Login

एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-26

The story is about a wandering young girl in search of her destination. Thank you

भाग 25 खालील लिंकवर क्लिक करून वाचा 

http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part-25_6355

एक उनाड वाट भाग-26
लंच करून झाल्यावर अनुभव सुबोध आणि ओशिन सोबत  स्टडीत बसून चित्रपट सोडून आणखी कुठे पैशाची गुंतवणूक करायला हवी याबाबत चिंतन मनन करत होता. आजी तिथे जाऊन धडकली. 

"मला कोणी सांगेल का कि काय चाललं आहे अनुभव तुझ्यात आणि इंदिरात." आजीनं स्टडीत बसलेल्या अनुभवला विचारलं. " आपण परतलो तेव्हाही सर्व गप्प होते. जातांना तर खूप अंताक्षरी, गंमती जमती झाल्या. मग येतांना इतकी शांतता का?"

"थकले असणार आजी ते. रात्री खूप उशीर झाला झोपायला." सुबोध भीतभीतच बोलला.

"मान्य कि थकले असतील. पण घरी आल्यावरही तुम्ही दोघं काहीच बोलत नाहीये. घरी आलो तेव्हापासून तु या दोघांसोबत इथे बसून त्या लॅपटॉप वर टिकटिक करत बसला आहे आणि  ती तिच्या खोलीत बसून रडकी गाणी ऐकत आहे."

"सॅड सॉंग आजी. 'आशिकी टु' चं 'पिया आये ना', सुन रहा है ना तु, झालं आताच, आता 'एक व्हिलन' चं तेरी गलिया सुरु आहे." सकाळीच गावाहून परतलेल्या शोभानं त्यांना अपडेट दिलं.

"आलीस तु ! बरं झालं. तुझीच कमी होती."

"माझं काही चुकलं का?" शोभा चेहरा पाडून म्हणाली.

"माझंच चुकलं. मी इथे यायलाच नको होतं." आजी संतापली हे पाहुन शोभानं तिथून पळ काढला. 
"आता बोलणार का अनुभव काय बोललास तु इंदिराला कि ती इतकी दुःखी आहे?" आजीनं अनुभवला चिडून विचारलं.

"आजी मीडिया इंदिरा आणि अनुभवच्या हात धुवून मागे लागलेली दिसतेय." सुबोधनं आजीला सांगितलं, "आम्ही तेच डिस्कस करत होतो इथे बसून."

"हुम्म्म त्या मेल्यांना दुसरं काही कामच नाही. काय करणार त्यांचं पोट यावरच आहे. झणझणीत नवीन बातम्या त्यांना हव्या असतात. ज्या एकतर पॉलिटिक्स मधून त्यांना मिळतात नाहीतर बॉलिवूड जिंदाबाद. म्हणून मला ही चित्रपटसृष्टी आवडत नाही. पैसा प्रसिद्धी भरपूर आहे पण त्याबरोबरच मीडिया नावाची तलवार डोकयावर टांगती असतेच सदैव. पण इंदिराला तर माहितेय या इंडस्ट्रीत हे सर्व नेहमीचच. मग का इतकी त्रस्त दिसतेय ती? इतकं दुःखी मी तिला फक्त तिच्या आई बाबांचा तो व्हिडीओ आला होता तेव्हाच बघितलं." आजीनं थोडा विचार करून अनुभवला विचारलं, "तु इंदिराला नवीन चित्रपट साइन नाही करू दिला म्हणून नाराज आहे का ती?  तसं असेल तर करू दे ना तिला हवं ते. ती दिव्यासारखी नाहीये अनुभव."

"आजी तसं काहीच नाहीये." आतापर्यंत शांत बसलेल्या  अनुभवला समजलं आजीला खरं काय ते सांगितल्या शिवाय गत्यंतर नाही, "आजी मी तिला अधिकारी पदासाठी स्पर्धा परीक्षा देता यावं म्हणून अभ्यास करायला बाहेर पाठवायचं ठरवलं आहे. म्हणून ती नाराज झाली आहे."

