Oct 26, 2020
रहस्य

गुपित पत्र-एका अचानक हरवलेल्या मैत्रिणीची कथा(सत्यघटना)

Read Later
गुपित पत्र-एका अचानक हरवलेल्या मैत्रिणीची कथा(सत्यघटना)

 

 

ही गोष्ट आहे साधारण सात वर्षांपूर्वीची..मी इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागले आणि डोंबिवलीत आले. तिथेच एका मुलींच्या होस्टेलला मी राहत होते. अतिशय गरजू मुलींसाठी ते हॉस्टेल अगदी परवडणाऱ्या दरात एक संस्था चालवत होती. सुखसोयी काही खूप नव्हत्या,डोक्यावर छप्पर, एक पलंग, कपड्यांसाठी एक आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी एक अशी दोन छोटी कपाट,चाळीस मुलीत तीन बाथरूम, पाच चार्जिंग पॉईंट पण मुलींसाठी अगदी सुरक्षित असं ठिकाण..

तर तिथे माझी ओळख झाली मेघाशी..लांबसडक केस, सडपातळ बांधा, उंची अगदी साधारण, तरतरीत नाक, गोरा वर्ण, डोळे अगदी तेजस्वी.. बघताक्षणी कुणालाही आवडावी अशीच होती ती. कॉमर्समधे पदवी घेतलेली स्पर्धा परीक्षेची तयारी करत पार्टटाईम नोकरीही करत होती. दोघींच्या आवडीनिवडी सारख्या, चहा दोघींचाही जीव की प्राण, रात्री झोपताना आम्ही दोघीही डायरी लिहायचो, दोघींचंही घर अगदी तीन तासाच्या अंतरावर त्यामुळे दोघीही वीकेंडला घरी पळण्यासाठी उत्सुक, वाचन आमचा दोघींचाही छंद म्हणून लगेच सूत्र जुळलं... पुस्तकांची देवाणघेवाण होत असतानाच विचारांची देवाणघेवाण झाली.. दोन तीन महिन्यातच आम्ही खूप छान मैत्रिणी झालो. मग रात्री फोनवर आवडीचे मूवी बघणं, गप्पा मारणं कधी एकेमकींसोबत सुख दुःख वाटण्यापर्यंत पोहचलं आमचं आम्हालाच समजलं नाही.

नेहमी खुश राहणारी ती, घरची परिस्थती अगदी सदन होती. तिचं प्रेम होतं एक मुलावर, तिच्याच बिल्डींगमधे राहत होता. जात एकच, मुलगा इंजिनीयर, टेलिकॉम कंपनीत नोकरीला होता. दोघांचेही बाबा एकेमेकांचे मित्र होते. घरी सांगितलं त्यांनी दोघांनीही..सगळं व्यवस्थित होतं मग नकाराचा काही प्रश्न नव्हता दोन्ही घरुन लग्नाला होकार मिळाला. पण मेघा त्याच्यापेक्षा पाच वर्षे लहान होती आणि जेव्हा घरी सांगितलं तेव्हा ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. मग दोघेही नोकरीत थोडे स्थिर झाले की लग्न करूया असं ठरलं आणि त्यांचा साखरपुडा पार पडला. तिची प्रेमकहाणी ऐकून अगदीच भारी वाटलं..किती छान झालं सगळं..अगदी परिकथेतली कहाणी, अडचणी आल्या नाहीत. ते ऐकून मला खूप आनंद झाला.

तो अधुमधून तिला भेटायला यायचा.त्याची नोकरी अलिबागला होती मग घरून जाताना तो डोंबिवलीला उतरून तिला भेटून जात असे. सासर आणि माहेर दोन्हीकडचा जेवणाचा डब्बा तो तिला देऊन जात असे. तिचा खूप आग्रह होता की मी त्याला भेटावं पण माझ्या ऑफिसमुळे मला कधी जमलंच नाही.
असंच बघता बघता एक वर्ष निघून गेलं, आमची मैत्री अधीकच निखळ बनत गेली. आता आम्ही एकमेकींचे चेहरे बघून ओळखू शकत होतो की हिच्या मनात काय चालू आहे. या वर्षभरात आम्हाला एकमेकींबद्दल सगळी माहिती असायची पण कधी एकमेकींच्या घरी जाण्याचा योग आला नाही.

