायला दोन मिनिट लागले. आपण स्वप्नात तर नाही ना! असा विचार करत तिने स्वतःला त्याच्या बाहूपाशातून दूर करत बाजूला जाऊन बसली. त्याने आपल्या सॅकमधून पाण्याची बाटली काढली आणि तिच्यासमोर धरली. तिने दोन मिनिटांत गटागटा सगळे पाणी संपवले. आता ती थोडी स्थीर झालेली पाहून ऋतूराज तिला तिरकसपणे म्हणाला,

“ एवढा जीव उदार झालाय तर इतका गड चढायची तसदी तरी कशाला घ्यायची, तिथून खालच्या बाजूला एक उडी टाकली असतीस तरी काम झालं असतं.”

त्याचं ते कुजकट बोलणं तिला समजूनही ती काहीच बोलली नाही. कारण आज ती सातव्या आसमानात विहरत होती. आता सगळ्या पोरींना खिजवायला तिच्याकडे एक न्यूज होती आणि ती त्याच खुशीत त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती.

“पाणी संपलय, आता बाटली पण गिळणारेस का?”

‘सगळं चांगलय पण हा इतका कुजकट कसा! ह्या एका गुणाने माती केलीय ह्याची! कोण समजतो काय माहीत स्वतःला!’

स्वतःच्या मनाशीच चाललेल्या संवादात ती इतकी मशगूल होती की त्याने हातातली बाटली कधी खसकन ओढून घेतली तिला कळलेच नाही. त्याच्या बाहूपाशात असण्याच्या आनंदाच्या परमोच्च शिखरावरून त्याने तिला खसकन जमिनीवर आणून टाकलं होतं. आपली बाटली झाकण लावून त्याने बॅगमध्ये ढकलली आणि तिकडून निघून गेला लांब ढांगा टाकत आणि दूहीता मात्र त्याच्या भुरूभूरू वाऱ्यावर उडणाऱ्या सोनेरी कुरळ्या केसांतच अडकून पडली.

“आता चल पुढे, का पुन्हा मरायचा विचार आहे? ”

तो लांब जाऊन मागे वळत तिला ओरडला आणि ती भानावर आली.

“पुन्हा आश्चर्य. हा खरंच मलाच बोलावतोय!”

ती पळत पळत अंतर कापत त्याच्याजवळ पोहोचली तसा त्याने त्याचा वेग वाढवला. त्याची ती डोळ्यात भरणारी उंची, गोरा वर्ण, मजबूत रूंद खांदे, बदामी डोळे. उफ्फ! सगळेच मार डाला!
हे सगळे मनात चाललेले. पण बोलणं किती खडूस आणि किती तो ॲटिट्यूड! हा माज रूबाबदार दिसण्याचा आहे की त्याच्या हुशारीचा!
कळत नाही.
ती विचारात गुरफटली की चाल मंदावायची आणि तो पुढे जाऊन पुन्हा तिला आवाज देऊन बोलावून घ्यायचा.

पुर्ण कॉलेज टीममध्ये फक्त हे दोघेच पुढे आले होते. बाकी लोक दूरदूरपर्यंत दिसत नव्हते.

‘कदाचित तो नसता तर मगाशी आपलं काय झालं असतं!’

नुसत्या विचारानेच तिच्या काळजाचा थरकाप उडाला. म्हणून तर ही काळजी घेणं नसेल ना! आता परत काही घडलं तर कुणी मदतीला पण येणार नाही म्हणून नकळतपणे तो तिची काळजी घेत होता. त्याचा तो वरून काटेरी मुलामा आणि आतली काळजी मनाला फारच स्पर्शून गेली दुहीताच्या.

थोडे अंतर सोबत चालल्यावर आता जरा भीड चेपली तसा तिने त्याला तोच मनातला प्रश्न विचारला,

“काय रे, नेहमीकरता असाच असतोस का तू?”

तिचा प्रश्न न समजून चमकून त्याने तिच्याकडे बघितले आणि विचारले,

“म्हणजे?”

“अरे म्हणजे हे इतकं खडूसपणे वागणं नेहमी असंच असतं की व्यक्तीसापेक्ष?”

त्याच्या चेहऱ्यावर इतक्या वेळाने एक हलकेसे स्मित पसरले,

“तुला काय वाटतं?”

“हा मला वाटायचा प्रश्नच नाही. मी तुला विचारतेय आणि तू प्रश्नाला प्रतिप्रश्न काय विचारतोय?”

“हम्म!”

ती विस्फारल्या नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली,

“बसं, इतकंच, हम्म! झालं?”
इतका ॲटीट्यूड नेमका कशासाठी बाळगून आहेस?
खूप हॅण्डसम आहेस म्हणून की कॉलेज टॉपर आहेस म्हणून?”

“तुला काय वाटतं?”

“परत प्रश्न?”

आता थोडंसं स्मित करून तो बोलू लागला.

“सगळ्यात पहिले थॅंक्स फॉर द कॉम्प्लिमेंट! पण कसेय ना, हुशारी आणि सुंदर दिसणं ह्या दोन्हीत माझं काहीच कॉन्ट्रीबिशन नाही असं मी मानतो त्यामुळे त्याचा माज करण्याचा प्रश्नच उरत नाही. आता तुझ्या प्रश्नाचं खरं उत्तर - जगात कुठलीही गोष्ट सहज मिळाली की त्याची किंमत करत नाहीत लोक. म्हणून आपली किंमत आपणच करायची. मी माझी किंमत करतो म्हणून लोक पण मला भाव देतात.

“म्हणजे?”

तिने जरा चक्रावूनच विचारले.

“म्हणजे असं की, समजा मी इतका ॲटिट्यूड दाखवतो, खूप मिजासखोर आहे अशी प्रतिमा नसती तर कदाचित आत्ता मी तुझ्याशी हा जो काही संवाद करतोय किंवा मगाशी तुला पडताना वाचवलं ह्याचं तुला अप्रूप वाटलं नसतं. आज मी तुझ्यासोबत वेळ घालवला हे सांगताना तुला असं नसतं वाटलं की आपण खूप काही अचिव्ह केलंय. मी जर असा आल्यागेल्या प्रत्येकाशी मैत्री करत असतो तर आत्ता तुला जे वाटतेय की आपण खूप लकी तो फिल तुला आला नसता, नाही काऽ?
मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळाले असेल.”

“ह्यात तुला अहंकाराचा दर्प नाही जाणवत?”

“जो तुला अहंकार वाटतो तो मला माझ्याबद्दलचा आत्मविश्वास वाटतो.”

जरावेळ ती अंतर्मुख झाली. तिला अजुनही त्याची गोष्ट पचनी पडत नव्हती. पण त्याच्याशी वाद घालून काय मिळणार आहे? असेही ही काही वेळेपुरतीची सोबत आहे. त्यानंतर तो त्याच्या मार्गे आणि मी माझ्या. मग कशाला वाद घालायचा? असं म्हणत ती शांत झाली.

“काय अचानक शांत झालीस? प्रश्न संपले की उत्सुकता?”

त्याने विचारले.

“तुला काय वाटतं?”

त्याने विस्मयचकित नजरेने तिच्याकडे बघितले..

—------------------------------------------------------------
क्रमशः -1

दूहीता त्याच्या प्रश्नावर काय उत्तर देते? ह्या इतक्या खडूस ऋतूराज आणि गोड लाघवी दूहीता ह्यांचा अनोळखी प्रवास पुढे प्रेमाच्या गावी पोहोचतो का आणि कसा?
हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.


🎭 Series Post

View all