"पण तिला अभ्यास करायची, परीक्षा द्यायची काय गरज आहे? काय कमी आहे घरात अनु बाळ? काही प्रॉब्लेम झाला का? तसं असेल तर माझं सोनं मोड. तसंही बँकेत लॉकरमधे सडतच आहे ते."

"आजी, आजी तसलं काहीच नाही."

"मग सरळ सांग काय झालं? माझा जीव धडधड करतोय आता."

"हे वाच काय छापलं यांनी" अनुभवनी आयपॅडवर आजीला वेगवेगळ्या वर्तमान पत्रात त्याच्या विषयी छापून आलेली बातमी दाखवली,
"इंदिरा बनली अनुभवच्या हातातली कट्पुटली,
अनुभवचं नवीन खेळणं इंदिरा,
नक्की कोण कोणाचा फायदा उचलतोय? इंदिरा कि अनुभव?
यांचं अफेअर फक्त एक पॉप्युलॅरीटी स्टंट तर नाही ना?
अनुभव खरंच इंदिराशी लग्न करेल का?
अनुभवला नवीन कोणी भेटलं कि इंदिराचा विसर पडेल का? "
"आजी मला हे असलं आयुष्य नाही द्यायचं आहे तिला, ज्यात सतत आपल्यावर नजर ठेवली जाते, आपलं आयुष्य आपलं राहतच नाही. कधी कोण काय छापून टाकेल, अफवा पसरवेल काहीच सांगता येत नाही इथे. बरं इतकं सहन करून काय फायदा जर तिच्या आई बाबांनी तिला स्वीकारलं नाही. शेवटी खूप मनस्ताप झालाय त्यांना. इंदिरा ही फिल्ड सोडून परीक्षा पास होऊन घरी जाईल तेव्हा त्यांना अभिमान वाटेलच ना कि चित्रपट करणं ही फक्त त्या काळाची गरज होती म्हणून तिने तो चित्रपट केला अन गरज संपताच ती परत तिच्या धैयपूर्तीला लागली. त्या सिनेसृष्टीच्या ग्लॅमरस जगात अडकून पडली नाही."

"अनुभव तु इतका विचार करतोय?" आजी त्याच्याकडे वाकली.
"आजी यापेक्षाही महत्वाचं तिनं स्वतःला केलेलं प्रॉमिस कि ती BDO लेव्हलची अधिकारी बनून दाखवणार. मी ऍग्रीकल्चर सोडून चित्रपटासाठी ऑडिशन दिलं, हिरो झालो. जवळ जवळ तीन चार वर्ष तु अबोला धरलास माझ्याशी. आई गेली तेव्हा कुठे तु माझ्याशी बोललीस. पण तुटकच!" अनुभवनी आवंढा गिळला.

"तु ठीक आहेस अनुभव?" सुबोधनं त्याला विचारलं.

"हो." अनुभव आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन सांगू लागला,  "आजी मजबुरी होती माझीआजोबा गेल्यावर बाबांनी आपली कात्रजची शेत जमीन विकली. इतकंच नाही त्यांना बिजनेसमधे झालेला लॉस भरून काढण्यासाठी आपलं फार्म हाऊसही गहाण ठेवलं. जेव्हा मला हे समजलं माझ्यावर खूप ताण आला. कसंही करून मला फार्म हाऊस सोडवायचं होतं. तुला काही सांगायचं म्हटलं तर आधीच तु आजोबा गेले व बाबांनी आईला सोड चिट्ठी दिली म्हणून खूप टेंशनमधे असायची. त्यात तुझा हार्टचा प्रॉब्लेम. आईही आजारी होती. नाहीतर तिनं सांभाळून घेतलं असतं. पण तीही नव्हती. अशा परिस्थितीत जे सुचलं ते केलं. कॉलेजचे मित्र चित्रपटाच्या ऑडिशनला जात होते. मीही गेलो त्यांच्या सोबत. त्यांचं कोणाचंच सिलेक्शन झालं नाही. मला मात्र हिरोच्या रोलची ऑफर मिळाली. काय कसं झालं माहित नाही. डायरेक्ट कोहलींना माझी अडचण सांगताच त्यांनी मला तिस लाखाचा चेक साईनिंग अमाऊंट म्हणून दिला. 

