Jan 19, 2022
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल भाग आठवा

Read Later
खेड्याकडे वाटचाल भाग आठवा

खेड्याकडे वाटचाल (भाग आठवा)

मी बजाबाला भाऊसाहेबांच्या तटस्थपणाविषयीचं कारण विचारलं पण तो गप्प राहिला. आता पुढे..

शुभ्रा लेकीला घेऊन माहेरपणाला आली. तिची लेक शीतल आता बाळसं घेऊ लागली होती. दुपट्यावर गोलाकार फिरायची. साद घातली की मान वर करुन बघायची न् खुदकन हसायची.चारेक वाजता वासंती तिला 
आंबेहळद,बेसन लावून न्हाऊमाखू घालायची. धुरी द्यायची. 

शुभ्राला आता गावातले लोक मानाने ओळखू लागले होते. तिने गावातल्या महिलांचा गट बनवला होता.  काही संस्थांमार्फत त्यांना कुटीरोदयोगांच प्रशिक्षण दिलं जायचं. स्थानिक उत्पादनं वापरून या महिला पोह्यांचा चिवडा,कुळीथ पीठ,नाचणी पीठ,घावण पीठ, वडे पीठ,हळद,मसाला असे जिन्नस बनवून विक्रीसाठी दुकानांत पाठवायच्या.

शुभ्राच्या माथ्यावरचा अपशकुनी हा शिक्का पुसण्यात ती यशस्वी ठरली होती. तिच्यामुळे बायांच्या हाती पैसा खेळू लागला होता. भिसी काढून बचतही करणं चालू होतं. अडीअडचणीला महिलांना पैसे मिळत होते.

वासंती नि बजाबाची भांडणं बघायला मजा यायची. दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करत. वासंती तर बजाबाला आमचे म्हातारे म्हणूनच हाक मारे. बजाबा व वासंती दोघं जोडीने आठवडी बाजारात जात. या गावात दर मंगळवारी आठवडा बाजार भरे. आठवड्याला लागणारे सगळे जिन्नस गावकरी मोठ्या टोपल्यांतून घेऊन येत. लाल माठ,चवळी,वांगी,भोपळा अशा परसवातल्या गावठी भाज्या घेऊन काही महिला विक्रीसाठी रस्त्याच्या काठाने बसायच्या.

 काही लोकं बांबूपासून रोवळी,झाप, धान्य पाखडायचे सुप,कणगी,डाळी या वस्तुही बनवून देत. जसजशी त्यांची मुलं शिकूनसवरुन मोठी झाली व नोकरीधंद्यासाठी शहरात गेली तसतशी ही कलाही दुर्मिळ होत गेली.

 फावल्या वेळात बजाबा माडांच्या झावळ्यांपासून वाडवणी(खराटे) बनवी. तसेच वासंती दुपारच्या वेळी गोधडी शिवायला बसे. कधी माडाच्या चुडताचं(झावळी) झाप बनवे. पावसाच्या झडीपासून घराचं रक्षण करण्यासाठी ती पावळीला बांधली जात तसंच ओटीबाहेर बांधली जात.  

 शिक्षणाचं महत्व आईवडिलांना कळू लागल्याने मुलामुलींची शाळेतील हजेरी वाढू लागली. मुलांना शिक्षणाची गोडी वाटू लागली.

 भाऊसाहेबांना विचारुन आम्ही वरच्या खोलीतलं सामान गरजूंना दिलं. तो ट्रंकही दिला पण त्यातली जरीकाठाची लुगडी शुभ्राला फार आवडली. तिने ती माझ्या परवानगीने घेतली,सागरगोटेही घेतले. 

शुभ्रा हल्ली एक डायरी वाचण्यात मग्न असायची. तिला ती एका लुगड्याच्या घडीत सापडली होती. दिव्याने एकदा ती सहज चाळली तर त्यात भाऊसाहेबांच्या पत्नीचं आत्मव्रुत्त लिहिलेलं होतं. ते वाचण्यापेक्षा फावल्या वेळात ती शीतलला आमच्या खोलीत खेळायला घेऊन येई मग शुभ्रा निवांतपणे वाचत बसे. 

एका रात्री मी,बजाबा व गावातली काही माणसं गप्पा मारत बसलो होतो. अमावस्या असल्याने झाडांच्या सावल्या अधिकच गडद भासत होत्या. झाडांतून वारा सू सू करुन घोंगावत होता. 

वासंतीने आम्ही अंधारात बसलोय म्हणून ओट्यावरची लाईट लावली आणि ती जोरात किंचाळली. ओट्यावरीर झोपाळ्यावर एक नववारी लुगडं नेसलेली बाई मंद गतीने झोके घेत होती. आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर ती दुसरी तिसरी कोण नसून शुभ्रा होती.

(क्रमशः)

सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now