Login

अनोखं हळदीकुंकू

Mother in law gives a new vision to her sister in law by way of arranging Sankranti Haldikunku at home as Sankranti is the festival of change i.e. 'Makarsankraman'.

"अनोखं हळदीकुंकू"

"सावनी, अग कसल्या विचारात आहेस? आवरून घे भरभर. चल बायका येतीलच इतक्यात. आणि हे काय नथ नाही घातलीस ती. सौरभला हे अजिबात आवडणार नाही. आणि हो ते मंगळसूत्र वगैरे पण घाल हं." एवढं सांगून मृदुलाबाई पुढच्या कामाला निघूनही गेल्या.  सावनी मात्र सासूबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच राहिली. तिच्या डोळ्यासमोरून भरभर मागची जवळजवळ १२ - १३ वर्ष गेली. जवळ जवळ एक तपाहून जास्त काळ ती त्यांच्यासोबत होती पण तिला अजूनही वाटत होतं आपण यांना ओळखलंच नाही. सावनी म्हणजे सावनी पाटील कोल्हापूरच्या aarmy man मोहन पाटीलांची सून. मोहन पाटील आणि मृदुला पाटील यांना कोल्हापुरात कोणी ओळखत नाही असं नव्हतंच मुळी! कै. मोहन पाटील यांच्या नावाचा जसा गाजावाजा होता तसाच त्यांचा मुलगा लेफ्टनंट सौरभ पाटील हे नावही खूप आदराने घेतलं जात होतं. लेफ्टनंट सौरभ यांना मागच्याच वर्षी काश्मीर खोऱ्यातल्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात वीरमरण आलं. आणि त्या धक्याने त्यांची पत्नी सावनी आणि १० वर्षांचा अभिजित अगदी हादरून गेले. अभिजित तसा सगळं कळायला थोडाफार मोठा होता त्यामुळे त्याच्या आयुष्यात वडिलांची एक पोकळी निर्माण झाली होती खरी. पण आता हळूहळू तो वडील जाण्याचं दुःख थोडं विसरत होता. शाळा आणि इतर शिकवण्या यातच त्याचा दिवस सरत होता. सावनीच्या मागे पण तसे बरेच घरचे व्याप होते. पण रात्री मात्र एकटं असल्यावर तिला सौरभच्या विचारांनी मन भरून यायचं. नाही म्हंटल तरी १२ वर्षांचा संसार होता त्यांचा. पण मृदुलाबाई मात्र अगदी खंबीर होत्या. सावनी ला राहून राहून वाटायचं सासूबाई इतक्या शांत कशा? सौरभचं पार्थिव आलं तेव्हाही त्या शांत होत्या आणि आजही. आणि परवा तर त्यांनी एक विचित्र फर्मान च काढलं. "सावनी आपण संक्रांतीचं हळदीकुंकू करणार आहोत आणि तू ते सगळ्यांना द्यायचं आहे." बापरे! हे काय सांगतायत सासूबाई. तिने मृदुला बाईंना विचारलं देखील. "आई, अहो हे काय बोलताय तुम्ही? सौरभ ला जाऊन एक वर्ष होतंय जेमतेम आणि हळदीकुंकू मी कसं करू? तो माझा अधिकार नाही." असं म्हणत ती रडायलाच लागली. पण मृदुला बाई मात्र ठाम होत्या. त्यांनी भामाबाई ज्या त्यांच्याकडे कामाला होत्या त्यांच्याकडून सगळी तयारीही करून घेतली. सावनी ला छान काळ्या रंगाची काठपदराची साडी आणली. आणि आदल्या रात्री जेवणं आटोपल्यावर त्या सावनीच्या खोलीत आल्या. अभिजित शांत झोपला होता. पण सावनी जागी असेल हे त्यांना माहीत होतं. त्यांना तरी कुठे झोप लागत होती. ती झोपळ्यावर बसली होती त्या तिथे आल्या आणि त्यांनी सावनीच्या डोक्यावरून हात फिरवला. सावनी गडबडीत उठली. "आई तुम्हाला हवं आहे का काही? मला सांगायचं न, मी आले असते." तेव्हा त्या कसनुसं हसत झोपाळ्यावर बसल्या. थोडा वेळ शांततेत गेल्यावर मृदुलाबाई बोलत्या झाल्या. "आपला सौरभ इथेच कुठेतरी असेल न ग?" असं आकाशाकडे बघत म्हणताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. "आई, अहो हे काय? सौरभ गेला त्याच्या महिन्यानंतर तुम्हीच तर मला सांगितलंत आता अश्रू ढाळायचे नाहीत. सौरभ ला नाही आवडणार ते. मग हे काय आता?" मृदुला बाई आता तर अगदी हुंदके देत रडू लागल्या. त्यांना अगदी भरून आलं होतं. मग थोडंस सावरत त्या म्हणाल्या," हो ग. एक स्त्री म्हणून मी ते सांगू शकते.  