मी फार्म हाऊस सोडवून घेतलं तेव्हा असं वाटलं जणू आजोबाचं एक स्वप्न वाचवण्यासाठी मी दुसरं गहाण ठेवलं. चित्रपटही सुपरहिट झाला. कोहलींनी परत दुसरा चित्रपट मला ऑफर केला. मला नाही म्हणता आलं नाही. मी या इंडस्ट्रीत पुरता गुरफटलो, तुही अबोला धरलेलाच होता, आई गेली मग परतीची वाट तरी कोणासाठी पकडावी म्हणून मी तेच आपलं नशीब समजून घेतलं."

"तु एकट्यानेच इतकं सहन केलं अन मी तुलाच काहीबाही बोलली, तुझा रागराग केला. मला माफ कर बाळा." आजी अनुभवच्या केसांना कुरवाळत आणि डोळे पुसत त्याला म्हणाली.

"आजी प्लीज माफी वगैरे नकोस मागू. मी आज तुला गिल्टी वाटावं म्हणून नाही सांगितलं हे सर्व तर तु इंदिराला का मी परीक्षा दे म्हणतोय हे समजून घ्यावं म्हणून सांगितलं. काही दिवस त्रास होईल तिला. पण हळूहळू सवय होईल आपल्या शिवाय राहायची. तिच्यात स्पार्क आहे. फक्त तिचा तिला तो दिसत नाही. दाखवावा लागतो."

"I am sorry, I am very much sorry", आतापर्यंत दाराच्या आडोशाला उभी राहून सर्व ऐकत असलेली इंदिरा दारातच रडत उठाबशा काढू लागली, "मी खूपच मूर्ख आहे. मी समजून घ्यायला हवं होतं कि काही कारण असेल म्हणून तुम्ही माझ्या इतकं मागे लागलेत अभ्यास करायच्या. मी करेल अभ्यास आणि BDO लेव्हलची अधिकारीच काय कलेक्टरही बनणार." आजीला संतापलेलं पाहुन शोभानं इंदिराला स्टडीत पाठवलं होतं. 

"इंदिरा माझी नक्कल नको करू, ये बस इकडे." अनुभवनी तिला आत सोफ्यावर बसवलं.

"संध्याकाळ झाली आहे. मी हातपाय धुवून दिवा लावते बाप्पा पुढे." इंदिरा त्याला म्हणाली.

"ओके !"

"मी चहा लावते. इथे आणू कि डायनिंग टेबलवर?" शोभानी विचारलं.
"तुला जिथे वाटेल तिथे आन. घेऊन घेऊ आम्ही." आजी शोभाला म्हणाली, "पण एक नक्की तु लग्न झाल्यावर सासूचा मार खाणार आहेस बाई."

"आजी ती कुठे सासरी राहणार आहे. आठ दिवसांनी परत इथेच येणार आहे आपलंच डोकं खायला ." उषानं आजीला सांगितलं तसे सर्व हसले.

"चला रडायचा आणि हसायचा दोन्हीही कार्यक्रम उरकले. हातपाय धुवून या हॉलमधे. आज सर्व मिळून पूजा करू. महादेवाला धन्यवाद देऊ कि त्यांनी माझ्या नातवाला स्वतःच्या दमावर उभं राहायची आणि सर्व दुःख एकट्याने सहन करण्याची हिम्मत दिली."

"हो आजी."

 सर्व हातपाय धुवून संध्या आरतीला हॉलमधे आले. धूप दीप चा सुगंध चहूकडे दरवळला. महादेवाचे दर्शन घेऊन सर्व चहा घ्यायला बसले.

"तुझे आजोबा नेहमीच म्हणायचे महादेवाच्या भक्ताने एकदा तरी केदारनाथला जावंच."