मी ऑफिसमधून येताना रोज चहा घेऊन यायचे मग आम्ही खूप गप्पा मारायचो. एके दिवशी मी रोजच्याप्रमाणे चहा घेऊन होस्टेलला आले, बघितलं तर मेघा खूप रडत होती. मी खूप विचारलं तिला पण ती काहीच सांगायच्या परिस्थितीत नव्हती. ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून अगदी लहान मूलासारखी रडली. मीही तिला मनसोक्त रडू दिलं.. मला वाटलं तिला हलकं वाटेल. रात्रभर ती झोपली नाही,सतत कसलातरी विचार करत होती. तिच्या डोक्यावर हात फिरवत मी तिच्या बाजूला बसली होते. रात्री मला कधी डोळा लागला मलाच समजलं नाही. सकाळी जाग आली तर मेघा अगदी फ्रेश दिसत होती, नेहमीसारखी हसत होती. माझ्या आधी उठून अंघोळ वगैरे आवरून ती चहाही घेऊन आली होती. आम्ही सोबत चहा घेतला,मी पुन्हा विचारलं तेव्हाही ती म्हणाली," काही नाही सांगेन नंतर कधीतरी, तू आवर तुला ऑफिसला जायला उशीर होईल."

मला काही समजत नव्हतं पण विचार केला संध्याकाळी निवांत बोलू. मी ऑफिसला निघून गेले,आल्यावर बघते तर मेघाचं सामान होस्टेलला नव्हतं. दोघींसाठी आणलेला चहा माझ्या हातातून खाली पडला. मी धावतच होस्टेलच्या ऑफिसमधे गेले तर मॅडमने सांगितलं दुपारी तिचे आईबाबा आले होते आणि ती हॉस्टेल सोडून गेली. मी तिचा फोन लावत होते पण बंद होता. मला काहीच समजत नव्हतं हे काय चाललंय.

सलग चार दिवस मी तिचा फोन लावत राहिले पण बंदच. तिने हॉस्टेललाही कुणाला काही सांगितलं नव्हतं. मला आता तिची खूप चिंता वाटू लागली होती .मी हॉस्टेलच्या ऑफिसमधून तिच्या घरचा पत्ता आणि तिच्या बाबांचं नंबर घेतला. तिच्या बाबांचाही फोन बंद आला. रविवारी सोबत अजून एका मैत्रिणीला घेऊन मी त्या पत्त्यावर पोहचले तिथेही कुलूप, शेजारी विचारलं तर ते गावी गेलेत असं समजलं.

हताश होऊन मी परत आले. तिच्याशी परत कधीच संपर्क झाला नाही. मी तिला तिच्या मेल वरही खूप मेसजेस पाठवले पण काहीच रिप्लाय नाही,फेसबुक अकाउंट बंद..एक हुरहूर आणि रहस्य मनात ठेवून ती गेली होती. मला खूप पश्चाताप झाला होता मी त्याच दिवशी तिला विचारायला हवं होतं की नक्की काय झालंय. एक दिवस त्याच विचारात असताना माझ्या हातातून माझ्या कपाटाची चावी खाली पडली,त्यात मेघाच्या कपाटाची एक चावी होती. आम्ही दोघींनी खूप आधी एकमेकींना एक अतिरिक्त  चावी बनवून देऊन ठेवलेली होती. मी तशीच उठुन गेले आणि मागचापुढचा कसलाच विचार न करता हॉस्टेलचे नियम मोडत तिचं कपाट उघडलं आणि खरोखर मेघा तिथे माझ्यासाठी काहीतरी ठेवून गेली होती.

तिची डायरी..????मान्य आहे कुणाची वैयक्तिक डायरी वाचू नये पण रिकाम्या कपाटात फक्त डायरी ठेवून ती गेली होती म्हणून मला वाटले की ती फक्त माझ्यासाठी आहे आणि मलाही हे जाणून घ्यायचं होतं की नेमकं काय होत जे ती मला समोर सांगू शकली नाही. मी ती डायरी वाचायला घेतली. त्या डायरीत अगदी तिने तिचं हृदय उघडून ठेवलेलं होतं. तिचे आई वडील, रोजच्या गोष्टी, तिची आणि त्याची ओळख, त्यांचं प्रेम, साखरपुडा, आमची दोघींची मैत्री, त्याच्यावर कविता, माझ्यावर कविता, पावसावर कविता.. काय काय नव्हतं त्यात...तिने तिच्या प्रेमावर, त्याच्यावर लिहलेलं वाचता वाचता मला जगाचा विसर पडत होता.

मी अधाशासारखं भरभर वाचत होते शेवटी मी तारखेनुसार तिथे येऊन पोहोचलेच ज्या रात्री ती खूप रडली होती. काळजात धस्स होत होतं. अक्षर डोळ्यासमोर फिरत होती... माझे डोळे वाहत होते.

मी पान बदललं, त्यावर लिहलेलं होतं माझ्यासाठी एक पत्र...

" Hi मेरी जान,

सॉरी मी तुला न सांगता अशी जातेय, पण माझा नाईलाज आहे. तुला समोर भेटून सगळं सांगायचं होतं पण हे शक्य नाही समजलं म्हणून हे पत्र लिहतेय, तुझ्यापर्यंत पोहचेल की नाही याची खात्रीही नाही पण तुला सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही म्हणून हे  सगळे प्रयत्न..

