गौतम बुद्धांच्या गोष्टी
गुलाम
एक माणूस बुद्धाच्या अंगावर थुंकला. बुद्धाने शांतपणे आपल्या वस्त्राने ती थूंकी पुसली आणि अगदी मनातल्या मनातही क्रोधित न होता अगदी सहजपणे विचारले, "आणखी काही सांगायचे आहे?"
तो मनुष्य एकदम बावरला, आणि काय उत्तर द्यावे ते त्याला सूचेना. त्या माणसाला वाटले होते, की बुद्ध काही प्रतिकर्म करतील, थोडेफार रागावतील, का थुंकलास असे काही विचारतील, आणि असे काही घडले, की काय प्रत्युत्तर द्यायचे ते मनाशी ठरवून तो आला होता पण असे काहीही न घडल्याने तो बुचकळ्यात पडला, काय करावे हे त्याला सुचेना, आणि एकदम तो बुद्धांना म्हणाला,"हे तुम्ही काय विचारतां?"
बुद्ध म्हणाले,"मी बरोबर विचारले, तुम्हाला दुसरे काही सांगायचे आहे का?"
तो मनुष्य म्हणाला, "मी तुम्हाला काहीच सांगितले नव्हते. केवळ तुमच्यावर थुंकलो."
बुद्ध म्हणाले,"तुम्ही थुंकलात पण मला वाटले तुम्ही मला काही विचारले, कारण थुंकणे ही पण काही सांगण्याची एक रीत आहे. कदाचित तुमच्या मनात इतका राग आलेला होता की जो तुम्ही शब्दात व्यक्त करु शकला नाहीत, म्हणून तुम्ही एक शब्दही न बोलता थुंकण्याद्वारें तो राग प्रदर्शित केलात. मी पण कित्येक वेळा खूप काही सांगू इच्छितो, पण जेव्हा ते शब्दांनी प्रगट करता येत नाही, तेव्हा ते काही इशाऱ्यांद्वारे सूचित करतो. तुम्ही पण तुमचा भयंकर क्रोध शब्दांनी प्रदर्शित करू शकले नाही, तेव्हा थुंकण्याच्या इशाऱ्याने तो दाखवलात आणि तुमच्या मनातली गोष्ट मला समजली."
तो माणूस म्हणाला, "तुम्ही काही समजलं नाही मला तुमचा फार राग आला होता तो मी दाखवला."
बुद्ध म्हणाले, "मी बरोबर समजलो. तुम्हाला माझा राग आला होता, तो तुम्ही थुंकण्याद्वारे प्रकट केला."
तो माणूस म्हणाला, "मग तुम्ही माझ्यावर क्रोधित का झाला नाहीत?"
बुद्ध म्हणाले,"तुम्ही काही माझे मालक नाही. तुम्हाला माझा राग आला तो दाखविण्यासाठी आणि मला भडकवण्यासाठी. तुम्ही माझ्यावर थुंकलात म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे मी भडकलो तर मी तुमचा गुलाम ठरेन. मी काही तुमच्या इच्छेप्रमाणे वागणारा, तुमच्या मागोमाग चालणारी तुमची सावली नाही. तुम्हाला क्रोध आला तुम्ही तो दाखवलात. आता, मी काय करायचे ते ठरवणारा मी स्वतंत्र आहे. मला जे करायचे ते मी करीन."
भगवान बुद्धाने काही केले नाही, ते रागावले नाही, थुंकी पुसून टाकली, हे पाहून तो माणूस निघून गेला.
दुसऱ्या दिवशी तो माणूस बुद्धांची क्षमा मागावायास आला, त्यांच्या पाया पडला आणि रडू लागला.
त्या माणसाने डोके वर करून रडत रडत बुद्धांकडे पाहिले.
बुद्ध म्हणाले, "आता आणखी काही सांगायचे आहे?"
तो माणूस म्हणाला, "आपण हे काय विचारता?"
भगवान बुद्ध म्हणाले,"मला सगळे काही समजले. तुमच्या मनातला पश्चाताप भाव इतका तीव्र झाला आहे की, तो तुम्ही केवळ शब्दांनी व्यक्त करू शकत नाही, म्हणून डोळ्यांत पाणी आणून आपले मस्तक माझ्या पायावर ठेवून इशाराने तुम्ही तो व्यक्त केला बरोबर ना? कालही तुम्ही मला काही सांगण्यासाठी आला होता, पण ते व्यक्त करणे शब्दांच्या पलीकडले असल्याने, तुम्ही थुंकीच्या इशाऱ्याने मला सांगून गेलात. आजही तुम्ही मला जे सांगू इच्छित आहात तेही शब्दांच्या पलीकडले असल्याने, आपल्या डोळ्यातील अश्रुं द्वारा आणि मस्तक माझ्या पायावर ठेवून, म्हणजेच खुणांनी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करीत आहात. ते सगळे मी बरोबर समजलो."