"हो आजी. तुमचं ज्या वर्षी केदारनाथला जायचं ठरलं त्याच वर्षी पिसमेकर बसवल्यामुळे तुला आराम करावा लागला आणि नाही जमलं जायला तुला त्यांच्या सोबत."

"हो, आता एकच शेवटची इच्छा आहे. एकदा मला घेऊन चल केदारनाथला. पाय असते ना साबूत तर मीच जाऊन आली असती एकटी."

"असं का बोलतेस आजी? तुझा एकमेव नातू आहे मी. मी नक्कीच नेणार तुला केदारनाथला."

"मी परीक्षा पास होऊन आल्यावर." इंदिरा न राहवून बोलली, "मलाही केदारनाथला यायचं आहे."

"आम्ही दोघंबी येऊ." चहाच्या कपांचा ट्रे घेऊन येत शोभा म्हणाली.

"आपण स्वतःची गाडीच घेऊन जाऊ. म्हणजे सर्वांनाच सोबत जाता येईल." सुबोधनी ओशिनकडे बघत सल्ला दिला.
"म्हणजे तिथेही माझा पिच्छा पुरवणारच तुम्ही लोकं."

"लाल चुनरिया वाली दुल्हन घर मेरे भी लाओ
मै कुंवारा कबतक बैठू,
मेरी शादी करवाओ,
मेरी शादी करवाओ... " इंदिरानी गाणं म्हणून नक्कल केली.

"हे काय? तुझंही उरकावुन टाकु का लगे हाथ?" आजीनं हसून अनुभवकडे इशारा करत विचारलं.

"मी तर कधीची तयार आहे. पण तुमचा.... (अनुभवनी तिच्याकडे हा विषय नाही काढायचा अशा इशाऱ्यात मान हलवली.) जाऊ द्या ते. मी हे गाणं सुबोध साहेबांना आता कसं वाटतंय ते सांगण्याच्या उद्देशाने म्हटलं."

"बाई बाई किती हा उतावीळपणा सुबोध. तूझ्या आईला भेटावंच लागेल मला." आजी त्याला चिडवत म्हणाली.

"आमच्या लग्नाचं बोलायला तुलाच भेटावं लागेल ना आईला. " सुबोध ओशिनला बघून म्हणाला. परत एकदा हास्याचा फवारा फुटला.

डिनर झाल्यावर इंदिरा अनुभवच्या खोलीत त्याच्याशी बोलायला गेली.

"आत येऊ?"

"ये. पण तुला कधीपासून परवानगीची गरज भासली माझ्या खोलीत यायला?" त्यानं आश्चर्यानं विचारलं.

"जेव्हापासून तुम्ही मला तुमच्यापासुन दूर पाठवायचं कारस्थान रचलं."

"इंदिरा..."

"जाऊ द्या ते. मी हे विचारायला आली होती कि, पंधरा दिवसांनी शोभाचं लग्न आहे. त्यासाठीही नाही थांबू मी?" इंदिरानी केविलवाणा चेहरा करून विचारलं.

"अजिबात नाही. तेव्हापर्यंत 'प्यार एक एहसास ' रिलीज झाली असेल, तु आणखी जास्त चर्चेचा विषय बनशील आणि पत्रकार परत तूझ्या मागावर असतील. तेव्हा तु उद्याच सकाळी जायचं दार्जिलिंगला."

"काय?"

"हो, तिथे एका बोर्डिंग स्कुलमधे तुझी राहायची व्यवस्था केली आहे. तूझ्या आजूबाजूला कुठेच चित्रपटसृष्टीचं कोणी असणार नाही. ऑनलाईन क्लासेस अटेंड करायचं आणि  निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यास करायचं. ओके !"

"काय  ओके? इतकी जड झाली मी तर आउट ऑफ इंडिया पाठवा मला नाहीतर आर्क्टिक प्रदेश एकदम बेस्ट. म्हणजे झंझटच नाही. इग्लू मधे राहणार आणि अभ्यास करणार."