तू नेहमी म्हणायची ना तुझी लव्हस्टोरी किती छान आहे, काही अडचणी नाहीत पण तसं काही नव्हतं ग.. घरुन खूप विरोध होता आमच्या लग्नाला पण माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर. त्यावेळी काही समजत नव्हतं, त्याच्या प्रेमात आंधळी मी तो जे म्हणेल त्यावर विश्वास ठेवला, आम्ही पळून जाऊन लग्न केलं म्हणून घरच्यांना स्वीकार करावा लागला. समाजासाठी पुन्हा लग्न लावून देऊ पण कुणाला आधीच्या लग्नाबद्दल सांगायचं नाही या अटीवर घरच्यांनी मला बाहेर सोडलं. तुला आठवतंय आम्ही दोघांनी एकदा फोन चेंज केले होते थोडे दिवस, त्यात मला त्याच्या फोनचा बॅकअप मिळाला. त्यात मिळालेले मेसेजेस, फोटो विडिओ बघून मला समजले की घरचे का विरोध करत होते लग्नाला. त्याचे बरेच अफेअर्स होते. त्याला जाब विचारला तर त्यानेही कबुल केलं सगळं आणि त्याला त्याचा काडीमात्रही पश्चाताप नव्हता. उलट तो मलाच ब्लॅकमेल करत होता की पळून लग्न केलंय सांगून समाजात तुझी बदनामी करेल. माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या दिवशी मी खूप रडले, तुला ऑफिसला जाताना सांगितलं नाही ,विचार केला की आल्यावर बोलू..पण तू गेल्यावर पुन्हा ढासळले..नंतर सहन होईना.

काय करावे सुचत नव्हते, आईला सांगितलं. आई बाबा लगेच मला घ्यायला यायला निघाले. मला माहित नव्हतं, पुढे काय होणार आहे,माझ्या पुढ्यात आता काय वाढून ठेवलंय. मी तुला फोन लावत होते पण लागला नाही. खूप राग आला तुझा त्यावेळी, मला त्यावेळी तुझी खूप गरज होती पण तुझ्याशी संपर्क झाला नाही,म्हणून हे पत्र लिहून ठेवलं.

बाबांचा स्वभाव पाहता काहीतरी भयंकर होणार आहे याची मला पुसटशी कल्पना आहे. कदाचित मी पुन्हा तुला कधीच भेटणार नाही. पण आपली ही मैत्री आणि हे रक्ताच्या नात्यापलिकडचे ऋणानुबंध माझ्या आयुष्यभर सोबत राहतील. हे पत्र माझी आठवण म्हणून तुझ्यासोबत कायम असू दे. आयुष्याने संधी दिली तर भेटू परत.

तुझी वेडी मैत्रीण,
मेघा..."

अचानक हरवलेली माझी मैत्रीण मला त्या पत्रात सापडली होती. मोबाईलच्या आधुनिक युगात,काळाच्या ओघात हरवलेल्या पत्राने मला तिची निघून जाण्याची कारणं कळवली होती. ते पत्र आजही मला तितकंच दुःख देतं पण आमची मैत्री किती भक्कम होती याचा पुरावाही देतं.

ती डायरी दुसरं कुणाच्या हाती लागली असती तर? असा विचार माझ्यासारखा तिनेही केला असेलच ना की तिला माझ्यावर इतका विश्वास होता की मी त्या डायरीपर्यंत पोहचलेच. डायरी वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तिने कुठेच कुणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नव्हता. माझाही तिने "जान"म्हणून उल्लेख केला होता ज्या नावाने फक्त तीच मला बोलायची.

खूप दिवसांनी मी पुन्हा त्या पत्त्यावर गेले असता समजले तिचं घर दुसऱ्यांना विकून ते निघून गेले होते. कदाचित तिच्या पर्सनल गोष्टी माहीत असलेल्यांशी संपर्क न ठेवण्याचं तिच्या घरच्यांनी तिच्याकडून वचन घेतलं असावं म्हणून ती मला संपर्क करत नसावी असं मला कुठेतरी वाटतं.

ती कुठे गेली, आता कुठे आहे, कशी आहे मला काहीच ठाऊक नाही पण तिची जागा माझ्या आयुष्यात आजही तशीच आहे रिक्त.. ते माझ्यासाठी आयुष्यात कुणीतरी लिहलेलं पहिलं आणि शेवटचं पत्र होतं..

तिला इतकंच सांगावंसं वाटतं, मी तुला शोधू शकत नाहीये, पण मी तुला विसरलेली नाहीये आणि तुही मला विसरलेली नसणार याची मला पूर्ण खात्री आहे.  जिथे आहेस तिथे आनंदी रहा.
हरवलेल्या पत्रासारखी माझी हरवलेली मैत्रीण नशिबाने कधीतरी माझ्यासमोर यावी एवढीच अपेक्षा.

लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेयर जरूर करा.
(लेख सत्य घटनेवर आधारित फक्त नाव बदलली आहेत.)



©® सुवर्णा राहुल बागुल