Jun 14, 2021
ललित

आईची साडी - मायेचा तो एक धागा

Read Later
आईची साडी - मायेचा तो एक धागा

# आईची साडी # मायेचा तो एक धागा
---------------------------------------------------

'आई' या शब्दात जेवढा गोडवा तेवढाच तिच्या सर्व वस्तूंमधे. आई, शब्द उच्चारल्यावर जो मायेचा स्पर्श स्पर्शून जातो तोच ती नसताना तिच्या वस्तू हाताळताना होतो. तिच्या मायेची ऊब जेवढी तिच्या स्पर्शातून जाणवते तेवढीच ऊब ती नसली तरी तिच्या आभासी जगात जाणवते.

आई आणि तिच्या साड्या हे समीकरण तर प्रत्येक घरात बघायला मिळतं. मग आई कितीही मॉड असो, साडी हा प्रत्येकच स्त्रीचा विक पॉईंट असतो. कितीही साड्या असो कपाटात, प्रत्येक सणासुदीला, लग्नाला घरातील आई नामक व्यक्तीमत्वाला साडी हवीच असते.

मला आठवते माझी आई. माझ्या आईला कॉटनच्या साड्यांचे प्रचंड वेड होते. कॉटनच्या साडीत एक वेगळा फील येतो, व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसतं आणि एकदा साडी व्यवस्थित नेसली की परत परत ती सावरावी लागत नाही, हे तिचं ठाम मत. कॉटनची साडी नेसण्याची तिची ढब अगदी वाखाणण्याजोगी होती. साडीच्या प्रत्येक निरीची घडी, मग त्याच्यावर ती तिची लांब लांब बोटं घासून इस्त्री करायची ती पद्धत सगळंच खूप छान होतं. कधी साडी नेसताना एखादी घडी नीट नाही आली की वैतागायची. तिला साडी नेहमी अगदी टापटीप नेसलेली लागायची. सर्व निर्‍या, पदर, साडीची प्रत्येकच घडी कशी छान दिसली पाहिजे. साडी, वार आणि रंग याचं एक तिचं वेगळं समीकरण होतं. मग एखादा सणवार वर्किंग डे ला आला की सणावाराला साजेशी पण जास्त झगामगा नसलेली अशी साडी. मुख्य म्हणजे एवढा सगळा व्यवस्थितपणा अगदी सकाळच्या घाईगडबडीत अगदी थोड्याच वेळात आटोपला जायचा. कधी घाई झाली म्हणून जाऊदे आज पदराच्या तीनच निर्‍या काढूया असं कधी झालंच नाही. कपाटातला आईच्या साड्यांचा कप्पा म्हणजे कलकत्ता साड्यांचा खजिनाच होता. आमच्याकडे एक कलकत्ता साडीवाला यायचा दर पंधरा दिवसांनी. दरवेळी येताना एक तरी नवी डिझाइन तो घेऊन यायचा. दरवेळी तो आला की एक तरी साडी त्याच्याकडून आई घ्यायचीच. हळूहळू तो पण घरातलाच झालेला.

२००१ मधे आई गेली. कॉलेजला होते मी तेव्हा. आता तिच्या साड्यांचं काय? एक तर त्या कॉटनच्या साड्या. जास्त दिवस तशाच घडीवर ठेवूनही उपयोग नव्हता. काही साड्या माझ्या मावश्या आईची आठवण म्हणून घेऊन गेल्या. काही आम्ही एका अनाथाश्रमात दान केल्या तरीही काही बाकी होत्या. त्या तशाच होत्या एवढी वर्ष कपाटात. एकदा मी माहेरी गेले तर वहिनीने सगळं कपाट काढलेलं लावायला. तिनेही लग्न होऊन घरी आल्यानंतर त्या काढून नाही टाकल्या. आमच्या भावना त्यात गुंतलेल्या म्हणून तिनेही त्या जपून ठेवलेल्या. काही ती सुद्धा वापरायची. काही साड्या माझं लग्न झाल्यावर मी घेऊन आले. नवरात्रीचे रंग फॉलो करताना बर्‍याच वापरल्या. शेवटी कॉटन ते! आता त्या जुन्या वाटू लागल्या पण टाकवत नव्हत्या. आईच्या मायेची ऊब होती त्यात. जपून ठेवल्या.

२०१९ मधे जान्हवी झाली. जून महिना, पावसाळा होता तेव्हा! दुपटी पुरायची नाहीत. एका साडीची छान दुपटी बनवली. एका साडीचे मोठाले तुकडे केले आणि तिला अंग पुसायला वापरले. काय माहित? कदाचित आईचीच इच्छा असेल नातीला असं कुशीत घ्यायची?

आई हे एक विश्व आहे, ज्याचा कधी अंत नाही. ती असताना ते विश्व आपल्याला तिच्या बोलण्यातून, स्पर्शातून जाणवतं तर ती नसताना ते आपल्याला तिच्या आठवणीतून, तिने वापरलेल्या वस्तूतून जाणवतं. आणि आईची साडी हा मायेचा असा एक धागा असतो जो कायम आपल्याला तिच्या अस्तित्वाची हमी देत असतो. अशी आहे माझी ही छान आठवण माझ्या आईच्या साडीविषयी. कशी वाटली तुम्हाला? नक्की कळवा ????. 
                                                   - आरती शिरोडकर

           ----------------  समाप्त ----------------

Circle Image

Aarti Shirodkar

Business Analyst

साहित्य माझा आवडीचा विषय. असंच काही साहित्य, माझ्या मानातलं, माझ्या लेखणीतून.