"हा पण बोर झालं कि तिथल्या पेंग्विनचं डोकं खाशील तू. म्हणून नाही पाठवत तिथे. नाहीतर पहिली चॉईस तेच होतं."

"व्हेरी बॅड जोक मिस्टर अनुभव सिन्हा." इंदिरा त्याचा गळ्यात हात टाकुन त्याला किस करायला पुढे झाली.

"इंदिरा रात्र खूप झाली आहे. जाऊन झोप." अनुभवनं प्रेमानं तिचे हात गळ्यातुन काढले.

"आपण लग्न करून घ्यायचं का मी तिकडे जायच्या आधी." जाता जाता इंदिरा त्याला म्हणाली.

"इंदिरा मला तुला परत परत नकार द्यायला अजिबात चांगलं नाही वाटत आणि तु अशाच गोष्टी विचारतेस ज्याला मला नकार द्यावा लागेल." अनुभव तिला कळवळून म्हणाला.

"कारण मला वाटतं आता मन बदलेलं तुमचं, नंतर बदलेलं म्हणून मी विचारते." तिचे डोळे भरून आले.

"लग्न करायला काहीच हरकत नाही. माझी आजी तर रेडीच आहे माझ्या डोक्याला बाशिंग बांधायला. आई नाही. बाबाला काही घेणं देणं नाही. पण तुझे आई बाबा आहेत. बहिण आहे. त्यांना न सांगता, भेटता, त्यांचा आशीर्वाद न घेता लग्न करणं योग्य नाही. आणि आपण तुझी त्यांच्याशी भेट व्हावी म्हणूनच सगळं करतोय.  काहीच दिवसांची गोष्ट आहे. परीक्षा पास झाली कि भेटायला जाऊ त्यांना आणि तेव्हाच लग्नाचंही बोलु आपल्या."

"खरंच !"

"अगदी खरं !"

"ओके पण मी ऐकलं कि बॉलिवूडमधे लग्न व्हायच्या आधीच हनिमूनला जातात. आपणही जायचं? तुम्ही दार्जिलिंगला येणार ना सोडायला मला तेव्हा हॉटेलात दोन दिवस मज्जा करण्याबद्दल काय विचार आहे तुमचा!" इंदिरानं मोठ्ठी स्माईल चेहऱ्यावर आणून, डोळे मोठे करून विचारलं.

"नाही. परीक्षा पास झाल्या शिवाय काहीच नाही."

"किस पण नाही."

"तुला किस घेता येतो?" त्यानंही खोडकर होऊन विचारलं. 

"नाही. पण तुम्हाला तर येत असेल ना ! तुम्ही घ्या. मी इथेच आहे."

"बघ, आवडलं नाही तर मी जबाबदार नाही."

"ओके ! चला लवकर घ्या." इंदिरा घट्ट डोळे मिटून म्हणाली.

अनुभवनी तिच्याकडे प्रेमानं एक नजर भरून बघितलं. मग त्याच्या हातांच्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला आणि तिच्या  कपाळावर ओठ टेकवले. मग दोन्हीही गालांचं चुंबन घेतलं, तिच्या नाकाला स्वतःचं नाक लावलं आणि हनुवटीची पप्पी घेतली. तिला दाराच्या चौकटी बाहेर करून म्हणाला,

"इंदिरा आता जाऊन झोप. ह्या सर्व गोष्टींसाठी पूर्ण आयुष्य आहे आपल्या समोर. एकदा आपल्यात काही झालं तर तु यातच गुरफटशील."

"ठीक आहे. माझ्यासाठी इतकंच खूप आहे." ती लाजून त्याला म्हणाली. "गुड नाईट !"

"गुड नाईट !" अनुभवही म्हणाला. 

"यही डुबे दिन मेरे 
यही होते है सवेरे 
यही जीना और मरना 
यही मंदिर और मदिना... 

तेरी गलिया, तेरी गलिया 
मुझको भाये तेरी गलिया... " 

दुपारी ऐकलेलं आशिकी टु चं गाणं गुणगुणत उडया मारतच इंदिरा तिच्या खोलीत झोपायला गेली. 

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

0