पण आई म्हणून किती काळ थांबवू स्वतःला. तू परवा म्हणालीस न हळदीकुंकू कशाला? पण त्या मागची माझी भावना वेगळी आहे. तुमचं लग्न होण्याआधी सौरभने माझ्याकडून एक promise घेतलेलं." हे ऐकल्यावर सावनी ने विचारलं, "काय ते?" मृदुलाबाई म्हणाल्या, "अग त्याला लग्न अजिबात करायचं नव्हतं. म्हणजे लग्न आवडत नव्हतं किंवा नको होतं असं नाही पण उद्या मला म्हणजे त्याला काही झालं तर माझ्या आईसारखं माझ्या बायकोला वैधव्याचं आयुष्य जगायला नको हा एकमेव विचार होता त्याचा. पण मीच मागे लागले होते त्याच्या. त्याखातर तो तयार झाला ही. शिवाय तू त्याला मनापासुन आवडली होतीस हे एक बरं झालं. पण बोहोल्यावर चढण्याआधीच्या रात्री ह्याच झोपाळ्यावर बसून त्याने मला निक्षून सांगितलं होतं नव्हे, प्रॉमिस च घेतलं होतं. आई मी लग्न करतोय. मला सावनी आवडली पण आहे. पण मला आत्ताच तू वचन दे की उद्या जर मला काही झालं तर तू तिला लग्न झाल्यावर ती जशी वावरेल आणि राहील तशीच ती मला कायम हवी आहे. आत्तासारखीच हसरी, मिश्किल! अगदी तशीच्या तशी. तिने सगळं अगदी सधवा स्त्रीचं आयुष्य जगायचं. आणि हो तिला दुसरं लग्न ही करुदे हवं तर.  माझ्यात किती काळ जीव अडकवून ती एकटी राहणार."  मी अचंब्याने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, "अरे हे काय बोलतोयस तू? तुला काही होत नाही." पण तो मात्र पक्का लेफ्टनंट होता. आपल्या म्हणण्यावर ठाम अगदी. त्याने मला समजावलं,"असंच काही नाही ग आई. आणि मी म्हणतो तसं नाही झालं तर बेस्ट आहे. पण लेफ्टनंट म्हणजे काय असतं हे मी तुला सांगायला नको. बाबांचा आदर्श घेऊन मी यात जायचं ठरवलं अगदी मनापासून आणि आवडीने. पण सावनीने मात्र माझ्यानंतर तुझ्यासारखं एकटं एकाकी आयुष्य घालवू नये असं वाटतं मला." त्यानंतरही तो पुष्कळ वेळ अगदी भरभरून बोलत होता आणि मी त्यावेळी मान्य नसतानाही त्याला हवं तसं प्रॉमिस दिलं.
त्यावेळी मला त्याचा खूप राग आला होता. पण खरं सांगू? आज ते सगळं आठवून खूप समाधान वाटतंय. तू साजशृंगार तसाच आधीसारखाच करावास असं आता मलाही वाटतंय. अग सौरभ काय असातसा नाही गेलाय. वीरमरण आलं त्याला. आणि तू वीरपत्नी आहेस. तेव्हा तुझा आदर्श तुझा मुलगा आणि हे सगळं जग घेईल. देशातल्या इतर स्त्रियांनी तुझा आदर्श घेतला पाहिजे. जुन्या प्रथा आणि परंपरा किती काळ जोपासून ठेवायच्या. चांगल्या आहेत त्या घायच्या, बाकी जमतील तशा बदलायच्या. बदल हा च तर या संक्रांतीचा म्हणजेच संक्रमणाचा गाभा आहे न? आणि नवरा गेला म्हणून काय झालं? स्त्रीचं एक स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि विधवेला असं नाही म्हणणार मी, पण नवरा नसलेल्या स्त्रीला इतर सामान्य स्त्रियांसारखं आयुष्य जगायला मिळालंच पाहिजे. हो की नाही?" मृदुला बाई डोळ्यातले अश्रू पुसत एकदम झोपळ्यावरून उठल्या आणि सावनीला म्हणाल्या, "चल उठ बाळ तयार हो उद्यासाठी. सौरभ पण त्या क्षणाची वाट बघतोय जेव्हा तू संक्रांतीचं हळदीकुंकू करशील. आणि हो इतर बायका काय म्हणतील या कडे अजिबातच लक्ष देऊ नकोस. ज्यांना यामागची आपली भावना आणि दृष्टिकोन कळेल त्या येतील बाकीच्या राहुदेत. असं म्हणून त्या निघून गेल्या आणि सावनी आकाशातल्या लूकलुकत्या चांदणीकडे कृतकृत्य होऊन बघत होती आणि ती सुद्धा आता उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होती केवळ तिच्या सौरभ साठी. आणि आज तो दिन उगवला होता अगदी तसाच, जसा सौरभ ला हवा होता. सौरभच्या फोटोकडे बघत ती नाकात नथ घालून, तो गेल्यानंतरही त्याच्या नावाचं १३- १४ वर्षांपूर्वी घातलेलं मंगळसूत्र परत एकदा घालून हळदीकुंकू करायला जाताना फोटोतून सौरभ छानसा हसतोय असा भास झाला तिला. 

।।शुभम् भवतु।।
✍️ सौ. अतुला प्रणव मेहेंदळे

फोटो गुगलवरून साभार????
(कृपया पोस्ट शेअर करावयाची असल्यास नावासकट करावी. ????)