तो माणूस म्हणाला,"मी क्षमा मागायला आलो आहे मला क्षमा करा."
बुद्ध म्हणाले,"मी का म्हणून क्षमा करू? मी काल तुमच्यावर क्रोध केलाच नव्हता तर क्षमा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? काल जसे तुम्ही माझ्या अंगावर थुंकलात त्याचप्रमाणे आज माझ्या पाया पडलात. बस तुम्ही स्वतःच आपल्या कृत्याची फिटंफाट केली. त्यात मला काही कर्म करण्याची काय जरूर? मी काही तुमचा गुलाम नाही, की तुम्ही रागावला तर मीही रागवावे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला क्षमा करायची.
बोध- या कथेतून हा बोध घ्यायचा की चांगलं किंवा बरं समोरचा कसाही भागला त्याला प्रत्युत्तर देणार हे सर्वस्वी आपल्याच हाती असते त्याच्या चुकीच्या वागणुकीला प्रतिसाद देऊन आपण त्याचं गुलाम व्हायचं नाही.
**********************************************
ओझं
ओझं
एकदा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य कुठेतरी जात होते. रस्त्यात त्यांना एक नदी लागली. भगवान बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य नदीच्या एका तीरावर उभे होते. त्यांना नदीपार जायचं होतं. तिथे एक सुंदर तरुण स्त्री पण उभी होती. नदीला पूर्ण भरती आलेली होती आणि नदी भरून वाहत होती. त्या सुंदर तरुण स्त्रीला पोहता सुद्धा येत नव्हतं.
तिने विनंती केली,"मला नदीच्या पार जायचे आहे पण मला पोहता येत नाही. आणि तुम्हा दोघांकडे पाहून असे वाटते आहे की तुम्हालाही नदीच्या त्या तीरावर जायचे आहे. तुमच्या दोघांपैकी जर कोणी मला नदीच्या त्या तीरावर पोहोचवलं तर फार उपकार होतील."
गौतम बुद्धांसोबत असलेला शिष्य लाजला, संकोचला. त्याला असं वाटलं, आपण पूर्ण ब्रह्मचर्यचा स्वीकार केला आहे; त्यामुळे सुंदर तरुण स्त्रीला स्पर्श करणे म्हणजे जणू बापच.
पण त्या स्त्रीला मात्र पैलं तीरावर जायचं होतं. त्या स्त्रीची अडचण ओळखून भगवान बुद्धांनी त्या स्त्रीला उचललं, खांद्यावर घेतलं, भरभर चालून नदी पार केली. सुखरूप तिला खाली ठेवलं.
त्या स्त्रीने भगवान बुद्धांना नमस्कार केला. त्यांचे आभार मानले आणि निघून गेली.
शिष्य आणि भगवान बुद्ध त्यांच्या वाटेनं चालू लागले. पण शिष्य च्या मनात मात्र तेच! ती सुंदर स्त्री!!
शिष्याने मनात विचार केला,"आपले गुरु एवढा संसाराचा, मोहाचा त्याग करा, असा उपदेश देतात, पण तरुण स्त्री दिसताच घेतली खांद्यावर, केली तिला मदत नदी ओलांडायला! पण मी कुठे तिची विनंती मान्य केली? मी खरा ब्रह्मचारी. पण खरंच ती स्त्री किती सुंदर होती! तिचे ते मोठे मोठे डोळे, सुंदर आपरे नाक, सुडौल बांधा, काळेभोर लांब केस! त्या स्त्रीचा कल्पनेतच विचार करून त्या शिष्याचे डोळे चकाकले. त्याने परत विचार केला. तिसरी इतकी सुंदर असूनही मी तिला स्पर्श करण्याचा मोह टाळला."
संध्याकाळ झाली. शिष्याला राहावेना. त्यानं शेवटी विचारलचं,
शिष्य म्हणाला, "गुरुवर्य ती बाई……"
भगवान गौतम बुद्धाने विचारलं,"कोणती बाई?"
शिष्य म्हणाला,"तुम्ही जिला खांद्यावर उचलून घेऊन नदी पार केली…….." शिष्य चाचरत म्हणाला.
भगवान बुद्ध ते! ते म्हणाले, "अरे मी त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं होतं खरं! पण तेव्हाच दुसऱ्या काठावर उतरवून दिलं. तू मात्र तिला घेऊन अजूनही फिरतो आहेस. अजूनही ती तुझ्या मनातून उतरली नाही."
बुद्धांचे हे शब्द ऐकून शिष्य ओशाळला.
बोध- या कथेतून दोन बोध घ्यायचे एक म्हणजे नीती आणि ती मनोहर नेत असते कृतीत नव्हे आणि दुसरे घडलेल्या अनेक घटनांची अशी अनावश्यक ओझी आपण तिथल्या तिथं न सोडता मनावर भागवत राहून स्वतःला त्रास तर करून घेत नाही ना हेही तपासायचं.
©® राखी भावसार भांडेकर .
नागपूर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा