Jan 23, 2021
माहितीपूर्ण

ऑनलाईन व्यवहार करताय.....जरा सांभाळून

Read Later
ऑनलाईन व्यवहार करताय.....जरा सांभाळून

 

 

 

 

पंकज आज मला तब्बल बारा ड्रेसेसची ऑर्डर मिळाली आहे. खूप आनंदीत होत गौरी पंकजला, तिच्या नवऱ्याला सांगत होती. अरे वा! खूप छान तुझ्या मेहनतीला यश मिळत आहे तर. पंकजलाही खूप आनंद झाला हे ऐकून. हे करत आहेस पण या धावपळीत स्वतः च्या तब्बेतीची पण काळजी घे ग, खूप ओढाताण होत आहे तुझी,पंकज काळजीने म्हणाला.

हो घेईन मी माझी काळजी, तू काळजी करू नकोस. गौरी बोलली खरी पण पंकजच्या या प्रेमळ शब्दांनी तिला भरून आले होते. किती काळजी घेतो हा माझी, किती प्रेम करतो माझ्यावर, तिला वाटले. या व्यवसायात आज माझा चांगला जम बसत आहे त्याचे श्रेय ही त्यालाच जाते. त्याने विश्वास नसता दाखवला, त्याने प्रोत्साहित नसते केले तर आपण आज इतकी मजल मारूच शकलो नसतो, ती विचार करत होती.

पंकज आणि गौरी एक मधमवर्गीय जोडपे. पंकज सॉफ्टवेअर इंजिनिअर तर गौरीचे फॅशन डिझायनिंग झाले होते. तिची आवड लक्षात घेऊन पंकजने तिला तिचे बुटिक सुरू करण्याविषयी सुचवले होते, तिला आत्मविश्वास दिला होता, प्रोत्साहित केले होते, बुटीक सुरू करण्यासाठी सुरुवातीचे भांडवल पुरवले होते. सुरुवातीला खूपच कमी रिस्पॉन्स मिळाला तिला पण नंतर जसे तिने बनवलेले ड्रेस, तिच्या डिझाईन लोकांना समजल्या, आवडल्या त्यानंतर तिच्याकडे भरपूर ऑर्डर यायला लागल्या. तिच्या ड्रेस चे फॅब्रिक, ड्रेसची फिटींग, त्यांच्या युनिक डिझाईन लोकांनी डोक्यावर घेतल्या.

व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने तिने फेसबुकवर जे वेगवेगळे व्यावसायिक ग्रुप असतात त्याची मेंबरशिप घेतली, तेथूनही तिला ऑर्डर येऊ लागल्या. काम भरपूर वाढल्यामुळे तिने कामाला दोन मुली ठेवल्या. ड्रेस वेळेत बनवणे, नीट पॅकिंग करून कुरिअर पाठवणे, त्यांचे पेमेंट घेणे यात तिची दमछाक होत होती, पण हे तिचे पॅशन होते त्यामुळे या कामाचे समाधान तिला मिळत होते.

हे सगळे ठीक होते पण ऑनलाईन पेमेंट वगैरे गोष्टी तिच्यासाठी नवीन होत्या, हे व्यवहार तिचा नवरा पंकज पहायचा पण जेंव्हा तिला बाहेरून भरपूर ऑर्डर येऊ लागल्या तेंव्हा प्रत्येकवेळी पंकजला त्रास देणे तिला योग्य वाटत नव्हते त्यामुळे या गोष्टी आपल्याला येणे तिला गरजेचे वाटतं होते.

पंकजनेही आनंदाने तिला ऑनलाईन पेमेंट कसे घ्यायचे, कसे करायचे हे समजावले, यामधील खाचाखोचा समजावल्या, पेमेंट ऑप्शन जसे की फोन पे, गूगल पे, पेटीएम याची माहिती दिली. यामध्येही फसवेगिरी होऊ शकते त्यामुळे सतर्क राहण्यास ही सांगितले. गौरीने सर्व शिकून घेतले आणि बघता बघता या गोष्टी ती लीलया हाताळू लागली.बाहेरच्या ऑर्डर जास्त असल्याने तिचा संबंध वारंवार या गोष्टींशी येई.

अश्याच एका दिवशी कामात व्यस्त असताना तिला एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. हा कॉल व्हॉट्स ऍप वरून आला होता. समोरची व्यक्ती एक हिंदी भाषिक मुलगी होती आणि तिने तिचे लवकरच लग्न होणार असल्याचे सांगितले आणि त्यासाठी बारा डिझायनर ड्रेसेसची ऑर्डर दिली. गौरीला साहजिकच खूप आनंद झाला. बारा आणि तेही डिझायनर ड्रेसेस असल्याने खूप मोठी अमाऊंट होणार होती. त्या मुलीला तिची साइज, तिला हवे असणारे रंग वगैरे विचारून तिने फोन ठेवला आणि या सगळ्यांचे एकत्र किती पैसे होतील ते हिशोब करून उद्या सांगते असे सांगितले. त्या मुलीने उद्या परत फोन करेन असे म्हंटले.

इतकी मोठी ऑर्डर गौरीला पहिल्यांदाच मिळाली होती याची खूप मोठी रक्कम एकहाती तिला मिळणार होती. या सगळ्या आनंदात ती एक महत्त्वाची गोष्ट मात्र विसरली की फोन व्हॉट्स ऍप वरून आला होता आणि ही गोष्ट ती एका खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहे हे दर्शवित होती.

दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा पुन्हा एकदा फोन आला आणि यावेळीसुद्धा तिने व्हॉट्स ऍप वरच फोन केला होता. गौरीने सांगितलेली रक्कम तिने काहीही घासाघीस न करता मान्य केली. पेमेंटचा ॲडव्हान्स देण्यासाठी ती उद्या परत फोन करेन असेही सांगितले. मोठी पार्टी दिसत आहे गौरीला वाटले.

तिने आनंदाने काम सुरू केले. ही बातमी कधी एकदा पंकजला सांगते असे तिला झाले होते. रात्री जेवण वगैरे झाल्यावर ती आनंदाने पंकजला म्हणाली, पंकज अरे खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे आपल्याला, कालच व्हॉट्स ऍप वर एक कॉल आलेला मला, आपल्याला बारा डिझायनर ड्रेसेसची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठीची रक्कम त्या मुलीने कोणतीही घासाघीस न करता मान्य केली. गौरीच्या अंगात जणू उत्साहाचे वारेच संचारले होते.

कशावर....कशावर कॉल आलेला म्हणालीस तू? पंकजने सावध होत विचारले.

अरे व्हॉट्स ऍप वर. निरागसपणे गौरी म्हणाली.

का? व्हॉट्स ऍप वरच का केला असेल कॉल, तुला प्रश्न नाही पडला? पंकजने विचारले.

हो पडला खरा, पण असतील ना एखाद्याची काही कारणं. असे वाटले.

हे इतकं सोपं आहे असे वाटते का तुला, पंकजने घाईत तिला विचारले.

कशी बोलली ती मुलगी तुझ्याशी?

छान बोलली, हिंदी भाषिक होती. पुण्याला ऑर्डर पाठवायची आहे असे म्हणाली.

हे बघ गौरी हे वाटते तितके सोपे नाही असे मला वाटत आहे. या अगोदर कधी तुला व्हॉट्स ऍप वरून कॉल आला होता का? अधिरतेने पंकजने विचारले.

नाही ही पहिलीच वेळ आहे. अरे पण इतके काय झाले व्हॉट्स ऍप वरून फोन आला तर. थोडे वैतगतच गौरीने विचारले. आनंद होण्याऐवजी हा कसल्या गोष्टींचा किस काढत बसलाय हेच तिला समजत नव्हते.

अग बाई तुला समजत नाही का, व्हॉट्स ऍप वरच्या कॉल चे रेकॉर्डिंग करता येत नाही.

हे बघ हा फ्रॉड नसेलही पण आपण सावध राहायला हवे,पण माझा सिक्स्थ सेन्स सांगत आहे की यात काहीतरी धोका आहे.

कारण आत्ताच चार पाच दिवसांपूर्वी माझ्या कलिगच्या बहिणी बरोबर अशीच घटना घडली आहे, ऑनलाईन इंटरव्यूसाठी तिला एक QR कोड पाठवला आणि सांगितले तुम्हाला नोकरी हवी असेल तर 49 रुपयांची अमाऊंट स्कॅन करावी लागेल.ती स्कॅन केल्यावर तुम्हाला इंटरव्यूसाठी बोलावले जाईल. तिने ही रक्कम स्कॅन केल्यावर पुढच्या क्षणाला तिच्या खात्यातील सगळी रक्कम दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाली.

हे ऐकून गौरी घाबरली. पंकजने तिला धीर दिला आणि सांगितले उद्या परत फोन येणार आहे ना, मी एक काम करतो उद्या मी घरीच थांबतो आपण आपल्या दुसऱ्या फोनवर तिचे रेकॉर्डिंग करूयात.

दुसऱ्या दिवशी परत त्या मुलीचा व्हॉट्स ऍप वर फोन आला. पंकज तयार होता त्याने त्याच्या मोबाईल वरून त्यांचे रेकॉर्डिंग करणे सुरू केले. ती मुलगी म्हणाली " दीदी ये ऑनलाईन पेमेंट वगैरा मुझे पता नही, ये मेरे भाई से बात करो ये जैसे बताता है वैसे आप करो" गौरी ने पंकज कडे पाहिले, पंकजने इश्याऱ्याने तिला होकार द्यायला सांगितले.

गौरीने होकार देताच त्या मुलीने तिच्या तथाकथित भावाला फोन दिला. तो मुलगा म्हणाला " दीदी मे आपको फोन पे पर 5 रुपये का QR कोड भेजता हू. आप आपके फोन गॅलरी मे जाकर वो QR कोड स्कॅन करना और सेंड ऑप्शन जाकर  आपका UPI ID डालो और सेंड करो, वो 5 रुपये सक्सेसफुली आपके अकाउंट में ट्रान्सफर होगे. उसका स्क्रीन शॉट निकालके मुझे भेजना मे आपका ऍडव्हान्स तुरंत भेज देता हू.

पंकजच्या सर्व प्रकार लक्षात आला. आता त्याने फोन घेतला आणि समोरच्या त्या मुलाला झापायला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे समोरून फोन कट झाला.

गौरी पुरती घाबरली होती. खूप मोठा फ्रॉड होता होता राहिला होता. पंकजने तिला शांत केले आणि तिला समजावून सांगू लागला. हे पाच रुपये घेण्याच्या नादात आपण जर तो QR कोड चुकून जरी स्कॅन केला असता तर आपल्या अकाऊंट मधली सर्व रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाली असती. हे हॅकर्स खूप हुशार असतात जे लोक फोन पे, गूगल पे किंवा पेटीएम वापरतात अश्या लोकांचे नंबर मिळवतात त्यांच्या UPI कोड वरून त्यांचे डिटेल्स मिळवतात, काहीनाकाही लालच देऊन त्यांना QR कोड पाठवतात आणि UPI ID टाकून ठराविक रक्कम स्कॅन केली त्या व्यक्तीचे सर्व पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर होतात.

पंकज आणि गौरी लगोलग पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी ही सर्व माहिती पोलिसांना सांगितली सोबत रेकॉर्डिंग ऐकवले. त्यावर पोलिस म्हणाले ते खूप धक्कादायक होते. पोलीस म्हणाले ही खूप मोठी चेन आहे. जामतारा- झारखंड, बिहार, यूपी, पंजाब मधून या गोष्टी होत आहेत. फेक आयडी बनवून हे हॅकर्स लोकांना लुबाडत आहेत. खोटे नाव, खोटे ठिकाण, दुसऱ्याचा कोणाचा तरी व्हॉट्स ऍप नंबर वापरून या गोष्टी करत आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे ते जो नंबर वापरतात तो ट्रेस करता येत नाही म्हणून त्यांना शोधनेही कठीण जाते. आत्तापर्यंत भल्या भल्या लोकांना यांनी लुबाडले आहे. तुम्ही सावधानता दाखवलीत म्हणून मोठ्या आर्थिक फटक्यापासून वाचलात.

मैत्रिणींनो ही जरी एक काल्पनिक कथा असली तरी यातील सांगितलेल्या गोष्टी अगदी १००% खऱ्या आहेत. हल्ली सायबर क्राईम प्रमाण खूप जास्त वाढले आहे. त्यातही या पॅन्डयामिक सिच्युएशनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, बिझनेस बंद पडले आहेत त्यामुळे चोऱ्यामाऱ्या, लुटमार यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आणि यामध्येही काही डोक्याने अतीहुशार असणारे लोक असे सायबर गुन्हे घडवून आणत आहेत. पोलिस प्रशासनही यावर ठोस पावले उचलू शकत नाही कारण या लॉकडाऊन मुळे त्यांच्या तपासकार्यावरही बंधने येत आहेत.

आत्ताच मध्ये या विषयावर भाष्य करणारी 'जामतारा' नावाची वेब सिरीज आली आहे. झारखंड मधील जामतारा मधून हे हॅकर्स कशी हॅकिंग करतात यावर प्रकाश पाडला आहे.

मध्यंतरी माझ्या मैत्रिणीला एक फोन आला होता  त्यात त्या माणसाने असे म्हटले की सरकारच्या नवीन योजनेनुसार एक ठराविक रक्कम सरकार आपल्या खात्यात जमा करणार आहे तेव्हा तुम्ही तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे चार नंबर आम्हाला द्या. पण मैत्रीण हुशार तिला लगेच समजले की काहीतरी फ्रॉड आहे. तिने फोन लगेच कट केला.

लक्षात घ्या, असे फुकट पैसे कोणालाही, कसेही मिळत नाहीत. आणि सरकार जरी कोणत्या योजना आणत असेल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती प्रसार माध्यमांद्वारे जनतेला कळवत असते.

या सगळ्यात आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे. कोणतेही पैशाचे व्यवहार करताना, ऑनलाइन व्यवहार करताना खूप सावध आणि सतर्क राहिले पाहिजे. खूप कष्टाने, घाम गाळून कमावलेल्या पैशाचे मोल आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. हे पैसे कोण्या तीसऱ्याचा हातात जाऊ नयेत म्हणून सावध राहा, सतर्क राहा. शेवटी पैसा हे सर्वस्व नसले तरी पैशाशिवाय काही चालतही नाही तेही तितकेच खरे आहे.

धन्यवाद
©अश्विनी रितेश बच्चूवार